Jun 12, 2021

आजूचे केस

                 आजूचे केस
आदित्यस्य नमस्कारान्‌ ये कुरवनती दिने दिने
जन्मान्तर सहस्त्रेषु दारिदयं नोपजायते
अकाल मृत्युहरणं सर्व व्याधी विनाशनं
सूर्यपादोदकम्‌ तीर्थम्‌ जठरे धारयाम्यहम‌!!!!

नेहेमीचाच श्लोक, पण “अकाल मृत्युहरणं” या ओळींशी आजोबांचा घसा दाटून आला, डोळयात पाणी भरलं.
त्यांनी मान फिरवून पालथ्या पंजाने डोळे पुसले खरे, पण चिनूचं तिकडे लक्ष होतं.
“आजोबा, रडताय?” त्याने दबल्या सुरात विचारलं .
 त्या क्षणालातरी आजोबांना बोलणं अशक्य झालं होतं - त्यांनी मानेनेच नाही म्हटल .
“आजोबा या श्लोकाच्या वेळी रोज रडता.” बिचा-या चिनूने निरागसपणे म्हटलं.
 निशाचं लक्ष तिथे होतंच,त्यामुळे तिने पटकन पुढे होऊन चिनूला तिथून उठवलं .
“चल बेटा, आजीने शिकवलेले सगळे श्लोक म्हणून झाले ना? "
“आई, आजोबा रोज रडतात पण कबूल नाही करत." चिनू विसरायला तयार नव्हता .
“चिनू दूध प्यायचय ना अजून, चल चल, मग पाळणाघरात जायला उशीर होईल."
“आई, नको ना पाळणाघर .मला तिथे नाही आवडत जायला" चिनू थरथरत्या आवाजात म्हणाला .
“चिनू, असं काय ते बाळा ? तू शहाणा मुलगा ना. " 
“पण मी उद्यापासून पाळणाघरात नाही हं जाणार .तूच सांगितलस ना की आजी संध्याकाळी हॉस्पीटलमधून घरी
येणार आहे म्हणून."
 निशाची आणि आजोबांची नजरानजर झाली.
जेमतेम चिनूची समजूत काढत निशाने स्वैपाकाचं काम चालूच ठेवलं, तिचा काही इलाजच नव्हता.
हॉस्पीटलमधे झोपायला गेलेला निखिल, घरी यायची वेळ झाली होती . तो आल्यावर आंघोळ, चहा, खाणं उरकून लगेच तो ऑफिसला जाणार, ते ही डबा घेऊन, हे गेल्या काही दिवसांतलं रूटीन होतं . निखिलचा डबा, चिनूचा पाळणाघराचा डबा, स्वतःचा ऑफिसात न्यायचा डबा आणि आजींना हॉस्पीटलमधे दयायचा डबा हे सर्व उरकताना निशाची धांदल होत होती . निशाकडे पाहाताना आजोबांना वाटलं तिला थोडी मदत करावी.
पण ते फार थकून गेले होते . मनाचं आणि शरीराचं सारं बळचं गेल्या दोन महिन्यात संपलं होतं.
दोन महिन्यांपूर्वी एक वादळ आलं होतं आणि त्याने सा-या घरादाराची झोप उडवली होती .
वंदनाताईच्या साध्या थकव्याचं निमित्त होतं ते. आणि थकव्याने सुरू झालेल्या त्या कथेचा शेवट, केमोथेरपीत
होता, वेदनांच्या राज्यात होता, मृत्युच्या उगीचच लागणा-या चाहूलीत होता, चिंतेच्या अंधार कोठडीत होता.
 आजोबांनी एक सुस्कारा सोडला.त्यांना अचानक डॉ. . जोशींची आठवण आली.आजीच्या सा-या तपासण्या,
 तपासण्यांचं निदान, हॉस्पीटलमधले उपचार हे सर्व डॉ . जोशीनीच केलं होतं.आजोबांची डॉ .जोशींशी जुनी ओळख
 होती . त्यामुळे खरं तर त्यांना डॉ जोशींशी या विषयावर भरपूर बोलायचं होतं, मन हलकं करायचं होतं.
खरतर खूप रडायचही होतं.
 गेल्या दोन महिन्यात झालेल्या धांदलीमुळे निवांतपणे बोलायला मिळालच नव्हतं . आजोबांनी मनाशी ठरवलं 
आज डॉ जोशींच्या क्लीनीकवर जाऊन त्यांना भेटायचं .
“निशा, आज चिनूला पाळणाघरात मी सोडेन आणि तिथूनच परस्पर हॉस्पीटलमधे जाईन .”
“पण तुम्हांला त्याचे डबे, त्याचं दप्तर शिवाय हॉस्पीटलमधले तुमचे डबे हे सगळं न्यायला त्रास नाही ना होणार?"
यावर आजोबांनी मानेनेच नाही म्हटलं . चिनूने, रेंगाळणारा दूधाचा ग्लास एका दमात रिकामा केला .
 त्याचा चेहेरा खुलला होता.
“आजोबा तुम्ही खरच याल मला सोडायला ? प्रॉमिस ? मग मी सुध्दा आज न रडता जाईन पाळणाघरात . कारण मी
 रडलो तर तुम्हांला आणखीनच रडायला येईल ना ?” चिनू त्यांचं मगाचच रडणं विसरला नव्हता . 
यावर निशा पटकन पुढे येत विषय बदलत म्हणाली, “ एका मुलाने दूध प्यायल्यावर चूळ भरली नाही, तोंडावरून पाणी फिरवलं नाही त्यामुळे.  त्यामुळे त्याला ना दूधाची मिशी आली आहे."
  चिनू खुदकन हसला आणि म्हणाला, “दूध पिऊन झाल्यावर आजी तिच्या पदराने माझं तोंड पुसते ना त्यामुळे मला कधी मिशी येतच नाही . आता बघ आजी आज हॉस्पीटलमधून येईल मग उद्यापासून मी तिच्या पदराला तोंड पुसेन .
आजोबांच्या डोळयासमोर हॉस्पीटलच्या हिरव्या गाऊन मधल्या, कृश झालेल्या, पांढ-या पडलेल्या, विरळ झालेल्या
 केसांच्या आजी आठवल्या . म्हणून तर चिनूला हॉस्पीटलमधे न्यायची कुणाचीच इच्छा नव्हती . 
एकदा कधीतरी नेल्यावर, त्याला पाहिल्याबरोबर आजींनी रडून गोंधळ घातला होता .त्यामुळे त्या दोघांच्या भेटी आता रोज, फोनवर होत होत्या.
“आजोबा संध्याकाळी आजीला घरी आणायला मी आईबरोबर येऊ का ?"
   “निशा, हा संध्याकाळी आजी घरी येईल हे धरूनच चाललाय . मला आधी डॉ .जोशींशी बोलायला लागेल .
डिसचार्ज एक दोन दिवसांत देऊ असं ते म्हणाले होते. पण आज संध्याकाळीच मिळेल असं काही सांगता येत नाही,
त्यातून आता निखिल येईल तेव्हां कळेलच .
“ते काही नाही मी आजीला आज संध्याकाळी घरी आणणारच आणि मी रात्री तिच्याजवळ झोपणार.तिच्या
वेणीवर हात ठेवला की मला रात्री छान झोप लागते . ”
 यावर निशाची आणि वसंतरावांची नजरानजर झाली . आजीचे दाट लांबसडक केस हा चिनूचा विक पॉइंट.
"आजीचे केस थोडेसे कापूया का?" असं गंमतीत जरी म्हटलं तरी तो रडून अकांडतांडव करायचा . आजीचे केस पहिल्या
केमोथेरपीच्या तडाख्यातून सुटले होते. तसे थोडेसे गळून पातळ झाले होते तरी वेणीच्या दाटपणात थोडासाच फरक
पडला होता .
 पण आता मात्र दुसरी केमो संपवून पाच सहा दिवस झाले होते . आणि त्या विषाने अख्ख्या शरीरावर कब्जा घ्यायला सुरुवात केली होती.
डॉ जोशींनी खरं म्हणजे ट्रीटमेंटच्या सुरवातीच्या काळातच या साऱ्याची कल्पना दिली होती.
आणि हॉस्पिटल-बारबर संपूर्ण केस काढून घ्या अस सुचवलं होतं.
 आजींनी त्याला अर्थातच परवानगी दिली नव्हती . एकदा तर त्यांच्या खोलीत आलेल्या त्या माणसाला त्यांनी
अक्षरशः खोलीबाहेर हाकलवून लावलं होतं . त्या म्हणाल्या माझं पोरगं माझ्यात जेवढं गुंतलय तेवढच माझ्या केसांतही
 गुंतलय . मी केसांना हात नाही लावू देणार. 
आजी वेणी घालायला लागली की चिनू मागे येऊन उभा राहायचा . त्या केसांच्या फुलो-यावरून हळुवार हात फिरवायचा . न्हायल्यादिवशी तर चक्क नाक खुपसून केसांना येणारा सुगंध हुंगायचा आणि रात्रीच्या अंधारात आजीचा शेपटा कुरवाळत, चाचपत झोपायचा. त्या शिवाय त्याला रात्री झोपच नाही यायची .
कर्कश वाजणा-या बेलने आजोबांची तंद्री मोडली . त्यांनी लगबगीने पुढे होऊन दार उघडलं.निखिलच्या
हातातली आजींच्या धुवायच्या कपडयांची पिशवी घेतली, रात्रीचा जेवणाचा डबा घासायला टाकला .
रोजच निखिल आला की त्याला रात्रीबददल विचारायचा त्यांना फार मोह व्हायचा. 
डॉ.जोशी रात्रीच्या राऊंडला आले होते का ? आजींना रात्रीचं
जेवण संपलं का ? रात्री शांत झोप लागली होती का ? मधे कितीवेळा उठल्या ? रात्री एकटया रडत तर नव्हत्या बसल्या
ना ?
 आजोबांजवळ प्रश्नांची मालिकाच होती . पण निखिल आंबलेल्या अंगाने, तारवटलेल्या डोळयांनी आणि दमलेल्या
चेहे-याने आला होता. त्यामुळे प्रश्‍न विचारायची ईच्छा त्यांनी आत दाबून टाकली .शेवटी ते त्याची आंघोळ होईपर्यंत
चुळबुळत राहिले. कानाने, ते, आवाज टिपत होते . शॉवर सुरू झाल्याचा आवाज, थोडयावेळाने बाथरूमचं दार उघडल्याचा आवाज, कपाट उघडण्याचा आवाज, सर्वात शेवटी परफ्यूम स्प्रे फवारायचा नाजूकसा आवाज आला आणि ते डायनिंग टेबलपाशी पोझीशन घेऊन बसले . निखिल ऑफिसला जायला पूर्ण तयार होऊनच डायनिंग टेबलपाशी येऊन बसला.
“काय म्हणते ही ? रात्री जेवली का ?”
“हो जेवली व्यवस्थित, निशा पेपर टाक गं जरा. ” आजोबांनीच उठून लगबगीने पेपर आणून दिला.
“रात्री झोप लागली होती ना तिला की मधेमधे उठत होती ?”
“तुम्ही उगाच काळजी करता, ती चांगली झोपली होती. रात्री अकराला जी झोपली ती सात वाजता सकाळी
उठली.निशा डबा तयार आहे ना ?"
“हो भरून तयार आहे.काल खिचडी संपवली का आजींनी? मुद्दाम लिंबाचं लोणचं दिलं होतं, या सगळया औषधांनी त्यांच्या तोंडाची चवच गेली आहे."
ह्या वाक्यावर निखिलचा चेहेरा जरा उग्र झाला,आणि तो म्हणाला"खात होती, चांगली खात होती . पण खाताना केस आला तोंडात . शेवटी जेवलेलं सगळं उलटून पडलं .”
निशाचा चेहेरा हे सर्व ऐकल्यावर खर्रकन उतरला . “आई आई ग. खिचडीत केस सापडला ? पण मी. .... .”
 “तुझा दोष नाही.केस तुझा नव्हता, तिचा स्वतःचाच होता . चांगला लांबसडक."
“जाऊ दे रे वर्णन कसलं करतोयस . शेवटी जेवायचं काय केलस त्यांच्या, ते सांग आधी . ”
“जाऊ दे नाही.मला याबद्दल बोलायचंच आहे. कालपासून भरपूर केस गळतायत. डॉ.जोशींनी सांगितलय सगळे केस
काढा तर ही तयार नाही.काल शेवटी काय झालं?उशीवर पांघरुणावर केस पडतायत,खोलीभर पडतायत.काल जेवताना हा प्रकार झाला.शेवटी हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून वरणभात आणून दिला,तो जेवली."निखिलचा सूर तापलेला होता.
"निखिल तू किती चिडचिड करतोयस?त्यांना समजून घे ना जरा."निशाने बोलता बोलता आजोबा ऐकतायत याची जाणीव त्याला डोळ्यांनी खुणावून दिली.
"मी तिला समजावतो,तिला पटवतो केस कापण्यासाठी."आजोबा कसंनुसं होत म्हणाले.
"नाही!!!!!माझ्या आजूचे केस नाही कापायचे.बाबा तुम्ही दुष्ट आहात, डॉ जोशी दुष्ट आहेत.आजोबा आजीचे केस नाही कापायचे."चिनूचे नाक डोळे लालेलाल झाले होते.ओठ थरथरत होते,टप्पोरे डोळे पाण्याने गच्च भरले होते.
निशाने त्याला जवळ घेतलं."चिनुल्या आजु घरी लवकर यायला हवी ना?"
"पण  पण तिचे केस कशाला कापायचे?"
"कारण तिला बरं करण्याचं इंजेक्शन तिच्या डोक्यातून दयायचय.” 
निशाने त्याला पटेल असं कारण सांगत त्याला उचलून आतमध्ये नेलं.
निखलची नजर चुकवत आजोबा मूकपणे रडत राहिले . अश्रूंशिवाय . कोरडया डोळ्यानी ते  आतल्याआत गदगदत राहिले.
का? हे सारं तिच्या वाटयाला का यावं ? शारिरीक वेदना, मानसिक यातना आणि आता तर विद्रूपता.
"बाबा आज संध्याकाळी आईला डिसचार्ज मिळेल .मी बिलाचा चेक तुमच्या ड्रॉवरमधे ठेवलाय तो घेऊनच
हॉस्पिटलमध्ये जा. निशा अर्ध्यादिवसाची रजा घेऊन साडेचारपर्यंत येईल . तुम्ही तिघं टॅक्सी करूनच या." आजोबांनी काहीही उत्तर दिलं नाही .
 “बाबा मला कळतय तुम्हांला गेल्या दोन महिन्यांत खूप त्रास झालाय ना ? पण आईकडे पाहा.तिचं निदान कळल्यावर ती पहाडासारखी भक्कम राहिली की नाही ? कोसळून गेलो आपण सगळे, पण ती जराही चलबिचल झाली नाही. 'माझ्या चिनूसाठी मला लवकरात लवकर बरं व्हायचय' या एका वाक्यात तिने कोसळलेलं आकाश पेलून धरलं.
हो की नाही ? मग तुम्ही एकदम शांत राहा."निखिल त्यांना थोपटत राहिला .
आजोबा मात्र “तिच्याच वाटयाला हे सारं का?"या प्रश्‍नाने स्वतःला छळत राहिले .
दुतर्फा गुलमोहोराची बहरलेली झाडं असलेल्या रस्त्यावरून आजोबा आणि चिनू पाळणाघराच्या दिशेने चालले होते.
 रस्त्यावर रहदारी होती, स्कूटर्स, गाडया, सायकली, दुकानं, हॉटेलं आणि त्यामधे वावरत असलेली भरपूर निरोगी
माणसं . आजोबांना वाटलं हे सारं जग दोन प्रकारे विभागलं गेलयं . एकीकडे आजारी माणसं आणि दुसरीकडे धडधाकट
निरोगी माणसं आणि त्या दोन तुकडयांच्या मधल्या सीमारेषेवर आपण उभे आहोत . त्या आजारी माणसांच्या व्यथांच्या कथा या  निरोगी जगाला ओरडून ओरडून सांगाव्या अशी इच्छा त्यांना झाली . सगळयाच माणसांच्या शरीरात अब्जावधी पेशी आहेत पण आजीच्या शरीरातल्या एका पेशीने बंड पुकारलं, ती विकृत झाली आणि तिने तिच्याचसारख्या असंख्य विकृत पेशींना जन्म दयायला सुरूवात केली . ही विकृत पेशी आजीच्या शरीरात तयार व्हायचं कारणच काय ?का ? तिच्याच वाटयाला का ?
 “आजोबा तुम्ही माझा हात धरा ना .” चिनू मगाचपासनं अस्वस्थच होता तो आजोबांना चिकटला . आजोबांनी
 त्याचा हात हातात धरला . त्या हाताच्या सायीसारख्या मऊ स्पर्शाने ते सुखावले .
 “चिनू तू पाळणाघरात जाताना रोज का रडतोस ?” आजोबांनी विचारलं .
"कारण मला ती पाळणाघरातली सीमामावशी आवडत नाही." . चिनूने गाल फुगवत सांगितलं.
"अस म्हणू नये राजा.त्या तुला व्यवस्थित सांभाळतात . त्यांच्या घराबाहेरच्या झोपाळयावर, सीसॉवर तू खेळतोस
की नाही, मग तुला त्या का नाही आवडत?”
" त्यांच्याकडे मला कुणी भरवत नाही. आपल्या हाताने जेवायला लागतं. शिवाय जेवल्यानंतर हात धुतले ना की
त्या टॉवेलला हात पुसायला सांगतात.मला नाही आवडत टॉवेलला हात पुसायला . मला आजीच्या पदराला हात पुसायची सवय आहे ना.मग मला  ना . . . मला आजीची आठवण येऊन खूप रडायला येतं." चिनूचे ओठ थरथरले,
डोळे पाणथर झाले.
 आजोबाना राहावेना त्यांनी चिनूच्या गोब-या गालावर ओठ टेकले .
"आणि आजोबा त्या सीमा मावशीच्या केसांचा बॉबकट आहे.मला नाही आवडत तसे केस. आजीचे केस किती छान आहेत."
 आजीच्या वोर्डमधली तुळतुळीत गोटा केलेली आजारी माणसं आठवली.केमोथेरपीच्या उशापाला  चिकटलेला विदृपतेचा शाप आठवला . पण त्यांनी क्षणातच स्वतःला सावरलं. मनाशी काहीतरी योजना करत ते चिनूला म्हणाले  “चिनू तुला तुझा केदार दादा आवडत नाही का रे ?” चिनूला आजोबांच्या प्रश्नाचा रोखच कळला नाही.
"असं काय विचारता, मला केदारदादा खूप आवडतो."
“पण त्याच्या मुंजीत नाही का त्याचे सगळे केस कापले .मग तुला तर केस कमी असलेली माणसं आवडत नाहीत ना?"चिनूच्या चेहे-यावर संभ्रम होता.
“तुला तुझे दादारचे नानाआजोबा पण नाही का रे आवडत?  कारण ते तर पूर्ण टकलू आहेत."
“मला नानाआजोबा खूप आवडतात. ते म्हातारे आहेत म्हणून टकलू आहेत"चिनूने त्याचं समर्थन सांगितलं.
आणि तुझ्या वीणामावशीचं छोटं बाळ? त्याला तर डोक्यावर एकपण केस नाही आहे. ते तुला आवडतं की नाही?" 
 “हो खूप आवडतं . मी ना त्याला खेळवतो आणि हळूच त्याचा पापा घेतो ” चिनूने खुशीत येऊन सांगितलं .
“चिनू तुला एक सांगू ?तुझी आजू तुला खूप आवडते ना ? मग आपल्याला तिला लवकर बरं करायचय ना?
 मग तिचे केस कापले तर तू रडणार नाहीस ना?” 
चिनूला “हो म्हणवेना .तो विचारात पडला . त्याचे डोळे मोठे
झाल, ओठाचा चम्बू झाला.
"पण कशाला तिचे केस कापायचे ?? त्याने त्याच्यापरीने प्रश्‍न केला.
आजोबांनी मगाशी निशाने चिनूला दिलेलं उत्तरच पुढे केलं . “केस कापायचे, कारण तिचं इंजेक्शन डोक्यातून द्यायचंय. केस नाही कापले तर डॉक्टरना इंजेक्शन नीट देता नाही येणार.आणि इंजेक्शन नीट दिलं नाही तर आजू बरी 
नाही होणार . तुला चालेल का?”
“नाही चालणार."
“मग तू संध्याकाळी आजूला आणायला तुझ्या आईबरोबर येणार का?"
 “येईन” चिनूच्या उत्तरात नेहेमीचा उत्साह नव्हता.
पण तो विचार करत होता हे आजोबांना कळलं आणि त्याचा विचार योग्य त्या दिशेनेच चाललाय याचाही त्यांना अंदाज आला होता.
चिंनूला पाळणाघरात सोडून आजोब क्लिनिकपाशी आले.स्वागतिकेला सांगून ते जोशी डॉक्टरांच्या केबीनपाशी
गेले . डॉक्टर आलेले दिसत होते .
“या या . आज अचानक क्लिनिकमधे कसे काय ? आमचा पेशंट आम्हांला रोज सकाळ संध्याकाळ भेटतो . तुमची
भेट मात्र होत नाही . रात्री तुमचा निखिल भेटतो आणि सकाळी एक वयस्कर बाई दिसतात . ”
"त्या अक्का हिची मोठी बहीण . सकाळी त्या निखिलला सोडवतात . बसतात तीन चार तास. मग मी दिवसभरासाठी जातो.संध्याकाळी हिची धाकटी बहीण तास दोन तास बसते कधी हिचे भाऊ भावजय येतात .”
"यु आर लकी.इतकी माणसं तुमच्या मदतीसाठीहॉस्पीटलमधे रोज येतायत . ”
"कसलं लक? लक असतं तर हा आजार मागे लागला असता का ?” कडवटपणे आजोबा म्हणाले.
"असं म्हणू नका. आजार होणं याला आपला काही इलाज आहे का ? पण आजारी पडून ट्रीटमेंटसाठी आलेले अनेक पेशंट आम्ही हॉस्पिटलमध्ये पाहतो. कितीतरी जण बेडवर एकटे पडून असतात.दिवसेंदिवस त्यांना भेटायला कुणीही येत नाही. हॉस्पिटलचं अन्न खायच आणि कुणीतरी भेटायला येईल याची वाट पाहात बसायचं. अहो अगतिक,असहायय 
होऊन जातो माणूस अशावेळी . म्हणून म्हणतो माणसं असणं आणि ती स्वेच्छेने आणि प्रेमाने मदतीला येणं हे ही नशीबच नाही का?"
"पण मला तुम्हाला विचारायचंय हे झालंच का? का मागे लागला हा आजार ? तिने कुणाचंही वाईट चिंतलं नाही.
आम्हाला कुठल्याही वाईट सवयी नाहीत.बाहेरचं खाण नाही,हॉटेलमध्ये जाणं नाही. दोन वेळेचा आमटी भात खाणारे आम्ही. बरं पहिल्यापासून तस निरोगी शरीर आहे तिचं . ताप वगैरे सोडाच पण साध्या सर्दी खोकल्यानेही ती कधी आजारी नाही पडली . माझ्या एकटयाच्या नोकरीत तिने काटकसरीने संसार केलान, आनंदाने केलान.
निखिलला आम्ही भरपूर शिकवला आणि आता त्याला उत्तम नोकरी लागली, सोन्यासारखा मुलगा झाला.सुखा
समाधानाचे दिवस जराकुठे येतायत तो हे पाठीशी लागावं ? सुखाचा तोंडाशी आलेला घास असा हिरावला जावा ?”
आजोबांच्या डोळयातून पाणी वाहात होतं.
 डॉ .जोशींनी त्यांच्या हातावर हात ठेवून त्यांना थोपटलं . पाण्याचा ग्लास त्यांना दिला . पाण्याचे दोन घोट घेतल्यावर आजोबांना जरा बरं वाटलं.डॉक्टर गेल्या दोन महिन्यात मी “हे का झालं हा प्रश्न हजारवेळा तरी विचारलाय .कधी स्वतःला, कधी तुम्हांला, कधी कुणा नातलगांना .” 
" हा आजार का होतो; याचं उत्तर शोधण्याचा तर सारं जग प्रयल करतय . युरोप, अमेरिकेतले अनेक शास्त्रज्ञ
त्यांच्या प्रयोगशाळातून प्रयोग करतायत . हजारो कोटी डॉलर्स संशोधनावर खर्च होतायत; कुठलाही ठोस निष्कर्ष कुणीच काढू शकलेलं नाही.तरीही काही ढोबळ कारणं प्रसिध्द झाली आहेत.धूम्रपान, एक्स-रे सोनोग्राफी सारख्या किरणोत्सारी चाचण्यांचा शरीरावर झालेला अतिरिक्त वापर, इलेक्ट्रॉनिक साधनांचा केला जाणारा अति वापर, गुणसूत्रातल्या किंवा आनुवंशिकतेतील काही दोषांमुळे किंवा वायु प्रदुषणामुळे हा आजार. . . . .
वायुप्रदुषण शब्दाला आजोबांनी डॉक्टरना थांबवलं .
“कुठलं वायुप्रदुषण? शहराबाहेर भरपूर हिरवाई असलेल्या भागात आम्ही पहिल्यापासून राहातोय हे तुम्हालाही
माहिती आहे . तिथे कुठलं आलंय वायुप्रदुषण ?”
“मी पुन्हा सांगतो की वायुप्रदुषण किंवा मी सांगितलेल्या इतर कारणांतली नक्की कुठची कारणं आहेत ज्यांनी
आजींना हा आजार झाला, हे नाही सांगू शकत . . . पण तुम्ही जे म्हणताय ना की तुमच्या भागात प्रदुषण नाही याच्याशी मात्र मी सहमत नाही . या शहरातल्या लाखो स्कूटर्स, हजारो मोटारी,रिक्शा बसेस रोज राक्षसी धूर ओकतायत. तो धूर या शहरातल्या हवेच्या आत भिनत चाललाय; आणि तुम्ही आम्ही किवा इथे राहाणारे सर्वच नागरिक या प्रदुषणाचा अप्रत्यक्ष बळी ठरणार आहोत."
आजोबा सुन्न होऊन ऐकत होते.त्यांच्या मनातली असुरक्षिततेची भावना वाढत होती.
"डॉक्टर ही याच्यातून सुखरूप बाहेर येईल ना ? तुम्ही तिला कसंही करून वाचवा हो . कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल पण ती लवकरात लवकर बरी व्हायला हवी."
“त्यांच्या आजाराचं निदान योग्य वेळी झालंय आणि गुंतागुंत वाढायच्या आत आपले उपचार सुरू झाले आहेत. केमोसारख्या विषाला त्यांनी चांगलं पचवलय . त्यांच्या शरीराचा प्रतिसाद खूप चांगला आहे . मला वाटतं तिस-या
केमोनंतर त्यांचे सगळे रीपोर्टस्‌ नॉर्मल येतील . त्यामुळे आपल्याकडून आपण सर्व उपाय करतोच आहोत याची खात्री बाळगा आणि आपल्या शक्‍तीपलीकडे एक खूप मोठी शक्ती आहे त्या शक्तीला शरण जा."
डॉक्टरांनी त्यांच्या खुर्चीच्या मागे असलेल्या रथातल्या कृष्णाकडे बोट दाखवत म्हटलं “हा फोटो पहा. . “कर्मण्ये वाधिकारस्ते . . . .” हे जरी सत्य असलं तरी  पचायला खूप कठीण असलेलं सत्य आहे . फळाची अपेक्षा न करता कर्म करणं शक्‍य आहे का? मग मी माझ्यापुरता लावलेली अर्थ असा आहे की मी प्रामाणिकपणे माझी कर्म करत राहिन पण माझ्या मनांत जी फळाची अपेक्षा आहे ती पूर्ण होण्यासाठी मला त्याचा आशिर्वाद हवाय. तुम्हांला वाटेल डॉक्टर कुठल्या विषयात शिरले . पण हे अध्यात्म हेच या जगांतलं निखळ सत्य आहे .जन्माला आलेला प्रत्येक जीव मृत्युपर्यंतच नाही तर मृत्यूनंतरही  हेच अध्यात्म जगत
असतो . माझे पेशंट बरे व्हावे म्हणून मी त्याचं स्मरण करतो. मी करत असलेल्या उपचारांना यश मिळावं, माझ्या पेशंटची  वेदना कमी व्हावी, त्यांचं मानसिक बळ वाढावं म्हणून मी त्याचं स्मरण करती. तुम्हीही तेच करा. हे का झालं? कसं
झालं ? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात तुमच्या मनाची शक्‍ती खर्च करू नका."
आजोबा आतून कुठेतरी, थोडेसे शांत झाले होते . त्यांनी डॉक्टरांचा निरोप घेतला . 
ते केबिनबाहेर पडणार इतक्यात डॉक्टरांनी त्यांना हाक मारली. “वॉर्ड सिस्टर मला काल रात्री सांगत होत्या की त्यांचे केस पुष्कळ प्रमाणात गळतायत पण त्या हॉस्पीटल बार्बरला
हात लावून दयायला तयार नाहीत म्हणून . . . त्यांनी आत्तापर्यंत स्वरुप कोआपरेट केलय त्यामुळे त्यांच्यावर जबरदस्ती करायची नाही . आणि त्यांच्या मनाविरूध्द काहीच करायचं नाही . पण आज त्यांना डिसचार्ज मिळतोय आठदहा दिवस तरी त्या घरी राहातील . एकदां घरी गेलं की केस कापायला त्यांना वाहेर काढणं मुश्किल होईल.इथे कसं तो व्यवस्थित करेल . कारण त्याला सर्व पेशंटसाठी हे करायची सवय झाली आहे . त्यातून त्या नको म्हणत असतील तर त्यांच्यावर जबरदस्ती करू नका."
  आजोबांनी मान हलवली . केबिनवाहेर पडताना एकच क्षण त्यांनी रथातल्या तेजपुंज कृष्णाकडे नजर टाकली .

आजोबा वॉर्डमध्ये शिरले.
 पांढरा हिरवा रंग,फीनेल डेटॉलचा वास,नर्सेसची आणि डॉक्टरांची धावपळ,तुळतुळीत गोटा केलेले पेशंट्स, त्यांचे नातेवाईक हे सारं एका क्षणात त्यांच्या नजरेला जाणवलं.
ते खोलीत शिरले तेव्हा अक्का आजींचे केस विंचरत होत्या
'काय म्हणतोय पेशन्ट? संध्याकाळी डिस्चार्ज मिळणार म्हणून खुशीत दिसतोय"
"निशा हाफ डे रजा घेऊन येणार आहे ना? आज बरोबर तिसाव्वा आहे मी घर सोडल्याचा.आज माझा चिनू भेटेल."

"का हो तुमच्या सुनेला आज ही रजा घ्यायला नाही का जमली?एवढी काय महत्वाची काम असतात देवजाणे"
 आक्कांनी त्यांचा आवडता विषय काढला .
"अगं  ती खूप चांगली आहे . मनापासून सर्वाचं करते . पण तिच्याकडे रजा शिल्लकच नाहीत त्याला ती तरी काय
करेल?"आजींनी निशाची बाजू घेतली खरी पण आककांना ते पटेना.
शेवटी आजोबांनी, मनांत नसतानाही तोंड उघडलं.
"हे पहा आक्का, निशाची नोकरी ही आमच्या कुटुंबाची गरज आहे . निखिलला चांगली नोकरी असली तरी ती खाजगी
कम्पनीतली आहे . हल्लीच्या काळात काही भरवसा आहे या नोक-यांचा ? सगळं आयुष्यच असुरक्षित झालय तिथे या
नोक-यांचा काय भरवसा ?”
"पण मी म्हणते सासू आजारी असताना नोकरीला जाववतचं कसं ?” आककांचा सूर हा त्यांच्या एकटीचाच नव्हता
 तर त्या सगळयाच नातेवाईकांचा होता .
आता मात्र आजींची चिडचिड झाली "आक्का निशा घरी बसेल, हॉस्पीटलची ड्युटी सुद्धा करेल पण मग तिची बिनपगारी रजा होईल आणि आम्हांला आत्ता तरी ते परवडणारं नाही. कारण गेल्या महिन्याभरातलाच खर्च किती लाख झालाय माहिती आहे  का तुला? आज मला घरी नेण्यासाठीही तिने अर्ध्या दिवसाची रजा घेऊन यावं हे निखिलला काल मीच सुचवलय."
 आजींनी स्वतःच्या उपचाराकरता झालेल्या खर्चाविषयी बोलताच आक्का गो-यामो-या झाल्या,आजोबाही
गप्प झाले.
 आजींना बहुतेक ते जाणवलं असावं.
"आक्का आज कंगवा खूप लागतोय गं . सहन नाही होत आहे.'
“अगं तुझे केस पातळ झालेत ना म्हणून तुला सोसत नाहीये” बोलता बोलता आक्कांचा हात थबकला . केसांचा    
गुंता सोडवताना कंगवा फिरवल्यावर केसांची एक अख्खी बटच्या-बट आक्कांच्या हातात आली.त्यांचे डोळे विस्फारले.
 हात थरथरायला लागले. त्यांनी डोळयांनीच आजोबांना खूण केली आणि हळूच कंगवा दाखवला .
आजोबांनी आवंढा गिळला. त्यांना सकाळी निखिलने सांगितलेला कालचा किस्सा आठवला आणि डॉ.जोशींशी   
झाललं बोलणंही आठवलं.त्यांनी सहज पाहात असल्यासारखं पलंगावर पाहिलं.
तिथे केसांचा अक्षरशः सडा पडला होता.
 निष्प्राण झालेल्या हजारो केसांची कलेवरं होती ती . आक्कांनी आजींना कळणार नाही अशा बेताने ते केस उचलले आणि टोपलीत टाकले . ते तसे टाकायलाही त्यांना दोन खेपा कराव्या लागल्या.
केराचा टोपला केसांनी गच्च भरला होता!!!!
 आजीची वेणी आत्ता निम्मयाच्याहीपेक्षा जास्ती पातळ दिसत होती .   
आजोबांना आठवली चहा पोहे घेऊन आलेली वंदना!!!
तीस वर्षापूर्वीची! चहा पोहे देऊन ती मागे वळली मात्र
आणि तिच्या काळयाभोर दाट केसांनी सगळयांच्याच नजरा बांधून ठेवल्या होत्या . तिथून बाहेर पडताना सर्वानीच तिला एकमताने पसंत केलं होतं.
लग्नाच्या दिवशी दळदार घमघमणा-या मोग-याच्या असंख्य गज-यांची वेटोळी तिच्या त्या लांबसडक शेपटयावर  
घातली होती आणि तीन चार दिवस तरी तो सुगंध तिच्या केसांना . . . . . आजोबांना एक क्षण स्वतःचीच लाज वाटली.तीच वंदना आज असाध्य रोगाशी झगडत असताना आपल्याला कुठल्या गोष्टींची आठवण व्हावी....
एरवी बडबड करणा-या आक्का तर धक्का बसल्यासारख्या गप्प झाल्या होत्या .
शेवटी त्यांना तिथे बसवेना .
"वंदना मी येते गं . उद्या किंवा परवा तुला घरी भेटायला येईन हं."त्या पडेल आवाजा म्हणाल्या आणि निघाल्या.
आजोबांना वाटलं त्यांना थांबवावं, कदाचित त्यांनी समजावून सांगितल्यावर तरी केस कापून घ्यायला आजी तयार होतील .
अशा बटाच्या बटा गळून जाताना पाहण्यापेक्षा एकदाच काय ते होऊन जाऊ दे असं त्याना वाटलं.
 पण त्यांनी आक्काना थांबवलं नाही.
मृत्युशी चाललेल्या मोठया लढाईच्या तुलनेने ही लढाई फारच लुटुपुटीची होती.
आणि ती आपली आपणच लढायची असं त्यांनी ठरवलं . 
ते दोघंजणं जेवायला बसले.
आजोबांनी एखादया बाईला लाजवेल अशा पध्दतीने दोघांची पानं घेतली .निशाने सकाळच्या घाईतही केलेले कोशिंबीर, भाजी, पोळी वगैरे सर्व पदार्थ त्यांनी ताटात वाढले .
 निशाने जेवण  घरी जेवल्यासारखं वाटावं म्हणून ताटं , वाटया भांडयांपासून सगळी तयारी हॉस्पीटलमधेच आणून ठेवली होती. आजिंना जेवण संपत नव्हतं तरी आजोबांच्या समाधानापुरतं त्या जेवल्या. आजोबांनी आजींच्या हातात केळ ठेवलं आणि ते दोघांची ताटवाटया घासायला बेसीनपाशी गेले.अर्धी भांडी घासून होतायत तोच त्यांच्या कानावर आजींची किंकाळी ऐकू आली .
त्यांना धस्स झालं. कुठे पडली बिडली की काय असं मनाशी म्हणत ते हातातली भांडी तशीच टाकून मागे वळले.
केळयाचं साल टाकताना, आजी केराच्या टोपलीपाशी वाकून पाहात होत्या.
“काय झालं गं?ओरडलीस का?तू तिथे काय करते आहेस?" 
आजी, केराच्या केसांनी भरलेल्या टोपल्यापाशी , थिजून गेल्यासारख्या उभ्या होत्या . |
"हे, . , .हे. . . .हे माझे केस गळले आहेत ? ही टोपली भरण्याइतके गळले?कधी गळले?आक्का काही बोलली
नाही.आजींच्या घशात हुंदका अडकला होता.त्यांनी वेणी पुढे ओढली.
 “ही- -ही- - माझी वेणी ?इतकी पातळ कधी पासून झाली ? मला कळलंसुध्दा नाही."
“तू आडवी हो पाहू . मगाचपासून बसून आहेस. मग तुला थकवा येतो." 
“तुम्ही विषय बदलू नका .मला वाटलं होतं,केसांची एवढी निगा राखली आहे की ते कुठल्याही औषधाने
गळणार नाहीत.पण निर्जीव झाले आणि गळायला लागले.
"अगं डॉक्टरनी सांगितलय की नाही ? केमोथेरपीमधे हे असे परिणाम..."
 त्यांना मधेच अडवत आजींनी सुरू केलं . “सगळं माहिती आहे, ऐकून पाठ झालय , केमोथेरपीचं औषध, वेगाने
वाढणा-या सगळयाच पेशींना मारतं . त्यामुळे जसं ते विकृत आणि वाईट पेशींना मारतं तसच ते चांगल्या पेशींनाही मारतं त्यामुळे केसांच्या वेगाने वाढणा-या पेशीही मरतात आणि केस गळतात . सगळं पुस्तकातलं ज्ञान! खूप सोपं आहे |
बोलायला, इतरांना समजवून सांगायला . पण भोगतेय मी . सोसतेय मी - एका अक्षराने मी तुम्हांला काही विचारलं नाहीये गेल्या  महिन्यात.तुम्ही माझ्या आजाराचं नाव सांगितलत. मी हादरले पण हतबल नाही झाले हॉस्पीटलमधे तर राहावचं लागलं . माझा काही इलाजच नव्हता. केमोथेरपी चालू झाली.सारखी मळमळ, उलटया, तोंडात अति उष्णतेमुळे झालेल्या जखमा, व्रण; मी सगळं सहन केलं तुम्ही खायचा आग्रह करायचात . मला इच्छा नसूनही तुम्हांला बरं वाटावं म्हणून मी खात होते.स्वतःच्या इच्छेविरूध्द खाताना किती त्रास होतो माहिती आहे तुम्हांला? ? रोज संडासला गेल्यावर,एखादीला बाळंतपणात होतील अशा वेदना मी सहन केल्या आहेत . पण मी मुकाटयाने डॉक्टरने दिलेली औषधं लावत राहिले .
आजींना बोलून दम लागला तशी त्या एक क्षण श्‍वास घ्यायला थांबल्या .
आजोबांचे डोळे डबडबले होते . पण त्यांनी ओठ आवळून धरले .तिला तिचं मन कधीतरी मोकळं करायल मिळू दे
या विचारांनी ते स्वतला सावरत राहिले . 
 “मला माहित आहे, माझी लढाई साक्षात मृत्युशी आहे . आणि मी ती लढणार आहे  कारण कारण मला जगायचय . मला मरायचं नाहीये . खरच मला जगायचय, खूप जगायच - चिनूसाठी.त्याचा अभ्यास घ्यायचाय,त्याला भरवायचंय, त्याला रात्री माझ्या कुशीत झोपवायचंय.पण तो माझ्याजवळ आता येणार नाही.तो मला घाबरेल.
त्या दिवशी एकदाच भेटायला आला होता . तो घाबरला बाहेरच्या सगळया पेशंटना बघून ,त्यांची ती निर्जीव पडलेली टकलं पाहून .आणि आता तर मी ही तशीच . हो, हो, मी ही आता तशीच दिसेन." आजी हमसाहमशी रडायला लागल्या.
 दोन महिन्यातल्या सगळया यातना, मनस्ताप, जीवाची झालेली घालमेल त्यांच्या डोळ्यांतून पुरासारखी वाहात होती.आजोबा त्यांच्याजवळ गेले आणि  त्यांना निशःब्दपणे थोपटत राहिले.
काही क्षणानंतर आजींनी डोळे पुसले,त्या एकदम कठोर झाल्या होत्या.
“तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांच्या न्हाव्याला बोलावून आणा."
"अग असं काय करतेस ? इतकी नको ना चिडूस .गेले तर गेले केस . जाऊदेत .आपण न्हाव्याला बोलवायच नाही."
“मी चिडले नाहीये हो,।मी थकले आहे . मला आता काही सोसवणार नाही . आणि रोजच्यारोज केसांची प्रेतच्याप्रेतं
मी नाही पाहू शकणार."आजी विखारीपणे म्हणाल्या . 
आजोबांच्या अंगावर सर्रकन काटा आला . 
-“तुम्ही त्याला बोलावताय की मी वॉर्ड सिस्टरला सागू?" 
“वंदना, असं काय करतेस? वेडेपणा नको करू  क्वचितच एखादया हळव्या क्षणी आजोबांच्या तोंडात वंदना ह नाव यायचं.
"आत्ताच्या आत्ता त्याला बोलावताय की मी बेल मारून सिस्टरला बोलावू ?"
शेवटी आजोबा हतबल होऊन उठले.
आजोबा गेली पंधरा मिनिटं खोलीबाहेरच्या खुर्चीवर तळमळत होते.
एक आया, एक सिस्टर आणि तो हॉस्पिटलबार्बर  त्यांच्या खोलीत दहा पंधरा मिनिटांपूर्वीच शिरले होते . 
शेवटी न राहवून ते दरवाज्यापाशी आले पण त्यांना दार उघडायची हिंमत झाली नाही .
मग ते कॉरीडॉरमधे नुसत्या फे-या मारत राहिले . नंतर त्यांना अचानकपणे सुचलं की निशाला चिनूला घेऊन हॉस्पीटलमधे यायला सांगावं.
त्यांनी कॉरीडॉरमधल्याच पब्लिक फोनवरून निशाच्या ऑफीसमधे फोन लावला . 
“निशा, मी हॉस्पीटलमधून बोलतोय ” त्यांचा सूर भकास झाला होता -
“काय हो काय झालं ? तुमचा आवाज असा का येतोय ? सासूबाईची तब्येत ठीक आहे ना ?"
“ठीक आहे . पण आज तिने स्वतःला खूप त्रास करून घेतलाय."
 “काय झालं तरी काय?"
“आज तिचे टोपलीभर केस एकावेळेला गेले . तिने ते पाहिलं आणि . . . .” आजोबांना पुढे बोलवेना .
“हॅलो . . . हॅलो प्लीज तुम्ही बोला ना ? तुम्ही त्रास नका करून घेऊ ."
“ती आज केस काढून घ्यायला तयार झाली आहे . आत्ता हॉस्पीटल बार्बर तिच्या खोलीत . . ." आजोबांच्या घशात हुंदका . . . .
 “तुम्ही प्लीज रडू नका ना . मी चारपर्यंत येते .चालेल ना?
“हो,पण येताना चिनूला घेऊनच येशील?" 
चिनूचं नाव घेऊन रडते आहे . तिला वाटतय तो घाबरेल."
"मी त्याला आणते . मी वाटेत त्याला समजावून सांगते” 
"मी सुध्दा त्याला सकाळी सगळं समाजवून सांगितलं आहे बरं मी फोन ठेवतो .” आजोबांनी खोलीचं उघडलेलं दार पाहिलं
आणि त्यांनी घाईघाईने फोन ठेवला .
केसांनी भरलेल्या दोन पिशव्या घेऊन आया वाहेर पडत होती.
आजोबांनी धडधडत्या छातीने खोलीत पाऊल ठेवलं . नर्स आजींच्या गुळगुळीत गोटयाला मलम चोळत होती . ती
जरावेळाने बाहेर गेली .आजोबांनी आजींची नजर चुकवत हळूच त्यांना निरखायला सुरूवात केली .
आजी मूकपणे रडत होत्या . त्यांना ते जाणवल्याक्षणी ते जवळ गेले त्यांनी आजींना प्रेमाने थोपटलं . त्यांना पलंगावर आडवं केलं . अंगावरची चादर हळुवारपणे सारखी केली .

 आजींनी डोळे मिटले . एखादया सिनेमासारखी त्यांच्या डोळयासमोरून लहानपणापासूनच्या प्रसंगांची रीळंच्या रीळं उलगडत होती . शाळेत जाणारी दोन लांबसडक वेण्यांची वंदना, लांब केसांमुळे वडिलांची जरा जास्तच लाडकी . दादा तिला चिडवायला तिच्या वेणीच्या रीबीनी सोडायचा . आक्का तर सुचतिल त्या केशरचना करायची आणि धाकटी ते कोतुकाने पाहायची.बी ए च्या पहिल्या वर्षाला घाबरत घाबरत कॉलेजला जाणा-या वंदनाच्या कानावर
कुठल्यातरी वात्रट मुलाची केसांवरून केलेली कमेंट पडायची आणि लाजल्यासारखं व्हायचं . शेवटच्या वर्षापर्यंत धीट बनलेल्या वंदनाला, लोकांच्या आपल्या केसांवर खिळलेल्या नजरा निरखायचा चाळाच लागला होता . लग्नाच्या वेळी सासूबाईनी केलेलं केसांचं कौतुक . लग्नानंतरच्या कितीतरी रात्रींतला मोकळया केसांतून दरवळणारा मोग-याचा सुगंध .डोहाळेजेवणाच्या वेळेला केसांवर चढलेल्या कलाबूती घातलेल्या सुगंधी वेण्या. आरशासमोरचा मोकळया केसांतला फोटो.आणि चिनूच्या जन्मानंतर, हळूहळू मोठया होत जाणा-या त्या बाळाचा केसांवर जडलेला जीव.
'चिनू माझं हे रूप स्वीकारेल? तो जवळ तरी येईल का माझ्या ? माझ्याकडनं भरवून घेईल का ? रात्री माझ्याजवळ
झोपेल का ?' 
असंख्य प्रश्‍नांच्या दंगळया आजींच्या मनाला डसत होत्या . त्यांना अचानक खूप थकवा वाटायला लागला .
काही वेळापुरती तरी शांत झोपही लागली .
पावणेचारच्या सुमाराला कॉरीडॉरमधनं धावत येणा-या पावलांचे आवाज कानावर पडले आणि आजोबांचे कान
टवकारले . ते कानोसा घेतच होते, इतक्यात धाडकन दरवाजा उघडला . त्या आवाजाने दचकून आजी जाग्या झाल्या .
उन्हाने लाल लाल झालेला चिनू खोलीत शिरला, हातात वॉटरबॅंग, डोक्यावर टोपी . आजीच्या छातीवर मणामणाचं ओझं चढलं होतं.
आजीकडे पाहाताच तो दचकला  पुढे टाकलेलं एक पाऊल त्याने मागे टाकलं . निशा आणि आजोबा एकमेकांकडे
पाहात होते .
चिनू निशाला चिकटला . त्याच्या डोळयात वेदना होती .
“आई आजूचे केस खरचं कापले ? मी सांगितलं होतं ना." आजींनी डोक्यावरून पांघरूण ओढलं . निशा मनातून देवाचा धावा करत होती . आजोबांना डॉ. जोशींच्या केबीनमधला तो तेजस्वी कृष्ण आठवला.
ही छोटी लढाई जिंकणं खूप महत्वाचं होतं .
. "चिनू आजीला लवकर बरं वाटायला हवं ना ? आज आपण आजीला घरी न्यायचं ना ?” निशाने चिनूच्या डोळयात खोलवर पाहात विचारलं .
“चिनू , केदारदादा, नानाआजोबा, वीणामावशीचं छोटूलं बाळ? ” आजोबांनी सकाळच्या त्यांच्या संवादातले
परवलीचे शब्द उच्चारले.
चिनूच्या डोळयात जरा चमक आली . त्याने निशाचा हात सोडला . एक पाऊल त्याने अडखळत का होईना पण
पुढे टाकलं . आजोबांनी चिनूला हळूच पलंगाजवळ आणलं  आजींचा पांघरूणाबाहेर राहिलेला कृश हात आजोबांनी
अलगदपणे चिनूच्या हातात ठेवला .
त्या स्पर्शाने आजीचं गात्र नं गात्र मोहोरलं . सायीसारखा तो मऊ मऊ स्पर्श तब्बल एक महिन्यांनी त्यांना झाला
होता .
 निखिल एकुलता एक असल्याने लाडका असला तरी त्याचे लाड करायलाही परिस्थितीमुळे मर्यादा आल्या होत्या -
ती सगळी भरपाई चिनूच्या वेळी झाली होती .नुकत्या जन्मलेल्या चिनूचं गोंडस रूप त्यांना आठवल नितळ, दुधासारखा गोरा रंग, जराशी जाडसर पण विलक्षण गोडवा असलेली जिवणी, टप्पोरे डोळे आणि जावळाच्या जागी असलेलं गोरंगोरंपान टक्कल . त्याच्या आंघोळीच्या नंतर आजी त्याला हुंगायच्या . साबणाचा, धुपाचा, पावडरीचा गोडसर वास त्याच्या डोक्याला यायचा . 
निखळ निरोगी असलेलं ते तुकतुकीत टक्कल कुठे आणि आताचं आपलं, रोगाने पोखरलेल्या अशक्‍त शरीरावरचं
टक्कल कुठे.
इतक्यात, आजींच्या हाताला चिनूच्या ओठांचा ओलसर स्पर्श झाला . “आजू पांघरूण वाजूला कर ना. मी नाही
घाबरणार तुला."चिनू म्हणाला.
आजी पांघरूण घट्ट धरून आतल्या आत रडत होत्या -
“आजू मला आजोबांनी सकाळी सांगितलं की तुला इंजेक्शन देता यावं म्हणून तुझे केस कापले . मी सकाळी रडलो
पण आता नाही रडणार . मी एकदम गुड बॉय झालोय ."
आजी स्वतःशीच  लढत होत्या .
“आजू प्लीज पांघरूण बाजूला कर ना गं .मला तू खूप आवडतेस . तू आलीस की मी उद्यापासून पाळणाघरात
नाही जाणार . तुझ्या पदराला माझी दुधाची मिशी पुसणार, ओले हात पुसणार, सकाळचे सगळे श्लोक तुझ्याबरोवरच
म्हणणार, तुझ्याकडंनच भरवून घेणार आणि रात्री तुझ्या वेणीवर हात ठेवून - . . - ,” चिनू अडखळला . निशाने आणि
आजोबांनी श्‍वास रोखून धरला .
“सॉरी, सॉरी, रात्री मी तुझ्या डोक्याला तेल लावणार . तू कसं माझ्या डोक्याला लावतेस ना तसं .आणि मग आपण दोघं एका पांघरुणात झोपायचं .” 
आजींच पांघरूण बाजूला झालं . त्यांनी हात पुढे केले . चिनू आजीच्या मिठीत शिरला.
आणि आजोबांच्या आणि निशाच्या डोळयांना आनंदाश्रूंच्या धारा लागल्या .
@योगिनी श्रीनिवास पाळंदे