श्री सरस्वती प्रसन्न
*मोदक का सातवा नारळ*
लग्न झाल्यानंतरचा पहिलाच गणपती
माझ्या माहेरी गणपती बसवायची प्रथा नाही
त्यामुळे मी, य-एकसायटेड.
सगळे एकत्र मिळून धम्माल आणि उकडीचे मोदक या दोन गोष्टींसाठी मी एखादी कॅज्युअल-लीव्ह सुद्धा कुर्बान करायला तयार होते.
“आमच्याकडे एकत्र असतो गणपती,सख्ख-चुलत असलं काही नाही हो” हे वाक्य गणपतीचे ओपनिंग स्टेटमेंट होतं.
आदल्या रात्री चुलत घरी मदतीला जायचे होते
“आमच्याकडे साडी नेसतात हं का!”
मी निमूटपणे साडी नेसले
त्या घरी,वक्रतुंड आगमनाची तयारी,महाकाय पातेल्यापासून सुरू झाली होती
हजारोंच्या संख्येने,मोड आलेल्या डाळिंब्या अहिल्या-प्रतीक्षेत,आमच्या हस्तस्पर्शाने उद्धार व्हायची वाट पाहात होत्या.
“सर्वांनी घेऊ म्हणजे होतील पटपट.आहे काय त्यात?”
या वाक्यानंतर, तिसऱ्या चहाची राऊंड प्यायलेली,समस्त पुरुष मंडळी एकेक करून निसटली!
दोन चार आज्ञाधारक सुना आणि एक दोन सासवा, बसल्या सोलायला!!!!!
ते काम परवडलं,असं दुसरं काम, आज्ञाधारक सुनांची वाट पाहात होतं.
सात नारळ आणि कोयता अशी मोदकांची भक्कम तयारी ठेवलेली होती.
एका दिराने सातही नारळ फोडायचे सत्कृत्य केलं , त्याचं पाणी,
हरताळकेचा कडक उपास असलेल्या आम्हाला प्यायला देऊन तो अदृश्य झाला.
त्या नारळपाण्याच्या बदल्यात सात दुणे चवदा वाट्या खरवडायच्या होत्या!
डाळिंब्या सोलायचा कंटाळा म्हटलं तर नारळवाट्या आ वासून बसलेल्याच होत्या.
मी आपलं हळूच म्हटलं”एवढ्या डाळिंब्या कोण खाणार? उद्या बटाट्याची भाजी सुद्धा आहे ना?”
“नुसती बटाट्याची भाजी कशी खायची???.किती वातूळ होईल? इति एक सासू.
मी मनात म्हटलं “यांच्याकडच्या डाळिंब्या विना-वात आहेत की काय? असतीलही!!” पण त्या सोलून सोलून आम्हा सुनांना मात्र वात आला होता हे नक्की!!!
अखेर दीड तासाच्या हातघाई(की बोट-घाई) नंतर,गोऱ्या गोऱ्या डाळिंब्या पोटात घेऊन एक भक्कम स्टीलचा डबा,फ्रीजमध्ये रवाना झाला!
एव्हाना कडक उपासाने डोकं कलकलायला लागलं होतं.
पण भुकेल्या पोटानि,कलकलत्या डोक्यानि आणि डाळिंब्या सोलून सोलून हुळहुळ्या झालेल्या बोटांनी,नारळ खरवडायचे बाकी होतच.
आम्ही दोन नवीन सुना बसलो खरवडायला.
मला माहेरी नारळ खरवडायची अजिबातच सवय नव्हती.त्यामुळे माझे हात भरून आले होते.
खरवडून झालेल्या वाट्या मी बाजूला ठेवल्या होत्या.
त्या हातात घेऊन त्या वाट्यांच्या अंगाला चिकटून असलेल्या पातळ थराकडे पाहात ,चुलत सासूबाई म्हणाल्या”अग हिने बघ कशी खरवडलीये वाटी? अग हे खोबरं टाकायचं नाही, चमच्याने खरवडून काढायचं !!”
मोदकाच्या सारणासाठी,गोरं गोरंच खोबरं हवं,जरासुद्धा सावळ खोबरं आलं नाही पाहिजे असं आमच्या सासूबाई बजावून गेल्या होत्या
(सुनेच्या आणि मोदकाच्या-खोबऱ्याच्या रंगाची अट एकच होती, *लख्ख गोरेपणाची* ) …..आली का पंचाईत?
बरं चुलत सासूला नक्की काय सांगू असा प्रश्न पडायच्या आतच त्या म्हणाल्या “अग हे असं चमच्याच्या धारीने खरवडून घ्यायचं आणि चटणीसाठी वापरायचं हो!आमच्याकडे आम्ही काहीही फुकट घालवत नाही”
पुन्हा तेच *“आमच्याकडे”?????*
सहावा नारळ खरवडून झाला तेव्हा वाटलं आता बस झालं.
मी आणि माझ्याच वयाची जाऊ,आम्ही एकमेकींना डोळ्यांनी खुणावत आहोत हे
समस्त सासवानी पाहिलं,आणि *उशाप* देत म्हणाल्या”ठीक आहे सहा नारळाचं सारण पुरेल!!!
नाही खरवडलात तो सातवा नारळ तरी चालेल”
इतक्यात तिथे आमच्या सासूबाई आल्या आणि म्हणाल्या"माझ्या मते सातवा नारळ सुद्धा खरवडून ठेऊ देत.आपल्याकडे तेवढे मोदक लागणारच आहेत"
"काही गरज नाही,हवे तेवढे होतील याचे मोदक। आणि एक सांगू का हल्ली आपल्याकडे पूर्वी सारखं कुणी खात नाही हो.
आमचे हे पहा ना,हल्ली पथ्य पाळायला लागल्यापासून अगदीच बेताबेताने खातात.
आणि त्यातून कमी पडले तर आपण बायकांच्या शेवटच्या पंक्तीत करू ऍडजस्ट" इति चुलत सासूबाई.
*या शेवटच्या वाक्याला माझ्या मनात कळ उठली.*
का म्हणून ऍडजस्ट करायचं आपण? असा *पोट* तिडीक विचार मनात येऊन गेला.
शेवटी सहा नारळावर एकमत झाले!!
आणि आम्हा दोघींची सुटका झाली.
विळीवरून उठताना पाय आणि हातसुद्धा भरून आले होते.
पोटातले उसळी मारणारे पाचक रस एव्हाना, खाली सेटल झाले होते!
भूक मेल्यानंतर ,ती खरतर मेलेली नसतेच,ती डोक्यात *पित्त-रूपाने* अमर झालेली असते!!!
आता सारणाचा कार्यक्रम होता.
“ढवळत रहा गं, जरासुद्धा खाली लागता कामा नये.”
ही सूचना शिरोधार्य मानून ढवळत होते,एकीकडे वेलचीची पूड काढून ती त्यात घालणार
इतक्यात कुठूनतरी आमच्या सासूबाई
प्रगट झाल्या.थाम्ब थाम्ब थाम्ब...
“आधी नाही घालायची वेलची.वास कमी होतो त्याचा!
सगळ्यात शेवटी घाल म्हणजे वास जास्ती लागेल आणि कमी घालूनही पुरेल”
मी मनातल्या मनात हात जोडले!!
(कोपरापासून)!!!!!!
सहा नारळाच्या सारणाला अर्धा तास लागला!!
आता, बाप्पाना आणायला जायचे होते.बाजूच्याच वाडीत जायचे होते.
बाप्पांना वाजतगाजत आणून,
देव्हाऱ्यासमोर बसवलं.
खूप गोंडस गोड मूर्ती होती.
तिच्यापुढे मनोभावे हात जोडून,
आम्ही एकदाचे घरी जायला निघालो.
उद्या जरा आरामात उठेन,हा विचार मनात यायला आणि कानावर चुलत सासूचे वाक्य पडायला एकच गाठ होती.
”उद्या पहाटे उठून लवकर या बरं का.
मी साबुदाणे घालतेयभिजत.सर्वांनी
नाश्त्यालाच या”
उद्याच्या साबुदाणा खिचडीच्या कल्पनेने मला *बिरबलाच्या खिचडीसारखा* आधार मिळाला होता!
*त्याच चिंतनात* मला गाढ झोप लागली!
पहाटे उठले तेव्हा,डोक्यातलं पित्त *रिव्हर्स* होऊन पुन्हा पोटात उसळ्या मारत होतं.
आन्हिके उरकून ,पुन्हा एकदा *“आमच्याकडे साडी नेसतात”* तशी साडी नेसून,आम्हा सासवा,
सुनांची जोडी निघाली त्या घरी...
खिचडीची तयारी चालूच होती.
पुन्हा एका महाकाय कढईत तीन गलेलठ्ठ बटाट्याच्या फोडी, साजूकतुपात स्विमिंग करत होत्या.
तळून तळून त्या तेजस्वी सोनेरी झाल्यावर,चुलत सासूबाईंनी त्यावर साबुदाणा आणि पांढरं शुभ्र दाण्याचं कूट ढकललं.(“आमच्याकडे दाणे भाजताना फार जपून भाजायला लागतात हो,आमच्या ह्यांना पांढरं दाण्याचं कूट लागतं”,,हे वाक्य तर यांच्या फॅमिलीत *अजरामर* आहे)
खमंग वास दरवळला होता.
एकीकडे चहाचं आधण चढलं होतं.
माझ्या आणि साबुदाणा खिचडीमध्ये आता फक्त काही क्षणांचं अंतर होतं.
इतक्यात चुलत सासूबाईंनी माझ्या हातात ट्रे दिला.
बाहेरच्या खोलीत बसलेल्या आम्हा हरतालकांच्या *कैलासपतीनि* चढाओढीने खिचडी खायला सुरवात केली!
त्यांच्या दोन राऊंडस झाल्यावर ताजा चहा!!!!!
यांच्या घरातल्या नाश्त्याच्या रमीचा सिक्वेन्स चहाशिवाय पूर्णच होत नाही!
मी ते प्रकरण आटोपून लगबगीने कढाईपाशी आले तेव्हा साबुदाणा खिचडीने तळ गाठला होता.
आम्ही सगळ्याजणींनी ती खिचडी वाटून घेतली.
आता दोन लढाया होत्या!
एक स्वैपाकघरात आणि दुसरी बाहेर………..
बाहेर,गणपती पूजन प्लस गुरुजींची तयारी प्लस कालची अर्धवट राहिलेली आरास!!
बाहेरचा माहोल मस्तच होता(फक्त पोटातला माहोल जरा गडबडला होता)
बागडणारी पिलावळ,
बाहेर काही गप्पा मारणारी आणि काही अर्ध ग्लानीत पेंगणारी(काम नसलं की हमखास येते) दीर आणि सासरे वगैरे मंडळी,सासवांच्या गप्पा,
हलक्या आवाजातल्या *फॅमिली गॉसिपस!!*
पूजा संपन्न झाली आणि गुरुजी
(उत्तरपूजेच्या अक्षदा आजच देऊन) निघाले.
निघण्यापूर्वी त्यांच्यासाठी चहा टाकायचा होता.
“बाहेर विचार गं कुणाला हवाय का?”
विचारायचं काय,बाहेरचं उत्तर मला ठाऊकच होतं!!!
“घोट घोट चालेल आम्हाला
सगळ्यांनाच!”
ह्यांच्या फॅमिलीत,चहाला नाही म्हटलं तर चहाचा अपमान होईल, असा एक गैरसमज असावा!
सो…...,गुरुजींसोबत सर्व मंडळींचा(तिसरा) चहा झाला.
अकराच्या सुमाराला मोदकांची उकड काढायला घेतली!
त्या कामाचा चार्ज मात्र एका एक्स्पर्ट सासूबाईंनी घेतला!
मळताना,त्यांचे हात लालीलाल झाले होते.
तुकतुकीत,पांढराधोप, उकडीचा
गोळा अगदी *राजस सुकुमार*
दिसत होता!
परात भरून गेली होती त्या गुबगुबीत गोळ्याने
आंबेमोहोरी सुगंधाने माझ्या चित्तवृत्ति की काय असतात ना त्या फुलून गेल्या होत्या!
शंभर!!!!!!!!
बरोब्बर शंभर मोदक झाले होते!
दुपारचा दीड वाजला होता!
पहिली पंगत आम्ही वाढायला घेतली!
गप्पांचा फड आणि त्यासोबत, मोदक,डाळिंब्या,अळूची पातळभाजी,
बटाट्याची *लग्नी-भाजी*
हे सगळं आग्रह करून वाढताना माझ्या (नसलेल्या) स्थितप्रज्ञ वृत्तीला मोठे आवाहनच होते.
पहिल्या वाढपानंतर आग्रहाच्या फैरी झडू लागल्या.
बघता बघता मोदक फस्त होऊ लागले!
मला शोले आठवत होता…कितने आदमी थे????????
*आदमी बीस ऑर मोदक सौ!!!!!*
आता या बीस नि प्रत्येकी पाच उडवले तर माझ्यासारख्या कालियाला( वर्ण तोच आहे म्हणा)
*खाली-हात* जावं लागेल अशी भीती वाटायला लागली होती.
*हल्ली पूर्वीसारखं खात नाहीत हो*
अशा वर्णनातले,सगळे *गोळी ते इंजेक्शन* या वाटेवरचे प्रवासी , तुडुंब मोदक खात होते.
शेवटी आम्हाला बसायला दोन वाजून गेले होते.
माझी भुकेली नजर शोधकपणे मोदकांचा अंदाज घेत होती.
पंधरा मोदक आणि आठ बायका!!!!
मला थोडं तरी हुश्श झालं!!
आम्ही सुरवात केली!!
इतक्यात बाहेरून माझ्या नवऱ्याने आवाज दिला”काकू,माझे दोन मित्र संध्याकाळी दर्शनाला यायचेत ग,सात आठ मोदक शिल्लक ठेव जरा.”
आमच्या सासूबाई कौंतुकाने निथळत होत्या”हो हो ठेवणारे बाजूला.अहो त्याचे पंजाबी मित्र आहेत,त्यांना खूप आवडतात उकडीचे मोदक”
मी मनात कपाळाला हात लावत म्हटलं ,इथे या महाराष्ट्रीयन सुनेलाही खूप आवडतात मोदक.आणि ती कालपासून या मोदकांच्या आशेवर बसली आहे….
नाहीं म्हणायला,सासूबाई सोडून सगळ्याच बायकांची नजरानजर झालेली मी पहिली!!
त्याला प्रत्युत्तर म्हणून सासूबाई म्हणाल्या ,”तरी मी म्हणत होते ,तो सातवा नारळसुद्धा खरवडायला हवा होता!!”
"मी हल्ली गोड कमीच खाते असं म्हणत"
माझ्या अजूनहीं हुळहुळणाऱ्या बोटांनी,मोदकाला हातही न लावता,मी मुकाट्याने वातूळ बटाटा भाजी
आणि ( बिन-वातूळ)डाळींब्या,भातासोबतखायला सुरवात केली…………
योगिनी श्रीनिवास पाळंदे
पुणे