Feb 21, 2021

वास

श्री सरस्वती प्रसन्न
                
योगिनी श्रीनिवास पाळंदे
                 *वास*
डोळ्यात जळजळ,घशात खवखव
पायात मणमण घेऊन
काल रात्रीपासून तो आलाय
कित्येकांना होतं, तसच मलाही
पण आम्ही *सत्याणेदार* ना
लगोलग टेस्ट केली
पी पी इ चे श्वेतांबर परिधून 
लॅबवाला आला
नाकातोंडात हात घालून गेला
संध्याकाळी मेलतो म्हणाला
आणि आली मेल पॉझिटिव्हची
मी आहेच की पॉझिटिव्ह 
पहिल्यापासून...
त्यात नवीन ते काय
नवीन इतकंच की
बस आता बोंबलत एका खोलीत
नवरा छद्मीपणे हसून गेला
जरा मनन चिंतन करा आणि
आठवा गेल्या दोन महिन्यात 
किती लग्न अटेंड केली???
मी म्हटलं करून दाखवू
मग काय
पेपर,पुस्तकं,पाणी ,लोणी
थर्मामीटर,ऑक्सिमीटर
यांच्यासह  कोठडी!!!
माझी चौदा दिवसांची
 *कॉर्पोरेट जन्मठेप*
 दरवाजाबंद!!!!!
बायकाबंद!!!!!!!
तीस साल बाद आमचा 
मधुचंद्र पिक्चर सुरू
मधु आयसोलेटेड एका खोलीत
चंद्र दुसरिकडे ऑनलाईन कामात
दुसऱ्या क्रोसीनला
मधूचा ताप उतरला
मग फूड फूड चॅनेल सुरू
चंद्राला स्वैपाक कुठे येतोय
माझं रसोई मॅजिक...
पोह्यांशी सुरू होतं
आणि उपम्याशी संपतं
कढीपत्ता तोडायला टेरेसवर गेले
सवयीप्रमाणे पान तोडली
आणि चुरून नाकाशी लावली
चुकून गोकर्ण तोडला का काय?
पुन्हा वास घेतला
पुन्हा तेच !!!!
 दीर्घश्वसन केलं
 आई ग.....वास गेला माझा...
उपमा केला पण 
*निर्गुण निराकार निर्वास*
घशात लॉक झालेला
*आध्यात्मिक* उपमा
नवरा  कोऑपररेशनमूड मध्ये
चांगला झालाय की
तुलाच चव नाही समजत आहे
सकाळच्या चहातल्या आल्यापासून
ते मेथीभाजीतल्या
 लसणीच्या फोडणीपर्यंत
माझा *हुंगखोर लॅब्राडोर* झालेला 
माझे दीर्घश्वसन 
कशासाठी पोटासाठी?
छे छे फक्त वासासाठी
सासुमांची आठवण झाली
त्यांना वास नाही यायचा
आणि मी??? पदार्थ तर सोडाच
पण ,उन्हात वाळून 
चुरचुरित झालेल्या
 कपड्याचाही वास घेणारी
मग मला ओरडायच्या
सारखी ज्याचा त्याचा 
वास कसली घेतेस??
आता याना कशा सांगू
माझ्या *वासकथा* ?????
पहिल्या पावसाचा वास
ओल्या मातीचा वास
समुद्राचा लाटेरी खारा वास
कोकणातली  वासांची ऍडिशन
माती प्लस शेण प्लस चुलीतला धूर  मामाच्याबागेतला....
 कवठीचाफाळलेला वास
हापुसचा सोडा हो,पायरीचा वास
बाळाच्या ओव्याच्या धुरीचा *जॉन्सनपापीवास*
वर्षा आणि माझ्या प्रभातफेरीत 
येणारा आंब्याच्या मोहोराचा वास
वेचलेल्या ओंजळभर फुलांचा
*बकुळवास*
मैफिलीत दरवळणारा 
जायफळ कॉफीचा वास
शाळेतल्या कोऱ्या वहीचा वास
शाळेच्याट्रिपमध्ये आईने डब्यात
दिलेल्या बटाटाभाजीचा वास
नेत्रावली अभयारण्यात डोळ्यात आणि नाकात घुसलेला
 हिरवा जंगलवास
सिझनमध्ये मिळालेल्या पहिल्या
 मोगऱ्याच्या गजऱ्याचा वास
चौलच्या आठवडी बाजारातून 
पुण्यापर्यंत जपूनआणलेल्या 
दवणा मरव्याचा वास
देव्हाऱ्यातल्या माझ्या लाडक्या
शिवरंजनी उदबत्तीचा वास
ऑफिसात कदमांनी आणलेल्या
वाफाळत्या बटाटेवड्याचा वास
शेवग्याच्या शेंगांच्या आमटीचा वास
खमंग भाजलेल्या बेसनाचा वास
होळीच्या धुराचा पुरणपोळीयुक्त वास
लग्नाच्या होमाचा, 
डोळ्यातून घळाळणारा वास
कढवत ठेवलेल्या लोण्याचा वास
मोदकाच्या उकडीचा वास
कोजगिरीच्या मसालेदुधाचा
*चंद्रसाक्षीवास*
सत्यनारायण शिऱ्यातला *केळेदारवास*
चांदीच्या पळीतून हातावर पडणाऱ्या 
पंचामृताचा वास
माझी वासदुनियादारी 
अफाट असीम अनादी अनंत आहे
पंचेंद्रियातलं माझं सर्वात 
पावरबाज इंद्रिय ....
वनवासाचे चौदादिवसच काय एकवीस दिवसही संपले ..
गजानना गेला ना कोरोना
यकदम दणकट मजबूत 
 *कपालभातीवाली* फुफ्फुसं
पण नाकाच्या पाईपलाईनित
कोरोनाचा चोक आहे.
मी मज हरपुन बसले ग
कुणीतरी सुचवलं
थोडक्यात वाचलीस
घरच्याघरी निभावलंय
देवाचे आभार मान.
मुळीच नाही..शक्य नाही!!!
आभार??? हरगिस नही??
वो  मेरा नाक लेके गया है
ये नाक मुझे  वापस दे ठाकूर
 मेरा वास मुझे वापस दे ठाकूर

योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे

Feb 20, 2021

अ ल क

श्री सरस्वती प्रसन्न
योगिनी श्रीनिवास पाळंदे
(अ ल क  चा पहिलाच प्रयत्न)
अ ल क  1
असंख्य बाळंतयातना आणि जीवघेणा रक्तस्राव सोसून रमाने तिळ्याला जन्म दिलाय.
गोंडस तीन पऱ्यांना पाहून तिच्या सासूबाईंच्या एका डोळ्यात हासू आणि दुसऱ्या डोळ्यात आसु आलेत.
सासूबाई देवापुढे हात जोडून प्रार्थना करतायत,रमाच्या आयुष्यासाठी आणि कुलदीपकाच्या जन्मासाठी सुद्धा.
दहा बाटल्या रक्त दिल्यावर कुठे रमाचा देह मृत्यरेषे अलिकडे आलाय.
कारण
कुलदीपकाला जन्मदेण्यासाठी रमाच्या देहाला जगावच लागणार आहे.

अ ल क  2

सुनेला कडक डोहाळे होते,ते माहेर मायेने पुरवता पुरवता शुभांगी धन्य झाली आहे.
चिरंजीवांना,सुनेला आणि होणाऱ्या बाळाला खास भेट म्हणून तिने,मुदतपूर्व राजीनाम्याचा अर्ज पाकिटात घालून आणलाय.
तिकडे चिरंजीव आणि सुनबाईसुद्धा आईला पाकिटात घालून गोड बातमी देणार आहेत.
सुनेच्या माहेरघराजवळ,नवीन ब्लॉकची नोंदणी झालीये,त्याचे कागदपत्र आहेत पाकिटात.
बाळाला सुनेची आई सांभाळणार आहे ना.

अ ल क 3

विग्स आणि विंगजच्या आलिशान लॉबीमध्ये वीस वर्षाची ऋता बसली होती.तिच्या डोक्यावरच्या स्कार्फ खाली तिची कॅन्सर लढाईची कथा होती. तिचा कुरळा,घनदाट विग आज तिला मिळणार होता. विग लावून बाहेर पडताना, ऋताचा चेहेरा आत्मविश्वासाने उजळला होता.आणि कितीतरी दिवसांनन्तर विग्जच्या मालकाला आज पैशासोबत, दुर्मिळ असा निर्मळ आनंदही मिळाला होता.
अ ल क 4
संस्थेत त्या आल्या होत्या.
निरागस ,चौकस,डोळ्यात अपार कुतूहल असलेल्या
अगदी खऱ्या खऱ्या वनकन्या
मी उत्साहाने शिकवत होते
चौथाच दिवस... ..
धडा होता पक्षी प्रेमाचा
तुम्हाला कुठला पक्षी आवडतो सांगा बरं??
सगळयाजणी एकमुखाने म्हणाल्या *मोर*!!!
"का ग आवडतो मोर तुम्हाला??"
मी विचारलं.
त्या पुन्हा एकमुखाने उतरल्या"खायला छान लागतो ना..'
माझ्या काळजात चर्रर्र झालं
त्यांनीच मला जीवनातला एक धडा शिकवला होता.

@योगिनी श्रीनिवास पाळंदे पुणे