गाडीतल्या स्वच्छता गृहाचे पाणी संपले आहे ही आनंद वार्ता सुद्धा त्याच सुमाराला समजली आणि चहा प्यायची हिंमत होईना. शेवटी सगळ्याजणी बाहेरचा निसर्ग पाहू लागलो. डोळ्याला हिरवाई सुखावत होती. गच्च दाट झाडी! त्यामधून वळसे घालत जाणारी डौलदार वाट हे पाहायला मिळाल्यावर सगळ्या तक्रारींचा विसर पडला.
आणि एकदाचे मडगाव आले सुद्धा. ओंकार धारवाडकर आम्हाला घेऊन जायला आलाच होता. आम्ही दोघांनी एकमेकांना पाहीले नव्हते त्यामुळे आता याला ओळखू कसा असा विचार करतानाच एक अगदी गोड, उमदा, दोन्ही गालाना खळ्या पडणारा मुलगा ओळखीचे हसू दाखवत आमच्यापाशी आला. त्याच्याकडे पहिल्यावर परकेपणा वाटलाच नाही. त्याच्या सोबत आम्ही सात मैतरणी निघालो. त्याला मी आधीच कल्पना दिली होती की तो आता आमच्या तावडीत सापडला आहे आणि जितके प्रश्न आणि शंका विचारू त्या सगळ्याला त्याला उत्तरं द्यावीच लागणार होती.
हल्लीच्या काळातल्या कॉम्प्युटर इंजिनीअर झालेल्या ओंकार ने एकही दिवस कोडिंग चे काम केलेले नाही. डिग्री मिळाल्यास तो गेली आठ वर्षे जंगले पालथी घालतोय झाडे वेली पाने पशु पक्षी याना निरखतोय त्यांचे फोटो काढतोय. नुकत्याच त्याच्या निसर्ग छाया चित्रणाला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.
गाडी मडगाव केपेम रस्त्यावरून धावत होती. वाटेत रिवोना जांबवली अशी गावे लागत होती. एकीकडे ओंकार सोबत संवाद सुरू झाला होता आणि त्याच्याशी गप्पा मारता मारता डोळे बाहेरच्या रसरसलेल्या निसर्गात सुद्धा गुंतून जात होते. त्याच्याशी बोलू की बाहेरचे लोभस दृश्य पाहू असा गोड संभ्रम पडत होता.
गाडी हळूहळू चढ चढू लागली आणि दीड तासाच्या प्रवासानंतर आमचा नेत्रावली अभयारण्यामध्ये प्रवेश झाला. वळणा वळणाचा रस्ता सुरू झाला. छोटासा घाटच म्हणा ना. अतिशय निबिड अरण्याच्या पोटात आम्ही शिरत होतो. नजर जाईल तिथे गर्द झाडी. सह्याद्रीचे हे सदाहरित म्हणजेच एव्हरग्रीन फॉरेस्ट.
गाडी गावात शिरली. आम्हाला होम स्टे होता. म्हणजेच आम्ही तिथल्या ग्रामस्थांच्या घरी मुक्काम करणार होतो. ते जे खातील तेच खाणार होतो पिणार होतो. एका वेगळ्याच अनुभवला सामोरे जायला आम्ही खूप उत्सुक होतो. गावात अगदी मोजकीच घरं होती आणि तीसुद्धा उंच उंच चढणीवर. सात जणी असल्याने चौघी एक घरी आणि तिघी दुसऱ्या घरी असे ठरले होते. आम्हा तिघींना मिळालेले घर गावातले सर्वात शेवटचे होते. तिथे व्हरांड्यात खुर्चीत बसून पोटभर निसर्ग पहायची लाजबाब सोय होती.
घरात शिरल्या शिरल्या “गंजण” नामक पेयाने आमचे स्वागत झाले. गंजण म्हणजे गवती चहा पाण्यात उकळून त्यात चवीपुरती साखर घालतात.कडकडीत गरम गंजन पोटात गेल्यावर एकदम तरतरी आली.
घरात सामान ठेवून,रेल्वे मध्ये टाळलेल्या “काही कृती” करायच्या होत्या. नाही म्हणायला थोडी धाकधूक होतीच. पण अतीव स्वछ स्वछता गृह पाहून ज्या काही थोड्या चिंता होत्या त्या दूर झाल्या.
थोडेही शिक्षण न झालेल्या या खेडुताना ओंकार च्या “मृगया” संस्थेने खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. होम स्टे साठी काही नियमावलीच केली आहे.
- मदिरा पानास सक्त मनाई आहे. पाहुण्यांना मनाई आहेच पण जिथे तुम्ही राहणार त्या घरानेही तो नियम पाळायचा आहे.
- स्वच्छता गृह (कमोड सिस्टिम) आणि त्याची कमालीची स्वच्छता. त्याच्या बाहेर असलेले पांढरेशुभ्र बेसिन (अगदी शुभ्र टॉवेल आणि डेटॉल liquid सोप सकट)
- राहणाऱ्या पाहुण्यांना घरातल्या त्यांच्या खोलीत जाण्या येण्यासाठी स्वतंत्र दरवाजा
- ज्या घरी राहायची सोय आहे त्यांचा प्राथमिक व्यवसाय हा शेतीच असला पाहिजे.
हे निकष पाळणाऱ्या घरातच होम स्टे असतो. यातील कुठलाही नियम मोडणारे घर बाद ठरते. आदिवासींना त्यांचा स्वतःचा शेतीचा व्यवसाय सांभाळून यातुन अधिक उत्पन्न मिळते.
आमची राहायची सोय वेगवेगळ्या घरात होती पण आम्हाला सातही जणींना एकत्र जेवायचे होते आम्ही तशी विनंतीच केली होती म्हणून गावातल्या महिला बचत गटाला जेवण खाण्याचे कंत्राट दिले होते. बचत गटांचीही एक यादी केलेली असते त्यामुळे ही काळजी घेतली जाते की प्रत्येक बचत गटाला संधी मिळेल.
जेवण जेवायलाही उतरंडीच्या रस्त्यावरून उतरून पुन्हा काही चढ उतार करूनच जायचे होते. आम्ही तिथे गेल्यावर अतिशय हसतमुख शिडशिडीत बांध्याच्या सावळ्या वर्णाच्या पण निरोगी पणाचे तेज असलेल्या महिला आमच्या स्वागताला हजर होत्या. शेणाने सारवलेल्या अंगणात आम्ही बसलो होतो. जेवण त्यांच्याच पद्धतीचे असावे असा मृगया चा आग्रह असतो,जो आम्हाला मान्य होता,नव्हे नव्हे आम्हाला त्याबद्दल खूप कुतूहल होतं. फुटी कढी नामक अतिशय चविष्ट पेयाने जेवणाची सुरुवात झाली. फुटी कढि म्हणजे सोलकढीच पण त्यामध्ये नारळाचे दूध घालत नाहीत आणि मिरची लसूण हिंग याचा थोडासा वापर करून त्याची लज्जत वाढवतात. आम्ही प्रत्येकीने तीन तीन वाट्या फुटी कढि रिचवली. दुसरा वेगळा पदार्थ म्हणजे “कढी” ज्यामध्ये आपण वापरतो तसे ताक न घालता नारळाचा घट्ट चव आणि त्यामध्ये एखादे आंबट फळ जसे की बिमला किंवा छोटी कैरी. (बिमला म्हणजे तोंडल्या सारख्या आकाराचे आंबट फळ) त्या आंबट गोड चवीच्या कढीला सुद्धा आम्ही योग्य तो न्याय दिला. (आम्ही सहसा कुणावरच अन्याय करायचा नाही हे पक्के ठरवले होते), लाल माठ, हिरवा माठ, त्यांनतर खतखत नामक गोवन पदार्थ ज्यामध्ये समस्त कंद वर्गीय भाज्या घातलेल्या होत्या,त्यातल्या कुठल्याही भाज्या बाहेरच्या गावातून किंवा शहारातून आणलेल्या नव्हत्या. तिथेच रुजलेल्या, त्या जंगलाची नैसर्गिक चव भिनलेला होत्या या सर्वांच्या जोडीला भात लोणचे पापड कोशिंबीर असे सारे काही होतेच. जे आम्ही शहरात कधीही अनुभवलेले नव्हते अशा चवीचे ते ग्रामीण जेवण आम्ही पोटभर जेवलो. आणि आम्हाला तृप्त करणाऱ्या त्या समस्त सुगरणींना बाहेर बोलावून खाणाखुणा करून आमची पोचपावती दिली. भाषा हा अडसर ठरलाच नाही मुळी. त्या सगळ्या शिडशिडीत बांध्याच्या , तुकतुकीत वर्णाच्या आरोग्यसंपन्न स्त्रियांचे केस,केशभूषा आणि त्यातली पुष्प रचना पाहाणे हे सुद्धा आमच्या आकर्षणाचा विषय ठरले होते. कुणी अबोलीची वेणी, कुणी गडद रंगाच्या रतन अबोली ची कलाबुतीसह, कलात्मकपणे विणलेली वेणी, कुणी चक्क जास्वंद आणि कुणी ऑरचिड सुद्धा माळलेली होती. त्यांच्या केशरचना निरखणे हा सुद्धा तिथल्या निसर्ग अनुभवण्याइतकाच निखळ आनंददायी होता.
संध्याकाळी ओंकार त्याच्या पक्षी निरीक्षणाच्या दुर्बिणीसह हजर होताच. आम्ही त्याच्यासोबत निघालो.
गावात फेरफटका, तिथली भात शेती त्याच्या लसलसत्या हिरव्या पात्याना जवळून पाहणे, त्याची ओलसर हिरवाई डोळ्याने पिऊन घेणे असे अनुभव ओंकार आमच्यापुढे अलगद ठेवत होता आणि आम्ही सुद्धा त्या साऱ्याला कडकडून भेटत होतो. गावात काही जणांनी स्ट्राबेरी ची लागवड सुद्धा केली होती. ते पाहून वाटेत जागोजागी पक्षी निरीक्षण करत करत आम्ही आपापल्या घरी पोचलो. रात्री गरमागरम जेवण जेवून आम्ही झोपून गेलो. दुसऱ्यादिवशी पहाटे उठून रावण डोंगर चढायचा होता.
रात्रीच्या गडद अंधाराला अलगद बाजूला सारत, ढगांचे पापुद्रे सोडवत हळू हळू उमटणारी लालुस सूर्यकिरणे, पलीकडे पसरलेल्या डोंगररांगापलीकडून चाललेली रंगपंचमी, झुळूझळू येणारे वाऱ्याचे संगीत, या सोबतीला हवीहवीशी वाटणारी थंडी आणि त्यासोबत असंख्य पक्ष्यांचे कूजन, अशी अवतरली होती आमची पहाट. आमचे घर अगदीच उंच डोंगराच्या माथ्यावरचे असल्यामुळे व्हरांड्यात खुर्ची टाकून, निसर्गाच्या या विविध रंग नाद छटा पाहायचे सुख आम्ही मनमुराद घेत होतो.
आवरा आवरी करून आम्ही रावण डोंगराकडे निघालो. हा ट्रेक प्रत्यक्ष जंगलातून होता. अगदी पायवाट सुद्धा नव्हती. ओंकार सोबतीला असल्यामुळे प्रत्येक झुडूप,झाड,पक्षी इतकंच काय प्राण्यांच्या विष्ठा सुद्धा तो ओळखून आम्हाला दाखवत होता.रानखजुर म्हणजेच शिणोली, कुंभा, खाजकूयली, किंजल, फर्न, करमल, तमालपत्र, जायफळ अशी विविध झाडं, वृक्ष पाहत पाहत, पालापाचोळा तुडवत कधी दगड खडकांमधून वाट शोधत,कधी काटेरी वेलिनी, ओरबाडून घेत तर कधी जांभळूल्या रानफुलांची रांगोळी पहात पहात, आम्ही पुढे पुढे जात होतो.
तासाभराचा चढणी नंतर रावण डोंगराचा माथा आम्ही गाठला. सणसणत येणारे वाऱ्याचे बाण टोकदार असले तरी सुखावह होते. त्यांचा तो झुळझुळुत येणार नादस्पर्श आम्ही मिटल्या डोळ्यांनी घेत होतो. चौबाजुनी कधी गडद, कधी फिक्या काधि तांबुस कोवळ्या हिरव्या रेषा पांघरून बसलेले समाधिस्त डोंगर पाहणे हा अंतर्मुख करणारा शांतसा अनुभव घेत घेत एका पठार सदृश जागेवर आम्ही सगळे बसलो होतो.
ओंकार आणि त्याच्यासोबत च्या दोन volunteers बायका नी आमचा नाश्ता सोबत घेतला होता. अतिशय तलम नीर डोसा आणि भरपूर खोबरे घातलेली चटणी. असा नाश्ता आणि त्यासोबत गरमागरम गंजण. शुद्ध हवेचे झोत च्या झोत. आम्हाला गुदगुदल्या करत होते. चौबाजुनी डोंगर माळा. नेत्रा ला दिसणारी आवळी (माळ) म्हणूनच कदाचित नेत्रावळी असे नाव होते त्या अभयारण्याचे. मागच्या बाजूला दुसरे घनदाट जंगल दिसत होते ते होते कोतेगाव वाइल्ड life sanctuary चे. आणि त्याही पलीकडे दिसणाऱ्या डोंगर रांगा होत्या कर्नाटकातल्या.
खाली उतरायची इच्छा नव्हती पण क्रमप्राप्त होतं. त्यामुळे उतरायला लागलो. ते उतरणं तर चढण्यापेक्षाही कठीण होतं. पाऊण तासात आम्ही, खालच्या, आम्ही राहत असलेल्या गावात पोचलो. तिथेही आमच्या घरवाली ने गरमागरम गंजण प्यायला देऊन आमचा शीण घालवला.
आंघोळी, जेवण, भरपूर गप्पा आणि थोडी विश्रांती अशा ब्रेक नंतर आम्ही सगळे ताज्या दमाने सावरी धबधबा पाहायला निघालो. तिथे जाताना उलटा क्रम होता. आधी खूप खोलखोल पायऱ्या उतरून जायचे होते. त्या पायऱ्यांपर्यंत पोचायलाही जंगलातल्या हिरव्याकंच रानवाटा कुस्करत जायचे होते. जंगलाचा गूढगर्दपणा इथेतर अधिकच जाणवत होता. खाली उतरताना डावीकडे निबिड झाडी आणि उजवीकडे गर्द दरी. त्याची भीती नाही वाटली पण गूढता मात्र जाणवत होती. त्या सगळ्या अनुभवाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे नसलेली मानवी गर्दी. जणू तो सगळा अनुभव फक्त आणि फक्त आमच्यासाठी तयार केला गेला होता.
जवळ्पास अडीचशे पायऱ्या उतरल्यावर धबाबा वाजे तोय चे स्मरण करून देणारा घनगंभीर तोयनाद, काळ्या कभिन्न कातळाच्या काळजाला कापत कापत धरतीच्या उदरात उतरणारा तो पांढरा शुभ्र फेसाचा लोट च्या लोट पाहताना सारेच निःशब्द झाले होते. आम्ही आपापल्या जागा गाठल्या. नितळ थंड पाण्यात पाय सोडून बसल्यावर ब्रम्हांनंदी टाळी लागली होती. दुसरं काही जाणवत नव्हतं पाण्यात चाललेल्या छोटुल्या माश्यांच्या लयबद्ध हालचाली, अंगावर उडणारे तुषार, हिरव्या ओल्या वासाचा सुगंध हे सर्व तृप्त करणारं होतं. अभयारण्यात नेमणूक असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या, वेळ संपली, आता उठा या सुचनेचे पालन करण्यासाठी तिथले आसन आम्हाला हलवायलाच लागले. हळू हळू चोरपावलांनी अंधार सुरू होणार होता आणि रानातल्या अंधारात सुरू होणाऱ्या हालचालींना मान देत तिथून निघून जायची वेळ पाळायलाच लागणार होती.
आम्ही परतलो. आमच्या सुगरण वनभगिनी आम्हाला रोज नवनवीन पदार्थ खायला घालून खुश करत होत्या. आज तांदुळाच्या कलात्मक नाजूक शेवया त्यात ओला नारळ आणि बारीक चिरलेल्या गुळाची पखरण असा एक गोवन पदार्थ आमची वाट पाहत होता.आम्ही तीन तीन वाट्या भरून तो खाल्ला. भूक इतकी लागत होती की लगेच त्यानंतर झालेल्या जेवणालाही आम्ही अव्हेरले नाही. वेलकम ड्रिंक असलेली फूटी कढी तलम तांदुळाच्या भाकऱ्या ताज्या ताज्या लाल मठाची भाजी,खतखत, कढी आणि कोशिंबीर पापड लोणचे अशा रान मेजवानी वर आम्ही चांगलाच ताव मारला.
आजची रात्र तिथली शेवटची होती म्हणून झोपताना हुरहूर लागली होती दुसऱ्या दिवशी लवकर उठून ओंकार सोबत पक्षी निरीक्षणाचा अनुभव घ्यायचा होता
नेत्रावली मध्ये दोन तीन छोटे छोटे आदिवासी पाडे आहेत. आणि त्या लोकांची थोडीफार वर्दळ असते एक डांबरी रस्ताही केलेला आहे. पण त्याच्या मधोमध चालल्याचे दुर्मिळ स्वातंत्र्य, तिथे मिळते. कारण वाहने नसतातच मुळी. आणि जेव्हा केव्हा ती येतात तेव्हा तेव्हा त्यांचा आवाज इतक्या दुरुनही स्पष्ट पणे येतो की आपण त्या वाहनाला वाट द्यायला सावध असतोच. आम्ही पक्षी निरीक्षणासाठी कुठल्याही रानांत न शिरता केवळ रस्त्यावरून निघालो. ओंकार ची तरबेज नजर दुरदूरचाही पक्षी शोधू शकत होती. तो कानोसा घ्यायला लागला की अचानक स्थिर व्हायचा. त्याचा खांद्यावरच्या स्टँड अलगद पणे खाली उतरवून त्यावर दुर्बीण सेट करू लागायचा. मग आम्ही देखील आवाज न करता ओंकार ने शोधून काढलेल्या त्या चिमणुल्या रंगीत जीवाला डोळे भरुन पाहून घ्यायचो. व्हाईट चीक बार्बेट, रेड व्हीस्कर बुलबुल, फ्लेम थ्रोटेड बुलबुल, ग्रे हेडेड बुलबुल,क्रीम्सन बँक सन बर्ड, लोटेनस सन बर्ड, कॉमन अयोरा, ऑरेंज मिनिवेट, असे असंख्य पक्षी आम्हाला पाहायला मिळाले.
आता तिथला मुक्काम हलवायची वेळ आली होती मन आणि पावल सुद्धा जड झाली होती. तिथला शेवटचा नाश्ता खाऊन गंजण पिऊन सर्वांचा निरोप घेत घेत आम्ही निघालो.
सारेच निःशब्द होतो. दोनच दिवसात त्या मातीशी नाते तयार झाले होते. त्या डोंगर रांगा, मुक्त उधळलेल्या हिरव्या रंगाचा खजिना,खडबडीत पायवाटा, जागोजागी दिसणारे पक्षी, शुद्ध ताजी हवा,तुकतुकीत सतेज बांधेसूद आदिवासी, त्यांनी प्रेमाने खाऊ घातलेले पदार्थ आणि ओंकार च्या तीक्ष्ण नजरेने आम्ही घेतलेले निसर्ग दर्शन हे सारं काही केवळ अविस्मरणीय होत.
आता परतायचे होते शहराकडे,अशुद्ध हवेकडे,अतोनात गर्दी कडे आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनाकडे. (पण मनातला समाधिस्त डोंगर मात्र अबाधित ठेवून),कदाचित नव्या ताज्या दमाने सामोरे जाणे थोडे जास्ती सोपे होणार होते….



No comments:
Post a Comment