Aug 28, 2021

शेवटचं विमान

                        श्री सरस्वती प्रसन्न

@योगिनी श्रीनिवास पाळंदे,                                                                 शेवटचं विमान

मऊसूत दुलईमध्ये गुरफटलेली हीना आज मात्र नेहेमीसारखी झोपली नव्हती.

 रात्री झोपायला उशीर झाला होता.जावेद अमेरिकन सैन्यासाठी दुभाष्याचं काम करायचा. त्यामुळे त्याच्या घरी येण्याच्या वेळा अनिश्चित असायच्या. कैक वेळा त्याला रात्री घरी यायला उशीर व्हायचा.पण कितीही उशीर झाला,कडकडून भूक लागली तरीही हीना त्याच्यासाठी जेवायला मात्र थांबायची.

गरमागरम रोटी शेकून त्याच्या ताटात वाढून ती त्याच्या चेहेऱ्याकडे बघत बसायची.

रोटीसोबत लालेलाल कुर्म्याचा रस्सा असायचा.भुकेल्या जावेदने जेवणाचा पहिला घास घेतला की त्याच्या हिमशुभ्र त्वचेवर लाल छटा चढायची.

जेवण झालं की जावेद दिवसभरातल्या गोष्टीं तिला सांगत असे. 

त्याच्या अमेरिकन साहेबांचं,जॉर्जचं तो भरभरून कौतुक करायचा.गेल्या काही वर्षांत जावेदचा आणि जॉर्ज साहेबांचा ऋणानुबंध जुळला होता.

अमेरिकन आले होते ते तालिबान्यांना पळवून लावायला,पिचून गेलेल्या अफगाणींना अत्याचारांच्या गर्तेतून बाहेर काढायला आणि त्यांच्या प्रगतीच्या स्वप्नांना आर्थिक बळ द्यायला, यावर जावेदचा ठाम विश्वास होता.त्यामुळेच त्याच्या मित्रांनी केलेल्या विरोधाला न जुमानता तो अमेरिकन सैन्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांचा दुभाष्या बनला होता.

जावेदने त्याच्या लहानपणी दऱ्याखोऱ्यातून केलेली उनाड वणवण,त्याच्या अशी उपयोगी पडेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं.इंग्रजी जाणणारा,आणि त्या प्रदेशातल्या इंच-न-इंचाच्या खाचाखोचा जाणणारा जावेद अमेरिकन सैन्याने लगेच हाताशी धरला होता.त्याच्या मदतीने तालिबान्यांच्या लपायच्या अनेक जागांचा शोध अमेरिकन सैन्याला लागला होता.

जावेद खूश होता.आयुष्यात न ऐकलेली आणि न पाहिलेली रक्कम दरमहा पगार म्हणून हातात येत होती.आणि सोबत होतं जॉर्जने त्याला दाखवलेलं अमेरिकेत नेण्याचं लखलखीत स्वप्न!!!!

 *आम्ही तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही,आणि जर का गेलोच तर शेवटचं विमान तुम्हादोघांना घेतल्याशिवाय उडणार नाही!!!* 

जावेद आणि हीनाच्या गाढ निद्रेतही ते शेवटच्या विमानाचं स्वप्न कधीं चुकत नसे.

आज घरी आलेला जावेद मात्र खूप अस्वस्थ होता.

जेवण झाल्यावर तो काहीही न बोलता विमनस्क बसला होता.

तो काहीतरी बोलेल याची वाट पाहून शेवटी हीनाने त्याला विचारलं होतं”काही झालंय का?

नेहेमीसारखा बोलत का नाहिस?”

“तुझ्यापासून एक गोष्ट मी खूप दिवसांपासून लपवली आहे.हीना,अमेरिकन सैन्य आपला देश सोडून मायदेशी परत जायला निघणार अशी पक्की बातमी आहे!!!त्यांचं इथलं काम संपलं असं म्हणतायत जॉर्जसाहेब.”

हीनाला धस्स झालं.तिच्या पोटात मोठ्ठा गोळा आला.लहानपणी लपूनछपून शाळेत जाताना यायचा ना तस्सा.तरी ती उसनं अवसान आणून म्हणाली”जावेद हे कधीतरी होणारच होतं ना रे.शेवटी ते काही इथे कायम राहणार नव्हतेच ना?तू नको इतका अस्वस्थ होऊस.ते गेले तरी तुला कुठेतरी नोकरी नक्कीच मिळेल.आणि अगदीच काही नाही जमलं तर आपली शाळा आहेच ना रे.”

“हीना इतकं सोपं नाहीये हे सगळं.तालिबानींना आता रान मोकळं मिळणार आहे.त्यांच्या टोळ्या हळूहळू पुन्हा परत यायला सुरुवात झाली आहे.ते एकदा परत आले की सगळं चित्र विस्कटून टाकतील.गेल्या अनेक वर्षांत कणाकणाने झालेले कितीतरी बदल ते क्षणात नष्ट करतील.”

“अरे अमेरिकन सैन्य गेलं तरी आपल्या देशाचं सैन्य आहे ना आपलं रक्षण  करायला.तू कशाला काळजी करतोस.”

जावेदचं तिच्या समजवण्याकडे मुळीच लक्ष नव्हतं.

“मला मुळीच खात्री वाटत नाहीये कसली.तालीबानींकडे आधुनिक शस्त्रसाठे आहेतच आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांचा त्यांच्या मनात खदखदणारा सूड आहे.”

कसेबसे ते दोघेजण पलंगावर आडवे झाले.

हीनाच्या डोळ्यासमोर तिची अडाणी अम्मी होती,जिने हे भविष्य सुरुवातीलाच सांगून ठेवलं होतं.

हीना आणि तिच्या घरचे,ह्या विषयावर अनेकदा बोलले होते.

हीनाच्या अस्वस्थ डोळ्यांपुढे आज तिच्या बालस्मृती होत्या.

घरी तिच्या दोन बहिणी,अम्मी अब्बू, अब्बूची बुढि आई आणि या सगळ्यांना सोबत करणारं अखंड दारिद्र्य!!

बरं दारिद्रय परवडलं असतं पण घराबाहेरची सततची दहशत.रस्त्यावर पाऊल ठेवायची सोय नसायची.घराच्या भिंतींत कोंडून घेऊन हीनाची घुसमट होई.असं वाटायचं बाहेर पडावं आणि वारा प्यायल्यागत दिशाहीन धावत सुटाव.

अब्बू तिथल्या मोजक्या प्रगत विचारांच्या लोकांपैकी एक.

त्यांनी घरात पाऊल ठेवलं रे ठेवलं की घरात जादूची छडी फिरे.ते कितीतरी पुस्तकं घेऊन यायचे. मग घराच्या मळक्या भिंती रंगीत व्हायच्या.त्यावर फुलं उमलायची,फुलपाखरं भिरभिरायची.

अब्बू अतिशय पुढारलेल्या विचारांचे शिक्षक होते.त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून एक मुलींची शाळा सुरू केली होती. त्या शाळेत हीना आणि तिच्या बहिणी जात असत पण त्याशिवाय,अबूनी मुलींसाठी घरच्याघरीच इंग्लिश,इतिहास असे विषयही शिकवायला सुरवात केली होती.

इतिहास,भूगोलासारख्या रटाळ विषयांची अबूंमुळे परीकथाच व्हायची.

आठ वर्षांची हीना मोठया बहिणींसोबत शाळेत जात असे.त्यासाठी घरापासून अर्धातास चालावं लागे.

एकेकाळी हिरव्यागार झाडांनी डवरलेला तो रंगीबेरंगी रस्ता सततच्या बॉम्बहल्ल्यांनंतर ,आता मात्र उजाड झाला होता.होरपळून करपला होता.आकाशातून येणाऱ्या अग्नी गोळ्यांपासून,रस्त्यावरच्या पेरलेल्या सुरुंगांपासून आणि हातात विनाशाची खेळणी खेळवणाऱ्या तालिबानींपासून लपत लपत, जीव मुठीत घेऊन त्या शुष्क रखरखित रस्त्यावरून चालणं नको वाटे.

हीनाला बुरख्याचा मनसोक्त तिटकारा.पण जागोजागींच्या धर्मरक्षकांपासून खूप काळजी घ्यायला लागे.एकतर मुलींचं शाळेत जाऊन शिकणं आणि तेसुद्धा बिनाबुरख्याने रस्त्यावरून चालत जाणे,ह्या प्रमादाला माफी नव्हती.

 मग घरापासून शाळेपर्यंतची वाट बुरखा घालून धडधडत्या अंतकरणाने चालावी लागे.

शाळेत गेल्यावर मात्र हीनाला खूप मज्जा यायची.

 ती आणि तिच्या मैत्रिणी अभ्यास करायच्या, गोष्टी ऐकायच्या, गाणी म्हणायच्या.

 ते जगच वेगळं असे.

हो आणि घरी अम्मीने फुलवलेल्या बागेत एक दुसरंच स्वप्नील जग असे.

अम्मीच्या हाताला यश होतं. तिने लावलेली सगळी फुलझाडं, फळझाडं ताज्या ताज्या हिरव्या भाज्या यांनी परसबाग फुलली होती.

 त्या बागेत अबू इंग्लिशची उजळणी घ्यायचे.

 “रोझेस आर रेड,हीना बेटा इथल्या सगळ्या फुलांचे रंग इंग्लिशमध्ये सांग बरं.”असं अब्बू म्हणाले की हीनाची इंग्लिश रंगपरेड सुरू होई.

*रोझेस आर रेड* घोकणाऱ्या हीनाच्या आयुष्यात, *ब्लड इज ऑल्सो रेड* सांगणारा एक दिवस आला.

खूप भयंकर होती ती आठवण.

अब्बू घरी यायची वेळ होऊन चार तास उलटले होते.वाट पाहून सगळ्याजणी हवालदील झाल्या होत्या.मध्यरात्रीच्या सुमारास  घराचा दरवाजा धडधड वाजला.

धडपडत अम्मीने दार उघडलं होतं. दारात कपडे फाटलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत अबू उभे होते,आणि त्यांच्यासोबत चार तालीबानी!!!!!.त्यांनी रात्रीच्या प्रहरी घराची झडती घेतली होती.

अबुंची सगळी पुस्तकं त्यांनी घराच्या अंगणात रचून त्याची होळी केली होती.

“तुझ्या ह्या पुस्तकांची राखरांगोळी केलीये.आणि आज तुला सोडतोय.पण पुन्हा मुलींची शाळा सुरू झाल्याचं समजलं तर तुझ्यासकट तुझ्या या घराला जाळून टाकू.”तालिबनींनी निघता निघता इशारा दिला होता.

ती रात्र त्या सगळ्यांनीच,थरथरत्या शरीरानी, थिजलेल्या डोळ्यांनी,बधीर झालेल्या हृदयानी काढली होती.

बसलेला धक्का इतका मोठा होता की कुणाच्याच तोंडून शब्दही फुटत नव्हता.

आणि असं असताना,सकाळी अब्बू अचानक हसायला लागले.

ते हसणं बघून अम्मी घाबरून जोरात किंचाळली होती”हीना, अग सगळ्यांना बोलावं,बघ तरी ह्यांना काय झालंय. अहो तुम्ही असे हसता काय???रडलात तरी चालेल पण हसू नका हो असे!!!.मला बघवत नाहीये.”

हीना सगळ्या बहिणींना घेऊन अब्बूजवळ जाऊन बसली.

अब्बू हळू आवाजात म्हणाले “कुराने शरीफच्या खाली लपवून ठेवलेली सगळी पुस्तकं त्यांच्या तावडीतून वाचली.त्या राक्षसांनी तिथे पाहिलंच नाही.हीना बेटा, तुम्हाला सगळ्यांना अल्लानेच हा संदेश दिलाय.तुम्ही पुस्तकं वाचा,अभ्यास करा,शाळेत जा आणि कितीही संकटं आली तरी शिक्षण थांबवू नका.आपल्या देशाला प्रगतीपथावर न्या”

अम्मीला आणि दादीला हसावं की रडावं तेच कळेना.

ज्या स्त्री-शिक्षणाच्या कारणामुळे अब्बूचे अक्षरशः हात पाय तोडेपर्यंत मारहाण झाली होती,त्या स्त्री शिक्षणाचं महत्व, जीवघेणा हल्ला होऊनही,अब्बूच्या मनातून जात नव्हतं.

अम्मी म्हणाली”बास झालं तुमचं ते शिक्षण!!!!मी माझ्या मुलींना आजपासून शाळेत पाठवायची नाही.आज तुम्हाला इतकं मारलंय त्या हैवानांनी. उद्या आपल्या पोरींना मारतील,विद्रुप करतील,अत्याचार करतील.ह्या मुली शाळेत जाऊन सुखरूप परत येईपर्यंत सततची भीती मनात असते.मला त्या तणावाचा उबग आलाय अगदी.मला नकोय ते दहशतीच्या सावटाखालचं आयुष्य.”

अब्बूनी तिला हातानेच शांत केलं,आणि म्हणाले”हे दिवस लवकरच जाणार आहेत.अमेरिकन सैन्य आपल्या मदतीला येणार आहे.तू बघतच राहा.”

“हे दिवस जाणार आहेत” ह्या वाक्याने जादू केली होती.

मुली अब्बूना जास्तीच चिकटल्या होत्या.अम्मी आणि दादीसुद्धा हातातली कामं टाकून ऐकायला येऊन बसल्या होत्या . पण अम्मीला मात्र अब्बूचं म्हणणं खरं वाटत नव्हतं. तिने  भाबडी शंका विचारली होती. “पण का येईल अमेरिकन सैन्य आपल्या मदतीला?आपल्याकडून त्यांना काय मिळणार आहे??ते येतील आणि थोड्या दिवसांनी आपल्याला एकट टाकून निघून जातील.ह्या राक्षसांच्या तावडीतून सोडवायला कुणीही इथे कायमचं येणार नाहीये.आपल्याला आपलं आयुष्य असंच रडत कुढत काढायचं आहे.”बोलता बोलता अम्मीच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या.

अब्बूची तीक्ष्ण बुद्धी,त्यांचा अभ्यास,त्यांचं वाचन आणि तिथल्या बुद्धिवंतांशी असलेले घनिष्ठ संबंध ह्या सगळ्यामुळे काळाच्या पुढचं भविष्य ते जाणत होते.त्यांनी अम्मीला शांत केलं

त्यादिवशी अब्बू अफगाणिस्तानच्या राजकारणाबद्दल खूप खूप बोलले.

“अमेरिकेत दोन वर्षांपूर्वी झालेला हल्ला हे निमित्त आहे.आणि त्याचा सूड घायला ते इथे येणार हे जरी सत्य असलं तरी,आपल्या देशात तालिबानींना टक्कर देणारं लोकशाही सरकार जर कुणी स्थापन करू शकणार असेल तर ते फक्त अमेरिकाच!!!! भले त्यांचा स्वार्थ असेल,पण आपल्या देशात प्रगती होण्याची ती एक मोठी संधी असणार आहे हे निश्चित.”

हीनाला फारसं काही समजण्याच्या वयाची ती नव्हतीच मुळी.पण तिला इतकं मात्र समजलं होतं की.अमेरिकेच्या रूपाने कुणी मसीहा येणार आहे.

त्या दिवसापासून तिच्या स्वप्नांना वेगळेच रंग मिळाले.काहीतरी चांगलं घडणार आहे, ह्या अब्बूनी दिलेल्या विश्वासाने त्या सगळ्यांचंच छोटंसं जग हरखून गेलं होतं. मुली जास्तच जोमाने अभ्यास करायला लागल्या होत्या.

हीनाने अब्बूनी लपवून ठेवलेली सगळी पुस्तकं हळूहळू वाचायला सुरुवात केली होती.

बाहेरच्या जगात काय चाललंय, तिथली लोकं कशी राहतात, कशी वागतात,तिथल्या आपल्या वयाच्या मुली कशा असतात,हे सगळं वाचल्यावर तिचा आयुष्याकडे पहायचा नजरियाच बदलला होता

सुरवंटाचं फुलपाखरू झालेल्या हीनाला विचारांचा एक नवाच फुलपाखरी ज्ञानकोष मिळाला होता.

तिला वाटायचं अब्बूच्या स्वप्नातल्या अफगाणिस्तानला आपल्यासारख्या शिक्षित स्त्रियांचं बळ मिळालं तर त्यांचं प्रगत अफगाणिस्तानचं स्वप्न साकार व्हायला मदत होईल.

दिवस मुंगीच्या गतीने जात होते.

अब्बूनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकन सैन्य दाखल व्हायला लागलं होतं.

त्यांच्या आणि तालिबानच्या सततच्या चकमकी होत असत. धुमश्चक्री, बॉम्ब हल्ले याचं हीनाला आणि तिच्या बहिणींना काहीच वाटेनास झालं होतं.आणि सध्या चालू असलेले बॉम्बहल्ले तालिबान्यांना नेस्तनाबूत करणारे असल्याने त्याबद्दल तर मुळीच भय वाटत नसे.

पण ह्या सगळ्यामुळे भवतालच्या दहशतीच्या वातावरणात काहीतरी नक्कीच बदल घडत होता.

अब्बूना झालेल्या मारहाणीच्या प्रसंगालाही आता सात आठ वर्षे उलटून गेली होती.ते सतत आजारी असायचे.त्यांच्या औषधोपचारांसाठी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न मुलींना भेडसावत असे.

आणि एक दिवस झंझावात घेऊन आला.

पाकिस्तानमध्ये लपलेल्या ओसामा बिन लादेनला अबोटाबादमध्ये घुसून अमेरिकेने ठार केलं होतं.

अब्बूच्या मित्रांकडून मिळालेल्या वर्तमानपत्रात ती बातमी वाचायला मिळाली होती.

हीनाच्या घरातल्या सर्वांनी,नेहमीप्रमाणे एकत्र बसून ते वर्तमानपत्र पुन्हा पुन्हा वाचलं होतं.

“हे कधीतरी घडणारच होतं.दहशतवादी वृत्तींचा शेवट हा असाच होतो.इतका आतमध्ये लपून बसला होता

तरी त्याला शोधून शोधून मारलंच ना?”

अब्बू कितीतरी वेळ बोलत होते.

“शिक्षणाचा अभाव हेच मूळ आहे या वृत्ती फोफावण्याचे. आपल्या मातीतल्या प्रत्येकाला शिक्षण मिळायला हवं.नुसतं शिक्षणच नाही तर आधुनिक जगात काय चालू आहे ह्याचीसुद्धा माहिती हवी.विज्ञान इतकं पुढे गेलंय. प्रगत देशांमधले वैज्ञानिक परग्रहांवर चालले आहेत.आणि आपल्या देशात बंदूक आणि बुरख्याच्या बाहेर पडूच देत नाहीयेत हे तालिबानी”

हीनाच्या आयुष्यात बरेच बदल घडले होते.दोन्ही बहीणींची लग्न झाली होती.आजाराचं निमित्त होऊन म्हातारी दादी अल्लाला प्यारी झाली होती.आता अम्मी अब्बू आणि हीना असे तिघेच उरले होते घरात.

अब्बूची जाहीरपणे वर्तमानपत्र वाचायची सवय अजूनही सुटली नव्हती.

“मी सांगत नव्हतो का? दिवस नक्की बदलतील.अराजकाचा नाश होईल.शिक्षणाचं महत्व वाढेल आणि.आपल्या अफगाणी स्त्रियाही सगळी क्षेत्र काबीज करतील.”पेपर वाचता वाचता अबूची टिप्पणी चालू होती.

अम्मी काहीच बोलली नाही,फक्त तीक्ष्ण नजरेने त्यांच्याकडे पाहात होती.

“”अग तू आहेस कुठे?आपल्या ह्या छोट्या गावात राहून आपल्याच देशातल्या इतर शहरात काय काय चाललंय याचा तुला पत्ता नाहीये.अग आता इंजिनिअरिंग आणि मेडिसिन दोन्ही क्षेत्रात आपल्या मुलीसुद्धा यश मिळवतायत.हे बघ मोठी बातमी आहे इथे छापलेली.मी सांगत होतो ना,आपलं आयुष्य बदलणार आहे.तेव्हा तुला पटत नव्हतं.”

हे ऐकून अम्मी फक्त इतकंच म्हणाली”हे सगळं परदेशी सैनिकांच्या जीवावर चाललंय. पण ते कधीतरी जातीलच पळून.तेव्हा इथे काय होईल याचा कुणी विचार केलाय का????”

अम्मीच्या त्या बोलण्याकडे कुणाचं लक्षच नव्हतं.

हीनाच्या हातात एक छोटं रंगीत मासिक होतं ते दाखवत ती म्हणाली.

“अम्मी, आपल्या काबुलमध्ये मुलींनी चक्क फुटबॉल टीम तयार केली आहे.हा बघ त्याचा फोटो.किती मोठा पल्ला गाठला आपल्या मुलींनी!!!पण अब्बू हे सगळं घडतंय ते काबूलसारख्या मोठ्या मोठ्या शहरात.आपल्या गावात हे बदल कधी घडणार?”

ह्यावर अब्बू तिच्या डोळ्यात बघत उत्तरले होते”बेटा, मान्य आहे आपलं गाव प्रगतीच्या कोसो मील दूर आहे..पण तुझ्यासारख्या मुलींनी पुढाकार घेऊन आता हे बदल आपल्या गावातही घडवायला हवे आहेत.”

 गावातलं वातावरण गेल्या काही वर्षांत हळू हळू का होईना पण बदललं होतं.

गावाबाहेरच अमेरिकन सैन्याची छावणी होती.त्या छावणीचा खूप आधार वाटायचा हीनाला.

कधीकधी त्यांच्या सैन्याची परेड गावातल्या रस्त्यांवरून जाई. हीना बुरख्याआडून त्या सैनिकांना डोळे भरून बघत असे.

त्या सैनिकांच्या जिवावर आपलं गाव हळूहळू सुरक्षित होतंय ही भावना मनात पक्की झाली होती.

अब्बूची बंद पडलेली शाळा सुरू करायची हे एव्हाना हीनाने मनोमन ठरवलं होतं.

आता ती सज्ञान होऊनही दोन वर्षे झालीच होती.

ती आणि तिच्या मैत्रिणींनी एकत्र येऊन शाळेची डागडुजी करून घेतली, साफसफाई करून घेतली.प्रत्येकीने आपापल्या घरात लपवून ठेवलेली पुस्तकं बाहेर काढली होती.

 घरोघरी जाऊन ,हातापाया पडून,सुरक्षिततेची खात्री पटवून दिल्यावर शेवटी गावातले लोकं मुलींना शाळेत पाठवायला तयार झाले होते.

एकदोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर शाळेतली मुलींची पटसंख्या पन्नासच्यावर गेली होती.

त्या बेजान शाळेत आता चिमण्यांचा गोड कलकलाट सुरू झाला होता.

शाळा हळुहळू पूर्ववत सुरू झाली होती.

सगळं सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच एक भयानक सकाळ उजाडली.

सकाळी घराबाहेर पाय मोकळे करायला गेलेल्या अब्बूचा पाय,तालीबानींनी पेरलेल्या एका भूसुरुंगावर पडून झालेल्या स्फोटात होत्याचं नव्हतं झालं होतं.

अब्बू सम्पून गेले होते.

हीनाच्या आयुष्यातल्या अनेक वाईट सकाळींपैकी ती सकाळ होती.

बधीर झालेल्या तिला आता अम्मीला सावरण्याचं मोठंच आव्हान होतं

अम्मीला बसलेला मानसिक धक्का इतका मोठा होता की तिला शारिरिक आणि मानसिकही उपचारांची नितांत गरज होती

 हीनाच्या गावाबाहेरच युनिसेफचं हॉस्पिटल होतं.

अम्मीला औषधोपचारासाठी आणि समुपदेशनासाठी युनिसेफच्या छावणीत घेऊन गेलेल्या हीनाची भेट जावेदशी झाली.त्यांच्या गावातल्या अनेक पुरुषांपेक्षा अतिशय वेगळा असलेला जावेद!!!

 अब्बूसारख्या पुढारक विचारांचा.

उंचापुरा,तगडा,लालबुंद वर्णाचा जावेद अफगाणी सौन्दर्याचा मूर्तिमंत पुतळा होता.

तसे तर तिथले सगळेच पुरुष देखणे होते पण जावेदच्या देखणेपणाला सुधारक विचारांची जोड मिळालेली होती.अमेरिकन सैन्यासोबत सतत वावरून त्याच्या वागण्या बोलण्यात एक वेगळीच सफाई आली होती.

युनिसेफच्या त्या तात्पुरत्या उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये जॉर्जसाहेबांची बायको समुपदेशक होती.तिचा दुभाष्या म्हणून येणाऱ्या जावेदशी हीना हळूहळू बोलायला लागली होती.

त्याच्या विचारांची खात्री पटल्यावरच तिने त्याला हळूहळू मुलींच्या शाळेबद्दल सांगितलं होतं.

पंधरा दिवसांच्या उपचारांनन्तर अम्मीला घरी सोडलं होतं.

आता जावेदशी भेट मात्र होणार नव्हती.

हीनाचा शाळेतला दिनक्रम पुनःश्च सुरू झाला होता.

एकदिवस सुरक्षारक्षक तिला सांगायला आला की कुणी साहेब, शाळेत यायची परवानगी मागत आहेत.

हीनाला धस्स झालं होतं. अमेरिकन सैन्याच्या सुरक्षेच्या छायेत ते जरी असले तरीही त्या सर्वांच्याच मनात कायम एक छुपी धास्ती असे कारण तालिबानींच्या कारवाया काही पूर्णपणे संपलेल्या नव्हत्या.

धैर्य गोळा करून येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायला म्हणून हीना गेटवर गेली.

पाहाते तो साक्षात जावेद!!!!! आणि तो ही एकटा नव्हे तर सोबत जॉर्जसाहेबांची बायको.

पुढचे दिवस स्वप्नवत होते.

जॉर्जसाहेबाची बायको मारिया,त्या शाळेवर बेहद्द खूश होती.

तिच्या शिफारशीमुळे बरीच मोठीं रक्कम शाळेला मिळाली होती.

शाळेची डागडुजी आणि रंगरंगोटी झाली होती.बसायची बाक, वस्तू ठेवायला कपाटं, रंगीबेरंगी पुस्तकं, वह्या, पेन्सिली,पेनं,खडूच्या पेट्या,चित्रकलेची पुस्तकं!!!!

कशाची म्हणून आता कमी नव्हती.

आणि एक दिवस जावेदने हीनाचा हात हातात घेतला होता….आयुष्यभरासाठी!!!!!

हीनाचं आयुष्य आता अब्बूच्या परदेशी पुस्तकातल्या गोष्टींसारखं सुखी झालं होतं.

लहानपणापासून अनुभवलेली अस्थिरता आता राहिली नव्हती.

मनात अपार स्थैर्य होतं आणि त्याच्या जोडीला होतं एक चकचकीत स्वप्न!! अमेरिकेला जायचं.साधं काबुलही न पाहिलेल्या हीनाला जॉर्ज आणि मारियासोबत अमेरिकेला जायचं स्वप्न पडत होतं.

स्वप्नात गुंगलेल्या हीनाला अचानक जाग आली. जावेद तिला गदागदा हलवत होता.

हीना दचकून उठली.”हीना आपलं सगळं सामान पॅक करायला घे.आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपले दोघांचे पासपोर्ट काढ.”

हीना सुन्न चेहेऱ्याने त्याच्याकडे बघत होती”अरे आत्ता मध्यरात्री उठून पॅकिंग करायचं ??अचानक तुला काय झालंय??”

“अमेरिकेन सैन्याने रातोरात त्यांचा तळ हलवला असा मला आत्ता फोन आला होता.”जावेदच्या तांबारलेल्या डोळ्यात रणकल्लोळ होता.

“काय?? रातोरात तळ हलवला? ते असं कसं करू शकतात?? आणि मग अफगाण सैन्य कुठे आहे??” हीनाने किंचाळून थरथरत्या स्वरात विचारलं.

“ते मला नाही माहीत.जॉर्जसाहेबांना फोन लावतोय तो सुद्धा लागत नाहीये.एकदा लागला होता तो त्यांनी उचलला नाही.ते मला अजूनही अमेरीकेचा व्हिसा मिळवून देतील अशी  खात्री वाटते आहे .”तो भकास सुरात म्हणाला.

“अरे व्हिसा आत्ता कसा मिळणार???तुला वेड लागलंय का जावेद?”

“तू प्रश्न नको विचारू.अग तालिबानी आपल्या गावाच्या दिशेने यायला निघालेत ग.वेळ कमी आहे ,म्हणून तू ,मी सांगतोय तेवढंच कर.बॅगेत आपलं मोजक सामान, पैसे आणि पासपोर्ट भरून घे.”आता मात्र जावेदचा आवाज चढला होता.

हीनाच्या रडवेल्या चेहेऱ्यासमोर तिच्या बहिणी होत्या, अम्मी होती, तिची शाळा होती,शाळेतल्या गुलाबी गालाच्या,फुलपाखरी डोळ्याच्या कोवळ्या मुली होत्या.

ह्यांना सोडून अमेरिकेला पळायचं??

तालीबानी येणार अशी कुणकुण लागल्यामुळे दोन दिवस गावात तणावाचं वातावरण होतं. शाळा तर लगेचंच बंद झाली होती. जावेद वणवण हिंडत होता.कुणाकुणाला भेटत होता.जॉर्जसाहेबांचा आणि त्यांच्या सैन्याने हलवलेल्या तळाचा शोध घेत होता.

हीना सामानाच्या बॅगा घेऊन एका जागी शून्यवत होऊन बसली होती.स्वैपाकपाणी काही काही म्हणून सुचत नव्हतं तिला.

ती  कुठून कुठे जायला निघाली होती आणि शेवटी पुन्हा तिथेच येऊन पोचली होती.

आंतरराष्ट्रीय राजकारणाचा गंधही नसलेल्या,अशिक्षित असलेल्या अम्मीने मात्र काळाची पावलं ओळखली होती.

नव्हे तिच्या तोंडून काळच जणू भविष्य सांगुन गेला होता.

खरोखरच अमेरिकन पळून गेले होते. 

मोठी मोठीं स्वप्न बघायला शिकवून,प्रगतीच्या वाटा दाखवून,आधुनिकतेचं जग दाखवून शेवटी ते निघून गेले होते.

दोन दिवस हीना घरात कोंडून फक्त टीव्ही बघत होती. जागोजागी चाललेली रणधुमाळी.अफगाणी सैन्याचा पाडाव करत एकेक शहर ताब्यात घेणारे तालिबानी.त्यांच्या दहशतीच्या भीतीने देश सोडून जायला निघालेले हजारो नागरिक.

हीनाच्या शाळेच्या भिंतींवर उच्चशिक्षित अफगाणी महिलांचे फोटो लावलेले असायचे.अगदी डॉक्टर इंजिनिअर,पॉप सिंगर,वृत्तवाहिन्यांच्या निवेदिका,फुटबॉलपटू!!!!त्यातल्या सगळ्याजणी फोटोबाहेर येऊन जीवाच्या आकांताने धावत सुटल्यात असा भास तिला होत होता.

त्या रात्री दार धडधड वाजलं.हीना जावेद झोपलेले नव्हतेच.जावेदने सावधपणे दार उघडलं.दारात त्याचे दोन बालमित्र होते.घरात येऊन त्यांनी दरवाजा लावून घेतला.

“जावेद त्यांनी हिटलिस्ट केली आहे आणि त्यात तुमच्या दोघांची नावं आहेत.तरी तुला आम्ही तेव्हाच सारखं सांगत होतो,नको त्या अमेरिकनांच्या नादी लागूस.त्यांचा स्वार्थ साधून झाला की ते आपल्याला टाकून निघून जातील.तुला वाटलं होतं ते तुला त्यांच्यासोबत घेऊन जातील.पण त्यांनी खोटी आश्वासनं देऊन राजकारणाचा खेळ केला रे फक्त”

हिटलिस्ट या शब्दाने हीनाची वाचाच बंद झाली होती,तिच्या सर्वांगाला थरथर सुटली होती.

जावेदचा चेहेरा उतरला होता,काय बोलावं तेच त्याला समजत नव्हतं.

“आम्ही मित्र म्हणून फक्त एकच मदत करू शकतो.इथून काबूलला जायची तुमची सोय आम्ही केलेली आहे.तुम्ही दोघ आत्ताच्या आत्ता इथून निघा.तालिबानी आपल्या गावाच्या सीमेवर तर कधीच आलेत.ते गावात पोचायला वेळ लागणार नाही.”

हीना आणि जावेद उठले.सामान घेऊन घराबाहेर पडताना त्या दोन्ही मित्रांनी हीनाच्या उघड्या चेहऱ्याकडे तीक्ष्ण कटाक्ष टाकत बुरख्याची खूण केली.चपापलेल्या हीनाने झटकन कपाटातला बुरखा काढून चेहेऱ्यावर चढवला.

आज आपला चेहेराच नाही तर सगळा देशच पुन्हा एकदा बुरख्यात शिरतोय असं तिला तीव्रतेने वाटलं.

वेगाने वारा कापत ती मिनीबस सुसाट निघाली होती.हीनाच्या डोळ्यात पाण्याचा दाट पडदा होता.

आयुष्याचा लचकाच कुणीतरी कापून त्या गावात काढून ठेवला होता.तिची माणसं, तिची शाळा,तिच्या मुली तिची सगळी स्वप्न मागे ठेवून ती निघाली होती.

पळून जाण्यावाचून पर्याय नव्हता.जावेदच म्हणणं असं होतं की एकदा अमेरिकन एम्बसी गाठली की आपण सुटलो.त्याचा जॉर्जसाहेबांवर भाबडा विश्वास होता.त्यांनी दिलेलं शिफारस-पत्र त्याने सोबत घेतलं होतं.त्याशिवाय त्यांचे दोघांचे पासपोर्ट आणि आवश्यक असलेली सगळी कागदपत्रं सोबत होती.

काबूलमध्ये त्यांची बस शिरली तेव्हा सकाळचे सहा वाजले होते.

रस्ते माणसांनी लगडलेले होते.सकाळच्या प्रसन्न प्रहराची कुठलीच खूण तिथे नव्हती.होता तो फक्त मृत्यू-ताण. भेदरलेल्या चेहऱ्याची असंख्य माणसं,जे मिळेल ते सामान हातात घेऊन विमानतळाच्या दिशेने धावत सुटली होती.छोट्या मुलांचे हाल तर बघवत नव्हते.

जशी जशी बस एम्बसीच्या जवळ जायला लागली तसा तसा तणाव वाढत होता.जागोजागी  तालीबानींची चेकपोस्ट होती.त्यांच्या तपासण्यांतून कशीबशी सुटका करून ती बस एम्बसीच्या बिल्डिंगपाशी पोचली आणि हीना जावेदला तिथे सोडून,तातडीने निघूनही गेली.

त्या इमारतीच्या भव्यतेकडे बघूनच जावेदला मोठा दिलासा मिळाला होता.

सामानाच्या बॅगेतले पासपोर्ट आणि शिफारस पत्र हातात काढून तो लगबगीने इमारतीत शिरण्यासाठी म्हणून लोखंडी गेटपाशी आला.आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे कुठलेच सुरक्षा रक्षक नव्हते.हे काहीतरी वेगळं होतं.त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

धडधडत्या अंतःकरणाने तो पहिल्या मजल्यावरच्या ऑफिसच्या दारात पोचला मात्र आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.एम्बसीला भलं मोठं कुलूप होतं,आणि एम्बसी रिकामी करत असल्याची नोटीस त्या बंद दरवाज्यावर लावलेली होती.

आता मात्र जावेदचा सगळाच धीर सुटला होता.हीनाचा हात हातात घेऊन तो भकास स्वरात म्हणाला”हीना मला फसवलं ग जॉर्जसाहेबांनी.अग त्यांच्या कित्येक मोहिमांमध्ये मी जीवावर उदार होऊन त्यांना मदत केली होती.तेव्हा मला म्हणाले होते.तुम्हा लोकांना इथे सोडून आम्ही कधीच जाणार नाही.आणि जर का गेलोच तर शेवटचं विमान अमेरिकेसाठी निघेल तेव्हा तू त्यात नक्की असशील.हीना आपण इथून विमानतळावर जाऊया.चल चल लवकर जाऊया.त्यांचं शेवटचं विमान अजूनही निघालेलं नसेल.”

“जावेद आपल्या हातात व्हिसा नाहीये.आपण विमानतळावर जाऊन काय उपयोग आहे? कुठल्या शेवटच्या विमानाबद्दल तू बोलतोयस? अरे जरा विचार कर.त्यापेक्षा आपण इथून कुठल्यातरी सुरक्षित ठिकाणी पळून जाऊया.आपल्यासाठी कुठलंही विमान थांबलेलं नाहीये.लक्षात घे.”

आता मात्र जावेदचा तोल सुटला,हीनाने सांगितलेलं सत्य स्वीकारायची त्याची तयारी नव्हती.तो बेंबीच्या देठापासून किंचाळला.”तू मला अक्कल शिकवू नकोस.तू माझ्यासोबत येते आहेस की नाही तेवढं फक्त सांग.ते बघ बाहेरून फायरिंगचे आवाज येतायत.आपण दोघे त्यांच्या हिटलिस्टवर आहोत.आपण विमानतळावर जाऊया.शेवटचं विमान आपल्यासाठी वाट बघत असेल.जॉर्जसाहेब आपल्याला सोडून नाही जाणार.माझा विश्वास आहे त्यांच्यावर.तू माझं ऐक, आपण जाऊया .”असं म्हणून तो बाहेर धावत सुटला.

हीना डबडबलेल्या डोळ्यांनी त्याचं ते भेदरून गेलेलं रूप असहायपणे बघत होती.

नाईलाजाने ती धावत धावत निघालेल्या जावेदच्यापाठी फरफटत निघाली.

तासाभरानंतर विमानतळावर ते पोचले तेव्हा तिथे जबरदस्त हलकल्लोळ माजला होता. त्या कोलाहलाला थिजवणाऱ्या फायरिंगच्या फैरी झडत होत्या.विमानतळाचे दरवाजे बंद केलेले होते.सैरभैर झालेले अफगाणी लोकं भिंतींवरून उड्या मारून विमानात जायला धडपडत होते.बायका मुलं टाहो फोडून रडत होती.नको नको म्हणणाऱ्या हीनाला ढकलून देऊन,परिणामांची पर्वा न करता जावेद गेटच्या दिशेने धावत सुटला आणि त्याचवेळी झालेल्या फायरिंगमधली एक गोळी सुसाटत त्याच्या छातीत घुसली.छाती आवळत आवळत जावेद खाली कोसळला तेव्हा अमेरिकेचं *शेवटचं विमान* आकाशात झेपावलं होतं.

@योगिनी श्रीनिवास पाळंदे, पुणे

















Aug 16, 2021

तिची स्मरण यात्रा(2)

श्री सरस्वती प्रसन्न
योगिनी श्रीनिवास पाळंदे
पुणे
               *आठवणींचा श्रावण*
काही काही व्यक्ती जगातून निघून गेल्या तरी त्यांचं अस्तित्व राहातंच नं? शक्तीचं रूप कन्व्हर्ट होतं फक्त. आणि त्याची जाणीव ठायी ठायी होत राहाते.
  *ती* माझ्या आयुष्यात अशाच कुठल्यातरी शक्तीरूपाने भिनून गेली आहे.
तसा भिंतीवर आहे तिचा एक निर्जीव फोटो.
पण तिच्या फोटोत ती नसतेच कधी. सारखी-सारखी फोटोबाहेर येते.
दूध निगुतीने तापवताना, रिकाम्या दुधाचं पातेलं निपटून खाताना,भांडी एकातएक रचून ठेवताना,चहात आलं घालताना,वाणसामानाची यादी टाकताना,वाण्याने पाठवलेलं सामान डोळ्यात तेल घालून बघताना.
तिच्यासारख तेल डोळ्यात कुठून आणू,हा प्रश्न आहेच म्हणा.
आमचा वाणी आणि ती ह्यांच्यातलं नातं भन्नाट होतं.
 त्याला दुर्बुद्धी झाली की तो, हिने न मागितलेली वस्तू पाठवायचा.
ते लक्षात आल्यावर ही काय गप्प बसेल??
डोळे बारीक करून त्याचा फोन नंबर पाहून त्याला फोन करायची
*तुला सकसचं पीठ पाठवायला सांगितलेलं होतं ना रे? मग तू दुसरं कुठलंतरी माझ्या गळ्यात का मारतोस? पाठव त्या मुलाला पीठ परत न्यायला.आणि हो, ते परत केलेल्या पिठाचे पैसे वजा करायला विसरु नको*
वाणी मुकाट्याने तिला हवा तो ब्रँड पाठवायचा.
तिचं अगम्य अक्षर तोच *डिकोड* करू जाणे.
पतंजली हे नाव तिच्या लक्षात नाही राहायचं.यादीत लिहायची
*रामदेवबाबा साबण* !!!!!!!
वाणी मुकाट्याने पतंजलीचा साबण पाठवायचा.
माझ्या ऑफिसातून मिळालेली सोडेक्सोची मिल-कुपन  वाण्याला द्यायला तिला खूप आवडायचं.
लहान मूल कसं हातात नोटा दिल्यावर रुबाब करतं ना तस्सा रुबाब करायची
आणि ऐटीत सोडेक्सोने पेमेंट करायची.
कालांतराने सोडेक्सो कार्ड आलं,तेव्हा ती कित्ती हिरमुसली होती आणि कार्ड मला देऊन टाकलं होतंन.
कर्मकांडावर तिचं अतिरेकी प्रेम.
माझ्या माहेरी कर्मकांडाच्याविरुद्ध वातावरण असल्यामुळे मला काहीच प्रथा माहिती नव्हत्या.त्याचा तिच्या स्टाईलने योग्य तो समाचार तिने घेतलाच होता.
त्यावेळी वाईट वाटायचं,माफक त्रासही व्हायचा.
साबुदाणा खिचडी करताना
खरकट मीठ  आणि उपासाचं मीठ.
खरकट तूप आणि उपासाचं तूप,
ह्यावरुन ती जितकं बोलली आहे तितकंच,खरकटी गावी दुधाच्या पातेल्याला लावल्यावर आणि गंध दाट न उगाळण्यावरूनही बोलली आहे.
तिचा परखडपणा थोडा थोडा काटेरीही व्हायचा.
पण सुरवातीच्या वर्षांत टोचलेले काटे नंतर इतके बोथट झाले की टोचण्या ऐवजी ते गुदगुदल्या करायला लागले होते.
शनिवारी तेल आणायचं नाही,
सोमवारी नाहायचं नाही,इथपासून सुरू होणारि प्रथांची मालिका अन्न उरवू नको नाहीतर घरात कुणीतरी आजारी पडतं,इथे येऊन थांबायची.
आपण जर विरोध केला तर
*आपल्या माणसांनी सगळं सोडलंय* हे एक आवडतं वाक्य सुनावलं जायचं.
आता ह्यातलं *आपलं माणूस* कोण हे तीच जाणे.
सणावाराला मात्र तिच्या अंगात यायचं.
 वटपौर्णिमेच्या आधीच बँकेत जाऊन लॉकरमधले दागिने काढणे.त्यातली काळी पडलेली चांदीची भांडी सोनाराला शिव्या देत देत घासणे
अशी पूजेच्या तयारीची सुरुवात होई.
"काही गुरुजींना बोलवायला नको,मी सांगेन तशी करू आपली पूजा " असं अफाट कॉन्फिडन्सने म्हणत सगळी तयारी करून ठेवे. स्वतः अगदी नथ बिथ घालून तयार व्हायची,मी नटायचा आळस केला की "तुला मुळी कसली हौसच नाही"असला आहेर मिळायचा.

'हा चला अपोष्णी  घ्या.' अशी  मारे झोकात सुरवात करून पुढे काहीतरी पुटपुटायची *इथे ते गुरुजी काहीतरी मंत्र म्हणतात  ते मला नाही येत* 
ह्या वाक्यावर मी आणि माझी नणंद हसू दाबायचो.
हसू दाबणे की कला तिच्यामुळे माझ्या अंगात विकसित झाली हे नक्की.
*देवळापासून ते दहाव्यापर्यंत*  तिच्या स्पेशल कॉमेंट्समुळे मला विविध प्रसंगात हसू दाबावे लागले आहे.
श्रावणात ती एकेक करून सगळ्या उंची,सिल्क साड्या काढायची.
सोमवारी मात्र पांढरी शुभ्र लखनवी साडी नेसायची.
लघुरुद्राला खायला काय करायचं ह्या विषयावर आमच्या वादाची पहिली फैर झडे
*पेढा आणि वेफर्स बस झाले की,अजून काही कशाला हवंय? आमच्यावेळी असली खायची थेरं  नव्हती*
"अहो काहीतरीच काय काहीतरी खायला करूया ना.पण गुरुजी साबुदाणा खिचडीला नको म्हणतायत.मग वरीतांदूळ दाण्याची
 आमटी करूया का?"
 माझा केविलवाणा प्रयत्न.
*आम्ही श्रावण सोमवारी-वरी नाही खात, त्यातून तुम्हाला काय हवं ते करा*
असं म्हणून *इशय कट* व्हायचा
ही तर फक्त नांदी असायची.
श्रावणी सोमवारी एक कढई गॅसवर चढवलेलीच असायची
*आम्ही श्रावण सोमवारी भाजक खातो*  
नेहेमीप्रमाणे *आम्ही*!!!!
मग काय सकाळच्या कणकेपासून ते डाळ तांदुळापर्यंत सर्वांना भाजणे.
गोरी कणिक तांबूस व्हायची आणि पोळ्या कॅडबरी कलरच्या पण खमंग लागायच्या.तांदूळ डाळ भाजल्यामुळे खिचडी खमंग व्हायचीच पण खरा खमंगपणा तिच्या कॉमेंटरीमुळे  लघुरुद्रात यायचा.
अलीकडे गुरूजींची टीम, लघुरुद्र करतानाही मोबाईलवर चॅटिंग करते.एकमेकांना खाणाखुणा करून हसणं चालतं.
ते पाहिल्यावर हिची 
 *सो कॉल्ड कुजबूज* सुरू!!!!!
*बघतेयस ना ह्यांच काय चाललंय ते!पूर्वी असं नव्हतं. हा कसला लघुरुद्र!!पुढच्या वर्षी ह्यांना मुळीच बोलवायचं नाही.*
ह्या वाक्याचा *व्हॉल्युम* ऐकून मी मेल्याहून मेल्यासारखी!!!!!
"अहो हळू बोला,ऐकायला जाईल."
*मी हळूच बोलतेय.आणि गेलं ऐकायला तर गेलं.*
मी पुनःश्च धरणी मातेच्या पोटात गुडूप.
नागपंचमीच्या दोन तीन दिवस आधीच तांदूळ धुवून वाळवून त्याचा रवा काढून ,त्याची  गूळ आणि नारळ घालून खांडवी करायची.
ऑफिसला जाताना *घेऊन जा भरपूर,नाहीतरी आपल्याला कुठे एवढ्या संपणारेत* असले डायलॉग.

शुक्रवारी जिवतीची पूजा ती अगदी।मनापासून करायची.
पण पुरण करताना आमची दोघींची झकाझकी.
 मला पुरण नुसतं खायलाही खूप आवडतं त्यामुळे खूप जास्त शिजवायची सवय,आणि हिला सदैव *उरलं तर घरातलं कुणीतरी आजारी पडेल* ही चिंता!!!
त्यामुळे श्रावणी शुक्रवारी,शिजवलेलं पुरण संपेपर्यंत माझ्या मागे-पुढे करून *जास्ती केलायस ना आता संपव* असा लकडा लावायची.
 मला विचारायची,"मला शिवलिलामृत वाचायचंय,तुझी तारीख कधी आहे ते सांग,नाहीतर तुमच्या त्या गाऊनांचे *फलकारे* लागून शिवाशिव झालेली मला नाही चालायची"
मग दोघींच्या चर्चेच्या फेऱ्या व्हायच्या आणि शिवलीलामृतवाचनाची तारीख ठरायची. 
ते वाचन करताना तिचं अष्टावधान मात्र चुकायचं नाही. एकीकडे पोथी वाचताना, केर लाद्या करणाऱ्या बाईकडे डोळे बारीक करून वॉच ठेवणे हे सुद्धा चाले.
*काल तिथला कोपरा नीट पुसून नाही घेतलास* हे वाक्य ऐकल्यावर शिवलीलामृताची पोथी वाचताना शंकरासारखा तिसरा डोळा उघडून ही कामवाल्या बाईकडे बघत होती ह्याचा पर्दाफाश व्हायचा.
ती कडवी धार्मिक होती पण नंतरच्या आयुष्यात प्रॅक्टीकलसुद्धा व्हायला लागली होती.
श्रावणात कांदा लसूण खायची परवानगी शेवटी शेवटी आम्हाला मिळाली होती.
"तुम्ही घाला तुमच्या भाज्यांमध्ये,मला भाजी केली नाहीस तरी चालेल.मी खाईन तूप गूळ पोळी." 
गोकुळाष्टमीचे दही पोहे ह्यावर मात्र आम्हा दोघींची *युती* असे.
भरपूर दही,दूध,ताक,कोथिंबीर, वाटलेली मिरची,भिजवलेले शेंगदाणे आणि मजबूत साखर घालून केलेले दहिपोहे म्हणजे आम्हा सासू सुनांना खाद्यपर्वणी वाटायची.
विदर्भातल्या काही मैत्रिणींनी मला त्यात लोणचं,सांडगी मिरची, खारातली मिरची,डाळिंब,सफरचंद घालायला शिकवलं होतं, तो विषय निघाला की 
*मुंबईत नाही असली फळ घालायची पद्धत.तू सुद्धा कुणा कुणाचं ऐकून प्रयोग करत असतेस.आम्ही नाही हो दही पोह्यात सांडगी मिरची वगैरे घातली.*
असा समारोप व्हायचा आणि आमच्या युतीला दणका बसायचा.
तिची पूजा आणि मोठ्या आवाजात टाळ्या वाजवत गायलेली आरती मुलांना इतकी आवडायची की अमेरिकेला गेलेल्या माझ्या लेकीला होम सिक वाटल्यावर मी आजीच्या आरतीचं लाईव्ह शूटिंग तिला दाखवलं होतं.त्यानंतरच माझ्या लेकीची मिटलेली कळी खुलली होती.
तिच्या व्यक्तिमत्वात इतकं जबरदस्त चैतन्य होतं की मरगळलेल्या मनाची  झाडाझडती व्हायची.
ती कधी जाईल असं वाटलंच नव्हतं.
कमीत कमी शंभरी गाठेल असं वाटतं असतानाच ती गेली.
ती तिच्या मस्तीत गेली.कुणाकडूनही सेवा न घेता गेली.
*तुमच्या त्या ऍलोपथीची मला  मुळीच गरज नाही* असं डॉक्टरांच्या तोंडावर सांगून गेली.
माझं रिकाम झालेलं घरट जास्तच रिकाम करून गेली.
दीड वर्ष होऊनही तिच्या नसण्याची अजून सवय होत नाही.
खूप उदास वाटायला लागलेलं असतं.
मग अचानक काळाची पान फडफडवत श्रावण येतो.तो येताना तिचं अस्तित्व घेऊनच आलेला असतो.
*श्रावण म्हणजेच चैतन्य म्हणजेच ती*  इतकं सोपं असतं सगळं!!!
 तिच्यासोबतच्या सगळ्या आठवणी  श्रावणफेर धरतात आणि तो घननीळ माझ्या डोळ्यात बरसू लागतो.
माझ्याच नकळत मी श्रावणी सोमवारी  गॅसवर कढई चढवते आणि  कणिक भाजताना मीसुद्धा तिचा डायलॉग म्हणायला लागते *आम्ही बाई श्रावणात सोमवारी भाजक खातो*
@योगिनी श्रीनिवास पाळंदे पुणे

तिची स्मरण यात्रा(1)

श्री सरस्वती प्रसन्न

आज तिला जाऊन बरोबबर 1 वर्ष झालं.गेले वर्षभर,तिच्या खोलीत,
तिच्याच तक्क्याला टेकुन बसून मी रोज काही न काही लिहिते आहे.

ती म्हणायची काही काही दिवाळी अंक अगदीच फालतू आलेत यंदा आणि किती त्यातले ते फडतूस लेख....त्यांच्यापेक्षा तू बरीच बरी लिहितेस....
तिच्या तसल्या शब्दांनी, *ही माझं कौतुक करते आहे की टीका,हेच समजत नसे.*
तिचं नाक टोकदार..अगदी एखाद्या प्रकरणाचा छडा लावायला उपयोगी पडेल इतकं...
एकदा झालंही तसच होतं.
ती इम्पोर्ट एक्स्पोर्टच्या सरकारी खात्यात ऑफिसर
तिथलं ओ एस डिपार्टमेंट
म्हणजे बदली,बढती,इन्क्रीमेंट, डिसीप्लिंनरी ऍक्शन वगैरे
तिच्या कारकिर्दीत एका माणसाने जातीचा खोटा दाखला आणून दिला
झालं,हिला वास लागला.
तिने सफाईदार नोट लिहून रेटून ते प्रकरण पार दिल्लीच्या मुख्यालया पर्यंत नेलं
आणि चक्क खोटा दाखला देणाऱ्याला, मागे हटावं लागलं.
नंतर तिचं प्रोमोशन झालं आणि तिला  खाणारं खातं मिळालं...
ही , न खाणाऱ्यातली..त्यामुळे
सदैव ताण....
जागेवरून बाथरूमला उठलं 
तरी ड्रॉवरमध्ये एखादं पुडक आलेलं असे
शेवटी त्याला कंटाळून,बिथरून तिने नोकरी सोडली
आणि एका महाचतुर ऑफिसरला डिपार्टमेंट मुकलं.
निवृत्तीनंतर तिच्या तीक्ष्ण बुद्धीचं टोक 
दुसरीकडे वळलं
साधं बँकेत गेली तरी प्रत्येक एन्ट्री शेरलॉक होम्स स्टाईलने तपासायची
एकदा एका बँकेने एस एम एस चे 50 रुपये डेबिट लावले होते
हिने संबंधित माणसाला विचारलं
तो निरुत्तर
ही थेट मॅनेजर कडे
माझ्यकडे मोबाईलच नाही मग हे कसले चार्जेस
शेवटी एन्ट्री रिव्हर्ट झाली
पुढच्या वर्षी..तीच बँक...तेच चार्जेस
ही यावेळी थेट मॅनेजर कडे
*त्याच त्याच चुका दरवर्षी काय करता*
आम्ही म्हणायचो काही काही फार खडूस कस्टमर असतात
आणि तुम्ही त्यापैकी एक आहात.

बँकेत पेन्शन आणायला गेली आणि एकच खिडकी आणि मोठी रांग असेल तर  आरडा ओरडा करून दुसरा काउंटर उघडायला लावायची.
पेन्शनचं बंडल उघडून त्यातल्या फाटक्या नोटा दुसऱ्या दिवशी त्याच कॅशीयरला साभार परत(कॉमेंट्स सह)
 फुटपाथवरन चालत येताना,एकदा एक मोटरसायकलवाल्याने रस्त्यातील ट्रॅफिक टाळण्यासाठी  फुटपाथवर गाडी घातली.
ही सटकली.....
रस्त्यात त्याच्या समोर बाबू गेनू झाली
आणि म्हणाली "ढकलून देईन तुला आणि  तुझ्या गाडीला,
हा फुटपाथ आहे,आणि तो आमच्यासारख्याना
चालण्यासाठी केलेला आहे."
डी ए वाढल्याची बातमी पेपरात वाचली रे वाचली की हिच्या गणिताना सुरवात होई.
अचूक कॅलक्युलेशन असे.
संध्याकाळी नातवाला पाचशेची नोट
ते हल्ली महागडं आईसक्रीम मिळतं ते...काय रे नाव त्याचं???ती करिष्मा कपूर जाहिरात करते ते ??
75 रुपयाला एक कोन मिळतो,ते *मॅग्नम* घेऊन ये आपल्यासाठी .
पेन्शनचा दिवस खास उत्साहाचा असे
यावेळी दिवाळीचा सगळा खर्च मी करणार
अग दोघांचे मिळून पेन्शनचे केवढे पैसे मिळतात मला
जेव्हा हवे होते तेव्हा नाहीं मिळाले
आता नको झालेत एवढे पैसे,
असं म्हणायची
झुळझुळीत इस्त्रीच्या  सिल्कच्यासाड्या पहाटे साडेपाचला फिरायला जातानासुद्धा नेसायची
थंडीत खांद्यावरून पदर
शाल किंवा स्वेटरचा आग्रह केला तर
म्हणायची ,या पुणेकरांची नाटकच किती
कुठे आहे एवढी थंडी?
ज्या दिवशी हवामान 12 दाखवतील त्याच्या दुसऱ्या दिवशी मी स्वेटर घालीन
ही मनाने आयुष्यभर मुंबईकर राहिली
अगदी पेपर सुद्धा जो मुंबईत वाचायची तोच पुण्यातही
आम्ही मुंबईकर फक्त म टा वाचतो म्हणायची
पण पेपरातून कधी मोदींवर शरसंधान झालं की मग मात्र म्हणायची हल्ली *म टा वाला* (मटारवाला नव्हे ह)जरा बिघडलाच आहे.
पुण्यातल्या देवळांवर मात्र खुश असायची!
रोज सकाळी अगदी धो धो पावसातही तिची देवळं तिने कधी चुकवली नाही.
देवळातून परत आल्यावर रुमालात भरून आणलेला पेढा,मोदक,बर्फी मला द्यायची!
मी कणभरच घेतला की म्हणे अहाहा काय पण तुझं डाएट!!!
कसली ती हाडं दिसतायत गळ्याशी!!
आम्ही नाही कधी असली फॅड केली!
चॉकलेट खावीत तर ती तिनेच!!
अमेरिकेहून आणलेलं कुठलंही चॉकलेट तिने सोडलं नाही.
फ्रीझमधली संख्या कमी व्हायला लागली की मला डाउट यायचा
मग दिसायच्या चांदया कुठे कुठे लपलेल्या..
इतकं गॊड खायची,इतकं गोड खायची 
आणि वर म्हणे काय बिशाद आहे डायबेटीस मला व्हायची??
सगळे अवयव आणि सगळी इंद्रिय अति तीक्ष्ण!!
पण कानानी मात्र अधू झालेली.
1952 मध्ये झालेला टायफॉईड,
त्यात घेतलेलं ते तेव्हांचं,नव्याने आलेलं क्विनाइन!
त्यात तिची श्रवणशक्ती आणि नाकाची वास यायची शक्ती पूर्णपणे गमावली गेली.
आज कोव्हिडंमुळे माझ्या नाकाला वास येत नाहीये.
तर इतका त्रास होतोय.
नाकाच्या आतही दुसरं एक नाक असतं जे डोळ्याला नाही दिसत पण ते असतं.
फुलांचे वास,वेलचीचा वास,उदबत्तीचा  वास,अगदी दूध करपल्याचाही वास टिपणारं!
मला कुठलाच वास येत नाहीये
जीव घाबरा झालाय
कोव्हिडंमुळे नव्हें ह
प्रतिभासारख्या टेरर बाईची मी सून..कोव्हिडला घाबरेन की काय
पण या *वासहरणाला* घाबरलेय मी
श्वास बंद झाल्यासारखं वाटतंय
वास यायची क्षमता किती मोलाची आहे ते जाणवतंय.
हिने अख्ख आयुष्य बिनवासाचं कसं काय काढलं असेल??
पण ईश्वराने ती शक्ती तिच्या मेंदूत मात्र भरून काढली आणि तिच्या त्या तीक्ष्ण बुद्धिचे गमतीदार तडाखे आम्ही एन्जॉय केले!
आज तिला न ओळखणारे लोकं सुद्धा ही पोस्ट वाचतील
हो वाचायलाच हवी!!!
तीच तर तिला खरी श्रद्धांजली असेल!
आणि हो
ज्या माझ्या लेखनाचं तिला अपार कौतुक वाटायचं ते या कोरोना काळात मी जपायचा,वाढवायचा प्रयत्न करते आहे हे ती फोटोतून पाहतेय....मला दिसतंय ना ते!!
लिहायची थांबले तर वरून एखादा कॉल सुद्धा करेल
तिच्या आणि माझ्या नात्याबद्दल काय लिहावं आणि काय बोलावं!!
बँकेतल्याच खात्यात काय पण स्वतःच्या पेन्शनच्याही खात्यात सुनेचं नाव घालणारी ही बाई,
देवळात मी आपल्या दोघींच्या नात्याबद्दल कुणाला सांगत नाही नाहीतर दृष्ट लागेल आपल्या दोघीना असं म्हणणारी ही प्रतिभा अनंत पाळंदे मागच्या वर्षी ह्याच दिवशी अनंतात विलीन झाली
अजून तीन दिवस जगती,तर 23 जानेवारी तिने गाठला असता
जो तिचा जन्मदिवस होता.
सुभाषचंद्र बोस,बाळासाहेब ठाकरे या सारख्या ज्वलंत व्यक्तिमत्वाचा जन्मदिन!
आम्ही चिडवायचो, स्फोटक व्यक्तीमत्व जन्मदिन म्हणून
ती सुद्धा घ्यायची कौतुकाने चिडवून!
शेवटपर्यंत काम करत राहीन ह्या ब्रीदाला जागली!
तिने,जाण्याच्या आदल्या दिवशी सोलून ठेवलेले एक किलो मटार फ्रीजमध्ये होते!
कितीतरी दिवस त्याला हात लावायची माझी हिम्मत नाही झाली.
मी गेल्यानंतर तुम्हाला त्रास नको म्हणून सगळीकडे सतर्कतेने केलेली नॉमिनेशनस
व्यवस्थित ठेवलेली कागदपत्रं
सगळा व्यवहार चतुर मामला
फ्रीजमध्ये गंगाजलाची बाटलीसुद्धा तिने मला दाखवून ठेवली होती.
ती गेल्यावर तेव्हढेसुद्धा कष्ट मला करायला लागले नाहीत.
"तुझ्या हळव्या स्वभावाची काळजी वाटते योगिनी,मी गेल्यावर
अजिबात डोळ्यातून पाणी नाही काढायचं" अस मला बजावून गेली आहे ती......
त्यामुळे महत्प्रयासाने डोळे कोरडे ठेवत,तिच्यावरचा लेख थांबवते.
योगिनी श्रीनिवास पाळंदे