श्री सरस्वती प्रसन्न
*मुंबईची सहनसिद्धी*
मुंबईवर बॉम्बफेक होणार अशी आवई उठलेली.
आवई कशी म्हणायची?खरोखरच तसा प्रसंग उदभवला होता.
आकाशात लढाऊ विमानांची घरघर सुरू झाली होती
1972 च्या पाकिस्तानवॉर वेळीचा प्रसंग. माझं वय अंदाजे सात.
आमच्या सहनिवासातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने गस्त घालायचं ठरवलं होतं.खिडक्यांना काळे कागद चिकटवायच्या सूचना आलेल्या. रात्री दिवे घालवायचे असा इशारा मिळूनही काही घरात दिवा लागायचा आणि मग गस्त घालणारी मंडळी *“जोशी बाथरुम मधला दिवा घालवा”* अशी आरोळी ठोकायचे.
जोशी आणि *गस्तवान मंडळी* दोन्हीबाजूनी समसमान समजूतदारपणा!
त्यामुळे राग,चिडचिड,आमचे नाव का मोठ्याने घेतले वगैरे इश्यू कधीच नाही झाला.
नोकऱ्या चाकऱ्या सांभाळून गस्तपथके रात्रीरात्री राबत असत आणि एकमेकांना युध्दकाळातही आधार देत असत.
*माझी मुंबईच्या सहनसिद्धीबद्दलची ही सर्वात जुनी आठवण!!!!*
मुंबईकरांच्या रक्तातच ह्या सिद्धीचं *हिमोग्लोबीन* ठासून भरलंय.
मुंबईची जीवनरेखा असलेली रेल्वे, हिचे या सहनसिद्धीमधले योगदान अपूर्व म्हणावे लागेल.
खचाखच भरलेली एखादी वसई किंवा विरार लोकल असते,ती अंधेरी पर्यंत येतानाच ओतप्रोत भरलेली असते..
बाहेरून तिच्याकडे पाहता आतमध्ये इंचभरही,जागा नसते.तरी अंधेरी स्टेशन आले की आतले आणि बाहेरचे असा भेदभाव उरत नाही,आणि बाहेरच्यांना अलगद आत सामावून घेतलं जातं,तिघांच्या सीटवर चौघांना सामावून घेतलं जातं तसंच!!
पुढच्या स्टेशनात तीच (जणू)अध्यात्मिक देवाणघेवाण होते आणि ती चालूच राहाते.
नुसती चालू नाही राहात तर त्या तसल्या गर्दीत भजनं चालतात,आणि डोहाळजेवण, हळदीकुंकू आणि भोंडले सुद्धा रंगतात.
नुसते रेल्वेच्या डब्यापुरते नाही तर,बाहेरच्या प्रांतातून आतमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मुंबई अलगद सामावून घेते. आणि त्याची राहायची खायची प्यायची सोय कुठेतरी नक्की होते.
आतल्या आणि बाहेरून आलेल्या सर्वच मंडळीना अहोरात्र तडजोड मात्र करावी लागते.
सगळ्या पातळीवरची तडजोड,
खुराड्या सारख्या जागेत राहायची,तुडुंब गर्दीने भरलेल्या वाहनाने प्रवास करायची,महागाईला तोंड द्यायची,राजकीय हतबलतेची…….सगळीच तडजोड!!
*मुंबई शहराच्या कणाकणात ही तडजोडीची विलक्षण सिद्धी रुजलेली आहे.*
नेमेची आलेल्या पावसाळ्यात मुंबईची *तुंबई* होते.
माझ्या लहानपणी असाच एक उधाणलेल्या पावसाचा दिवस होता.रेल्वे ट्रॅक हळूहळू भरायला लागलेले.
किंग्ज सर्कल,हिंदमाता, सांताक्रूझ-सबवे अशा लाडक्या लेकरांवर वरुणराजाने *स्पेशल-पॅकेज* जाहीर केलेलं.
झालं……...दुपारीच गाड्या बंद पडल्या. संध्याकाळी सहापर्यंत घरी पोचणारे आईबाबा,रात्रीचे दहा वाजल्यानंतरही घरी आलेले नव्हते.
चाळीतल्या मुंबईकर शेजाऱ्यांनी आम्हा लहान मुलांना जेवायला घातलं.सोबतीला येऊन बसले.
आई बाबा *चर्चगेट ते अंधेरी* असे अंतर रात्री रेल्वेट्रॅकमधून चालुन,पहाटे घरी पोचले. बरं त्याची कुठे तक्रार नाही की कुरकुर नाही.
*परिस्थितीचा अटळ स्वीकार*.
ही कथा केवळ माझ्या आईवडिलांची नाही तर तमाम मुंबईकरांची होती *आणि अजूनही आहे.*
ही गोष्ट चाळीस वर्षांपूर्वीची.
पण तसाच प्रसंग 26 जुलैच्या पूराच्यावेळीही घडत होता.
लोकं मिळेल त्या वाहनाने घरं गाठायच्या प्रयत्नात होते आणि वाहन न मिळालेली तमाम जनता,रस्त्याने पायी चालली होती.
तेव्हा आसपासच्या घरातून,हातात पार्ले ग्लुको बिस्किटाचे पुडे आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन मुंबईकर खाली उतरला होता, आणि घर गाठणार्या *मुंबादेवीच्या वारकऱ्यांना* आधार देत होता.
गैरसोय पचवून पायी निघालेल्या मुंबईकरांच्या सहनसिद्धीची आणि रात्री अपरात्री,वादळी पावसात,घरात बसून न राहाता त्यांच्या मदतीला धावून येणाऱ्या मुंबईकरांच्या सहनसिद्धीची देखील कमाल वाटते.
*सहनसिद्धी* शब्द ज्ञानेश्वरमाऊलींनी त्यांच्या लेखनात वापरलेला आहे
त्यामुळे त्या शब्दालाच एका व्रतस्थ योग्याची तेजझळाळी आहे
आणि अनेक आपदांमध्ये तावून सुलाखून निघालेल्या मुंबई आणि मुंबईकरावर या *तेजझळाळीची प्रभावळ आहे*.
मानसशास्त्राप्रमाणे सहनसिद्धी शब्दाचा अर्थ होतो इंग्रजीतला फ्रस्ट्रेशन टॉलरन्स
म्हणजेच,मनस्वास्थ्य ढळू न देता,शांत राहून विपरीत परिस्थितीला तोंड द्यायची क्षमता अथवा कुवत!!
मुंबईकरांनी मिठी नदीवरआक्रमण केले आणि त्याची मोठी किंमत मृत्यूंतांडवाच्या रूपाने चुकवली!
तसंच समुद्रावरील *रेक्लेमेशनच्या* रूपाने निसर्गावर अंकुश मिळवायचाही प्रयत्न केला खरा!
पण येणाऱ्या अफाट लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी निसर्गाविरुद्ध केलेला हा प्रयत्नसुद्धा मुंबईकरांना प्रत्येक पावसाळ्यात भारी पडतो.
26 जुलैला मिठी नदीने मुंबईच्या थोबाडीत मारली,तरीही गाल चोळत मुंबईकर अलिप्तपणे चालतच राहिला.
लाखोंच्या मनाला चटका लावून *डॉक्टर अमरापुरकरांसारखा* एक प्रथितयश डॉक्टर उघड्या गटारातून मृत्युमुखी पडतो तेव्हा मुंबईकर विलक्षण हळहळतो.
असे अनेक डेथ टोल दरवर्षी देत देत मुंबई सहनसिद्धीचे व्रत घेऊन ताठपणे उभी आहे.
लोकसंख्येच्या फुगवट्यामुळे पाणी व वीज पुरवठा यासारख्या व्यवस्थांवर ताण आले, निसर्ग रुसला,प्रदूषण वाढले,रेल्वेवरचा अतिरिक्त ताण वाढला,गर्दीच्या भडक्याने लोकांचं मनस्वास्थ्य पणाला लागले,जागांच्या किमती गगनभेदी झाल्या.
या पार्श्वभूमीवर,राजकारण्यांच्या *क्षीण इच्छा शक्तीमुळे* रस्ते मात्र खराबच राहिले,गटार साफ झालीच नाहीत आणि झोपडपट्ट्याना दिलेल्या *राजकीय आशीर्वादामुळे* बकालपणा मात्र बेसुमार वाढतच गेला.
या सगळ्याचा अतोनात त्रास झाल्यावर कधीकधी मुंबई रस्त्यावर उतरते,रेल्वे ट्रॅकवर येऊन आंदोलन सुद्धा करते.
पण ते अगदीच क्षणिक असतं.
सत्य हेच असतं की सगळ्या त्रासांसकट आणि दोषांसकट *मुंबईच्या कुशीत,मुंबईकर खुशीत असतो.*
तो क्षणिक रागावतो, आणि नंतर रागावणे विसरून पुढे चालू लागतो.
मुंबईवर अनेक *जखमा* आहेत.तिने त्या लपवलेल्या असतील पण त्या आहेत हे निश्चित.
बाबरी मशिदीच्या वेळेला झालेल्या धार्मिक दंगली!!!!!!!
सर्वांना सामावून घेणाऱ्या मुंबई शहराला,कधी नव्हे ती धार्मिक तेढ पहायची वेळ आली होती.
पण त्याने निर्माण झालेली क्षणिक तेढ ,काही महिन्यांनी मावळली.
1993 साली झालेली बॉम्ब स्फोटाची मालिका,ओळीने झालेले बॉम्ब स्फोट,
त्यातले काही तर रेल्वेमध्ये झाले होते तरीही ती *मुंबईची जीवनवहिनी* बंद नाही पडली.
२७ नोव्हेंबरचा ताज हल्ला हा तर मुंबईच्या मानबिंदूवर पडलेला घाला होता.
कामा हॉस्पिटल, ताज हॉटेल,ओबेरॉय ट्रायदंत हॉटेल,नरिमन हाऊस, लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक या सगळ्यावर अतिरेकी हल्ला झाला.मुंबई भीतीने गोठून गेली होती.
तुकाराम ओंबाळे नावाच्या एका मुंबईकर कॉन्स्टेबलने अतुलनीय धैर्य दाखवून अजमल कसाबला पकडलं.
*आणि मुंबईकरांच्या सहनसिद्धीच्या मुगुटात,अतुलनीय धैर्याचेही पीस रोवले गेले.*
मुंबईचा माणूस घाबरून गेला होता पण तो थाम्बला नाही पुन्हा नव्याने जनजीवन सुरू झाले.
परळला कोसळलेला ब्रिज असो वा बॉम्बस्फोटाच्या रक्तरंजित मालिका असोत.
त्याने घाबरून तो घरी बसून राहत नाही आणि रेल्वेने जाणेही बंद करत नाही.
नाही म्हणायला गेल्या काही वर्षांत मुंबई-मेट्रो आली आणि तिने रेल्वेच्या ताणाला थोडं हलकं केलं.
प्रवाशांचे जीवन थोडं सुसह्य झालं.
पण इथेही कसोटीच्या प्रसंगातून सुटका नसते.एखादेवेळी हवेतून चालणारी मेट्रो तांत्रिक बिघाडामुळे हवेतच बंद पडते......
कधीकधी चार पाच तास सुद्धा!!!!!आतमधली वातानुकूलित यंत्रणा बंद पडते.आत अडकलेला घामाघूम झालेला, मुंबईकर तेही सहन करतो.
*मुंबईकर कुठल्याही संकटाचे *भयंकरीकरण करत नाही.त्याची *सहज स्वीकाराची अफाट क्षमता* त्याला या सगळ्या संकटात न डगमगता खंबीरपणे उभी ठेवते.
एकाक्षणी असंही वाटतं की हातातोंडाची गाठमिळवण्यासाठी,
पोटाची खळगी भरण्यासाठी ही *वज्र-तडजोड* त्याच्यावर लादली तर नाही ना जात? नाईलाजापोटी तो हे सहन करतो का?
पण पुढच्याच क्षणी वाटतं नाही मुंबईकर असहाययतेपोटी तडजोड नाही करत.
त्याची सहनसिद्धीच इतकी विलक्षण आहे की त्या सामर्थ्याच्या जोरावर तो पुढेच जात राहतो.
मुंबईकरांच्या रक्तात अजून काही घटक आहेत जे त्याची ही सिद्धी वाढायला कारण ठरतात.
मुंबईकर सर्व सणांवर,नाट्य सिनेसृष्टीवर,क्रिकेटवर,
तुडुंब प्रेम करतो.
तो गणपतीत नाचतो,गरबा खेळतो,दहीहंड्या फोडतो,गल्लीत क्रिकेट खेळतो,आणि अपघातात मृत्यूपंथाला लागलेल्या अमिताभसाठी सिद्धिविनायकला नवसही बोलतो
*अगदी धारावीवाला मुंबईकर, अँटिलियाचे स्वप्नसुद्धा पाहतो* आणि सत्यात मात्र अगदी जमिनीवरची लढाई लढत जगतो.
आणि त्याच्या त्या सहजतेचं विलक्षण आकर्षण अवघ्या जगताला वाटत असावं!
म्हणूनतर एखादा *स्लम डॉग मिलियनर* ऑस्कर सुद्धा गाठतो.
मुंबईच्या कलेबद्दल ज्ञानाबद्दल वैद्यकीय सुविधांबद्दल काय बोलावे!!
एन सी पी ए,काळा घोडा फेस्टिव्हल, रवींद्र नाट्य मंदिर,शिवाजी मंदिर,
षण्मुखानंद हॉल,जहांगीर आर्ट गॅलरी यासारखि कलामंदिरं…
टी आय एफ आर किंवा बी ए आर सी, आय आय टी, यु डी सी टी(आय सी टी)यासारखी ज्ञान मंदिरं...
टाटा कॅन्सर हॉस्पिटल,जसलोक,
नानावटी,लीलावती,बॉम्बे हॉस्पिटल सारखी जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवणारी आरोग्यमंदिरं......
या साऱ्यासाऱ्याचा मुंबईच्या स्वभावावर आणि तिच्या शक्तीवर,
सिद्धीवर उर्जादायी परिणाम नक्कीच होत असणार.
मुंबईकराचा विकपॉईंट म्हणजे
*सिने सृष्टी आणि क्रिकेट!!!*
त्यातल्या ताऱ्यांच्या तो भजनी लागतो त्यांच्यावर ओतप्रोत प्रेम करतो.
त्यांच्यासोबतची स्वप्ने सुद्धा रंगवतो.
पण ह्या सर्व झगमगीत दुनियेबाबत मुंबईंकर *सॉरटेड* मात्र आहे.
स्टेजवर जे आहे ते किंवा छोट्या मोठ्या पडद्यावर जे आहे ते वास्तव नाही याची( *आध्यात्मिक?* ) खूणगाठ त्याने बांधलेली असते.
ते आयुष्य,ती स्वप्न आपली नव्हेत याची पक्की जाणीव तो ठेवून असतो.
त्यामुळे त्याने स्वप्न पहिली तरी स्वप्नभंगाची फ्रस्ट्रेशन त्याला येत नाहीत.आणि यदाकदाचित आलीच तर ती तो सहजतेने पचवतो.
ही *सहनसिद्धी* त्याला कुठून येत असेल?
बहुतेक,सिद्धिविनायक,माऊंटमेरी,हाजीअली,महालक्ष्मी,लालबागचा राजा हे सगळे *सर्वधर्मसमभावाने*,
ती सिद्धी प्राप्त करून देतात मुंबईकराला!!!!
तसही मुंबईकराला वेगळा असा जाती धर्म आहेच कुठे?
त्याची जात एकच, *माणूस ही* ! धर्म एकच, *मनुष्यधर्म हा!!!*
म्हणूनच हरताळकेचा कडक उपास करणारी एखादी मनीषा ,तिच्या ऑफीसातल्या,साजीदाने आणलेला,शिरकुर्मा चवीने खाते आणि जेनीने दिलेल्या ख्रिसमस केकवरही तुटून पडते.
आणि गणपतीत त्याच साजीदा आणि जेनी फुलबाजारातून फुलं घेऊन मनीषाच्या घरी गणेश दर्शनाला येतात आणि प्रसादाचे मोदक खातात.
तर अशीही मुंबई आणि मुंबईकर!!!
दशकानुदशके तिच्यावर होणाऱ्या, परप्रांतीय लोंढ्याच्या,
प्रदूषणाच्या,वादळी पावसाच्या,
अतिरेकी हल्ल्याच्या,बॉम्ब स्फोटाच्या
आक्रमणांना *सहनसिद्धीच्या* अलौकिक बळावर तोंड देत ठाम आहे.
एकवेळ सहनशक्ती संपू शकते पण सहनसिद्धी ही चिरकाल टिकणारी असते.
*तशीच मुंबई आणि मुंबईकर त्याच्या या अलौकिक सिद्धीच्या बळावर सर्व विपरिताच्या विरुद्ध, चिरकाल उभेच राहणार आहेत!!!!!!!*
योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे