श्री सरस्वती प्रसन्न
@ योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे
*नाही फेअर….तरीही लव्हली….*
माझ्या आजोळ घरी सात बुटक्या होत्या,पण त्यातल्या सहा हिमगौरी होत्या आणि सातवी मात्र *सावळी-बुटकी..*
ती म्हणजे माझी आई.
अतिशय दर्जेदार शास्त्रीय संगीत आणि नाट्यगीतं गाणारी माझी आई,त्या काळच्या सगळ्या प्रतिष्ठित मोठ्या संगीत स्पर्धा जिंकली होती.
वसंत देसाई यांच्याहस्ते बक्षीस घेतानाचा तिचा फोटो अजूनही माहेरच्या अलबम्स मध्ये आहे.
या अशा तेजस्वी सावळ्या *माली* बद्दल “माली काय दिसायला चांगली आहे??”(केवळ सावळी म्हणून)
असं वाक्य ऐकलेलं होतं. आणि मला त्याचं दुःख बिख्ख मुळीच नाही झालं.कारण आई सावळी असली तरी नाकी डोळी अतिशय नीटस .आणि त्याहीपेक्षा तिचं बुद्धधी आणि विचार सौन्दर्य अतितीक्ष्ण होतं. *गाण्याचं नाणं तर खणखणीत होतंच होतं* ,
आणि त्या खात्रीमुळेच हे वाक्य उच्चारणाऱ्या घरातल्याच एका ज्येष्ठ नातेवाईकाला मी मनोमन माफ केलं होतं.
पण रंगमंच गाजवणाऱ्या आईला हा *रंगपंच* मात्र जरासा टोचायचाच.
माझं बालपण घराबाहेर उंडारणे आणि अभ्यासाकडे पोटतिडीकीने दुर्लक्ष करून,विजयनगरच्या समस्त मैदानांत खेळणे यामध्ये गेल्यामुळे,माझी सावळी तनु अगदीच *सावळी टॅनू* झाली होती, ज्याची फिकीर कधीच वाटली नव्हती.
घरात असलेल्या एकुलत्या एक,पारा उडालेल्या आरशासमोर *चांगले रंग दाखवलेस* असं वाक्य म्हणण्यासाठीही मी कधी उभी नाही राहिले.
रंग ह्या शब्दाची ओळख मला शाळेतल्या(गणपती चित्रकार) दाभोळकर सरांमुळे झाली खरी.आणि त्या झालेल्या ओळखीचा ना मला काही फायदा होता ना अखिल कलाविश्वाला.सर माझ्या चित्राला नाईलाजाने दहापैकी साडेतीन(हे अर्ध्या मार्काचं गणित काही समजलं नाही बुवा) मार्क देत असत आणि मलाही माझी चित्रकला त्यापलीकडे मार्क्स मिळवायच्या लायकीची नाहीच मुळी असा बेदम आत्मविश्वास होता.
शाळेनंतर रंग हा विषय सुटला आणि त्यानंतर *चेहेऱ्याचा रंग* नावाच्या एका रंगाने आयुष्यात आणि मनात प्रवेश केला.
काळ्यासावळ्या मुलींनी काहीतरी *प्रथमोपचार* करून रंगबदल करून घ्यावा असे बदलाचे वारे तेव्हा वाहू लागले होते.
माझे कॉलेजचे दिवस विको टरमरीक नावाच्या एका पिवळ्या क्रीमने सुगंधी केले होते.
व्हिकोटर्मरीक लावल्यामुळें उजळलेल्या माझ्या सावळ्या सख्या पाहून, ते वापरायचा माझा बेत मात्र मनोमन निश्चित झाला.
एव्हाना मी आरशात स्वतःतल्या *ऐश्वर्याला* निरखु लागले होते आणि आईवडिलांच्या रीतसर परवानगीनन्तर (लागायची बाबा परवानगी त्याकाळी) *ऐश्वर्याला उजळवण्यासाठी* अखेर मी ते क्रीम वापरू लागले.
सौन्दर्य प्रसाधनं निषिद्ध असलेल्या आमच्या घरात,अशा रीतीने विकोचा मुक्त प्रवेश झाला.
एव्हाना कनिष्ठ मध्यम ते मध्यम मध्यम असा आमच्याही कुटुंबाचा प्रवास झाला होताच,त्यामुळे ब्युटीपार्लरमध्ये जाणं यालाही मासाहेबांची खाजगीत परवानगी मिळालेली होती.
त्याकाळी आय ब्रो ला पाच रुपये घेत असत आणि फेशियल-ब्लिचिंगला पन्नास.
एकदा आम्ही सगळ्या सख्या धाडस करून ते *फेशिअल उपचार* करून आलो.मी वडलांना म्हटलं”बाबा माझ्या चेहेऱ्याकडे पहा.कसा दिसतोय ते सांगा बरं?”
अंतू बरवा असलेल्या आमच्या पिताश्रीनि चेहेऱ्याची रेषही न हलवत सांगितलं *अभ्यास न केल्यासारखा दिसतोय* हे ऐकून विकेट गेलेल्या माझा टेम्पररी उजळलेला रंग क्षणात काळवंडला होता.
या फेशियलची गंम्मत अशी की रंग जरा जरा उजळला आणि त्यानंतर उन्हात बाहेर पडले की सूर्य किरणांचा *डी व्हिटॅमिन्सचा मेकअप* चेहऱ्यावर चढून पुन्हा आपला चेहेरा पूर्ववत!!!!!
बीकॉम आणि त्यानंतर नोकरीला चिकटणे या प्रवासानंतरचं कंपल्सरी स्टेशन होतं विवाहमंडळात नाव नोंदणी!!!!!!
आणि तिथे चक्क *मुलीचा वर्ण* असा वर्णावर की (वर्मावर???)घाव घालणारा प्रश्न होता.
आमच्या चतुर मासाहेबांनी त्यात लिहिलं *गहू.*
गहू वर्ण या शब्दाची माझी ओळख त्या क्षणी झाली.
घरी भावाने यथेच्छ चेष्टा केली.
कुठला गहू?
सिहोर की लोकवान की खपली??
(खपली गहू असतो म्हणे)
भाऊराया, *खपली गहू वर्णाची आमची भगिनी लग्नाच्या बाजारात खपली* असे फालतू जोक ही मारू लागला.
आमच्या शेजारी राहणारी वनिता पिठ्ठ गोरी त्यामुळे तिला माझे बाबा मैद्या म्हणायचे,मैद्याच्या गोळ्यासारखी पांढरी धोप.पण या मैद्याच्या पित्याने म्हणजे गव्हाने माझ्या पित्याची मात्र लाज(?) राखली.आणि विवाह मंडळाच्या फॉर्ममध्ये लिहायला, *सावळा आणि गोरा यामधले एक स्टेशन गव्हामुळे मिळालं.*
मुळात सावळा वर्ण मला कधीच टोचत नव्हता.
*पण तो टोचायला लावला इतरांनी!*
लग्नाच्या बाजारात(?) गोऱ्या मुलींची लग्न पटापट जमतात हा आमच्या मासाहेबांचा समज होण्याचं
कारणं असं होतं, की विवाह मंडळातल्या फॉर्ममध्ये मुलाकडच्या अपेक्षा या सदरात *गोरी मुलगीच हवी* अशी अट बऱ्याचदा असे.
सावळा ते गहू ह्या प्रवासासाठी आम्ही *हळदीघाटची लढाई* लढू लागलो.
*जी माशेलकरांच्याही आधी विको च्या पेंढारकरकाकांनी जिंकली होती.*
कारण चक्क माझा वर्ण हळूहळू बदलू लागला.
काही महिन्यांनी आईची भीड इतकी चेपली की ती फॉर्ममध्ये(त्या काळी विवाह मंडळांच्या,वेबसाईट नव्हत्या)
गहूच्या जागी मुलीचा *उजळ वर्ण* असेही शब्द ठोकून वापरू लागली.
तोपर्यंत आमच्या आयुष्यात एका नवीन मलमाने प्रवेश केला.फेअर अँड लवली!!!
( *खरंतर फेअर आहे म्हणून लव्हली,असं म्हणायला हवं ना?* )
त्या विंग्लिश मलमाने सुद्धा आमच्या सावळेला..……सुंदर…...रूप मनोहर करायचा चंग बांधला होता.. *पण राहो निरंतरवाले हृदय मात्र सापडत नव्हते*,हा भाग निराळा.
अगदी खरं सांगायचं तर त्या वयात मी अगदी *रेखुडी हेमुडी स्मितुडी* दिसत नसले तरी,त्या क्रीमविनाही
बररीच बररी दिसत होते…....
पण लोकाग्रहास्तव ती क्रीमं लावून उजळ दिसत राहणे क्रमप्राप्त होते.
अखेर अस्मादिकांच्या दोनाचे चार हात झाले
लग्नांनंतर मला विविध माणसांच्या *रंग-बेरंग* छटा अधिकच दिसू लागल्या.
एका दिराचं ठरत आलेलं लग्न,
फायनल होऊ शकलं नाही केवळ मुलीच्या सावळ्या रंगामुळे!
मुलगी सी ए,एका प्रसिद्ध कम्पनीमध्ये नोकरी करणारी,सुस्वभावी तरीही रंग…….. *त्या रंगाने बेरंग केलाच*
आणि तिला नाकारणारी मंडळी *“सगळी पुढची प्रजा सावळी होते मग”* अशा *कुळकुळीत* कॉमेंट्स करत राहिली.
प्रजा चांगल्या संस्कारांची,चांगल्या विचारांची,चांगल्या बुद्धीची होईल की नाही याची अजिबात काळजी नव्हती पण *प्रजा कुठला रंग घेईल* याची काळजी मात्र समस्त आजी मंडळींना होती.
बरं त्याच घरातल्या अशा लख्खवर्णाच्या प्रजेने, पुढे *करिअरमध्ये किती लख्ख उजेड पाडले* त्याबद्दल न बोललेलंच बरं.
या अशा *रंगाग्रही* वातावरणात आमच्या घरी एकदाची गोड बातमी आली.
माझ्या डोहोळ्यांच्यावेळी, *रोज शहाळ्याचे पाणी प्यायल्याने मूल गोरं होतं* असा साक्षात्कार सासरच्या कुणालातरी झाला होता.सो आम्ही डुगडुगत्या चालीने रोज संध्याकाळी शहाळे प्यायला जाऊ लागलो.
त्याने बाळाचा वर्ण,गौर व्हायला किती मदत झाली ते नाही माहीत पण शहाळ्वाल्या अण्णाचा वर्ण मात्र *धनतेजाने उजळू लागला होता.*
आणि इतक्या शहाळ्यानी अंघोळ घातलेल्या आमच्या कन्येचा वर्ण मात्र गहूच निघाला आणि *तिच्या सुदृढतेपेक्षा जास्त चर्चा तिच्या गहूवर्णाची मात्र झाली*.
आमच्या माताश्रीनि यावेळी मात्र कंबर कसली होती आणि आमच्या घरात बदाम आणि हळकुंड सायित उगाळून लावणे असे *बाळ वर्ण-उपचार* सुरू झाले.
रोज अख्खा बदाम कशाला फुकट घालवायचा? असं म्हणून,आमच्या मातोश्री, अर्धा बदाम उगाळून फक्त बाळाच्या चेहेऱ्याला लावायच्या (मानेखाली कशाला लावू तो महागडा बदाम??बघणारे फक्त चेहेराच बघतात ).
अशारितीने अर्ध्या हळकुंडाने नव्हे तर अर्ध्या बदामामुळे आमची कन्या उजळू मात्र लागली.
तिला आंघोळ घालणारी सावित्री “बाल, तोंडाने गोरं दिसतंय,मानेखाली का वो सावलं?”असले,माझ्या काळजाला आणि आमच्या माताजींच्या काटकसरीपणाला हात घालणारे प्रश्न विचारू लागली.
तर अशी ही आमच्या तीन पिढ्यांची मी एन्जॉय केलेली रंग-यात्रा,(त्यातल्या विविध मनुष्य छटांमुळे, रंगीत झालेली......)
पण आपल्या समाजमनाचा कौल मात्र बुचकळ्यात टाकणारा आहे.
एकीकडे सावळे सुंदर,सावळाच रंग तुझा,त्या सावळ्या तनूचे,रूपे सुंदर सावळा गे माये,असल्या गाण्यांना उचलून धरायचं.त्या वर्णाच्या कृष्ण,विठ्ठल या दैवतांवर इतकं जीव ओवाळून प्रेम करायचं की अगदी *नवसाच्या कमिटमेंटमध्ये सुद्धा अडकवायचं*.
आणि अगदी शिशुवयातल्या शाळेच्या विविधगुण दर्शन कार्यक्रमासाठी सुद्धा एखादं गोरंपान मूलंच निवडायचं.(विशेषतः राजा राणी निवडायची वेळ आली की.....)
सिनेमासाठी,जाहिरातीसाठी कलाकार निवडायची वेळ आली….आणि हो लग्नासाठी सुद्धा( *तो ही जीवनरंगमंचावरचा कलाकारचं की* ) की गोऱ्या रंगाची अट घालायची.
दादासाठी गोरीगोरीपान फुलासारखी छान वहिनी आणायची.
गोऱ्या भाळी जाळी चढवून,त्या गोऱ्या गळ्यात नवरत्नांची की कायशिशी माला चढवायची.
छान छान छान मनिमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान असली गाणी बालपणापासून शिकवायची.
*(मी तर मनिमाऊचं काळ काळ गोड गोड बाळ सुद्धा पहिलं आहे बरं का)*
आणि अगदी उडदामाजी सुद्धा काळेगोरे निवडायचे.
एक गोष्ट मात्र पक्की की लख्ख गोऱ्या वर्णाची मागणी करणारी जात म्हणून *कुणीही कुठल्याही जातीला नावं ठेवू नये* कारण समस्त भारत देशातील अगणित जाती जमातींच्या मध्ये हे *वर्ण-रण* माजलेलं आहे.
कुणीही त्यातून सुटलेला नाही.
या रणाने काहीजणांना खूप विद्ध मात्र केलं.रंगामुळे नाकारलं जाणं, गुणांची अवहेलना होणं तर वाईट आहे,अक्षम्य आहे.
पण जेव्हा घरातली जवळची माणसही त्यात अडकून स्वतःच्याच जिवलगाला त्रास देतात तेव्हा होणारे घाव खूप खोल जातात.
वरवर न दिसणारे हे घाव एखाद्या मानसशास्त्र शिबिरात मात्र लाव्हा रसासारखे उसळून येतात आणि भाजून ही काढतात आणि त्या ढासळलेल्या व्यक्तीला *I love myself and I Accept myself exactly as I am*,असले मानसोपचार करायची वेळ येते.
मी स्वतःपाहिलंय,एका वर्कशॉपमध्ये!
दाट सावळ्या रंगाची ती कॉर्पोरेटकल्चर मधली मुलगी.महागडा ड्रेस,महागडे मोजके दागिने,महागडी पर्स,चपला,घातलेली.उचच विद्या विभूषित आणि पगारदार अशा या मुलीने, चेहेऱ्याला कारण नसताना चोपडलेल्या क्रीमच्या थराकडे पाहून मला वाईट वाटत होतं.
एका सेशनला आयुष्यातल्या खोलवर दुःख देणाऱ्या आठवणींवर, एक प्रकारचा उपचार म्हणून एक नाट्य छटा रंगवायला सांगितली होती.तेव्हा ती मुलगी तिच्या *“मुलगी दाखवायच्या”* कार्यक्रमात तिचे आई वडील तिला कसं वागवायचे हे सांगत होती.आई,मुलीच्या चेहेऱ्याला कुठली कुठली मलम चोपडायला लावायची,मुलीने त्या वेळी कुठल्या रंगाचा कपडा घालावा जेणेकरून ती कमी काळी दिसेल यावर समस्त नातेवाईकात चर्चा व्हायची आणि शेवटी वडील तर, तिच्या चेहेऱ्यावर प्रकाशाची तिरीप येऊन तिचा वर्ण त्यातल्यात्यात कसा उजळ दिसेल अशी बैठकीची व्यवस्था करायचे.हे सगळं तिने एकदा नव्हे *अनेकदा भोगलं होतं.* त्या आठवणीतला प्रत्येक शब्द उच्चारताना ती हमसून हमसून रडत होती.
अखेर तिचं लग्न झालं होतं आणि नवऱ्याने केवळ त्या रंगाच्या कारणामुळे तिला लगोलग काडीमोड सुद्धा दिला होता.
इतकी उचचशिक्षित मुलगी पण डिप्रेशनमध्ये गेली होती.
वर्ण-युद्धाचा हा उचच शिक्षित बळी!!!!
आपला समाज,आपला देश ठराविक बाबतीत प्रगत आणि या अशा विषयांत मात्र आहेच मागासलेला.
तिथे ह्या अशा अनेक घटना घडत असतील.कित्येक मनं मोडून पडत असतील.
*पण या संपूर्ण जगतात काय घडतं?????????*
आपला देश मागास-विकसनशील म्हणावा तर जर्मनीसारख्या प्रगत देशातही मी स्वतः हा *वर्णअपमान* सहन केलेला आहे.
तिथल्या ट्राम प्रवासात माझ्या शेजारच्या रिकाम्या झालेल्या जागेवरही बसायला कुणी जर्मन तयार नसे,त्यापेक्षा ते उभं राहणं प्रिफर करत.मला बरंच असायचं.ऐसपैस बसता यायचं पण तरीसुद्धा मनात खटकायचंच(हो,खरं काय ते कबूल केलेलं बरं)
हल्ली असं ऐकलय की तिथल्या मॉडर्न मुलींमध्ये मात्र कृष्ण वर्णीयांशी लग्न करायची फॅशन आलेली आहे. त्यानंतर तिथे पुढच्या पिढीचा झालेला वर्णसंकर मात्र त्यांच्या त्या *शुद्ध आर्यतेच्या अहंगंडाला* नक्की हलवून जात असेल याची मला खात्री आहे
हल्ली आपल्याकडच्या मॉडर्न मुलीसुद्धा मुलगा कसा हवा??तर *टॉल,डार्क, हँडसम* असं म्हणू लागल्या आहेत म्हणे.
पण मॉडर्न मुलाकडच्या बाजूने *तरतरीत सावळी मुलगीच हवी* अशी अट असल्याचं काही अजून ऐकलेलं नाहीये.
दोन वर्षांपूर्वी नंदिता दासने या रंगभेदा विरुद्ध लढाई पुकारल्याचं वाचलं होतं.आणि तेव्हा बॉलीवुडमधल्या *मी टु* सारखिच एक दुसरी लढाई सुरू झाली होती.
अमेरिकेतल्या वर्णद्वेषाचे आणि गुलामगिरीचे वर्णन करणारी The roots ही कादंबरी काही वर्षांपूर्वी वाचली होती आणि मनापासून अस्वस्थ झाले होते.
त्याच अमेरिकेसारख्या *महाप्रगत(???)देशात* अजूनही असे वर्णबळी पडतच आहेत.
आणि एखादी जॉर्ज फ्रॉइड सारखी घटना तर अख्ख्या अमेरिकेला पार उघडं पाडते.”मी गुदमरतोय, मला श्वास घेता येत नाही” असं म्हणत म्हणत एक तरुण चक्क जीवानिशी मारला गेला,अखिल जगताने हे पाशवी दृश्य पाहिलेलं आहे.
*हाच तरुण जर वर्णाने काळा नसता तर त्या इन्स्पेक्टरची असं वागायची हिंमत झाली असती का?*
अमेरिकेने त्या घटनेची पुरेपूर किंमत मोजली,हे त्यांनतर उसळलेल्या दंगलीनी सिद्ध केलं.
त्याघटनेनंतर ढवळून निघालेल्या जगात बरेच वरवरचे तरी बदल झाले.सिस्को सारख्या महाकाय कम्पनीने त्यांच्या कामकाजातून *ब्लॅक हा शब्दच वगळायचं ठरवलं* तिथे आता ब्लॅक लिस्ट हा शब्दसुद्धा वर्ज्य आहे.हिंदुस्थान यूनिलिव्हरने फेअर अँड लव्हली हे नाव बदलून ग्लो अँड लव्हली असं *वर्णविरहित* नामकरण केलं.
अर्थात त्याने लोकांची मानसिकता किती बदलली हे नाही समजत.
मला खरंच नाही समजत की ही मानसिकता कधी बदलेल,कुणामुळे बदलेल आणि मुळात बदलेल की नाही.
पण आपल्या भारतीयांची लवचिकता काही कमी नाही. आणि विकास पावलेल्या पश्चिमी राष्ट्रांपेक्षा (नक्की कुठला विकास देवच जाणे)आपली लवचिकता काही विषयांत तर नक्कीच बरी आहे.
कोरोना काळात, *भारत वाटतो तितका ढ विद्यार्थी नाही* हे तर सिद्धच झालं आहे. भले भले, पहिल्या नंबरात येणारे, इंग्लंडसारखे फिरंगी विद्यार्थी,कोरोना परीक्षेत सपशेल आपटून नापास झालेत.
त्यामुळे अचानक पहिल्या नंबरात पास होऊ शकणारा माझा देश, कदाचित पुढेमागे *वर्णविरहीत विचारांची कास* धरेलही,अशी आशा करायचा कॉन्फिडन्स मला आला आहे.
काय सांगावे,नजीकच्या भविष्यात *मुलगी स्वच्छ सावळीच हवी,* अशीही अट घालणारी स्थळं नोंदवली जातील.
बघूया ना वाट,त्या दिवसाची…….!!!!
@योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे