Sep 1, 2020

पुढच्या वर्षी वाजवूया

               श्री सरस्वती प्रसन्न
@योगिनी श्रीनिवास पाळंदे

          *पुढच्यावर्षी वाजवूया*

अभ्याला तालवाद्यांची आवड अगदी बालपणापासून!!
घरात डबे-डूबे,झाकणं, अगदी दरवाजासुद्धा बडवायचा!
तिथपासून ते शाळेत बाक बडवणे असा त्याचा बालपणाचा *ताल-प्रवास*
फ्री पिरिअडला तर त्याचा *बाकवादनाचा*
 स्वतंत्र कार्यक्रम चाले.
एकदा पालक सभेला “त्याच्या अंगात जास्तच ताकद आहे आणि तालाचं ज्ञानही चांगलं आहे, ते चॅनेलाइझ करा”अशी थोड्या *शुगर कोटेड* स्वरातली तक्रारच आली
मग तबल्याच्या क्लासची शोधाशोध.
क्लास सुरू.
सुरवातीला रमला.
मग त्या शिस्तीला आणि क्लासमध्ये *वही न्यायची* या कल्पनेला कंटाळून गेला.
हौसेने आणलेली तबल्याची जोडी माळ्यावरसुद्धा जाऊन बसली.
आणि एकदा गणेश विसर्जन मिरवणुकीत. 
सिटीपोस्ट चौकात,उधाणलेल्या लाखोंच्या समुदायापुढे,
 ध्वजधारकाने ध्वज उलगडला
क्षणात, त्यात मिटलेल्या पाकळ्यांचा शिडकावा झाला.
पांचजन्याचा मंगल ध्वनी उमटला!
आणि ढोल ताशा वादकांनी तोच क्षण पकडून,
*तालाच्या मात्रांवर स्वार होऊन कडकडाट केला.*
कानाच्या ओंजळीत न मावणारा तो वीरश्री-घुमारा,त्याच्या अगदी रोमारोमात घुसला.
त्याच्या अंगावरचा केसनकेस उभा राहिला.
ढोलताशांच्या त्या पथकाने धरती-गगनाला जोडणारा जणू *ध्वनी-सेतूच* उभारला होता.
समुदायातला प्रत्येक जण मंत्रावला होता!
तो सुद्धा त्यातलाच एक!!!!!!!!
पण विलक्षण बेचैन झालेला.
पथकात सामील व्हायचंच हे ठरवल्यावर कुठे त्याला त्या रात्री झोप लागली.
लास्ट ईयर, प्रॅक्टिकलस,एकीकडे चालू असलेली इंटर्नशीप,या भरगच्च शेड्युलमध्ये,तो विचार मात्र मनातून 
नाही गेला.
एका सामाजिक कार्यक्रमात त्याला *दादा* भेटला.
दादा त्यातला मास्टर!!!
ढोलताशा महासंघाचा प्रमुखच!!
 त्याने दादाला, पथकात सामील व्हायची तळमळ बोलून दाखवली.
झालं!! दादाने एका पथकात त्याचा शिरकावही करून दिला!!
आषाढ महिना!
वाद्यांच्या मरमद्दीचा हंगाम!!!!पथकातल्या जोडीदारासोबत तो कारागिरांच्या घरी गेला होता.
अक्षरशः एका झोपडीवजा बैठ्या घरात कारागिरांचे काम चालू होते
तिथेच त्याचं वाद्य त्याने बघितलं!!
एक *गुटगुटीत,बाळसेदार ढोल* होता तो,आणि त्यासोबतच्या टिपऱ्या.
 प्रेमातच पडला होता तो.
त्यावरून हात फिरवताना शहारला होता!!!
नदीपात्रात प्रॅक्टिस सुरू झाली.याला वाटलं तेवढं सोपं नव्हतं ते.
हात भरून यायचे.अनुभवी वादकांसोबत लयकारी जुळवताना फरफटायला व्हायचं!
पण तो हटला नाही.दीड महिना बेदम प्प्रॅक्टिस केली त्याने!!
सुरवातीला बोटं सोलवटायची,मनगट सुजायची!
कंबरेला ढोलाच्या बांधपट्टीचा एक लालकाळा विळखा पडायचा!!
पण ते सगळं खूप आवडतं होतं!
तीन आठवड्यात तो सेट झाला.

कॉलेजमित्रांच्या ग्रुपमध्ये मात्र कुणाला त्याने पत्ता लागू नव्हता दिला.
प्रत्येक रविवारी कॉफीच्या प्लॅन मधून तो कलटी मारत होता.
कुणीतरी पचकला “काय रे,कुठे जातोस प्रत्येक रविवारी…..कोण भेटली आहे?? ?”
दुसरा डोळे मिचकावत म्हणाला
”मी याला बघितलंय नदीपात्राच्या दिशेने जाताना.तिथेच आहे की काय तुझा *मिटिंग स्पॉट?*
“ साल्या बोल ना,कोण आहे ती?”   
त्यासर्वाना उडवाउडवीची उत्तरं दिली होती.कारण त्या सर्वानाच थेट गणपतीत सरप्राईज द्यायचं त्याने ठरवलेलं होतं.
जेवताना त्याने चमचा घेतला तेव्हा,
“चिरंजीव,आपण बोटांनी जेवतो, फिरंग्यांसारखं चमच्याने नव्हे”
असं पिताश्रीनी सुनावलं,तिथेही त्याने वेळ मारून नेली!
माताजींच्या नजरेतून मात्र सोलवटलेली बोटं सुटली नव्हती.
त्यांनी जेवणानंतर रात्री एकट्याला गाठून छडा लावला...…
“हात्तीच्या,ढोल ताशा पथकात जातोयस का?मग चांगलंच आहे की,त्यात लपवायचंय काय”
“अग आई,पण मी पथकात जातो हे बाबांना नको सांगू,उगाच काही उलटसुलट बोलतील आणि मग आमचे वाद होतील."
माताजींना विश्वासात घेऊन भगव्या रंगाच्या सुरवार झब्ब्याच्या चार सेट्सची खरेदी झाली.
प्रॅक्टिस आता रंगात आल्या होत्या.
क्वचित कधी पावसामुळे खंड पडायची वेळ आली तर कुठल्या कुठल्या आडोश्याच्या जागासुद्धा
 मंडळींनी शोधून ठेवल्या होत्या.

मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीत वाजवायचं आमंत्रण पथकाला आलं.
अभ्या नखशिखान्त हरखला होता!!!
दिवस क्रमांक एक!!!!!!
वीस ढोल ,चार ताशा,एक पांचजन्य आणि ध्वज धारक
*श्रींचा पुष्पभारी रथ*
*तापलेली बोटं*
*धुंदावलेलं मन*
*नादावलेले जन*
*उधळलेला गुलाल*
*थिरकणारी पावलं*,बेभान समुदाय,
हवेत पसरलेला जादुई नादकल्लोळ,
*अवघा रंग एक झाला*
दहादिवस अभ्या अस्मान आनंदात!!!
बेभान वाजवत होता.असं वाजवत होता जणू त्यासाठीच तो जन्मला होता.
 *अनंत चतुर्दशीला छत्तीस तासांची मिरवणूक आणि सगळ्या शारीर जाणिवांपलीकडे नेणारा नादानुभव!*
शेवटच्या दिवशी घरी आलेल्या अभ्याचं *घर्मगुलाली* ध्यान पाहून
 आईने पहिली दृष्ट काढली आणि नंतर त्याला
अक्षरशः बाथरूममध्ये ढकलला.
अंगावरून निथळणाऱ्या गुलालपाण्याकडे तो कौतुकाने पाहात होता
स्वतःच्याच प्रेमात पडला होता.
आंघोळीनंतर जी *नादग्लानी* आली ती वर्णनातीत होती.
दुसऱ्यादिवशी जाग आल्यावर तो उदास उदास होता.
आता थेट पुढच्यावर्षी??
छे छे हे बरोबर नाही
दुसरं काहीच निमित्त असू नये पथकाच्या वादनासाठी?
*तो* ...जे वांच्छिल ते ते …..
आणि...दादाचा फोन आला
पितृपंधरवड्ड्यात एका वृद्धाश्रमात वाजवायचे होते.
अरे काय तिथला अनुभव होता.
सगळे म्हातारे डुलत काय होते,
टाळ्या काय वाजवत होते
काही तर वय विसरून नाचले सुद्धा.
मग काय ही पोरं सुद्धा कुठले कुठले *नवे पॅटर्न* काढून वाजवत होती!
त्यानंतरची दिवाळी,
दादाचा फोन ”काय,वाजवायचंय ना अजून? की फिटली हौस?"
“दादा,तू फक्त *कुठे* ते बोल?”
“भाऊबीजेनंतर पहिला रविवार येतो तेव्हा जायचंय आपल्याला.”
“दादा,नक्की येतो पण जायचंय कुठे?”
दादा *कोड्यात* हसत म्हणाला”ते तुला काय करायचंय? तुझं वाद्य घेऊन सकाळी आठला तयार रहा.
आणि हो, तू मार्केट यार्डच्या जवळ राहतोस ना? मग तिथून चाफ्याची शंभर फुलं घेऊन ये सोबत.”

रविवारी अभयशेठ लवकर उठून,
दादाच्या सूचनेनुसार ढोल आणि फुलं घेऊन निघाले.
मनात विचार करत होता”साला, हे कसलं कॉम्बिनेशन आहे. *पिवळ्या चाफ्याची फुलं आणि ढोल ताशा?*

एक मिनीबस बोलावली होती दादाने.
काहीजणांकडे पेढे आणि काहीजणांकडे चक्क *ओवाळणीचं सामान!!!!*
सगळं पथक बुचकळ्यात!!!!!!
नक्की ह्याच्या मनात तरी काय आहे?
बस,खडकीच्या *अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात* जाऊन थांबली
 तेव्हा कुठे पोरांच्या डोक्यात प्रकाश पडला.
देशासाठी लढताना,कंबरेखाली अपंगत्व आलेले जिगरबाज वीर!
प्रत्येकाच्या वेगवेगळ्या युद्ध कहाण्या!
सगळे चाकाच्या खुर्च्यांवर.
*अपंग पण हतबल नव्हेत!!*
सगळ्यांना गोलाकार बसवलं , 
पथकातल्या पोरांनीच त्या सर्वांना चाफ्याची फुलं दिली
त्यांनतर  वादन सुरू!!!!!!
समोर साक्षात *रणदेवतेचे सुपुत्र*
ढोलांतून ठासून भरलेल्या वीररसाचे घुमारे उठत होते
ताशा विजेसारखा कडाडत होता!
बेभान झालेले वादक!!!
त्याहूनही बेभान झालेले सोल्जर्स!!!
व्हीलचेयर गरागरा फिरवत होते,
टाळ्या वाजवत होते.हवेतल्या हवेत बेफाम नाचत होते.
शेवटी पोरांनी केलेलं औक्षण 
आणि भरवलेला पेढ्याचा घास 
सगळ्यांचे *भिजलेले डोळे*
अभ्याने दादाला कडकडून मिठी मारली
दादा यु आर ग्रेट!!
पथकाला *समाजभानाची* किती सुंदर वाट आखून दिलीस तू!!!
वेगळ्याच उंचीवर गेलेला अनुभव होता तो
अशी बेभान सात वर्षे…..........
शिक्षण,नोकरी,रोजचे व्यवहार यासारख्या बेचव आयुष्यापेक्षा
 अभ्या फक्त या असल्या गोष्टींसाठी जगत असे.
मार्चमध्ये लॉक डाउन लागला तेव्हा *किती महिने*?हा अंदाजच आला नव्हता
म्हणून तर अभ्या पहिले दोन महिने शांत होता
जून पर्यंत सगळं आलबेल होईल अशा बातम्या होत्या
पण एकेदिवशी एका चॅनेलचर्चेत गणेशोत्सव विषय आला.
आणि सगळं चित्रच स्पष्ट झालं
यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव नाही,मांडव नाहीत,गर्दी नाही
आणि अर्थातच ढोल ताशा पथकेही नाहीत
डोकच सटकलं होतं त्याचं!!
त्या दोन दिवसात दादाला तीस मेसेज केले अभ्याने.
मनात बेचैनी धुमसत होती.
पथकात तीच चर्चा!!!!
शेवटी एक झूम कॉल घेतला दादाने.
कुणाकुणाच्या कितीकिती कल्पना.
डिस्टन्स पाळू, मोकळ्या मैदानात वाजवू ,नाहीतर नदीपात्रात
वाजवूया पण गणपतीत वाजवायचंच!!
कुणी  म्हणाले हॉस्पिटल समोर वैद्यकियसेवा देणाऱ्यांना
*धन्यवादाची मानवंदना* म्हणून तरी वाजवू.पण वादनात खंड नको.

सर्वांचं ऐकून शेवटी दादाने कडक शब्दात, निर्वाणीचा समारोप केला....
" *यावर्षी वादन जमणे नाही*.
पुढच्या वर्षी सगळं पूर्ववत झालं की वाजवायचंच आहे की.
तुम्ही जर रस्त्यावर उतरलात तर तुम्हाला पाहून पाच पन्नास लोकं खाली उतरतील आणि सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडेल.
दहा दिवस वाजवायला मिळणार नाही म्हणून उदास आहात ना?
पण काय रे या दहा दिवसावर ज्या गरिबांचं वर्षभराचं पोट अवलंबून आहे,त्यांची  आयुष्य उध्वस्त झालीत त्यांचा विचार तरी आला का तुमच्या मनात?" दादा कधी नव्हे ते चिडलेला.
कॉल संपला.
अभ्या खट्टू झाला , एकीकडे आपण फक्त स्वतःचाच विचार केला याची लाजही वाटली त्याला.
पण तरीही त्याचं रक्त सळसळत होतंच.........
दादाच्या विरोधात जायचा प्रश्नच नव्हता तरीही…....
या उसळणाऱ्या रक्ताचं काय करू?असा विचार मनात आला आणि तो क्षणच *दृष्टांताचा* होता!!
वादनासाठी उसळणारं हे रक्त जर कुणाचं रुदन थांबवू शकलं तर!!!!!

 पथकातल्या एकाची पॅथलॅब आहे,त्याने घेतलीय सगळी जबाबदारी.
शहरातली सगळी पथकं एकत्र आहेत.
मोठा हॉल,सगळी वैद्यकीय सुसज्जता
हॉलमध्ये  मानाच्या गणपतीची भव्य तसबीरसुद्धा ठेवायचं ठरलंय.
तरी सगळयांच्या मनात बेचैनी....
अभ्या तर एकदा *त्याचं वाद्य* बघायलाही गेला होता !!!!
बिचारं, *क्वांरन्टाइन* झालं होतं.
त्याची *मरम्मद* झाली नाही यावर्षी,
त्याची पान,दोऱ्या बदलल्या नव्हत्या,
त्यावरून प्रेमाचा,दुरुस्तीचा हातही फिरला नव्हता
अगदी त्याच क्षणी त्याला आठवले,
 *ते सगळे कारागीर*,जे या मोसमात वाद्याच्या देखभालीसाठी
अहोरात्र कामात बुडायचे.
त्यांचं पोटच होतं या व्यवसायावर!!
मुळातच गरिबीशी झुंजणारे ते,
त्यांनी काय केलं असेल गेल्या चार महिन्यात?
त्यांची अक्षरशः उपासमार झाली असेल.
छे छे छे............
काहीतरी करायलाच हवंय!!!!!
ढोलावरून हात फिरवताना अभ्याच्या मनातल्या *प्रकाश वाटा* उजळल्या.

आज  *अनंतचतुर्दशी* आहे
ओकेबोके रस्ते
सुनसान गल्ल्या
थांबलेली वर्दळ
उदासलेलं मन
शिवशिवणारी बोटं
बंदिस्त गुलाल
स्पर्शप्रतीक्षेत ढोल ताशे,
आणि स्थितप्रज्ञ गणराय!!!!
पण................

डिस्टनसिंग चे नियम पाळून, कडक शिस्तीत,पोरांनी मात्र आजचा दिवस साधून रक्तदानाचं शिबीर ठरवलंय......
खास कोविड काळात घेतलेलं, 
एका मोठ्या हॉस्पिटलची रक्ताची गरज पुरवणारं!!!
ढोल वाजवताना तापलेलं,उसळणारं रक्त आज *बाटलीबंद* होतंय,
 विघ्नांचे हरण करण्यासाठी!!!!!!

दादाच्या हस्ते उदघाटन!!!

पण एक *सरप्राईज* बाकी आहे.

शिबिर समारोपाच्या वेळी एक टेम्पो भरून पोती उतरवली जाताहेत.
पोरं भराभरा ती पोती अदबशीरपणे 
लावून ठेवताहेत आणि......
पंधरा *कारागीरांचा* हॉलमध्ये प्रवेश होतो.
सगळे *चर्मवाद्य कारागीर*,मास्क लावून,अंतर ठेवून उभे आहेत,दादाला रामराम करतायत!
*दादा विस्मयचकित!!!!!!*
ह्या पोरांनी नक्की काय आरंभलंय??
पाचशे बाटल्यांचा रक्त संकलनासोबत वाद्य कारागिरांना चार महिन्यांच्या शिध्याचे धान्यवाटप!!
 त्यासोबत  *पुढच्यावर्षीच्या बिदागीचे*  ऍडव्हान्स पाकिटही!
कारागिरांच्या चेहेऱ्यावर संकोचभरली कृतज्ञता!!!
 तैलचित्रातला *स्थितप्रज्ञ गजानन*  आता मात्र प्रसन्न हसतोय......
पथकातल्या,पांचजन्याच्या मंगलध्वनी ऐकल्यावर हसायचा ना,थेट तस्साच!!
*आणि दादा???*
 आश्वस्त मनानी
 हसऱ्या ओठांनी
भरल्या डोळ्यांनी
गगनभेदी *गणेशगर्जना* करतोय 
 गणपती बाप्पा मोरया
*पुढच्या वर्षी वाजवूया*
 गणपती बाप्पा मोरया
*पुढच्या वर्षी वाजवूया*

@योगिनी श्रीनिवास पाळंदे,
    पुणे








.

No comments:

Post a Comment