Aug 16, 2020

निर्णय

श्री सरस्वती प्रसन्न

              निर्णय

छोटं गाव,गावात कॉलेज,
शिकणारा मुलगा,मुलाची फी
फी साठी बाबा,बाबा त्रस्त,
बाबाचं पाकीट रिकामं!!!!
अक्षयच्या डोक्यात रिकामं पाकीट!!
गुरुजी झोपाळ्यावर,चिंतेच्या झुल्यात ,मागच्या वर्षीची डायरी गुरुजींच्या पुढ्यात!
श्रावण ते चातुर्मास बुकींग्स झालेली! आणि….आजची डायरी कोरी !!!
इतक्यात अक्षय आला,
त्याचा,वयाला न शोभणारा पोक्तपणा,अकालीच आलेला!
अभ्यासातलं शहाणपण आणि आयुष्यातलंही
वडलांच्या आर्थिक आणि भावनिक दोन्ही गणितांची उत्तरं शोधणारा.
“बाबा,फी कशी भरायची यावर्षी?” गुरुजींनी त्याची नजर टाळली.
बारावीचा त्याचा रिझल्ट आला तेव्हा त्यांनी देव्हाऱ्यात त्याची मार्कलिस्ट ठेवली होती.
“तू खूप शिकायचं आहेस,गावातल्या नव्या कॉलेजात तुझी अँडमिशन करणार!”असं वचनच दिलेलं!!

पाहिली दोन ,पैशाने सुरळीत गेलेली वर्षं!!अक्षयला अर्धी स्कॉलरशिप!!!!
देवळातल्या मानधनाची आणि संपूर्ण चातुर्मासातल्या दक्षिणांची टोटल केली की उरलेली फी भरता यायची!

पण मार्च पासून सगळं चित्रच बेरंगी झालंय.श्रावण चार दिवसांवर आलेला.
गुरुजी दिवसभर मोबाइलकडे टक लावून पहायचे.जरा आवाज झाला की एस.एम.एस चेक करायचे.

दरवर्षीची बांधलेली पन्नास एक घरं!!!धनवान,धर्मवान,दातृत्ववान यजमान!
धर्म आणि अर्थकारण दोन्ही साधत असे.
जूनपासून कॅलेंडर हातात घेऊन लोकं यायची,मनासारखा दिवस आणि वेळ ठरवायला!
लघुरुद्र,मंगळागौरी,झालंच तर वार्षिक सत्यनारायण हे ठरलेलं.
श्रावणीसोमवार तर अनकंट्रोलेबल असायचा.
पहिला लघुरुद्र पहाटे पाच,तिथून पुढे कमीतकमी दहा तरी असायचेच.
रात्री गुळण्या आणि हळद दूध याचा मारा घशावर!!!
श्रावण संपायच्या आतच भाद्रपदाचं बुकिंग!!!!
कित्येक घरच्या गणपती पूजा!!सगळ्याची नुसती रेलचेल.
उत्तम तांदूळ,केशरी पेढे-बर्फी, ताजी फळं, सुकामेवा,नारळ!!!!!!!
झोपाळ्यावरून ते उठले! कपाटातून कागदपत्रं काढली! 
बँकपासबुक्स एफ डी.,तशी सोय होईल फीची,पण........
त्याला हात लावायचा नाही असा बायकोचा आग्रह!
तिचं बरोबर आहे ,पुढच्या दृष्टीने सगळं पाहायला हवं ना.
दुखणी खुपणी,म्हातारपण,लेकीचं लग्न.जमलंच तर अजून मोठी जागा,
“बाबा, मी आमच्या प्रोफेसरशी बोलून थोडी मुदत मागून घेतली आहे!”

डोक्यात कल्पनांचं तांडव सुरू होतं.ऑनलाइन पूजा कुणीतरी सुचवली पण ते काही पटेना.

मास्क लावून पूजा सांगता येईल की…..,डिस्टन्स पाळायचं…….,आहे काय त्यात?
सरकारनं तेवढी *देऊळ बंदी* उठवावी, लोकं हळूहळू देवळात येतील आणि 
त्यांच्या डोळ्यासमोर मास्कधारी गुरुजी दिसले ना तरी पुढचं सगळं सोपं होईल.
इतक्यात फोन वाजला.अक्षरशः झडप घालून गुरुजींनी तो उचलला.

वैकुंठातल्या गुरुजींचा फोन होता.
“तुम्ही विचार केलात का?तुम्हाला दोन तीन आठवड्यापासून मी सांगतोय.
अहो दाहिनी बिघडायची वेळ आली इतकी संख्या वाढतेय.
तुम्ही माझं ऐका. क्रियाकर्म कुणी करायची ,कुणी नाही,हे नियम ठरवले कुणी?माणसांनीच ना?
आणि त्या माणसांसाठीच, त्यांच्या भावना जपण्यासाठी निदान मनुष्यधर्म पाळण्यासाठी इथे या”
कर्मसंकट मर्मसंकट धर्मसंकट सुद्धा.
फी भरली नाही तर लेकाच्या मर्मावर घाव.आणि जर तिथली कर्म केली तर कर्मसंकट,
कुठल्याही शुभकार्याला पौरोहित्य करण्यासाठी आमंत्रण यायचं नाही,असलं धर्मसंकट!
सगळी मंगलकार्य डोळ्यासमोर फेर धरून वाकुल्या दाखवत होती
लग्न,मुंज,वास्तुशांत,यज्ञ-याग,होम

आयुष्यभर लोकांच्यापत्रिकापाहिल्या.
स्वतःच्या पत्रिकेतला राहूकेतूयोग मात्र कळलाच नाही.
रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही!इतकी चित्रविचित्र स्वप्न पडत होती!
एकीकडे देव्हाऱ्यातली मार्कलिस्ट दिसत होती! दुसरीकडे निराश झालेला अक्षय दिसत होता.
शेवटी तर वैकुंठातली विद्युत दाहिनी आणि तिच्यासमोरच्या निष्प्राण रांगा दिसल्या!!
आणि…काळाच्या कोपऱ्यात लपलेली
 ती गोष्ट अचानक पुढे आली.

तीस वर्षांपूर्वीचा तो,अभ्यासात जेमतेम लक्ष!
हट्टाने दुकान घातलं,वडलांनी होतं नव्हतं ते सगळं त्यात ओतलं
पण अपयश आलं, दिवाळखोरी आली!घरात प्रचंड वादावादी!!!
जेमतेम विशीचा तो,डोक्यात राख घालून निघून गेला!
संतापून वैकुंठात जाऊन बसला. क्रियाकर्म करणाऱ्यांच्या दृष्टीस पडला.
शेवटी तिथलीच दीक्षा मिळाली! एक वर्षाचे *त्या विषयातले* रीतसर शिक्षण.
घरच्यांशी संपर्क तोडलेला.एका अंत्यसंस्काराच्या वेळी घरच्यांनी पाहिला,
आणि,हाय खाल्लेल्या,लेकाची वाट पाहणाऱ्या, आईसमोर नेऊन उभा केला.
मृत्यूपंथाला लागलेल्या आईने वचनात बांधून टाकलं.
एका वेदशास्त्रसंपन्न, दशग्रंथी विद्वानाला मध्ये घालून त्याचा रीतसर शुद्धीकरण विधी झाला...…….
काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेल्या,बलिष्ठ, उदार असलेल्या महान धर्मात ती लवचिकता होतीच
त्यामुळे शुद्धीकरणविधीनंतर तो शुभकार्यांचे रीतसर पौरोहित्य करू लागला!!
आणि तो सगळा पूर्वेतिहास काळाच्या कुलुपात बंद झाला.
त्यांच्या स्वप्नात काळाच्या पडद्याआड लपलेली आठवणींची भुतं फेर धरू लागली .
आणि त्यांना दरदरून घाम फुटला.
ते दचकून जागे झाले तेव्हा पहाटेचे फक्त चार वाजले होते.
त्यांनी बाहेर अंदाज घेतला.मुलं गाढ झोपलेली.
मुलाच्या भाबड्या चेहेऱ्याकडे पाहून त्यांना गलबलून आलं आणि,गेला आठवडाभर चाललेला शंकांचा लपंडाव क्षणार्धात थांबला.
अवघड असला तरी तो निर्णय आज घ्यायचाच आणि बायकोच्या कानावर घालायचा.
तिचे वडील दशग्रंथी ब्राह्मण,
धर्म-शास्त्राचे प्रकांड पंडित!
तिच्या या कर्मकांडांबद्दलच्या कल्पना खूप कर्मठ! ती हे कसं स्वीकारेल???

स्वैपाकघरात त्यांनी विषय काढला!“यावेळची फी कशी भरायची मोठा प्रश्न आहे! 
सगळा चातुर्मास,कोरडा जाणार आहे.रोग वाढतंच चाललाय,एकाही यजमानाचा अद्याप साधा फोनही नाही!
लघुरुद्र,मंगळागौर,सत्यनारायण,
गणपती,काही काही नाही यंदा!!”
बायकोचा चेहेरा उग्र!!! “मला काही सांगू नका!फी कशी भरता येईल ते सांगा!
गुरुजी,जिभेवरचे ओठावर कसं आणाव या विवंचनेत.
“अहो बोला ना. मी माझे दागिने सुद्धा दिले असते.पण ते लेकीच्या लग्नासाठी........."
तिला मधेच तोडत गुरुजी म्हणाले “अजिबात नाही मोडायचे, 
मला एकच पर्याय दिसतोय,
तुला मी वैकुंठातली क्रियाकर्म केली तर चालेल का? त्यांना पुरोहिताची नितांत गरज आहे.
क्षणात बायकोचा चेहेरा पांढरटला!!
“अहो काय बोलताय काय?लोक काय म्हणतील?भलतंच काहीतरी!!!मला नाही चालणार अजिबात.”
“का?का नाही चालणार? आज तिथे क्रियाकर्म करणारे कमी पडतायत.
हजारो मृत्य दिवसागणिक होतायत. चेहेरासुध्दा पाहायला मिळत नाही मेलेल्या माणसाचा.
नातेवाईकांच्या मनाची तडफड चालू आहे. अंत्यविधीसाठीसुद्धा जवळ यायला धजत नाहीयेत माणसं.

 अशावेळी माझ्यासारख्यानी तिथे धार्मिक विधी केले तर लोकांचं हरवत चाललेलं मनोबल थोडंतरी वाढेल ना? स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधायचा आहे.
ज्या लोकलज्जेची तुला भीती आहे,ते लोक आपल्या अडचणीत उपयोगी पडणार आहेत का?”गुरुजी ठाम होते 
आणि बायको संतापाच्या आवेगात तडफडत होती…...
तिने शेवटचं अस्त्र काढलं “तुम्हाला तिथल्या क्रियाकर्म विधीचं शास्त्रशुद्ध ज्ञान तरी आहे का? ….....
तिला थांबवत वादाच्याआवेशात ते
अनेक वर्षांपूर्वीचा फ्लॅशबॅक,बोलून गेले!!
तिला प्रचंड धक्का!!
अनेकवर्षांपूर्वीचं,लपलेलं कठोर सत्य!
मग मात्र धरणीकंप झाला,तिच्या असहाययतेचा,संतापाचा..
 नवऱ्याने केलेल्या(?) प्रतारणेचा!!
ती धुसफुसत घुश्यात माहेरी निघाली,
पंचवीस वर्षांपूर्वीची प्रतारणा वडलांच्या कानावर घालायला!!

मुलं उठून बसली.पंचवीस वर्षांत न पाहिलेल्या दृष्याच्या शॉकमध्ये.. 
सात्विक पित्याने केलेली प्रतारणा??
रडत रडत निघून गेलेली आई पाहून दोघही सुन्नाळले ….
फी पलीकडचा कुठल्यातरी सत्याचा गुंता,मुलांना कोडं घालून गेलेला.
“बाबा, फी चा विषय राहुदेत.पण आई रडत का गेली ते मला सांगा?”
लॉकडाउनच्या फटफटीत सकाळी,
निष्प्राण रस्त्यावरून,निःशब्द तिघे,
तिच्यामागे निघाले!
ऐंशी पार केलेले,तेजपुंज,दशग्रंथी विद्वान आजोबा दोन नातवंडांना आणि विझून गेलेल्या त्यांच्या लेकीला गुंत्यातून अलगद सोडवत होते.
“कुठलंही काम श्रेष्ठ कनिष्ठ असूच शकत नाही. असताच कामा नये.काय रे,तुझ्या इंजिनीरिंगमध्ये असते का एखादीच ब्रांच सर्वश्रेष्ठ?कुठलाही धार्मिक विधी श्रेष्ठ कनिष्ठ असूच शकत नाही.
मानवजातीला त्या त्या वेळेला जे गरजेचे असेल ते ते कर्म करत राहणे हाच खरा धर्म”
सुजलेल्या डोळ्यांनी लेकीने विचारलं “खोटं बोलणं, प्रतारणा करणं हे कुठल्या धर्मात बसतं बाबा?”
“पंचविस वर्षांपूर्वी तुझ्या या नवऱ्याचं शुद्धीकरण करणारा तो दशग्रंथी ब्राह्मण मीच होतो.मला त्याचा सगळा इतिहास माहीत असूनही मी तुमचं लग्न लावलं,याने कुणाचीच प्रतारणा केलेली नाही, फसवणूक केलेली नाही.आज त्याने त्याच मार्गाचा पुन्हा स्वीकार करायलाही काही हरकत नाहीये माझी!”
निःशब्द झालेली दोन्ही मुलं आणि आई घरी आली.
मात्र,एकीकडे सुटला असं वाटणारा प्रश्न,त्याच्या पोटात कितीतरी गुंते घेऊन होता!
गुरुजींचं चित्त थाऱ्यावर नव्हतं.
घरचे दारचे समजून घेतली ना?त्यांना कमीपणा तर नाही ना वाटणार? एक ना दोन अनेक शंका!!!

कुठेतरी एकटं जाऊन बसावं वाटत होतं, देवळाच्या बाहेरच्या एका बाकड्यावर ते बसून राहिले!!

एकीकडे असं वाटत होतं की आपण माणुसकीसाठी हा निर्णय घेतोय की स्वतःच्या स्वार्थासाठी?
जिथून स्वतःला सोडवून घेतलं तिथेच पुन्हा जातोय,नाईलाजाने.

दुसरीकडे वाटत होतं, महामारीच्या संकटात,संसर्गाची भीती न बाळगता केलेलं धर्मकृत्य, हे कितीतरी पुण्याईचं ठरणार होतं!
 शुभ आणि अशुभ याच्या पलीकडे नेणारे,पिंडी ते ब्रह्मांडी ईशतत्व एकच तर आहे!!
चिताभस्माची राख फसलेला शंकरच आणि लघुरुद्राच्या अभिषेकात भिजणाराही शंकरच आहे.
आणि त्या सर्व कल्पनांच्या पलीकडे नेणारा मनुष्यधर्म?? तो पाळायची संधी आज मिळते आहे!!

भवताली खूप ढगाळून आलं होतं..

गुरुजी घरी परत आले तेव्हा घरी सर्वजण वाट पाहात होते.
कुणीचकुणाशी बोलत नव्हतं.

शेवटी अक्षयने सुरुवात केली!!
“बाबा,आज माझ्या फी च्या निमित्ताने हा विषय निघाला,मी रोज पेपर वाचतोय आणि मृत्यूनंतरचे लोकांचे होणारे हाल वाचून त्रास होतोय.
जर आज डॉक्टर,नर्स,पोलीस यांच्याइतकी गरज कुणाची असेल,तर ती तुमच्यासारख्यांची आहे.
तुम्ही तिथे जाऊन धर्मकार्य केलंत तर,तुम्हीसुद्धा या लढाईत सहभागी असाल,आणि आम्ही तिघेही
तुमच्या सोबत आहोत. कमीपणा नाहीच उलट आम्हाला अभिमान वाटेल तुमचा"
आज धर्म,कर्म,मर्म सगळं एक झालं होतं.
पश्चातापाने विरघळलेल्या पत्नी सोबत आणि नव्या विचारांनी तेजाळलेल्या नव्या पिढीसोबत आयुष्याचा प्रवाह चालूच राहणार होता.
आज आभाळाच्या डोळ्यातून श्रावणाचा बांध फुटला होता.
बुरसटलेल्या कल्पना,अंधानुकरणाच्या चौकटी तोडून तो खळखळ वाहात होता.
तो,बंद देवळं भिजवत होता,
नदीघाटात झिरपत होता,हिरव्या शेतात कोसळत होता आणि जमिनीच्या भेगांच्या जखमा बुजवत होता.
देव्हाऱ्यातली पिंडी,निरांजनाच्या सुवर्णतेजात न्हायली होती,तिला हात जोडून,गुरुजींनी होकार सांगायला फोन उचलला.

योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे

9 comments:

  1. अप्रतिम....
    वर्मावर कोणाच्या घाव न घालता...
    धर्म, कर्म, मर्म एक व्हावं

    ReplyDelete
  2. Nice story.also shows flexibility of Hinduism orthodox and flexible at the same time

    ReplyDelete
  3. कथानकाला छान वेग आहे, वाचता वाचता ही सर्व दृष्ये डोळ्यासमोर तरळतात, व या साऱ्या घटना आपल्या भोवती घडून गेल्या आहेत, असे वाटते. विदारक अनुभवातून पुढे जात असताना मनाची कोलाहल नेटक्या शब्दात पकडली आहे. सुंदर लिखाण....

    ReplyDelete
  4. मनाचं द्वंद्व, विचारांची आंदोलन, समाजाचा धाक, कुटुंब कर्तव्य सगळ्या गोष्टींची अलगदपणे उकल केलीस.
    तुकाम्ह्णणे हरीच्या दासा
    शुभ काळ अवघ्या दिशा

    ReplyDelete
  5. वा!योगिनी नेहमी प्रमाणे अप्रतिम आणि नवीन विचारांना पुढे करणारी कथा. आज घडीला अत्यंत चपखल.

    ReplyDelete
  6. कोरोना ची परिस्थिची चांगली सांगड घातली आहेस

    ReplyDelete
  7. खूपच छान कथानक.. सध्याच्या परिस्थितीला अनुसरून आणि कथेला एक प्रकारचा वेग आहे.दृश्य डोळ्यासमोर उभे राहते,इतकी ताकद आहे तुझ्या शब्दातही आणि कथाबीजातही..

    ReplyDelete
  8. Khupch chhan lihilays❤️

    ReplyDelete