Apr 18, 2021

पिल्लू

श्री सरस्वती प्रसन्न
  @ योगिनी श्रीनिवास पाळंदे
               *पिल्लू*
हाऊस ऍरेस्ट कसं म्हणावं? 
हौस नसताना मिळालेली रेस्ट म्हणूया फारतर
पण नाही ना मिळत रेस्ट
शरीराला मिळत असेल 
पण मनाला नाही
तो सातसमुद्राच्या पल्याड घरात
मी सातसमुद्राच्या अल्याड घरात
इथे कोरोना तिथे कोरोना
इथे कर्फ्यु तिथे कर्फ्यु
भय तिथले संपत नाही
भय इथलेही संपत नाही
रोजची आठवणींची तहान
झुकयापुढे झुकून भागवते
रोजची फोनची वेळ ठरलेली
दोन दिवसांपूर्वी आला त्याचा फोन
सर्दटलेल्या आवाजातला,
माझ्या कानांना धडधडलं
“बाळा आवाज असा का रे तुझा
काहीं होतंय का रे?”
त्याने उडवून लावलं
हे हल्ली नवीनच शिकलाय
*तो म्हणे मोठा झालाय*
मी बेचैन...
शेवटी त्याचं,न विस्कटलेलं
अस्पर्श कपाट उगाचंच लावायला घेतलं
त्याची प्रगतीपुस्तकं अजूनही आहेत कपाटात
कपाट लावताना येतात हातात!!!!
कित्ती वेगवेगळी प्रगती-पुस्तकं
सजवलेली,रंगारंग!!!!!
त्यात दरवर्षीच्या फोटोखाली चिकटवलेली त्याची छोटुली नखं,
मऊ मऊ केसांचे झुबके
हाताचे आणि पावलांचे
 इवले इवले ठसे!!!
प्रत्येक वर्षीच्या पुस्तकात हळूहळू मोठे होत गेलेले.......
पावलांचे ठसे इतके कधी मोठे झाले समजलंच नाही!!
इतके मोठे……की अचानक बाबाच्या बुटातच शिरायला लागले!
पावलं बाबाच्या बुटात शिरली
आणि आई अभ्यासाच्या बाहेर पडली
तरी आठवत राहातो
मी घेतलेला अभ्यास
परीक्षा काळात घेतलेली 
कन्सेशन्स, सुट्ट्या.
सोडलेली प्रमोशन्स
सगळा सगळा गतकाळ
होमी भाभा,स्कॉलरशिप,एन टी एस,आणि शेवटी
जीवापाड दिलेली आय आय टी
सगळ्या सगळ्यात मी त्याच्यासोबत होते
आधी शरीराने बुद्धीने
आणि नंतर मनाने
आणि आता हा शहाणा म्हणतोय
“मी मोठ्ठा झालोय,उगाच काळजी करू नको
काही सर्दीबिर्दी नाहीये,ताप तर अजिबात नाही”
अरे मी ऑफिसातून आलेली असताना
तू आज्जीच्या हातातून 
पहिल्या मजल्यावरून 
मलूल गढूळ डोळ्यांनी
मला पाहिलेलंस
तेव्हा खालच्या गेटातूनही 
तुला आलेला ताप मी ओळखला होता
*बिनास्पर्शाचा*
हे लंडन बिंडन काय चीज आहे रे??
माझ्या नजरेचा थर्मा मीटर
 स्क्रीन फोडून थेट
तुझ्या कपाळावर पोचलाय 
माझ्या बाळा
खरं सांग तुला ताप आहे ना?”
“आयला आई तू ना  भारीच आहेस
आहे ग मला ताप. पण तू नको काळजी करुस
मी घेतोय विश्रांती.”
“खाल्लस काय? मेतकूट देत होते मागच्या वेळी तेव्हा 
नको म्हणालास.
आत्ता मउ भातासोबत खाता आलं नसतं का रे?”
“आई खायची इच्छाच होत नाहीये,परवापासून.आणि करायची एनर्जीसुद्धा नाहीये.
ठेऊ का फोन?मला खूप झोप येतेय.”
फोन ठेवून झोपलास आणि माझी झोप उडवून गेलास.
कालच आंब्याची पेटी आणली होती.
आज काढणार होते रस.
पण आता आंबा कुठला,चहाचं पाणी सुद्धा घशाला टोचेल रे माझ्या.
फोन ठेवून तुझ्याच खोलीच्या खिडकीत बसून बाहेरची झाडं पाहतेय.
कडुलिंबाच्या लिंबोण्या दिसतायत.चाफा हळूहळू फुलतोय
आणि गोटू गोटू बाळ कैऱ्या लटकून झोके घेतायत.
तू नसलास तरी मी करून ठेवलंय 
पातेलंभरून केशर घातलेलं पन्ह
फक्त ते आता एका दिवसात संपत नाही
लोळत राहतं चारचार दिवस.
शेजारच्या अंगणात जांभूळ बेसुमार बहरलाय.
तुझा बसल्या बैठकीत संपलेला बाउलभर वाटा
आणि *जांभुळनिळी* झालेली जीभ आठवून हसायला येतंय
आपल्या टेरेसमध्ये शिंजिरने पिटकुलं घरटं बांधलंय
दिवसभर बारक्या आवाजात किणकिणत असतो
ऍम्ब्युलन्सचे आवाज ऐकुन आलेलं मळभ
त्या किणकिणीने जरा दूर होतं
तरी खरं सांगू….प्रत्येक सायरन
माझं काळीज चिरत जातो
जगातला सगळा प्राणवायू त्या आतल्या जिवाच्या
शरीरात जावा यासाठी प्रार्थना करते.

तुला पुन्हा फोन करावासा वाटतोय
ताप चढला तर नाहीये ना??
थकवा असेल तर कसा रे ओट्याशी उभा राहशील?
बघेन बघेन आणि तिथल्या माझ्या मैत्रीणीला तुझ्याकडे डबा द्यायला सांगेन
तुला कितीही क्रिनजी वाटलं तरी चालेल
क्रिनजी म्हणे,कसले मेले *फिरंगाळलेले* शब्द वापरतोस

पण आता तिला कसं सांगू.
कर्फ्यु भेदून माझ्या तापलेल्या  पिल्लाला डबा घेऊन जा म्हणून.
तिलाही तिची काळजी घ्यायला हवी ना.
तुझं *लास्ट-सीन* बघून झोपले
झोपले कसली..आडवी झाले
रात्र हळूहळू चढतेय,बाहेरची आणि मनातलीही
रात्री थांबतात अब्युलन्सचे आवाज
पण तरी कानात खोलवर तो सायरन 
वाजतच राहतो आणि जखमा देतो
आणि आता तुझा हा ताप!!!!!
माझी झोप उडवून गेलेला
पहाटे पहाटे लागला बहुतेक डोळा
तरी धसकून उठलेच
डोळे चोळत चोळत
*कराग्रे मोबाईल धरला*
तुला ऑनलाइन पाहून जीव थरकला
आत्ता तुझी मध्यरात्र ना रे?
सुरवातीला तू गेल्या गेल्या
मी सारखी विचारायचे  *आत्ता तिथे किती वाजलेत!!*
कसला उखडायचास तू.
“सारखी सारखी,आत्ता तिथे किती 
वाजलेत नको विचारू.”
पण आता कुठे विचारते मी!!
लंडनचं घड्याळ कालनिर्णयसारख
 भिंतीवर लावुनच टाकलंय
माझे पहाटेचे पाच म्हणजे तुझे रात्रीचे साडेबारा ना?
तापात सुद्धा चालूच आहे का तुझं जागरण?
नेटफ्लिक्स??की गेम?
की ताप चढलाय तुला म्हणून झोप येत नाहीये?????
दोन दिवस झाले तुला तापून
मलाच आता कणकण वाटतेय
बहुतेक मानसिकच
काल जेव्हा तू म्हणालास की 
लिंबाच्या लोणच्याचा वासच येत नाहीये
तेव्हा काळजात कळ घुसली रे……
सगळे अवयव आक्रोश करायला लागले
पोटात कळ, हातपायाला घाम,छातीत धडधड,डोक्यात कल्लोळ
तू पहिला हॉस्पिटलमध्ये जाऊन ये बाबा!!!
मला काळजी वाटतेय.
“सारखी काळजी काय करतेस.मी आता लहान राहिलोय का?
मला नाही आवडत सारखी काळजी केलेली.”
इतकं सोपं हे का रे सगळं?
आणि “मला नाही आवडत” हे वाक्य तर अजिबात  नकोय
मी वाचू का यादी??मला न आवडणाऱ्या  तुझ्या वाक्यांची???
क्रमांक एक…. *इथ्थे सगळं सगळं मिळतं, तू काही पाठवू नकोस*
क्रमांक दोन… *मी आता लहान नाही राहिलोय.*
क्रमांक तीन.. *तू तिथून मायक्रो मॅनेज करू नकोस ह आई.*
क्रमांक चार… *रोज रोज फोनवर काय बोलायचं??*
क्रमांक पाच… *भरपूर छोले करून फ्रीजमध्ये ठेवलेत आता आठदिवस तेच खाईन*
तूर्तास इतकीच….पण अजूनही बरीच आहेत
आज तुझ्या तापाचा पाचवा दिवस
फिरंगी डॉ नि तुला कोरोना टेस्टसाठी
हॉस्पिटलमध्ये येण्याची परवानगी नाकारली
त्यांच्यावर खूप ताण आहे म्हणे
आणि किट पाठवणार आहेत म्हणतोयस
देवा!!!!!!!हा काय प्रकार???
स्वतःच टेस्ट करायची!!!!!!आईआईग!!!!
हे तू सांगितलंस आणि उरली सुरली पळाली
झोप आणि मनःशांती!!!!
शिस्तीत पार्सल घरी पोचलंय
स्वच्छ खोका ,
 खोक्यात सात नळ्या
सोबत सात बाटल्या,
आणि कोव्हिडं सिद्ध करणारं द्रावण
तुला कॅप्सूल गिळताना सुद्धा आईचा हात हातात धरायला लागायचा.
नाकात,घशात नळी घालून तुला येईल का रे सॅम्पल घेता??
तुझे संध्याकाळचे सात,म्हणजे माझा पहाटेचा एक
तिथे तू 
इथे मी
बाबाच्या अंगावर डाफरून 
त्याला मोठा स्क्रीन लावायला लावलाय
न उतरलेल्या तापातला तू
इच्छा नसलेल्या रिकाम्या पोटी
टेस्टची कसरत करताना म्हणजे
माझा इमोशनल थ्रिलरपट 
बाबा झोपलाय
म्हणतो कसा “उगाच इश्यु नको करू.तो मॅच्युअर्ड आहे”
इतका राग आलाय न त्याचा
झालं का रे सँपल घेऊन??
आता काय त्या द्रावणात घालून अर्धतास ठेवायचं??
आणि नंतर फोटो काढून लॅबला पाठवायचा म्हणे
नानाची टांग या फिरंग्यांच्या
अर्धतास!!!कसा जायचा अर्धातास?
चल आपण भेंड्या लावूया की दमशेरास खेळूया ????
भेंड्या लावल्या  रात्री तर इथे लोकं म्हणतील वेड लागलंय हिला.
त्यापेक्षा दमशेरास खेळू.आणि हो
उगाच, किचकट, न ऐकलेले इंग्लिश पिक्चर नाहीं चालणार मला
आणि मी जुने मराठी पिक्चर नाही देणार तुला
 !!!मान्य!!!
आपण दोघे अजूनही मस्त खेळतो ह दमशेरास
झाला का रे अर्धातास!!!!!
काढ बाबा त्याचा फोटो आणि पाठव एकदाचा त्या लॅबला
तिथेही वेटिंग आहे का रे??म्हणजे किती वेळ लागेल??
अजून दोन तास??
तू शहाणपणा नको करुस ,मी मुळीच झोपायची नाही
अरे कशी लागेल झोप बाळा.
तुला झोपायचं तर तू झोप
माझी काळजी नको करुस
मी पडते जरा
मला धडधडतंय, नवरोबा घोरतोय
आणि बाहेर
आकाश पांघरून… जग शांत झोपलेले
तिथे हा फणफणलेला,थकलेला
एकटा……..
ह्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर!!
गळा दाटून आला
जागरणाने चुरचुरु झालेले डोळे झोंबतायत
*एकटी असले की रडणं किती सोपं होऊन जातं*
कितीवेळ रडत होते देव जाणे
शेवटी.....
श्रमलेल्या मनावर आणि दमलेल्या पापण्यांवर झोपेने कुरघोडी केली
कनाशी आवाज येतोय
किणकिण किणकिण
कसली????
टेरेसमधल्या शिंजीराची?? की अँब्युलन्सच्या सायरनची???
जडशीळ पापण्यांना टेस्टची आठवण झाली.
नि सटपटून उठले
मोबाईल वाजतोय
तुझाच फोन
छातीत धकधक
हातात मणमण
'आई लॅबमधून रिपोर्ट आलाय,निगेटिव्ह आहे.
आणि तापसुद्धा उतरलाय
तुला खरं नाही वाटणार म्हणून तुझ्या देखत लावतो थर्मामिटर'
डोळ्यात पाण्याचा दाट पडदा आहे 
तू दाखवलेला थर्मामिटरचा आकडा वाचताच येत नाहीये मला
'आतातरी काळजी नको करुस,
आणि हो माझा तो निशाचर
मित्र,आत्ताच फ्लॅटच्या बाहेर वरण भाताचा गरमागरम डबा ठेवून गेलाय
बघायचाय का??नको ना??नाहीतर म्हणशील थापा मारतोयस!!
मग आता झोप तू.रात्रभर जागलीयेस ना.'
बाळा आता झोप कुठली यायला
आता तर स्वच्छ उजाडलंय.
मी उजेडाचा शोध घेत टेरेसवर गेले
आणि शिंजीराचं पिल्लू 
उडालं की  घरट्याबाहेर,
मला समजलंच नाही
 ते इतकं मोठं कधी झालं!!!
जाळीवर त्याची आई आणि जाळी खालच्या टेरेसमध्ये मी,
दोघीच त्याच्या आकाशभरारीकडे अनिमिष नजरेने पाहात होतो.
@योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे

Apr 5, 2021

महिलादिन आणि ती

                    श्री सरस्वती प्रसन्न

योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे

      *ती आणि माझा महिलादिन*

मार्चच्या कामघाईतही
महिलादिन येतोच ना!!
यंदा कुणाला बोलवायचं??
चर्चा चालू!!!!!
कुणाला बोलवायलाच हवं का?
अशी कुणी नाही का चालणार??
जी आपल्या आजूबाजूलाच असते??
आपल्यातुपल्या सारखीच असते??
मला ना अशावेळी
*ती आठवते!!!!!!!*
ती माझी बहिण
सख्खी नाही,अख्खी बहीण
नात्याने,मनाने
बाकी फरक असतोच ना
तो आहेच......
ती गोरी मी सावळी.
ती बुट्टूकू मी मध्यम.
ती चालताना हिरनी
माझी गजगामिनी.
लहानपणीं कोकणात
मी झोपाळ्यावर सुस्त
ती परडी घेऊन *फुलमस्त*
तिच्यामागे धावावं लागे
तेसुद्धा काट्याकुट्यातुन
टोचणार्या दगडातून
कोकणातल्या घरामागे
पार पार टोकाला, 
सगळं रान कुस्करत गेल्यावर
एक बकुळी होती
हिला ती फुलं लागायची
घराजवळचे गुलाब,जाई, जुई
कवठीचाफा यांनी
निःश्वासलेले सुगन्ध
आम्हाला पुरे व्हायचे.
पण हिला बकुळ हवीच
तीच ती….
*वाटेवर काटे* असलेली

 *तर अशी ही*
पानोपानींचे शुभशकुन
गोळा करत बसणारी
पानं हिरवी असोत वा पिवळी
झाडावर असोत वा मातीवर
पुस्तकाची असोत वा पेपरची
रविवारी तिच्या घरचा टीव्ही बंद
आणि......
सात आठ वर्तमानपत्रांची 
चळत आलेली असते घरात
पान न पान वाचते
पुस्तकं पुस्तकं....किती ती पुस्तकं!!
झपाटलेलं वाचन
आणि त्यावर लेखकांना 
लिहिलेली अभिप्राय पत्रं
तिला आशिर्वाद द्यायला
पु.ल.सुद्धा आले होते
*पिवळ्या पत्रातून*
लोकांकडे कपाटभर कपडे
हिच्याकडे कपाटभर पुस्तकं
पण सोबत कपडे आणि दागिनेसुद्धा
म्हणते कशी!!!
उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी
एकदा तिच्या ऑफीसात
कुणी एक लेखक आले
ऑफीसातल्या *प्रजेने* 
त्यांना कस बरं ओळखावं?
हिने ओळखलं,अर्थातच..
आणि तिथेच घातला
*वाकुन-वाला* नमस्कार
उत्साहाने फसफसत राहिली
तुमचं हे वाचलंय..ते आवडलंय
उत्तम उत्तम शास्त्रीय संगीत
उत्तम उत्तम चित्रकृती
एन सी पी ए
कुठले कुठले संगीत महोत्सव
काळाघोडा फेस्टिव्हल
साहित्य संमेलन
जहांगीर आर्ट गॅलरी
घाशीरामच्या प्रयोगाला
शेजारी चक्क शरद पवार
*तर अशी ही*
अगदी सोललेल्या
केळफुलावरही जीव टाकणारी
सोलताना त्यातल्या *गर्भछटा*
मातृमायेने बघणारी
अडल्या नडल्याना भरघोस देणारी
वळचणीच्या कबुतरीचं
बाळंतपणसुद्धा करणारी
वेळप्रसंगी मात्र *कडकलक्ष्मी*
तिचं हे दुसरं रूप!!!!
ती कुणाचाच अपमान करत नाही
आणि स्वतःचा खपवून घेत नाही
म्हणूनच
टिपिकल सरकारी ऑफीसात
 मध्यभागी उभं राहून
आम्हाला जातीवरून चिडवलंत
तर.........
मी सुद्धा तुमच्यावर केस करीन..
करूनच दाखवीन!!!
असं ठणकावून सांगूं शकते
ती नाही घाबरत कुणाला!!
रेल्वेच्या डब्यात कायमच
हिच्याकडे प्लास्टिक पिशवी
एकदा एक बाई मटार सोलत होती
कचरा तिथेच,रेल्वेच्या डब्यात
हिने तिला आधी  *शब्दांनी सोललं* 
नंतर प्लॅस्टिक पिशवी दिली
सालं टाकायला.
घाटकोपर स्टेशनच्या
अलीकडे पलीकडे
नीतीचे *पहारे* उलथवून
स्त्रीत्वाच्या *तिजोऱ्या*
उघड्या पडलेल्या कुठल्याशा 
 *झोपडीसाठी* 
मनाच्या *दाराच्यादोऱ्या* उघडून
ही,चालत्या रेल्वेतून
चांगल्या कपड्यांची गाठोडी टाकते
*तर अशी ही*
यंदाच्या थर्टी फर्स्टला
मी तिला विचारलं
‘आज काय बेत?’
ती म्हणाली ‘उपास’
मी विचारलं ‘का बरं?’
ती म्हणाली
*कोरोनातल्या भूकबळींच्या स्मरणार्थ*
मला एकदम लालबहादूर आठवले
आता *ही* त्यांच्याइतकी महान आहे का??
नाहीच!!!!!
पण इतकीही लहान नाहीं की
तिच्या या समाजभानाचा
उल्लेखही करू नये
*तर अशी ही*
मुंबईच्या रेल्वेतूनही
वेळेपूर्वी तब्बल दहा मिनिटे
ऑफीसात पोचणारी
तिथला क्षण न क्षण 
कामी लावणारी
ऑफिसातल्या टेम्पररी मुलीला
ऑफिस वेळेवर पगार देत नाही
म्हणून खिशातून नोटा काढून देणारी
पिवळे कागद
सरकारची कामाची शान घालवतात
म्हणून ऑफीसात स्वखर्चाने
पांढरेशुभ्र कागद आणणारी
झपाटलेपणे पुस्तकं घेणारी
चरचरावर स्वतःला ओवळणारी
फुलांना काव्यपाकळीत बांधणारी
मालिनीताईंच्या गाण्यात रमणारी
ढगांच्या छटा पाहताना हरखणारी
गीताई वाचताना गहिवरणारी
फुलं तोडताना झाडांची माफी मागणारी
टेरेसवरची जास्वंदीची फांदी
मैत्रिणीला देताना,फांदीचा *माहेरनिरोप* घेणारी
सूर्यग्रहण सोहोळ्याचा *विश्वसाक्ष* समारंभ
रेशमी साडी नेसून,घरात साजरा करणारी
*पैसाच्या* ज्ञानखांबाला
*अश्रूभीज* मिठी मारणारी
आसक्ती…अनासक्तीचा तोल
काटेकोरपणे सांभाळणारी
   *अशी ही*
माझ्या मनातल्या महिलादिनाची
*कायमची व्याख्याती*
मी, आठ मार्चची वाट नाही पाहात 
कारण.... माझा महिलादिन
             वर्षभर चालू असतो
          तिच्याकडून काही घेण्यात…..
           आणि…….
   *तिच्यासारख्याना शोधण्यात…*

योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे