Jul 28, 2020

दृष्टी

श्री सरस्वती प्रसन्न

      दृष्टी

मंजू अंधारभरल्या डोळ्यांनी खिडकीत स्तब्ध!
खिडकीबाहेरचा सन्नाटा मनात उतरलेला!!!!

 गेली तीन वर्षे, या वेळी असं घरात बसणे माहीतच नव्हते.
तीन वर्षांपूर्वी मेधा संस्थेत घेऊन गेली,आणि त्या चिमण्यांचा वेढा मंजूला गुंतवून गेला,कायमचा!

ती संध्याकाळ मंजुपुढे लख्ख होती.

”ही मावशी आजपासून शिकवायला येणार”इतकीच ओळख पुरेशी झाली!

थोडा स्टारटिंग ट्रबल झालाच!

“काहीतरी मागे लावून घेत असते” नवरोजी.
“तू तिथे जाण्यापूर्वी स्वैपाकपाणी करून जात जा हो” इति सासुमा!!
“त्यापेक्षा एखादा कॉम्प्युटर कोर्स कर,तुलाच ऑफिसात उपयोगी पडेल.” चिरंजीव
कुठल्याही नवीन कल्पनेला हा असा आशीर्वाद मिळे आणि मनात विचारांचा गुंता होऊन पडे!
या सगळ्याच गुंत्याचा आणि शरीरातल्या हार्मोन-थैमानाचा उदास ज्वर भरायचा,शरीरात आणि मनात!  भरभरून समाधान मिळेल असं आपण केलं काय आयुष्यात?आणि यापुढे काय करणार?असे प्रश्न ओरबाडायला लागलेले!!
म्हणूनच मेधा आग्रहाने संस्थेत घेऊन गेली होती,आणि मुलींना पाहताच मंजू क्षणात विरघळली होती!

 मंजु ठाम होती.तिने कुणाचाच विरोध मनावर घ्यायचा नाही हे ठरवलं !!!
जायचं हे आता पक्क!!!
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर वेध लागायचे!
त्या वाटच पाहात असायच्या,गेलं की सगळ्याजणी वेढायच्या, शब्दशः!!
कुणी हात हातात घेऊन,कुणी पर्स हातात घेऊन,कुणी हळूचकन मंजुच्या वेणीला चाचपडत,कुणी कानातल्या गळातल्यालासुद्धा हात लावायच्या.
असलं स्पर्शोत्सुक स्वागत!! 
त्यांच्या नेत्रहीनतेला स्पर्श-संवेदनेनं सशक्त केलेलं!!
विषय ठरवतानाचा चिवचिवाट”मावशी भूगोल आणि इतिहास घे”एकीची सूचना.
”नको नको आपल्याला इंग्रजी जड जातंय”दुसरी कुणीतरी.
सगळ्या कलकलाटायला लागल्या.
शेवटी इंग्रजीवर एकमत!
मंजू हादरली होती त्यांचं अशक्त इंग्लिश पाहून!
सुरुवातीला केजी-लेव्हलची गोष्टींची पुस्तकं वाचावी लागली.
शिकवताना त्रास व्हायचाच आणि यांचं कसं व्हायचं या कल्पनेचाही.
मात्र,हळूहळू सुधारणा होत होती.
त्यांच्या शिक्षिकाच एका परिक्षेनन्तर तसं म्हणाल्या होत्या.

मुलींचं इंग्लिश आणि मंजूचं गेलेलं आत्मभान एकत्रच सशक्त होत होतं.

आता शिकवणं,आणि त्याही पुढचा नात्याचा प्रवास सुरु झाला होता.
फोन नंबर घेऊन झाला,दहा आकडी नंबर क्षणात पाठ! 
या सगळ्यांना स्मरण-शक्तीची इश्वरी देणगी!
“तुमचा नाही लागला तर काकांचाही देऊन ठेवा ना” इतपत जवळीक!!

 मंजुनेही चक्क नवऱ्याचा नंबर दिला.

एकदा मंजू फणफणली होती,इतकी,की तिथे कळवता सुद्धा नाही आलेलं.
फोन सायलेंटवर ! 
त्या रात्री नवरोजीना यांचा फोन “मावशी आज का नाही आली? आम्ही वाट पाहिली”
दुसऱ्या दिवशी मंजुला एस एम एस “गेट वेल सून”असा!
तिसऱ्या दिवशी तिथे गेल्यावर “आजारी माणसाला इंग्रजीत असाच पाठवतात की नाही मेसेज?” यावर उत्साहाने उधाणलेली चर्चा.

मंजुचा वाढदिवस,त्यांचे वाढदिवस,त्यांचा अन्युअल-डे फ्रेंडशीप-डेची कार्ड्स इतकंच काय पण त्यांच्या घरच्या कहाण्यासुद्धा!!!

अभ्यासाचा मात्र कॉमन कंटाळा. इतिहास,मराठी ऐकायला आवडायचं,पण लिहिताना बोंब. आणि इंग्रजीत तर विशेष पडझड.मंजू दणकून अभ्यास द्यायची,आणि अपूर्ण होमवर्कला शिक्षासुद्धा!!
एकदा,इंग्रजीचा होमवर्क अपूर्ण राहिल्यावर मंजुने जगावेगळी शिक्षा दिली, अबोल्याची!!!
मुली बेचैन,मॅडम आल्याचं समजलेलं,पण अबोल्याची शिक्षा.
 चिडलेल्या मंजुने त्यांना स्पर्शसुद्धा नाकारलेला!!
होम-वर्क अपूर्ण म्हणून फणकारून घरी निघून आलेली मंजू बेचैनीत!!

रात्री कहर म्हणजे पोरींनी काकांना फोन लावून सॉरी म्हटलेलं!!

त्या रात्री नवरोजीचं वेगळंच रूप दिसलं! काय भडकला होता!!!!!

”एवढा कसला राग,आणि ही कुठली शिक्षा द्यायची क्रूर पद्धत?
पेशन्स ठेव जरा आणि नसेल जमत तर सोडून दे! तुझा आवाज ऐकला की तुझ्या भेटीचा आनंद त्यांना मिळतो. बिचाऱ्या नजरेने पाहू शकत नाहीत.म्हणून तुला स्पर्श करून त्यांची भेटीची भूक भागवतात.त्या पोरी रडत होत्या,तू म्हणे त्यांना अबोल्याची शिक्षा देऊन आलीस,त्यांना तुझ्या जवळही येऊ दिलं नाहीस.उद्या तुझा जायचा वार नसला तरी जा आणि त्यांना खाऊ घेऊन जा.”

मंजुची कडक शब्दात कानउघाडणी!!

नवरोजींच्या डोळ्यात कधी नव्हे ते पाणी!!

सगळं कसं सुरळीत चालू होतं आणि कोरोना मधेच तडफडला!!

तीन चार दिवसात इकडचं जग तिकडे झालं!!!

शाळेतून फोन आला”,मुलींना आज घरी पाठवणार,शाळा आणि  संध्याकाळचा क्लास बंद”
मंजू गेली ,निदान त्यांना जाण्यापूर्वी भेटायला हवं होतं!
मुलींना मास्क लावले होते.
  निसर्गाने त्यांच्या डोळ्यांना कायमचा मास्क लावला होता आणि आता नाक तोंड झाकणारा मास्क कोरोनामुळे चढला होता!
त्यांच्याकडे बघवत नव्हतं!!
जिथे तिथे सॅनिटायझरच्या बाटल्या होत्या
मुली उदास,उदास होत्या,एकीकडे सामान भरत होत्या.
संस्थेने त्यांना पुढच्या वर्षाची पुस्तकं दिली होती,पण शिकवणार कोण हा प्रश्न अनुत्तरित होता.
“मावशी आता आपण कसे भेटणार?मावशी आम्हाला आता इंग्रजी कोण शिकवणार?”
“मावशी प्लिज जवळ या ना,आम्हाला तुमच्या केसांना हात लावायचाय,
आम्ही हात सॅनिटाइझ केलेत!”
मंजुला रडू कोसळलं! तिने सगळी डिस्टनसिंगची बंधनं झुगारून स्वतःला त्यांच्या स्पर्श-स्वाधिन केलं!
मुली चिकटल्या होत्या,नेहेमीपेक्षा जास्त जवळ येत होत्या.हात तर सोडतच नव्हत्या.
 यापुढची भेटींची अशाश्वतता सगळ्यांना बेचैन करून गेली होती.
“मावशी तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलं होतं ना तुमच्या घरी घेऊन जायचं?”
“मावशी आम्ही आता गावाला गेलो की आम्हाला परत कधी बोलावणार?”
“अग, एक दोन महिन्यात हा आजार पळून जाणार आहे असं परवा आपल्या मराठीच्या बाई सांगत होत्या”
मंजुला त्यांच्या भाबडेपणाचं वाईट वाटत होतं,स्वतःच्या हतबलतेची कीव येत होती आणि परिस्थितीचा संताप येत होता! 
असला कसला हा आजार,इतक्या निरागस जीवांच छोटंसं भाव-विश्व उध्वस्त करणारा!
खिडकीत बसलेल्या मंजुला तीन वर्षांचा ट्रेलर दिसत होता.
खांद्याला नवरोजिनी हात लावला तेव्हा ती दचकलीच!
“बायको,लेक्चरच्या तयारीला लागा. उदास कशाला होताय?”त्याच्या डोळ्यात मिस्कील झाक!

“कसलं लेक्चर? आता सगळं बंद, मुली गावाला गेल्यात तुलाही माहिती आहे,या विषयावरून मला चेष्टा नकोय अजिबात.” 
सगळी हतबलता बाहेर येत होती.
“अहो मॅडम,तुमच्या मुली स्मार्ट आहेत. ग्रुप कॉलची तयारी सुरू आहे आमची.”नवरा हसत हसत म्हणाला.

मंजुने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं.  “काय सांगतोयस काय? मुलींना कुठे रे ग्रुपकॉल बद्दल माहिती आहे?"
“बायको,चार पाच दिवसांपूर्वी सोसायटीत भाजीचा टेम्पो आला होता , तू भाजीसाठी खाली गेली होतीस,तेव्हा तुझा फोन लागला नाही म्हणून तुझ्या कन्यानी मला फोन लावला.माझ्याशी दोन दिवस बोलतायत.
अग त्या चांगल्याच टेक्नोसॅव्ही आहेत, त्यांनी ग्रुप फॉर्म केलाय.
मी म्हणालो नाहीतरी ग्रुप फॉर्म केला आहात तर तुमच्या मॅडम ग्रुपकॉलवर शिकवतील तुम्हाला.
ते ऐकल्यावर नाचायलाच लागल्या.
सर्वांना शिकवलं आहे मी,काय काय स्टेप्स असतात ते,काहीजणींना थोडी व्हिजन आहे त्याना नीट कळलं आहे, ज्यांना अजिबात व्हिजन नाही त्यांच्या घरची मंडळी किंवा आसपासचे कुणी मदत करतील.गावाकडे तेवढी मोबाइल-साक्षरता आहे म्हटलं!"

नवरोजीच्या हातात मुलींच्या सहावी इयत्तेचं इंग्रजीचं कोरं पुस्तक!! ऑनलाइन मागवलेलं!!
मंजू ताडकन उभी,नवरोजीने वर्क फ्रॉम होम मधून केलेल्या निःशब्द कामगिरीने ती थक्क !!

अखेर तो ग्रुप कॉल झाला.
पोरींनी काय आनंद-गोंधळ घातला !
नुसत्या चिवचिवत होत्या.
“मावशी तुम्ही कशा आहात?आजी आणि दादा कसा आहे?”

“मावशी आमच्या शेतावरची हळद आली आहे,आम्ही रोज हळद दूध पितो.मला तुला हळद पाठवायचिये, आता गावाकडून कशी पाठवणार?
एस टी बंद आहेत ना?"

“मावशी आम्हाला तुमची,आणि शाळेची सगळ्यांची आठवण येते”

“मावशी इथे गावाकडे मला इंग्रजी कोण वाचून दाखवणार?चार घरं सोडून एक ताई आहे कॉलेजात जाणारी पण आता तिचे आईबाबा पाठवत नाहीत संसर्ग होऊ नये म्हणून”
मंजू गुदमरून गेली होती.डोळे भरले होते.मुलींना जवळ घ्यावं वाटत होतं.
मनाला सारखी कुरतड लागली होती,निदान त्यांना पाहावं वाटत होतं.

“मावशी आज नुसत्या गप्पा मारायच्या आणि उद्यापासून अभ्यास हं का?”
मंजुला हसूच फुटलं!
दुसरा दिवस!! नवीन आणलेल्या पुस्तकातले धडा वाचन!!

मंजुने यावेळी मुलींना हातात पेन वही घेऊन बसवलं,”मी सांगेन त्या महत्वाच्या ओळी ब्रेलमध्ये लिहून घ्यायच्या,तशीच कठीण स्पेल्लिंग्स सुद्धा लिहायची.
आपला कॉल झाला,की ते सगळं पाठांतर करायचं आणि मी उद्या पुढचं शिकवायच्या आधी त्याच्यावर प्रश्न विचारिन.कळलं ना?"
मंजू साशंक!
या मुलींना केवळ फोनवरच्या कॉन्फरन्स कॉलवर शिकवलेलं समजेल ना? नीट लिहून घेतील ना? पाठांतर होईल ना? 
असंख्य भुंगे!!

दुसऱ्या दिवस मात्र सुखद धक्का देऊन गेला. 
मुलींनी विचारलेल्या  सगळ्या प्रश्नांची बरोब्बर उत्तरं दिली होती.
“काय ग इतका अभ्यास,तुमच्या होस्टेलवर मी येऊन शिकवायचे तेव्हा का नव्हता केला?" चेष्टेने मंजुने विचारलं.

“मावशी,त्या दिवशी काकांशी फोनवर बोलताना आम्हाला रडायलाच येत होतं.
तू भेटणार नाहीस आणि आपला अभ्यास होणार नाही याचं खूप वाईट वाटत होतं.
मग काकांनी फोनवर आम्हाला समजावलं की मावशीचा आवाज तुम्हाला ऐकायला येणार आहे ना?
मग ती प्रत्यक्ष भेटली नाही तर वाईट नाही वाटून घ्यायचं.
आता बरेच महिने हा आजार चालू राहणार आहे.म्हणजे आता शाळा काही इतक्यात सुरू नाही होणार.
मग फोनवरचा अभ्यास मनापासून करायचा म्हणजे आम्ही अभ्यासात मागे नाही पडणार."
त्या समजूतदारपणाने मंजू एकदम हळवी झाली!

मुलींचं कौतुक करावं की  त्यांना समजवणाऱ्या नवऱ्याचं?

इतक्यात दुसरीने सुरवात केली, ”मावशी आमच्या शेजारी कर्णबधीर मुलींचं हॉस्टेल आहे ना,त्या सगळ्या सुद्धा घरी गेल्यात पण त्यांच्याकडे जेमतेम साधे फोन आहेत.व्हिडिओ कॉल कसा करणार साध्याफोनवरून?
त्यांना हा असा आमच्यासारख्या  ग्रुप कॉलच फक्त करता येईल.
पण त्यांना तर ऐकूच येत नाही ना?आता त्यांचा अभ्यास किती बुडेल!!! 
मग आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्याला देवाने श्रवणशक्ती तर दिलीये ना? निदान फोनवरून तरी अभ्यास शिकत येईल ना?
मग आता यावर्षी आपण खूप अभ्यास करायचा.मावशी सांगेल ते सगळं ऐकायचं.”
कर्णबधिर मुलींच्या विचाराने मंजु हादरूनच गेली.
त्यांची अडचण डोक्यातही आली  नव्हती.
सगळ्याजणीच गरीब घरातल्या,
जेमतेम साधे फोन त्यांच्या घरात होते.
आणि स्मार्टफोन शिवाय त्यांचा व्हिडीओ कॉल शक्यच नव्हता, ऑडीओकॉलचा त्यांना उपयोग
नव्हता.

पण ही समज येण्याइतका शहाणपणा त्या अंध मुलींना कुणी शिकवला होता?
त्या रात्री सगळा अंधारच लख्ख झाला
आयुष्यातले न दिसलेले सुंदर कोपरे पहायची दिव्यदृष्टी तिला नव्याने जाणवली होती.
कितीजणांनि आपल्याला आयुष्यात दृष्टी दिली.
आयुष्यात पोकळी वाटू नये म्हणून मेधाने आग्रह करून करून संस्थेत नेलं.
घरच्यांनी सुरवातीला केलेल्या विरोधाकडे समजूतदार दुर्लक्ष करायलाही तिनेच शिकवलं.

नवऱ्याने ,तिथे प्रत्यक्ष न येतासुद्धा मुलींना माया लावली,त्यांना नुसत्या फोनवरून आपलंसं केलं.इतकंच नाही तर कोविडमुळे झालेला मुलींच्या अभ्यासाचा गुंताही त्यानेच सोडवला.

मुलींनी तर अंधत्वाचं अवडम्बर न करता आयुष्याकडे सकारात्मक पहायची दृष्टी दिली.

आणि आजचं त्यांचं समजूतदारपणाचं बोलणं म्हणजे मंजुचा आयुष्याकडे पाहायचा सगळा नजरियाच बदलून टाकणारं होतं.

त्या रात्री पानांत गोडाचा शिरा होता.

मंजू प्रश्नार्थक!!

सासुमा उवाचल्या”अगं, या सध्याच्या वातावरणात कुणाचच चित्त ठिकाणावर नाही.आपण पाडव्याला सुद्धा यावेळी गोड केलं नाही.पण दोन तीन दिवस तुझ्या मुलींचा अभ्यासाचा तास मी हळूच ऐकत होते बरं का.
तुझ्या डोळ्यांतून त्या शिकतायत, शहाण्या होतायत हे मी पाहिलं.
मी सुरवातीला तुझ्या संस्थेत जाण्याला उगाचच विरोध केला ग.दोन दिवस फोनवरचे मुलींचे आवाज,
त्यांचं बोलणं,त्यांना होणारा आनंद ऐकून 
 तू खूप मोठं काम करते आहेस याची जाणीव झाली.
त्यांचा आनंद आपल्या घरात साजरा करावासा वाटला.

 हा आजचा शिरा त्या कौतुकाचा!!!

साक्षात सासुमांची बदललेली दृष्टी !

नवरोजी आणि चिरंजीवांची मिस्कील नजरानजर झाली.

 मंजुचा हातातला शिऱ्याचा घास मात्र आनंदाश्रूनी खारट झाला होता.

योगिनी श्रीनिवास पाळंदे
पुणे

Jul 23, 2020

टार्गेट

            श्री सरस्वती प्रसन्न

                   टार्गेट

मार्च एन्ड!!   हातातोंडाशी आलेलं टार्गेट.
साधंसुधं नव्हे,दीडशे कोटींची स्कीम फायनल!
जोशींबुवा खुश! 
ऑफिसमधला रुबाबीथाट सोडला तर हा खरा कोकणातला जोश्याच.
पक्का जोश्या!!बायकोला डाळिंब्या सोलायला मदत करणारा.
पण कामाला,बुद्धीचातुर्याला,आणि कनविनसिंगला वाघ.
साठ जणांचा स्टाफ काय हाताळायचा बाबा.एक्ससलेंट मॅनेजमेंट!
पण कोविड आडवा आलाय!
जोशींची चुळबुळ चुळबुळ,येरझारा!!! कसही करून हातातोंडाशी आलेली मोठी स्कीम केवळ कोविडमुळे निसटून नाही द्यायची!
खूप घाईघाई केली,स्टाफला आमिष दाखवून जास्तीचं काम सुद्धा करवून घेतलं होतं!
कलेक्टरचं सर्क्युलर उशिरा येवो अशीं प्रार्थना करत असतानाच  आमंत्रण आलं. 
सिनियर मोस्ट मॅनेजरका बुलावा आ गया. स्टाफ फॉर्म्युलाचा निरोप असणार.
जोशा कोकणी-शिव्या मनातल्या मनात घालत लिफ्टपाशी उभा होता.
घरी जायला निघालेल्या स्टाफला थांबवून ठेवायला लागलं होतं.
सासरेबुवांनी कलेकटरचा आदेश नाचवला.
उद्यापासून कंपलीट लॉकडाउन!
 हाय रे दुर्दैवा!!!
 “साहेब स्कीम पूर्ण झाली आहे फक्त  फायनल डॉक्युमेंटेशन बाकी आहे.ते सही झालं की दीडशे कोटींचा चेक आपल्या काउन्टरला जमा होईल.तेवढी  दोनतीन दिवस स्टाफला बोलवायची परवानगी द्या”
“नथींग डूइंग,जोशी मी रिस्क नाही घेऊ शकत.टार्गेट नाही झालं तरी चालेल,इथे जर इश्यू झाला आणि चॅनेलवाले वगैरे आले ना तर तू गाळात जाशील नि सोबत मलाही घेऊन जाशील. परमिशन नॉट ग्रॅंटेड”
जोशा चडफडला “याची रिटायरमेंट आहे ना साल्याची म्हणून मला दाबतोय. ह्याचं पुढचं प्रोमोशन असतं तर हेच वाक्य बोलला असता का?”

बॅक टू डिपार्टमेंट गेल्यावर सगळा स्टाफ डोळे मोठे करून वाट पाहात होता.
“उद्यापासून सुट्टी!!!!वर्क फ्रॉम होम”सांगून टाकलं, आणि डोक्याला हात लावून बसला.
डोळ्यासमोर दीडशे कोटींचा चेक डिस्को करत होता!
डोळे मिटून,मान टाकुन जोशा अर्धातास तरी बसला होता..

इतक्यात कुजबुज कानावर आली, त्याने डोळे उघडले. केबिनबाहेर न्यू बिझनेस डेस्कच्या चौघी रेंगाळत होत्या.”साहेब येऊ का?”
“अरे विचारताय काय?या की.बसा बसा. बोला”
“सर,आपली नवीन स्कीम फायनल व्हायच्या आधीच लॉकडाउन लागला, खरंतर या चार दिवसात पूर्ण झाली असती ना हो?”
जोशा कळवळला. या पोरींना समजतंय ते त्या सासऱ्याला समजत नाहीये,म्हणे चॅनेलवाले इश्यु करतील.
“होय,तोच विचार करतोय मी.काय करता येईल आपल्याला?
या स्कीमसाठी तुम्हीं सगळे किती मेहेनत घेत होतात,आणि घास तोंडाशी आल्यावर….......”
”सर,आमचं जाऊदे,पण तुम्ही चार्ज घेतल्यापासून काम करायला मज्जा यायला लागली होती,कैक वर्षात पूर्ण न झालेलं टार्गेट यावर्षी तुमच्या स्किलमुळे पूर्ण झालं असतं.आम्ही एवढंच सांगायला आलोय की आपल्याला काही स्पेशल परमिशन मिळाली तर आम्ही चौघी ऑफिसला यायला तयार आहोत.”
जोशा रडायचाच बाकी होता!!!!! कसला कमाल स्टाफ होता!!
 या स्कीममुळे त्यांना तसा वेगळा फायदा नव्हताच.त्यांची महिन्याच्या पगाराची फिगर, या स्कीममुळे बदलली नसती.जोश्याला मात्र तुफान इंसेंटिव्ह मिळणार होता.
दीडशे कोटी पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर थैमान घालायला लागले! त्या चौघीजणी उठून गेल्यावर तासाभराने सगळं वाईंडअप करून निघायला दोन तास तरी गेले.

बायको,मुलं कुणाकुणाकडे त्याचं लक्ष नव्हतं.गेल्यागेल्या टीव्ही समोर जाऊन बसला.
घरचे सर्द, हा आणि टीव्ही????
आणि त्याला अपेक्षित असलेली बातमी झळकलीच,त्याने डोळे बारीक करून खात्री केली आणि टाळ्याच वाजवायला लागला.
कोरोनाच्या बातम्या पाहताना टाळ्या वाजवणारा तो वेडाच वाटला 
घरच्यांना.
आणि त्याला अगदीच अपेक्षित असलेला सासर्याचा फोन दहाव्या मिनिटाला आला!
“जोशी,आपल्याला  इसेन्शियल सर्व्हिस कॅटेगरीमध्ये टाकलंय. मला आपल्या मुंबईहुन इ डी चा फोन आलाय, टार्गेटला काही कोटी कमी पडतायत.आणि बिलिव्ह मी, जोशी फक्त आपल्यामुुळे झोनचं टार्गेट अचिव्ह होणारे,रडतखडत नाही तर सुपर ड्युपर फिगरने.सो,परमिशन ग्रॅंटेड, तुझ्या स्टाफला तू बोलावू शकतोस.मला क्यू-आर कोड मिळालाय,तुला पाठवतो,पोलिसांनी अडवलं तर दाखवायला लागेल.”

हरखलेल्या जोशाने त्या चौघीना फोन लावले.
 कुणाला,कुठे पिकअप करायचं याचि ठरवाठरवी झाली.
बायकोला  एव्हाना अंदाज आला होता.
जोशाला एक्सईटमेंटमुळे झोपच लागेना.कधी उठून ऑफिस गाठतोय असं झालेलं.
सकाळी निघताना बायकोने त्याच्या हातात सहा जणांचा इडली चटणीचा नाश्ता,कॉफीच्या थर्माससकट ठेवला.

जोशाने भुवया उंचावल्या ”पिकनिकला नाही चाललोय”

बायकोने सणसणीत चपराक दिली”तुम्हाला कळतंय का?कॅन्टीनवाला, वडापाववाला,झालंच तर तुमचं ते हॉटेल श्रावण सगळे लॉक झालेत.एक घोट चहासुद्धा आजपासून मिळणार नाहीये.” 
 च्यायला,वाटते त्यापेक्षा ही भलतीच स्मार्ट आहे राव!!

निघताना मिस्कीलपणे म्हणाली “संध्याकाळी ओवाळणीचं तबक तयार ठेवते.
जोशा थम्ब रेज करून बाहेर पडला.

रस्ता सगळा निपचित होता,ती मरण शांतता नको वाटली,आजतरी कसं प्रसन्न असायला हवंय आपण.

दोघींना पिकअप केलं,त्यांना ऑफिसला ड्रॉप करून त्यांना कामाच्या इन्स्ट्रक्शन्स देऊन, उरलेल्या दोघींना घ्यायला तो पुन्हा बाहेर पडला 

सायराच्या गल्लीच्या तोंडाशी गाडी अडली,अरुंद गल्ली आणि तोंडाशीच सगळीकडे पत्रे ठोकले होते आणि पाच सहा मास्कधारी पोलीस खुर्च्याच मांडून बसले होते.जोशानी बाहेर नजर टाकली,तिथे चिकटुनचिकटुन असलेल्या बैठ्या घराकडे पाहताना त्याला जरा वेगळंच वाटलं,बाजूलाच एक मशीद होती, मशिदीपलीकडे दाट वस्ती असलेल्या बैठ्या चाळी पसरल्या होत्या.
सायरा इथे राहते?
“सर,तुम्ही इथेच थांबवा गाडी,मी सायराला फोन लावून तिला बाहेर बोलावून घेते.” मागच्या सीटवरून विनी म्हणाली.
पाचव्या मिनिटाला सायरा बाहेर आली,हातात ऑफिसच्या पर्सशिवाय एक मोठी बॅग होती,बाहेर पडताना तिला पोलीसांनी हटकले.
जोशा सटकलाच होता.हे साले का अडवतायत तिला?
सायरा,आजच्या कामाची मास्टर होती,उरलेल्या तिघी कामाला बेस्टच होत्या पण मेन रोल सायराचा, डॉक्युमेंटेशन मास्टर होती ती.
कुठलीही स्कीम फायनल करण्याआधी,यापूर्वीचे सगळे मॅनेजर आणि अर्थात आता जोशासुद्धा तिलाच बोलावून घ्यायचे.
तिच्या तीक्ष्ण नजरेतून कुठलाही लीगल पॉईंट सुटत नसे.रेफरन्स बुक हातातही न घेता ती एकेक कागद चावून(वाचून)काढायची.
पोलिसांना क्यू आर कोड दाखवायला लागणार असं वाटून गाडीबाहेर पडणार इतक्यात हसत हसत सायरा आली.
”सॉरी सर आपको रुकना पडा.अरे ये पुलीस छोडने को तय्यार नहीं.”
मागच्या सीटवर त्या दोघी डिस्टन्स ठेवून मास्क लावून बसल्या,आणि गाडी सुटली.
“सायरा पोलीस तुला का अडवत होते?”
“सर,तोच प्रॉब्लेम तुम्हाला सकाळी फोन करून सांगणार होते. पण नवरा म्हणाला कशाला सकाळी सकाळी साहेबाना टेन्शन देते.म्हणून फोन नाही केला"
“मला जरा समजेल असं सांग ना, माझं डोकं त्या स्कीमच्या विचारांनी आधीच आऊट झालंय.”
“सर माझ्या बिल्डिंगमध्ये एक कोरोना पॉझिटीव्ह निघालाय,मला हे कळेचना की आता ऑफिसला येऊ कशी? सगळं सील केलंय. पोलिसाने म्हणून तर अडवलं मला.त्याला काहीतरी सांगून मी पटवलंय पण आता प्रॉब्लेम असा आहे की एकदा संध्याकाळी मी घरी गेले तर मात्र मला पुन्हा बाहेर सोडणार नाहीत.”
“सायरा, पण स्कीमचे डॉक्युमेंटेशन एक दिवसात कसं पूर्ण होणार? रात्री थांबूनसुद्धा पूर्ण होणार नाही. कमीतकमी दोन दिवसांचं तरी काम आहे ते.मग कसं करणार आपण?आणि तू आली नाहीस तर सगळं बोंबललं म्हणून समज.”

“सर,माझ्या नवऱ्यानेच मला आयडिया सांगितली,म्हणून तर मी तीन दिवसांच्या कपड्यांची बॅग घेऊन आले आहे.आता एखाद्या हॉटेलात राहायची माझी सोय मात्र करायला लागेल.कारण आता मी घरी नाही जाणार"

जोशाच्या डोक्याला मुंग्या आल्या!

 इतक्या मेहेनतीने ही स्कीम मिळवली होती,शेवटच्या क्षणी लॉकडाउन लागला,मग तो सासरा स्टाफला बोलवायची परवानगी देणार नाही म्हणाला,मग इसेनशिअल सर्विस म्हणून परवानगी देतो म्हणाला,
आणि आता घास तोंडात पडायच्या क्षणी सायराची बिल्डिंग सील झाली होती.दैव बलवत्तर म्हणून ती हिम्मत करून बाहेर तरी पडली होती.

नाही नाही,ते काही नाही,हिची बाहेर राहायची सोय करायलाच हवी,कारण एकदा घरी परत गेली की बिल्डिंगच्या सीलमुळे आणि कर्फ्युमुळे अडकली तर वाट लागेल.
कमीतकमी तीन दिवसांचं सायरास्पेशलपेपरवर्क  बाकी होतं,ज्या नंतरच चेक ऍक्सेप्ट होणार होता.

ऑफिसात त्या दोघीना नेऊन टाकल्यावर, त्याकंपनी सोबत फोनाफोनी चालू झाली.त्यांच्या साईडने पेपर देऊन झालेलेच होते,ते सायराच्या दृष्टीने क्लिंअर झाले की त्यांचा माणूस चेक घेऊन येणार होता. 
टार्गेट कंपलिशन वाला चेक!!
चौघी फाईलींमध्ये डोकं खुपसून बसल्या होत्या,मधूनच कुठला कुठला डेटा,अपलोड सुद्धा करत होत्या!त्यांना इडली-चटणी, कॉफी प्यायला लावून,जोशा येरझारा घालतोय.
स्कीमच्या बार्गेनपलीकडचे ऍडमिनवाले काम सुरू झाले की,याच्या  हात पाठी घेऊन फेऱ्या,हे नेहेमीचेच होते.

पण आज इथवर सगळं येऊन सायराच्या रात्रीच्या राहण्याचं काय,या भुंग्याने डोकं पोखरायला सुरवात केली होती.

जोशाने काँटॅक्टमधले काही नम्बर फिरवून हॉटेलची चौकशी केली.सोय होणार होती.दोन तीन ठिकाणी कन्फर्मेशन मिळालं होतं. म्हणजे खरंतर प्रश्न सुटला होता.

पण जोशा अस्वस्थ होता.सायराला एकटीला हॉटेलमध्ये ठेवणं बरं दिसलं असतं का?

तिच्या नवऱ्याने, तिला परवानगी दिली होती हेच खूप होतं.
त्याच्या विश्वासाला पात्र ठरायला हवं!
दुसरी कुणी असती तर या उरलेल्या तिघीनी स्वतःच्या घरी रात्री राहायला हसतहसत नेलं असतं.

सायराच्या नकळत त्या तिघीना वेगवेगळ गाठून थेट विचारूनही झालं होतं, कुणीच नाही म्हणालं नव्हतं, पण प्रत्येकीच्या घरी सासू,सासरे. नाही म्हटलं तरी जुन्या विचारांचे.
आणि सायरा सुद्धा फारच धार्मिक,नमाज पठण वगैरे सगळं रोजच्यारोज करणारी.
तीन दिवस कसं जमायचं???????
 एकतर त्या सगळ्या,लॉकडाउन असूनहि आपणहून यायला तयार झाल्या होत्या,त्यात,कुणीतरी सायराला घरी न्या हा प्रस्ताव मांडायचा म्हणजे !!!!
शेवटी भार्याशरण जायचे ठरवलं, तशी ती स्पोर्टिंग आहेच.
लावला फोन,तिला वाटलं टार्गेटचा चेक मिळाला की काय!!
तिला हताशपणे सगळा प्रकार सांगितला
”अहो त्यात काय ?येउदे की तिला आपल्या घरी” 
तिनताड उडालाच जोशा. “आपल्या घरी?”
“त्यात  काय  झालं? अहो फक्त एकदा तिच्या नवऱ्याच्या कानावर घाला बरं का.नाही ती माणसं जरा वेगळ्या विचारांची असतात ना. 
 निर्जळी हरताळका करणारी जोशीण स्मार्ट स्क्वेअर निघाली.
सायराशी बोलून झालं,तिच्या नवऱ्याला लगोलग फोन लावला.भलताच समजूतदार होता.
“आपके घर रहेगी ना,मुझे कोई दिक्कत नाही. लेकीन एक बात ध्यान मे रखो…”
जोशा टरकला,आता काय??????
“वो,टार्गेट कम्प्लिट होने के बाद पार्टी करोगे तो हमे भुलना नही” 
जोशा चारिमुंड्या चीत!!
आधी बायको आणि आता सायराचा नवरा.
दोन दिवस कामाच्या धुमशचक्रीचे.
 घरी यायला रात्रीचे दहा.
मान मोडून काम.
सायरा नमाजासकट मुलांच्या रूममध्ये छानपैकी ऍडजस्ट झालेली.
आज शेवटचा दिवस,दुपारी बारा वाजता चेक डिपॉझिट होणार.
मग चेअरमन आणि इ डी सोबत झूम कॉल,अर्थात लॉक डाउन मध्ये येणाऱ्या स्केलेटल स्टाफसोबत!

देवाला नमस्कार करून,बायकोला सांगून,सायरा आणि तिची बॅग घेऊन जोशा निघाला.
जोशींणबाईंनी सायराच्या परवानगीने कपाळाला हळदकुंकू लावून हातात ड्रेस मटीरीयल सुद्धा ठेवलं. 
सायरा थक्क!!

जोशा पाहतच राहिला.साला कुठल्या मटेरियलची बनली आहे बायको,
इतक्या वर्षात हिला ओळखलच नाही आपण.

बारा वाजता चेक आला.
एरवी किती कौतुक झालं असतं. वाजतगाजत,फोटो च्या क्लिक्लिकाटात सासऱ्यांने जोशाला पेढासुद्धा भरवला असता,
च्यायला आज त्या कोरोनामुळे काय वेळआलीये.
सेलिब्रेशनला मोजून सहा माणसं.

झूम कॉल झाला कौतुकाचा,पण रुखरुख लागूनच राहिली जोशाला.
आजवरच्या परफॉर्मन्सला चार चांद लागलेले. खडतर टार्गेट पूर्ण झालं पण काहीतरी कमीच वाटतंय बुवा.

बाहेर त्या चौघीजणी,सिस्टीम आणि मशीन बंद करून निघायच्या तयारीत आणि जोशा केबिनमध्ये,आपल्याला पाहिजे तेवढा आनंद का होत नाहीये याच विचारात,डोळे मिटून ध्यानस्थ!!
इतक्यात बायकोचा मास्कधारी लाऊडस्पीकर वाजला.
जोशा आश्चर्य-चीत!!!
“अहो बाहेर या, आम्हालासुद्धा सेलिब्रेट करूदे की”

बायको ऑफिसमध्ये किचनच्या सहजतेने…...
फॉर्मलिटी वगैरे भानगडीत नाही पडत ती.

मागून सायराचा नवरा माजीद,बाहेर हल्लकल्लोळ!!

साजूकतुपातल्या, प्रसादाच्या शिर्याचा सात्विक केशरभरला वास..
जोशा केबिनच्या बाहेर.
“काय ग, तू कशी आलीस? रिक्षा बंद आणि बाहेर कर्फ्यु असताना?”
“अहो हे माजिदराव आले मला न्यायला(कपाळाला हात!! माजिदराव म्हणे)”
सायरा आणि बायको संगनमताने खुदूखुदु हसतायत. आपल्याला वेडं करायचे उद्योग आहेत हे.
सकाळी सायरा किचनचा ताबा घेऊन बायकोच्या सूचनेप्रमाणे प्रसादाचा शिरा बनवते.आणि सायराच्या रेसीपीने बायको केक करते,टार्गेट-सेलिब्रेशनकेक!!!!

बाहेर सगळे उभे आहेत,माजिदने टेबल सॅनिटाइझ करून मधोमध घेतलंय,त्याने कुठूनतरी उत्पन्न केलेल्या गुलाबाच्या फुलांनी टेबल सजवलं आहे, टेबलवर एकीकडे साजुक शिरा आणि एकीकडे सेलिब्रेशन केक.

“थ्री चिअर्स टू द टार्गेट अचिवमेंट बाय जोशीसर” सगळे एकत्र ओरडतात.
जोशाच्या हातात सुरी आणि डोळ्यात डबडब पाणी!!!!!!!!!!

योगिनी श्रीनिवास पाळंदे
पुणे

Jul 14, 2020

कोकण कळा : भाग 3 - शिवांगी दातार यांची मुलाखत

श्री सरस्वती प्रसन्न। 

रानातल्या रात्रीतली रानपरीची मुलाखत सुरू!!
भवताली सुखद गारवा !!!!
पण कॅमेराकैद श्वापदांची कुठेतरी दबा धरलेली जाणीव!!
आणि आमच्या थरकापलेल्या जीवाचे कान झालेले!!!

आज हे लिहिताना सव्वा वर्ष उलटून गेलं आहे. टू बी प्रिसाईज मुलाखतीची तारीख होती 27 एप्रिल 2019.
सव्वा वर्षात मुचरीच्या जंगलात अनेक वृक्ष फोफावले असतील, अनेक दुर्मिळ रोपं पुण्याच्या नर्सरीतून दातारांच्या घरी राहून आता मुचरिवासी झाली असतील. तिथली हिरवाई अधिक गर्द झाली असेल. शिवांगीचे काही प्रयोग फसले असतील काही यशस्वी झाले असतील.
पण आम्ही या निसर्गयात्रेत तेव्हा कुठे होतो? आणि आज कुठे आहोत?
आम्ही झाडं लावली का, लावलेली जगवली का,पर्यावरण जपायला शहरात राहून काही केलं का? की दाताराना नमस्कार ठोकुन, "आपल्याला नाही बुवा जमणार हे असलं आयुष्य", अशी सोयीस्कर वाक्य म्हणत स्वतःला सेफगार्ड करत राहिलो?????????
शिवांगी बोलत होती…….
लहानपणीची, घराभोवतालची 
बाग तिच्या मनात रुजलेली!
लग्न ठरल्यावरच्या रोमँटिक भेटींत सुद्धा झाडांनी वेढलेल्या बंगल्याचीच स्वप्न!
2004 साली पुण्यात(सुखसोयीयुक्त नव्हे)विविध वृक्ष-युक्त भव्य बंगला साकारतो!
दोन्ही मुलंही मातीत हात घालूनच मोठी झालेली.
आर्थिक स्थैर्य आल्यानंतरचा मोठ्या गुंतवणुकीचा विचार, दागिने, फ्लॅट किंवा परदेशी बनावटीच्या पॉश गाडीपाशी न थांबता, कोकणात जाऊन पोचतो!!
कोकणात जमीन घ्यायची हे ठरल्यावर,अभ्यास,संशोधन,दर आठवड्याच्या कोकण फेऱ्या.
एकदा तर ती ऑफिसच्या कामासाठी थायलंडला जाऊन,पहाटे पुण्यात आल्यावर,अर्ध्यातासात नवीन बॅग भरून कोकणात जमीन संशोधनासाठी जायला निघाली. प्रवास, दमणूक, जेटलाग अशा किरकोळ गोष्टींचा बाऊ करणारी ही माणसंच नव्हेत. 
मुलाखत मध्येच थांबवून मी शिवांगीला तिच्या अक्सीडेंटची आठवण करून देते. 
    "2013 साली मला मनाली इथे पॅराग्लायडिंग करताना अपघात झाला, मणक्याचे हाड मोडले, गंभीर दुखापत,  ऑपरेशन, बेडरेस्ट, पण त्या दोन महिन्यात आयुष्याबद्दल मी खूप विचार केला", ती सांगत होती.

    पण कोलमडून पडणे नाही की रडगाथा गाणे नाही, दोन तीन महिन्यात पुन्हा कार चालवायला सुरवात. आयुष्याला खेचून normalcy वर आणून ठेवले. अगदी हिमालयातील ट्रेक सुद्धा केला! 
आणि 2014 साली प्रोजेक्ट मुचरीने जन्म घेतला!!!!
याला असामान्यत्वच लागतं, मनाचं!! आणि मनाचं असलं की ते शरीरात आपोआप उतरतं!!!!
जमीन-शोधा सोबत इकॉलॉजीकल सोसायटी ऑफ इंडियाचा, वर्षभराचा कोर्स. (अर्थात  परदेशी कंपनीतली
नोकरी सांभाळून) अनेक जमिनी पाहूनही मनास येईनात, जिकडे तिकडे शहरवासीयांनी केलेला हल्ला!
दोन तीन वर्षांच्या संशोधनांनन्तर, मुचरी येथील एकतीस एकराचे खरेदीखत होते!
    एव्हाना आतल्या आवाजाने निश्चय केला की, हे जंगल, संगोपनासाठी, त्यातली जैवविविधता जपण्यासाठी,
निसर्गाचे  देणे अंशतः फेडण्यासाठी घेतलेले  आहे. तिथे कुठलाही "याच्यापासून रिटर्न्स काय?" असा मानवी स्वार्थ असणार नाही!!!
    मुचरिला भेट म्हणजे देवरुखच्या हॉटेलात रात्रीचा मुक्काम, हे गणित सोडवण्यासाठी चक्क मुचरी  येथे जमीन घेऊन तिथल्या पद्धतीचे घर बांधले, ते ही शेखरच्या remote management ने. घराजवळ एक छोटा जमिनीचा  तुकडा विकायचा होता. ते कुरण विकत घेऊन त्यात विविध देशी वृक्षांची लागवड व संगोपन करायला सुरुवात केली. कुरणात सागरगोटा, कुंचा गवत, मोह, बेल, सीता अशोक, ऊद, कदंब इत्यादी झाडांची लागवड केली.
शिवांगी सांगत होती, "सुरवातीला ह्या जमिनीच्या तुकड्याला दगडी कुंपण घातले, पण एकेवर्षी उंदरांनी खूप नुकसान केलं, म्हणून वैभवला सांगून त्या कुंपणामध्ये भगदाडं पाडली, खास सर्पराजांसाठी, आणि तो मात्र जालीम उपाय होता. जीवो जीवस्य जीवनम अमलात आले. उंदरांचा त्रास कमी झाला."
    मी विचारलं, "तुला सापांची भीती नाही वाटत?".
    शिवांगी हसून उत्तर देते, "अहो पुण्याच्या माझ्या बंगल्यात माझी मांजरी तोंडात जिवंत साप घेऊन येते, तो साप मी न घाबरता बाटलीत पकडून बाहेरच्या रानात सोडून देते! (एव्हाना मी थक्कच्या ही पलीकडे पोचलेली असते).
शिवांगीचा कोर्स आणि श्री दातार यांनी मुळापर्यंत जाऊन केलेल्या अभ्यासामुळे, पंचवीस प्रकारची कोकणातली आता दुर्मिळ झालेली झाडं शोधून,पुण्यातल्या नर्सरीतुन घेऊन, त्यांना लहानाच मोठं करून, मुचरिला नेऊन रुजवलेलं असतं. पावसाळ्यात तर पर्यटनाला गेल्यासारखे समस्त दातार जंगलात झाडं लावायला हजर!
मुचरिवासी असलेल्या वैभव-विशाखा आणी त्यांच्या चार कन्याना दातारानी दत्तक घेतलेलं, सर्व ग्रामस्थांशी त्यांच्या सुख दुःखांशी स्वतःला सांधून घेतलेलं.
पण म्हणून पुण्यात निर्धास्त राहणे नाही. सतत तिथलाच विचार!
मध्ये कुणीतरी सुचवतो, सगळ्या जंगलजमिनीला तारेचं कुंपण घालावं!
या दोघांचा ठाम नकार. "अरे कुंपण घातलं तर जंगली श्वापद कशी येणार? आणि ती नाही आली तर जंगल परिपूर्ण कसं होणार? जंगल आमचं नाहीये, ते त्या चराचर सृष्टीचं आहे आणि त्या सृष्टीतील प्रत्येक जीव तिथे येणार, त्याला जंगलातून जे जे हवं ते ते तो घेणार!!"
    एखाद्या गोष्टीच्या ध्यासासाठी माणूस काय काय करू शकतो!!!
प्रयोग म्हणून मधमाशांच्या पेट्या सुद्धा विकत आणल्या होत्या, मधमाशांमुळे परागीभवन होऊन झाडांची वाढ  चांगली होते. मधमाशापालना संबंधी कार्यशाळा धाकट्यादातारानी अटेंड  केली आणि दोन मुलासह आईवडिलांचा पुण्यातल्या गच्चीत मधमाशी प्रयोग सुरू झाला!!!
एका सकाळी माझ्या व्हाट्सअप्प वर पूर्ण सुजलेल्या चेहेऱ्याचा शिवांगीचा फोटो मला धक्का देऊन गेला होता. तिला विचारल्यावर तिने निर्विकार पणे सांगितलं की मधमाशांचा बॉक्स हँडल करताना मधमाशा चावल्यामुळे चेहेरा सुजलाय. बस!!!!! त्याचं कोडकौतुक नाही की इश्यू करणे नाही!!!!!
मधमाश्यांच्या दोन बॉक्सेसची रवानगी मुचरीला झालीसुद्धा.
असले एकेक प्रयोग!
मला वाटतं जंगलालाही गहिवर फुटला असेल त्याचं कोडकौतुक होताना पाहून.
विशाखा वैभव या जोडीला सुद्धा, व्यवसाय उद्युक्त करणे असे बिझीनेस सुद्धा चालूच असतात.
त्या जोडीने एकेवर्षी मुचरीला, शेणखतावरची हळद केली होती. पन्नास किलो हळद निघाली. आणि हळकुंडे उकळत्या पाण्यातून काढून ती सुकवण्याची आणि दळण्याची संपूर्ण प्रोसेस शिवांगी पुण्यात राहून मॉनिटर करत होती.
    मग मला ती जंगलस्वादाची शुद्ध हळद घरच्याघरी मिळाली. काय त्याची चव!! बाजारच्या भेसळयुक्त हळदीच्या तोंडात मारेल  अशी!! अशी माणसं आयुष्यात असणं हीच आपली भाग्यरेखा असते.
    हा हिरवा प्रपंच मुचरित थाटलेला असताना पुण्यात, शास्त्र-वहिनी संस्थेतर्फे शाडूच्या गणपतीकार्यशाळा,
दिवाळीत बहुकोनी-क्लिष्ट, अशा आकाशकंदिलाच्या कार्यशाळा, विविध शाळांत जाऊन किंवा स्वतःच्या बंगल्याच्या गच्चीत सुद्धा!! (हे सुद्धा नोकरी सांभाळून)
    प्रोजेक्ट-त्रस्त पालकांच्या मेकॉलेग्रस्त बालकांसाठी, विज्ञान प्रयोग आणि कागदापुठ्याचा वापर करून  प्रोजेक्ट करायला शिकवणारी शिबिरं सुद्धा शिवांगी विविध शाळांत घेत असे. दिवाळीच्यावेळी श्रीवत्स संस्थेत दरवर्षी होणाऱ्या सामाजिक कामाबद्दल एकदा मी तिला सांगितलं, या गोष्टीला झाली असतील सात वर्ष, तेव्हापासून मी आठवण न करता, दरवर्षी तिच्या कंपनीमध्ये पुढाकार घेऊन, आर्थिक मदत(किमान पाच आकडी), स्वतःची घसघशीत भर घालून, आणि तेवढ्यावर हे थांबत नाही, त्या जमलेल्या रकमेतुन, संस्थेने मागवलेल्या वस्तू ती स्वतः बाजारात जाऊन आणते. आणि हे करताना घरचा दिवाळी फराळ विकतचा नव्हे, आकाशकंदिल कार्यशाळा हे सगळं जोरात चालू असतंच.
    हे सर्व पाहून निसर्गाने तिला दिलेले आठ-अदृष्य हात मला दिसतात.
आपल्यापासून पर्यावरणाला अजिबात हानी पोचायला नको, म्हणून घर शून्य कचऱ्यावर आणून ठेवलेलं असतं. स्वयंपाक घरातील ओला कचरा आणि बागेतील कचरा बागेतच जिरवला जातो. ती ओला कचरा खाऊन तृप्त झालेली बाग, दातारांना मायाळू, अंबाडी, वाल, पालक, लालमाठ अशा भाजा देते.
    पण या प्लास्टिकचं काय करायचं?
प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न काही अंशी तरी सोडवण्यासाठी घरघंटी घेतली जाते आणि कुठलेही पीठ मग ते भाजणी,ज्वारी,बाजरी,आंबोळी असो अथवा कणिक असो सर्व घरच्या घरीच दळले जाते. शक्यतो घरात प्लास्टिक पिशव्या येऊ द्यायच्या नाहीत ह्याचा प्रयत्न घरातील प्रत्येक सदस्य करीत असतो.
इतक्या भव्य बंगल्यात ए सी नाही,उन्हाळ्यात सुद्धा पंखाही न लावता झोपायची किमया दातार मंडळी साधतात तेव्हा मला स्वतःची लाज वाटायला लागते. उन्हाळ्यातला माझा वीजबिलाचा भव्य आकडा मला वाकुल्या दाखवायला लागतो.
जलप्रदूषण न होण्यासाठी आपण साबण लावायचा बंद करू शकतो का? नाही!!!! पण ती नाहीं लावत साबण सुद्धा. ती सांगत असते, "अहो वेगवेगळ्या निसर्गातल्या वस्तूं आहेत की, त्या सोडून साबण लावायची गरजच नाहीये!
मी सॅनिटरी नॅपकिन्स सुद्धा वापरत नाही. केवढं सॉलिड वेस्ट तयार होतं त्याच्यामुळे!!! आपले आई मावशींच्या काळातले तलम सुती कपडेच योग्य आहेत आपल्या स्वतः साठी आणि अर्थात पर्यावरणासाठी सुद्धा".

    एखादी वैतागलेली सकाळ असते आणि माझ्या मोबाइलवर,तिच्या घरच्या पॅशनफ्रुट पासून केलेल्या सरबताचा फोटो झळकतो, टेरेस मधल्या मधमाश्यांच्या सोनेरी मधाने तुडुंब भरलेली मधाची बुधली अवतरते, फणसाच्या गऱ्याचे तेजस्वी चिप्स चमकतात किंवा रसाळ सांदणाचा फोटो दिसतो आणि  कधी लेकाच्या वाढदिवसाला घरी केलेली केशराळलेली-जिलबी सुद्धा टपकते!
    तिने पाठवलेले ते फोटोच माझा दिवस उर्जापूर्ण करून जातात. मग मीही एखादी किरकोळ चिंता आणि चिडचिड विसरून ती ऊर्जा शोषून घेते आणि दिवसाची दिलखूष सुरवात करते.
 माझ्या मनात आठवणी ओघळत असतात,एकीकडे मी मुलाखतही ऐकत असते. रात्र  चढत असते, मध्यरात्रीच्या सुगन्ध-झुळुका शरीराला सुखावत असताना,मी मनात कुुठेतरी बेचैन असते.
मन एकीकडे निःशब्द थक्क झालेलं असताना मी शिवांगीने दाखवलेल्या आरशात स्वतःला पाहत असते.
या प्लॅनेटवर  आल्यापासून मी गेल्या पन्नास वर्षात इथलं काय घेतलं, ओरबाडलं, लुटलं, उपभोगलं? आणि त्याबदल्यात मी या सृष्टीदेवतेला रिटर्न काय दिलं? हा विचार मला छळत असतो. पण ती बेचैनी, तो सूक्ष्म छळ मला हवा आहे कारण तरच माझ्यात पर्यावरणपूरक बदल होण्याची शक्यता तयार होते आहे.

मुचरीहून परत जाताना मी त्या जंगलापुढे नतमस्तक होते आणि दातार परिवारापुढे सुद्धा!!!!!!!  
              समाप्त

Jul 9, 2020

कोकण-कळा : भाग 2 - मुचरी

धूसर धूसर दापोलीची आजोळवाट, लालीलाल धुरळा, लालीलाल नेत्रकडा.

जर्द-लालूस वाटा, सोबतीला समुद्री निळाई, डोंगर प्रदक्षिणा करत थेट कडा!!
अंजरल्याच्या कड्यावरचे गणेशदर्शन!! आणि आता अख्तरीबाई चिपळूणास रवाना!!!!!!!!

सात-बुटक्या(?) आता हिमगौरीला(?) भेटायला उत्सुक!!!!
योगु प्रचंड एकसाईटेड, शिवांगीला (हिमगौरीला) भेटायला.
तिनेच शोधून काढलंय ना तिला!!!!

चिपळूण गाठायला आठ, शिवांगी भेटायला नऊ, जेवायला दहा आणि मुचरीला पोचायला रात्रीचे अकरा!!!!

गाडी सुसाट, घनगर्द जंगलवाट, मिट्ट-काळोखी रात्र, अर्धमिट डोळे. इतक्यात शिवांगी, "ते बघा लिटल इंडियन सिवेट (कांड्याचोर)"…….तो क्षण घट्ट पकडून मी अंधार फाडून पाहाते तो, रस्ता पार करणारे दोन अग्निगोल, एकच क्षण, पुढच्या क्षणी रानात लुप्त!!! माझ्या अंगावर जंगल शहारा!!!

काळोखात गच्च मिटलेलं जंगल, ओला दरवळ. उग्र रानवास,जंगल-जाणीवा जागृत करणारा..
फायनली दोन्ही गाड्या, मुक्कामी!!!! मुचरी 


मध्यरात्रीच्या गृह-प्रवेशाची किती ती तयारी!! सारवलेल्या जमिनीवर शुभ्र रांगोळी, त्यावर डुलडुल पणतिच्या ज्योती!! मानलं शिवांगी तुला. पुण्याहून स्वागताची रिमोट मॅनेजमेंट!!! प्रशस्त स्वागतासाठी उत्सुकलेलं दातारांचं घर!!! शिवांगी प्लस दोन्ही मुलगे अशी दातार सरबराई, आणि संकोचलेल्या आम्ही सातजणी.

शिवांगीच्या जंगलात सारे सारे गाढ निद्रिस्त!!!

जंगलातली सकाळ झाल्याची वर्दी देतो रानकोंबडा, कुणीच कधीच न पाहिलेला, जन्मात न ऐकलेल्या त्या आवाजाने शिवांगीचं जंगल वेलकम करतंय!

आ हा हा हा काय तो हिरवा सोहोळा. शब्द खुंटलेले!   

घर चक्क जंगलाच्या मिठीत!!

सगळ्या इंद्रियजाणिवा एकवटल्यात, काहीच मिस करायचे नाहीये. हा अनुभव, नेहेमी मिळणारा नाही.

प्रशस्त व्हरांड्यात सारे उभे, जिभेवर वाफाळता चहा, नाकाला सूक्ष्म रानदर्प, कान शिवांगीला ऐकण्यात गर्क.

लालीलाल सारवलेल्या गेरु-व्हरांड्यात रान-झुली-झोपाळा, अंगणात तुळशी वृंदावन, त्यापुढे छोटूलं तळ त्यात गुलबट कमळ, शेजारी गोल घुमटासारखी कनात, उर्फ विहिरीचं एकेकाळचं आच्छादन. 

कनाती खाली सेटी उर्फ झाडाची ताशीव खोडं, पावसात उन्मळलेल्या पिंपळाचे देहदान!!! 
कनाती खाली निर्जीव पिंपळाचे सजीव शिल्प!! लाजवाब पुनःरवापर-आपलं रिसायकलिंग हो.
कनातीला कुठल्याशा वेलींचा गुलाबी विळखा, नाजूकलेला!! 
आता, वृक्ष परेड बाय शिवांगी, आम्ही सावधान!!!

उद…देवासमोरचा, सागरगोटा….लहानपणीचा मोह….रसाळ मदिरेचा  कुंचा..घर झाडायचा वाळा…सरबताचा, डिकेमाली तान्ह्या बाळाचा.

सोबत सीता अशोक, बेल, दासवण (दुर्मिळ) आणि कोष्ठ कुळींजन.

आमचा कोकण अभिमान जमीनदोस्त!! पंचवीस आम्हाला परकी (?) झाडं!! आंबा काजू फणसा पलीकडे आम्ही कुणाला ओळखतच नाही.

धडे वाचावे तसे शिवांगीचे घाड, घाड वृक्ष वाचन!!!!! शेजारून पक्ष्यांचे वनगायन!!!!
जंगल ध्यासापायी, शिवांगीने इकॉलॉजीकल सोसायटी चा दीड वर्षाचा कोर्स केलेला, लेक्चर संपवून घरी आल्यावर शेखरसोबत चर्चा, शेखर यांच्या झपाटलेल्या अभ्यासाने कोकणवासीयांनाही माहीत नसलेली कोकणातल्या जंगलातली वीस प्रकारची झाडं, पुण्यातल्या नर्सरी मधून घेऊन, त्या बाळांना जगवुन, मोठं करून मुचरीच्या जंगलात रिप्लान्ट केलेलं. 

 हे असलं वेड लागलेली ही कलंदर माणसं, स्वतः सोबत इतरांची आयुष्यही बहरवणारी.
जंगल हे अपत्याप्रमाणे जपायचे आहे तर तिथलं कुणीतरी हवं ना त्याला सांभाळणार.
मग विशाखा वैभव आणि त्यांच्या कन्या, जणू दातार फॅमिलीचाच भाग बनून जातात.
 विशाखावैभवकडे आमची पोटपूजा!!! शिवांगी तिच्या जंगल मनोगतात या दोघांना विठ्ठल-रखुमाई म्हणते!

आम्ही सात प्लस तीन दातार आता जंगल-गर्भाकडे कूच!!!! 

 शिवांगीची जंगलकथा, जणू  सृष्टी-संतांची गाथा. ती सांगतीये आम्ही थक्क. संत देवभक्तीत निरपेक्ष, दातार निसर्ग-निरपेक्ष!!!

(कलमी आंबा, काजू लागवड  मॉनेटरी रिटर्न्स????? किंवा प्लॉट पाडून शहरकर्यांना विकणे (अशावेळी शहर ही शिवी वाटते)  छे छे छे!!!!!!

 कॉर्पोरेट कपल चंद्रशेखर-शिवांगी यांचं हरित सहजीवन, दोन्ही मुलांची हरितच जातकुळी.

दोन कोटींचे सेकंडहोम..तीस एकर जंगलाचे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट-असीम आनंद!!!!! आनंद!!!! आनंद!!!! जंगल संवर्धन, निसर्गाचं देणं त्याला सव्याज परत करायचा ध्यास!!!

जंगल-जैव विविधतेने नटलेले, बहरलेले, फोफावले, अस्पर्श, घनदाट!!!!!

आम्ही काट्या कुट्यातून धडपडत चालतोय, कंच रान-वाटा तुडवत.
कसलेल्या धाकट्या दाताराच्या हातात कोयता, फक्त वेलविळखा मोकळा करायला.
पाय गुंतवी, काटेरी झुडूप माया!!! जंगल कुरवाळतय जणु.

मोठ्या कातळडोहा पासून दातारांचं जंगल सुरू. आता चढाची ट्रेड-मिल. कानाला सळसळ, रानकिड्यांच्या कॉलशी सुद्धा समस्त दातारांची ओळख!!

चाहूल लागताच, लपलेल्या रानकिड्यांचे धोका-कॉलस सुरू, पावलं पुढे गेली की अरण्य शांतता!!!
आम्ही साऱ्या निसर्ग-चकित!!! कुठून कुठून बघतेय जंगल आमच्याकडे. "जखम द्यायला तर नाही ना आलात?"
जंगलाचा विशाल हजेरीपट- मोठी झाडे-48 प्रकार, झुडुपे-19 प्रकार, छोटी झुडुपे-11 प्रकार, गवत- 3 प्रकार, नेचे- 2 प्रकार आणि महाकायवेली-17  प्रकार. हा सारा हिरवा गोतावळा, तीस एकरावर पसरलेला! आमचं चालणं संपतच नाहीये. ओबडधोबड रानवाटा म्हणजे पावलांची परीक्षा.

रिबॉक, नाईकी सगळे ठणाणून बोंबलतायत, असे चढ-उतार.

चढताचढता एक शहाणं पठार, तिथल्या दगड सोफ्यावर काहींची शरण-पथारी.  

आमची मात्र हाव मोठी, हपापलेली क्षुधा दिठी!!
आता ट्रेड-मिलचा स्लोप अधिकच तीक्ष्ण, करडी श्वास-परीक्षा तीव्र चढ आणि जडावलेले पाय.
जंगल विळखा अधिकच घट्ट होतो, खूप खूप घनदाट, डोळ्यांत जणु हिरव्या काचाच!!!

आयुष्याच्या अंताला नेणारी चढण!!
आम्ही मिटल्या तोंडाने, लटलट पायाने
ध-पा-पा छातीने, घर्मपावन कायेने आणि निर्विचार मनाने चढतोय.
ते म्हणतात ना काया-वाचा-मने तसलाच की हा प्रकार.

दातारांच्या जंगलाचा हा कळासाध्याय 
अखेरीस माथा!!!!! तिथला तो महदविशाल, प्रचंड आम्रतरु, शतफुटी त्याचा घेर, सृष्टी साधकांना कवेत घेणारा. 
असीम शांत शांत शांत शांतता!!!
शरीर-कोसळ शांतता, फक्त अंतरात्म्याचा आवाज,धक-धक-धक, मी क्षणशरण! शरीर शरण!! मी डोळ्यांनी जंगल भिजवते!!
लखलखीत चिरंतन सत्य! मी त्याच्यात आणि तो माझ्यात!! एकमिट तादात्म्यता!!!

कितीतरी क्षण सगळ्याजणी निःशब्द स्तब्ध, भावनांपालिकडे नेणारा अध्यात्मिक अनुभव!!!
काही क्षणांनी निःशब्दतेला वाचा फुटलेली!!
थँक्स गिविंगची!!!
एक कृतज्ञ कटाक्ष शिवांगीसाठी.
माझ्यातलाच परमात्मा मला भेटवल्याबद्दल!!! 

हलक्या शरीराने आम्ही उतरत असतो, काटे टोचत नाहीत, त्यांची स्पर्श-मखमल हुळहुळवत असते.

ज्युनिअर दातार सांगतो तुम्ही सारे  कॅमेराकैद आहात. आम्ही अचंबित!!! म्हणाला रात्री दाखवतो गम्मत!

रोमारोमाला झालेला जंगल-स्पर्श पुसणारी अंघोळ!! करायलाच नकोय!! पण करायला हवीच ना!!!!!

मग पुन्हा विशाखाच्या घरी चुलीवरचे चविष्ट जेवण.

आम्ही बागडतोय, अगदी गोठ्यातजाऊन कालवडीलासुद्धा कुरवाळतोय. घराच्या बांधावरची फुलं किती टपोर-बहरलेली!! प्रतिमाची फोटोबाजी दणक्यात.

ग्रामस्थाच्या भेटीची संध्याकाळ.
शिवांगी सहजतेने जणू त्यांच्यातलीच एक.
रात्री शिवांगीची फॉर्मल मुलाखत आणि कॅमेराकैदेची, ताणलेली उत्सुकता.
कॅमेरा मधून लॅपटॉप वर कॉपी होणारे फोटो, उलगडतायत!!!

अंगावर सरसरीत काटा!!!

भाला-काटे रोखून सालींदर फॅमिली!!
भेकर, रानकुत्र्यांची शिकारी टोळी!!
हरणं बावरी भोळी! रानडुक्कराची तीक्ष्ण सुळी! आणि!!!!!
शेवटी धिप्पाड रानगव्यांची पाळी!!!
"काकू आपल्या जंगलात काल रात्री आलेल्या प्राण्यांचे फोटो आहेत बरं का हे!!"
माझ्या समाधीझिंगेचा अनास्थेशीया उतरून दरदरून फुटलेला घाम. म्हणजे??? आपण जिथे सकाळी फिरलो तिथले हे फोटो????
"हो, आपले सुद्धा आलेत ना फोटो. तुम्ही सात, आम्ही तीन. कॅमेरा ट्रॅप आहेत हे. कुठलीही हालचाल झाली की फोटो काढला जातो. दोन महिन्यातून एकदा कार्ड वरील डेटा लॅपटॉप मध्ये घेतो. आज कॅमेरे काढून आणले आहेत. आत्ता पर्यंत 21 प्रकार चे पक्षी आणि 15 प्रकारचे प्राणी कॅमेरा ने टिपले आहेत. बिबटया सुद्धा कॅच झाला होता एकदा!"
मला रात्रीच्या थंडाव्यातही घाम!!
पण वेगळ्या अनुभवाचं आगळं समाधानही.
आता रात्री विशाखाकडे खास कोकणी वड्यांवर ताव आणि त्यांनतर कनातीच्या घुमटाखाली शिवांगीची मुलाखत सुरू. 
क्रमशः....