श्री सरस्वती प्रसन्न
सा.खि.
वटपौर्णिमा नक्की कशी साजरी करावी याबद्दल आमच्या दोघांमध्ये कोविडद्वंद्व सुरू झालं होतं.
नवरा म्हणाला”बाहेर काय चाललंय आणि तू कसली वटपौर्णिमा साजरी करतेस? बास झालं आता.गपचूप घरात बस”
त्याला सहजासहजी सोडेन ती मी कसली!!!
पंधरा वर्षांपूर्वीचा दाखला देत म्हणाले “हो का? हे धाडस तुमच्या मासाहेबांपुढे नाही दाखवलंत कधी? घरातल्या पूजेला मी कधी नाही म्हणाले होते का?
एकतर पावसाळा,त्यात ऑफिसची गडबड,त्यात जरिकाठी साडी,
दागदागिने,फुलं आणि पत्रीनं भरलेलं तबक अशी आमची वरात सोसायटी बाहेरच्या वडावर जायची.कधीकधी गुरुजींना उशीर व्हायचा.
मला कंपलसरी कन्सेशन घ्यायला लागायचं, ऑफिस मध्ये उशिरा गेल्यावर आल्या सवित्रीमॅडम अशी चेष्टा मैत्रिणी करायच्या ते वेगळंच.
आणि तुमच्या मासाहेबांच्या साम्राज्यात हे थोडथोडक नाही,तर कित्येक वर्षे चालूच राहिलं”
फोटोतल्या मासाहेब,माझी वटवट सावित्री ऐकून डोळे वट्टारुन माझ्याकडे पाहातायत हे मला समजत होतं,तरीही न डगमगता मी बोलतच राहिले.
माझ्या स्वराचा प्रवास कातर कडून खोचक असा सुरू झाल्यावर मात्र नवऱ्याने विषयाची गाडी,कोरोनाकेअरकडे वळवली.
”अगं,ते जुनं कशाला उगाळत बसतेस? मी तुझ्याचसाठी म्हणतोय की त्या वडाच्या पारावर कुठून कुठून बायका येतील आणि सोशल डिस्टनसिंग पाळता येणार नाही.
बरं येणाऱ्या सगळ्याजणी मास्क लावून येणार आहेत का?
त्यापेक्षा तू घरीच पूजा कर ना. आणि उपास कर म्हणजे झालं.
आम्हीसुद्धा करू कीं वटपौर्णिमेचा उपास!!!”
मला त्याच्या संवादाची दिशा हळूहळू साबुदाणा खिचडीकडे वळते आहे हे लक्षात आलंच होतं.
यांच्या तमाम पूर्वजांपासून एकमताने पास होणारा लाडका पदार्थ म्हणजे सा खि अर्थात साबुदाणा खिचडी.
पातेलं भरून साबुदाणा भिजवावा,
त्यावर दाण्याच्या कुटाचा ढीग रचावा, दोन तीन गुटगुटीत बटाटे त्यात ढकलावे,आणि अशा रीतीने कढई काठोकाठ भरून खिचडी करावी!!!!
आणी पहिलं वाढप करून एखादं दुसरं काम करून कढईपाशी यावे तर क्षणार्धात तो गोरागोरा कॅलरीयुक्त ढीग भुईसपाट!
ही खाद्यकिमया हेच लोकं करू जाणे!!!
उत्तर माहिती असूनही मी साळसूदपणे विचारलं”उपास तर आहे काय करू हो उपासाला उद्या?"
माझ्या स्वरात लपलेला खोचकपणा नवऱ्याच्या अजिबात लक्षात नाही आला.
तो खुश होत,बेसावधपणे म्हणाला”असं कर,साबुदाणा खिचडी नाश्त्याला कर. आणि तो उपास रात्री सोडायचाच नसतो ना,मग मी काय म्हणतो रात्री साबुदाणावडे होऊन जाऊदेत”
मी थक्क!!!!!!!!!!!
एरवी गुरुजींनी साधं गोत्र विचारलं तरी माझ्याकडे केविलवाण्या नजरेने बघणारा हा माणूस वटपौर्णिमेचा उपास रात्री सोडत नाहीत ही माहिती सोयीस्कर बाळगून होता.
याला काय जातंय फर्माईशी सोडायला? इथे अडीच महिने घरातली सगळी कामं करून कंबरडे मोडायची पाळी आली होती. मदतीच्या नावाने बोंब होती. भांडी घासायचे घेतलेले एकुलते एक काम इतक्या गलिच्छपणे करायचा की “नको ती मदत” असं म्हणायची पाळी आली होती.
फक्त साबुदाणाखिचडीचा मला वैयक्तिक फायदा असा होता की,पोहे उपम्याला नाक मुरडणारी मुलं, सा खि वर तुटून पडत होती.
त्यामुळे घरातल्या सर्वांचे खिचडीवर कायमचे एकमत होत असे.
रात्री साबुदाणा भिजत घालायला डबा उघडला,आणि पहाते तो काय साबुदाणा संपलेला.
(फोटोतुन मासाहेबांनी डोळे वट्टारले,वटपौर्णिमेच्या आदल्या रात्री घरातला साबुदाणा संपलेला?????? या अपराधाला क्षमा नव्हती)
खिचडी जमायचे एक तंत्र असते. रात्री साबुदाणा भिजणे मस्ट असते.
त्यामुळे मी ज्याम वैतागले होते...
नवऱ्याला रात्रीच बजावून ठेवलं की "उद्या नाश्त्याला खिचडी शक्य नाही.आणि रात्री साबुदाणावडे हवे असतील तर सकाळी वाण्याकडे
जाऊन साबुदाणा घेऊन ये."
नाश्त्याला सा खि नाही हे समजल्यावर त्याचा चेहेरा पडलाच!!
पण वाण्याकडे जायच्या प्रपोजलला क्षणात कबुल झाला.
हा माणुस साबुदाणावडे किंवा खिचडीसाठी काय वाट्टेल ते करेल. गजर लावून,पहाटे उठून,वाण्याकडे लाईन लाव म्हटले तरी तयार होईल.
दुसऱ्यादिवशी सकाळी आठ वाजता, नाश्ता सुद्धा न करता गेला,कारण लॉकडाउन मुळे वाण्याकडे लाईन लावायला लागत होती.
मी मात्र केर लाद्या करून मग अंघोळ आणि त्यानंतर जेवणाची तयारी आणि एकीकडे पूजेची तयारी अशी कामं, क्रमाक्रमाने करायचं ठरवत होते.
या सगळ्यात दोन तास सहज गेले.
दहा वाजता मुलांपुढे मॅग्गीची डिश ठेवली तेव्हा त्यांनी तिर्थरूपांच्या पावलावर पाऊल ठेऊन सुरवात केली
"हे काय आई,खिचडी करणार होतीस ना?"
"अरे,घरातला साबुदाणा संपलाय,तोच आणायला बाबा वाण्याकडे गेलाय. एरवी मॅगीवर तुटून पडता ना?मग आज तोंड वाकडं करायला काय झालं रे?"
धाकटा दीर्घ श्वसन करत म्हणाला "आई शेजारून खिचडीचा वास येतोय सकाळपासून .काल तूच म्हणालेलीस ना खिचडी करणार म्हणून?"
(फोटोतून माँसाहेब कौतुकाने म्हणत होत्या "आमच्याकडे पुरुषांची नाक अगदी तीक्ष्ण आहेत हो")
"अरे ,साबुदाणा घरात तरी येऊंदे ना. हे बघ,मी संध्याकाळी साबूदाणावडे करणार आहे.आता मॅगी खा आणि अभ्यासाला जाऊन बस बघू"
मुलांना नाश्ता दिला,माझी उपासाची थालिपीठं लावायला घेतली,तरीही या माणसाचा पत्ता नव्हता.
बर वाण्याचे दुकान घराजवळच म्हणून गाडी नेली नव्ह्ती आणि मोबाईल सुद्धा नेला नव्ह्ता.त्यामुळे नक्की कुठे अडकला आहे हे सुद्धा विचारता येत नव्हते.
नक्की याला कुणीतरी मित्र भेटला असावा आणि बसला असेल गप्पा ठोकत,या विचाराने वैतागलेली मी अडीच तास झाल्यावर मात्र चिंतातुर झाले.
मुलांचे ऑनलाइन क्लास चालू असल्याने बाबाला शोधून या म्हणता येत नव्हते.
घराची स्वछता, मुलांचा नाष्टा,पूजा आणि कुकर लावणे एवढी काम झाली होती.
अकरावाजता मात्र मास्क लावून निघाले त्याला शोधायला.
दहा मिनिटात येणारा माणूस अडीच तास गायब होतो म्हणजे काय?
वाण्याकडे उभ्या असलेल्या लाईनीतल्या लोकांच्या चेहेऱ्याकडे वेड्यासारखी पाहत राहिले.
मास्क लावलेल्यांमधून आपलं माणूस शोधणं कठीण होतं.
लाईन खूप मोठी होतीं पण त्यामध्ये हा नव्हताच.
पोलिसांनी मॉर्निंगवॉकवाला समजून उचलून नेलं की काय?
सध्या रस्त्यावर सिग्नल नसल्यामुळे भरधाव वाहने येत जात होती आणि अगदी परवाच या रस्त्यावर अकॅसिडेंट झाला होता.
तो विचार मनात आला मात्र आणि हातपाय गार पडायला लागले.
वटपौर्णिमेच्या दिवशी यायला नको ते सगळे विचार मनात येऊन गेले.
कुठून त्याला साबुदाणा आणायला पाठवला असं मला झालं होतं.
या माणसाला आता मी कुठे शोधू?
याला काय झालं असेल?
मला एकदम आठवलं हा बीपीची सकाळची गोळी न घेताच खाली उतरला होता.
देवा!! म्हणजे वाटेत कुठे चक्कर वगैरे येऊन नसेल ना पडला?
त्यात हे सध्याचे कोरोनाचे दिवस!!!
माझ्या हाताला घाम सुटला.काय करू आणि कुणाला विचारू काहीच समजेना.
मी खाली उतरून पंधरा मिनिटं झाली होती.
अकरा साडेअकराच्या रणरणत्या उन्हात मी हातात मोबाइल घेऊन,
नेमका कुणाला फोन करावा या विचारात सुन्न उभी होते.
रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं.
मनात येणाऱ्या भलभलत्या विचारांना कसंबसं थोपवत मी,कापऱ्या पावलांनी घराच्या दिशेने निघाले.
अगदी गेटपाशी तो वडाचा पार दिसला.
श्रावण चाहूल लागलेला,गच्च हिरवा वड,पाऊस पिऊन गडद झालेला.
आजच्या लॉकडाउनमध्ये सुद्धा कितीतरी बायका येऊन गेलेल्या दिसत होत्या.
गुंडाळलेल्या सुताचे,हळदी कुंकवाने माखलेले वेढे,वाहिलेल्या फुलांचे सुगंधी ढीग, जळून गेलेल्या उदबत्त्यांचे धुपाळलेले निःश्वास अजूनही तिथेच रेंगाळत होते.
माझी पावलं नकळत तिथे वळली.
मी हात जोडले.
मागच्या तासाभरात मी कितीतरी वाईट आणि अभद्र कल्पना करून मनाला खूप त्रास करून घेतला होता.
नकळत माझ्या डोळ्यात पाणी जमलं.
“हे निसर्गदेवा,माझं,माझ्या कुटुंबाचं आणि या अवघ्या विश्वाचं रक्षण कर”
अशी प्रार्थना करून मी हात जोडले,
आणि नतमस्तक झाले खरी,
पण अडीच-तीन तास घरी न आलेल्या नवऱ्याच्या सुखरूपतेबद्दल मी मनोमन साशंक होते.
मुलं माझीच वाट पाहात टेरेसमध्ये येरझारा घालत होती.
का कुणास ठाऊक पण मुलांना बघताच मला एकदम रडायलाच यायला लागलं.
ती बिचारी कावरीबावरी झाली होती. ”आई,बाबा नाही सापडले का गं?त्यांना आता कुठे शोधायचं?"
शेजारच्या काकांना आणि वहिनींना बोलवायचा विचार मनात आला.
खड्डयात गेलं ते सोशल डिस्टनसिंग असं म्हणत त्यांच्याकडे जाण्यासाठी दरवाजा उघडला आणि पाहाते तो..........
दारात, घामेजल्या, लालेलाल चेहेऱ्याने सत्यवानराव हजर!!!!
त्याला बघताच मला जास्तच रडू फुटलं.
असंख्य प्रश्न मनात असूनही तोंडातुन शब्द फुटेना.तो घरात आल्यावर त्याच्या हातातली पिशवी घेऊन मी लगोलग सरबताचा ग्लास त्याच्या हातात ठेवला.आणि मटकन खालीच बसले.
नवऱ्याला घरात झालेल्या घबराटीची कल्पनाच नव्हती.त्याने सरबताचे घोट घेत घेत,विजयी योध्याच्या थाटात कथाकथन सुरू केले.
”अगं घरातून निघालो आणि वाण्याकडे पोचलो. तिथे माझा आठवा वगैरे नंबर लागला.अरे लोक किती *चवीचवीने* किराणा खरेदी करतात राव. माझा नंबर यायला पाऊण तास लागला.आणि अगं आपल्या वाण्याकडचा साबुदाणा संपला.
साला,साबुदाणा कसा काय संपतो?
याला स्टॉक ठेवता येत नाही?”
याचं माझ्या रडवेल्या चेहेऱ्याकडे लक्षही नव्हतं.
साबुदाणा कथा पुढे चालूच.........
“मग मी विचार केला लॉकडाउन चालू आहे, वस्तू संपू शकतात,मागच्या आठवड्यात ट्रान्सपोर्ट सुद्धा बंद होता .आणि आमच्यासारखे खवय्ये आजूबाजूला असताना साबुदाणाच काय पण साखर आणि मीठ सुद्धा संपेल” स्वतःच हसत हसत म्हणाला.
( कप्पाळाला हात!!!!! )
”शेवटी मी काय केलं असेल? एक मित्र भेटला,त्याच्या कारमधून सरळ पुढे गेलो आणि तिथल्या किराणा दुकानाशी पुन्हा लायनीत उभा राहिलो.तिथे दोन तासाची लाईन लावावी लागली.”
एव्हाना माझा संयम संपला होता मी संतापून म्हटलं “अरे महान माणसा तुला घरी कळवावेसे नाही वाटलं? अरे माझ्या काळजाच पाणी पाणी झालं होतं तुझी वाट पाहून.
मनात किती विचित्र विचार येऊन गेले”
माझ्या चेहेऱ्यावरची रडवेली झाक आत्ता कुठे साहेबांच्या लक्षात आली.
“तू कमाल करतेस,रडतेस कसली?
मी फोनसुद्धा नेला नव्हता मग कळवणार कसं? आणि बाहेरून फोन करायचं मला नाही सुचलं.
तर शेवटी त्या दुसऱ्या दुकानात दोन तासांनी माझा नंबर लागला आणि साबुदाणा मिळाला.चांगला चार किलो घेऊन आलोय.आता लॉकडाउनमुळे वस्तू स्टॉक केलेल्या
बऱ्या नाही का?”
मी अवाक होऊन त्याचे कथन ऐकत होते,एकीकडे दया सुद्धा आली होती आणि त्याच्या पेशन्सचे कौतुकही वाटत होते.
सकाळी काहीही न खातापिता,आठ वाजता बाहेर पडलेला माणूस,तीन तासांची लाईन लावूनही न चिडता शांत राहिला होता.
आणि एखाद्या विजयी योद्धयाच्या थाटात साबुदाणा घेऊन आला होता.
किती???? चा र कि लो!!!!!!!
त्याचा नाश्ता हुकला होता आणि आता हा काहीतरी अरबट चरबट खायला लागेल,त्यापेक्षा जेवायलाच द्यावे असा विचार करत मी पोळ्या लाटायला घेतल्या,आणि त्याला पहिला जेवायला बसवला.
या सगळ्या *साबुदाणानाट्यात* माझ्या पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता.थालीपीठ केलेली असूनही खायचं भान राहिलं नव्हतं.मगाशी भीतीने कापणारे हातपाय आता भुकेने कापत होते.
(फोटोत माँसाहेब म्हणत होत्याच, आम्ही वटपौर्णिमेचा कडकडीत उपास करायचो)
हे आम्ही प्रकरण मला शेवटपर्यंत समजलंच नव्हतं.लग्नाच्या पंधरा वर्षांनंतर सूनबाईंचा प्रवेश त्या आम्हीच्या वर्तुळात झालाच नव्हता.
मी सोडून सगळ्यांची जेवणं उरकली.
मुलं आपापल्या खोलीत गेली आहेत असे पाहून नवऱ्याने मागून येऊन कंबरेभोवती विळखा घातला.
मी क्षणभर सुखावले .नवऱ्याने लाडात येऊन बोलायला सुरुवात केली”जन्मोजन्मी मला तूच हवीस बरं का.”
मी चक्क लाजले वगैरे!!!
आणि त्याला विचारलं “का हवी आहे मीच सातजन्मी?”
विचारताना माझा स्वर कातर की काय म्हणतात तसा झाला असावा.
थालीपीठ,भूक,उपास साऱ्या साऱ्याचा जणु विसरच पडला होता मला.
आणि प्रियकराच्या रोलमध्ये शिरलेला माझा नवरा कुठलं रोमँटिक उत्तर देतो,याकडे माझे कान लागले होते.
“तुझ्यासारखी साबुदाणा खिचडी या भूतलावर कुणालाच जमत नाही ना.
अग,त्या संज्याची बायको बकवास बनवते खिचडी, एकदम गोळा ,
आणि मावशीसुद्धा एरवी पुरणपोळ्यापासून सगळं भारी बनवत असली ना तरी तिची खिचडी एकदम चामट होते."........
एकतर पुरूषांनी अशा टिपिकल बायकी कमेन्ट केलेल्या मला अजिबात आवडत नाहीत (कितीही अचूक शब्द वापरले तरीही)
आणि कम्बरेला विळखा वगैरे रोमँटिक स्टार्ट घेतल्यावर कानशिलं की काय म्हणतात ती तापल्यावरचे हे उत्तर ऐकल्यावर माझा वाढीव-वयातला रोमँटिक फिवर झरकन खाली उतरला.
आणि चिडून त्याला बाजूला ढकलून मी थालिपीठं,डिशमध्ये घेतली.
मी पाहिला घास घेणार इतक्यात म्हणाला
“ आता याच्यात चिडायला काय झालं बुवा? तुझंच कौतुक करत होतो ना मी? कधी चिडशील काही नेम नाही तुझा. बरं आता मी जरा पडतो.” असं म्हणून सत्यावानराव चक्क शयनगृहाकडे रवाना.....
आणि पुढे गेलेला उलट्या पावली परत आला आणि म्हणाला”ते साबुदाणे भिजवायला विसरू नकोस,जरा जास्तीच भिजव,म्हणजे रात्रीला साबुदाणेवडे पोटभर खाता येतील.
आणि आजची राहिलेली सा खि,
एकदोन दिवसांनी नाश्त्याला होऊन जाऊदे.”
(फोटोतून माँसाहेब लेकाची दृष्ट काढतायत असा भास मला झाला)
त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत, मी थक्क झालेल्या मनानी,उपाशी पोटानी आणि माझ्या त्या खरकट्या न झालेल्या हातानी माझ्या सत्यवानाला कोपरा पासून हात जोडले.
योगिनी श्रीनिवास पाळंदे
पुणे
No comments:
Post a Comment