श्री सरस्वती प्रसन्न।
रानातल्या रात्रीतली रानपरीची मुलाखत सुरू!!
भवताली सुखद गारवा !!!!
पण कॅमेराकैद श्वापदांची कुठेतरी दबा धरलेली जाणीव!!
आणि आमच्या थरकापलेल्या जीवाचे कान झालेले!!!
आज हे लिहिताना सव्वा वर्ष उलटून गेलं आहे. टू बी प्रिसाईज मुलाखतीची तारीख होती 27 एप्रिल 2019.
सव्वा वर्षात मुचरीच्या जंगलात अनेक वृक्ष फोफावले असतील, अनेक दुर्मिळ रोपं पुण्याच्या नर्सरीतून दातारांच्या घरी राहून आता मुचरिवासी झाली असतील. तिथली हिरवाई अधिक गर्द झाली असेल. शिवांगीचे काही प्रयोग फसले असतील काही यशस्वी झाले असतील.
पण आम्ही या निसर्गयात्रेत तेव्हा कुठे होतो? आणि आज कुठे आहोत?
आम्ही झाडं लावली का, लावलेली जगवली का,पर्यावरण जपायला शहरात राहून काही केलं का? की दाताराना नमस्कार ठोकुन, "आपल्याला नाही बुवा जमणार हे असलं आयुष्य", अशी सोयीस्कर वाक्य म्हणत स्वतःला सेफगार्ड करत राहिलो?????????
शिवांगी बोलत होती…….
लहानपणीची, घराभोवतालची
बाग तिच्या मनात रुजलेली!
लग्न ठरल्यावरच्या रोमँटिक भेटींत सुद्धा झाडांनी वेढलेल्या बंगल्याचीच स्वप्न!
2004 साली पुण्यात(सुखसोयीयुक्त नव्हे)विविध वृक्ष-युक्त भव्य बंगला साकारतो!
दोन्ही मुलंही मातीत हात घालूनच मोठी झालेली.
आर्थिक स्थैर्य आल्यानंतरचा मोठ्या गुंतवणुकीचा विचार, दागिने, फ्लॅट किंवा परदेशी बनावटीच्या पॉश गाडीपाशी न थांबता, कोकणात जाऊन पोचतो!!
कोकणात जमीन घ्यायची हे ठरल्यावर,अभ्यास,संशोधन,दर आठवड्याच्या कोकण फेऱ्या.
एकदा तर ती ऑफिसच्या कामासाठी थायलंडला जाऊन,पहाटे पुण्यात आल्यावर,अर्ध्यातासात नवीन बॅग भरून कोकणात जमीन संशोधनासाठी जायला निघाली. प्रवास, दमणूक, जेटलाग अशा किरकोळ गोष्टींचा बाऊ करणारी ही माणसंच नव्हेत.
मुलाखत मध्येच थांबवून मी शिवांगीला तिच्या अक्सीडेंटची आठवण करून देते.
"2013 साली मला मनाली इथे पॅराग्लायडिंग करताना अपघात झाला, मणक्याचे हाड मोडले, गंभीर दुखापत, ऑपरेशन, बेडरेस्ट, पण त्या दोन महिन्यात आयुष्याबद्दल मी खूप विचार केला", ती सांगत होती.
पण कोलमडून पडणे नाही की रडगाथा गाणे नाही, दोन तीन महिन्यात पुन्हा कार चालवायला सुरवात. आयुष्याला खेचून normalcy वर आणून ठेवले. अगदी हिमालयातील ट्रेक सुद्धा केला!
आणि 2014 साली प्रोजेक्ट मुचरीने जन्म घेतला!!!!
याला असामान्यत्वच लागतं, मनाचं!! आणि मनाचं असलं की ते शरीरात आपोआप उतरतं!!!!
जमीन-शोधा सोबत इकॉलॉजीकल सोसायटी ऑफ इंडियाचा, वर्षभराचा कोर्स. (अर्थात परदेशी कंपनीतली
नोकरी सांभाळून) अनेक जमिनी पाहूनही मनास येईनात, जिकडे तिकडे शहरवासीयांनी केलेला हल्ला!
दोन तीन वर्षांच्या संशोधनांनन्तर, मुचरी येथील एकतीस एकराचे खरेदीखत होते!
एव्हाना आतल्या आवाजाने निश्चय केला की, हे जंगल, संगोपनासाठी, त्यातली जैवविविधता जपण्यासाठी,
निसर्गाचे देणे अंशतः फेडण्यासाठी घेतलेले आहे. तिथे कुठलाही "याच्यापासून रिटर्न्स काय?" असा मानवी स्वार्थ असणार नाही!!!
मुचरिला भेट म्हणजे देवरुखच्या हॉटेलात रात्रीचा मुक्काम, हे गणित सोडवण्यासाठी चक्क मुचरी येथे जमीन घेऊन तिथल्या पद्धतीचे घर बांधले, ते ही शेखरच्या remote management ने. घराजवळ एक छोटा जमिनीचा तुकडा विकायचा होता. ते कुरण विकत घेऊन त्यात विविध देशी वृक्षांची लागवड व संगोपन करायला सुरुवात केली. कुरणात सागरगोटा, कुंचा गवत, मोह, बेल, सीता अशोक, ऊद, कदंब इत्यादी झाडांची लागवड केली.
शिवांगी सांगत होती, "सुरवातीला ह्या जमिनीच्या तुकड्याला दगडी कुंपण घातले, पण एकेवर्षी उंदरांनी खूप नुकसान केलं, म्हणून वैभवला सांगून त्या कुंपणामध्ये भगदाडं पाडली, खास सर्पराजांसाठी, आणि तो मात्र जालीम उपाय होता. जीवो जीवस्य जीवनम अमलात आले. उंदरांचा त्रास कमी झाला."
मी विचारलं, "तुला सापांची भीती नाही वाटत?".
शिवांगी हसून उत्तर देते, "अहो पुण्याच्या माझ्या बंगल्यात माझी मांजरी तोंडात जिवंत साप घेऊन येते, तो साप मी न घाबरता बाटलीत पकडून बाहेरच्या रानात सोडून देते! (एव्हाना मी थक्कच्या ही पलीकडे पोचलेली असते).
शिवांगीचा कोर्स आणि श्री दातार यांनी मुळापर्यंत जाऊन केलेल्या अभ्यासामुळे, पंचवीस प्रकारची कोकणातली आता दुर्मिळ झालेली झाडं शोधून,पुण्यातल्या नर्सरीतुन घेऊन, त्यांना लहानाच मोठं करून, मुचरिला नेऊन रुजवलेलं असतं. पावसाळ्यात तर पर्यटनाला गेल्यासारखे समस्त दातार जंगलात झाडं लावायला हजर!
मुचरिवासी असलेल्या वैभव-विशाखा आणी त्यांच्या चार कन्याना दातारानी दत्तक घेतलेलं, सर्व ग्रामस्थांशी त्यांच्या सुख दुःखांशी स्वतःला सांधून घेतलेलं.
पण म्हणून पुण्यात निर्धास्त राहणे नाही. सतत तिथलाच विचार!
मध्ये कुणीतरी सुचवतो, सगळ्या जंगलजमिनीला तारेचं कुंपण घालावं!
या दोघांचा ठाम नकार. "अरे कुंपण घातलं तर जंगली श्वापद कशी येणार? आणि ती नाही आली तर जंगल परिपूर्ण कसं होणार? जंगल आमचं नाहीये, ते त्या चराचर सृष्टीचं आहे आणि त्या सृष्टीतील प्रत्येक जीव तिथे येणार, त्याला जंगलातून जे जे हवं ते ते तो घेणार!!"
एखाद्या गोष्टीच्या ध्यासासाठी माणूस काय काय करू शकतो!!!
प्रयोग म्हणून मधमाशांच्या पेट्या सुद्धा विकत आणल्या होत्या, मधमाशांमुळे परागीभवन होऊन झाडांची वाढ चांगली होते. मधमाशापालना संबंधी कार्यशाळा धाकट्यादातारानी अटेंड केली आणि दोन मुलासह आईवडिलांचा पुण्यातल्या गच्चीत मधमाशी प्रयोग सुरू झाला!!!
एका सकाळी माझ्या व्हाट्सअप्प वर पूर्ण सुजलेल्या चेहेऱ्याचा शिवांगीचा फोटो मला धक्का देऊन गेला होता. तिला विचारल्यावर तिने निर्विकार पणे सांगितलं की मधमाशांचा बॉक्स हँडल करताना मधमाशा चावल्यामुळे चेहेरा सुजलाय. बस!!!!! त्याचं कोडकौतुक नाही की इश्यू करणे नाही!!!!!
मधमाश्यांच्या दोन बॉक्सेसची रवानगी मुचरीला झालीसुद्धा.
असले एकेक प्रयोग!
मला वाटतं जंगलालाही गहिवर फुटला असेल त्याचं कोडकौतुक होताना पाहून.
विशाखा वैभव या जोडीला सुद्धा, व्यवसाय उद्युक्त करणे असे बिझीनेस सुद्धा चालूच असतात.
त्या जोडीने एकेवर्षी मुचरीला, शेणखतावरची हळद केली होती. पन्नास किलो हळद निघाली. आणि हळकुंडे उकळत्या पाण्यातून काढून ती सुकवण्याची आणि दळण्याची संपूर्ण प्रोसेस शिवांगी पुण्यात राहून मॉनिटर करत होती.
मग मला ती जंगलस्वादाची शुद्ध हळद घरच्याघरी मिळाली. काय त्याची चव!! बाजारच्या भेसळयुक्त हळदीच्या तोंडात मारेल अशी!! अशी माणसं आयुष्यात असणं हीच आपली भाग्यरेखा असते.
हा हिरवा प्रपंच मुचरित थाटलेला असताना पुण्यात, शास्त्र-वहिनी संस्थेतर्फे शाडूच्या गणपतीकार्यशाळा,
दिवाळीत बहुकोनी-क्लिष्ट, अशा आकाशकंदिलाच्या कार्यशाळा, विविध शाळांत जाऊन किंवा स्वतःच्या बंगल्याच्या गच्चीत सुद्धा!! (हे सुद्धा नोकरी सांभाळून)
प्रोजेक्ट-त्रस्त पालकांच्या मेकॉलेग्रस्त बालकांसाठी, विज्ञान प्रयोग आणि कागदापुठ्याचा वापर करून प्रोजेक्ट करायला शिकवणारी शिबिरं सुद्धा शिवांगी विविध शाळांत घेत असे. दिवाळीच्यावेळी श्रीवत्स संस्थेत दरवर्षी होणाऱ्या सामाजिक कामाबद्दल एकदा मी तिला सांगितलं, या गोष्टीला झाली असतील सात वर्ष, तेव्हापासून मी आठवण न करता, दरवर्षी तिच्या कंपनीमध्ये पुढाकार घेऊन, आर्थिक मदत(किमान पाच आकडी), स्वतःची घसघशीत भर घालून, आणि तेवढ्यावर हे थांबत नाही, त्या जमलेल्या रकमेतुन, संस्थेने मागवलेल्या वस्तू ती स्वतः बाजारात जाऊन आणते. आणि हे करताना घरचा दिवाळी फराळ विकतचा नव्हे, आकाशकंदिल कार्यशाळा हे सगळं जोरात चालू असतंच.
हे सर्व पाहून निसर्गाने तिला दिलेले आठ-अदृष्य हात मला दिसतात.
आपल्यापासून पर्यावरणाला अजिबात हानी पोचायला नको, म्हणून घर शून्य कचऱ्यावर आणून ठेवलेलं असतं. स्वयंपाक घरातील ओला कचरा आणि बागेतील कचरा बागेतच जिरवला जातो. ती ओला कचरा खाऊन तृप्त झालेली बाग, दातारांना मायाळू, अंबाडी, वाल, पालक, लालमाठ अशा भाजा देते.
पण या प्लास्टिकचं काय करायचं?
प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न काही अंशी तरी सोडवण्यासाठी घरघंटी घेतली जाते आणि कुठलेही पीठ मग ते भाजणी,ज्वारी,बाजरी,आंबोळी असो अथवा कणिक असो सर्व घरच्या घरीच दळले जाते. शक्यतो घरात प्लास्टिक पिशव्या येऊ द्यायच्या नाहीत ह्याचा प्रयत्न घरातील प्रत्येक सदस्य करीत असतो.
इतक्या भव्य बंगल्यात ए सी नाही,उन्हाळ्यात सुद्धा पंखाही न लावता झोपायची किमया दातार मंडळी साधतात तेव्हा मला स्वतःची लाज वाटायला लागते. उन्हाळ्यातला माझा वीजबिलाचा भव्य आकडा मला वाकुल्या दाखवायला लागतो.
जलप्रदूषण न होण्यासाठी आपण साबण लावायचा बंद करू शकतो का? नाही!!!! पण ती नाहीं लावत साबण सुद्धा. ती सांगत असते, "अहो वेगवेगळ्या निसर्गातल्या वस्तूं आहेत की, त्या सोडून साबण लावायची गरजच नाहीये!
मी सॅनिटरी नॅपकिन्स सुद्धा वापरत नाही. केवढं सॉलिड वेस्ट तयार होतं त्याच्यामुळे!!! आपले आई मावशींच्या काळातले तलम सुती कपडेच योग्य आहेत आपल्या स्वतः साठी आणि अर्थात पर्यावरणासाठी सुद्धा".
एखादी वैतागलेली सकाळ असते आणि माझ्या मोबाइलवर,तिच्या घरच्या पॅशनफ्रुट पासून केलेल्या सरबताचा फोटो झळकतो, टेरेस मधल्या मधमाश्यांच्या सोनेरी मधाने तुडुंब भरलेली मधाची बुधली अवतरते, फणसाच्या गऱ्याचे तेजस्वी चिप्स चमकतात किंवा रसाळ सांदणाचा फोटो दिसतो आणि कधी लेकाच्या वाढदिवसाला घरी केलेली केशराळलेली-जिलबी सुद्धा टपकते!
तिने पाठवलेले ते फोटोच माझा दिवस उर्जापूर्ण करून जातात. मग मीही एखादी किरकोळ चिंता आणि चिडचिड विसरून ती ऊर्जा शोषून घेते आणि दिवसाची दिलखूष सुरवात करते.
माझ्या मनात आठवणी ओघळत असतात,एकीकडे मी मुलाखतही ऐकत असते. रात्र चढत असते, मध्यरात्रीच्या सुगन्ध-झुळुका शरीराला सुखावत असताना,मी मनात कुुठेतरी बेचैन असते.
मन एकीकडे निःशब्द थक्क झालेलं असताना मी शिवांगीने दाखवलेल्या आरशात स्वतःला पाहत असते.
या प्लॅनेटवर आल्यापासून मी गेल्या पन्नास वर्षात इथलं काय घेतलं, ओरबाडलं, लुटलं, उपभोगलं? आणि त्याबदल्यात मी या सृष्टीदेवतेला रिटर्न काय दिलं? हा विचार मला छळत असतो. पण ती बेचैनी, तो सूक्ष्म छळ मला हवा आहे कारण तरच माझ्यात पर्यावरणपूरक बदल होण्याची शक्यता तयार होते आहे.
मुचरीहून परत जाताना मी त्या जंगलापुढे नतमस्तक होते आणि दातार परिवारापुढे सुद्धा!!!!!!!
समाप्त
No comments:
Post a Comment