Oct 26, 2020

अवघा रंग

              श्री सरस्वती प्रसन्न

@योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे

               अवघा रंग

कदम रोज चहा आणतात
लहानखोर सावळा तरतरीत विठुराया,
कोकणी चटपटीतपणा.…..
नुसता चालण्या वागण्यात नव्हे तर तिखट बोलण्यातही.....
ऑफिसचं कॅन्टीन चालवणाऱ्या अण्णाकडे कामाला!
मद्रासी अण्णाकडे मराठी कदम…आपलं नेहेमीचंच दुःख…… असो..

कदम म्हणजे कष्टांगण.

एकदा एकीने ऍप वर, ते  रोज किती पावलं चालत असतील ते मोजलं होतं.
पंधरा हजार पावलं…रोजची
पंधरा हजार पगार....महिन्याचा

आस्ते कदम म्हणायची सोयच नाही
त्यांचे कदम कायम भरभर झपझप चटचट फिरतात 
तीन मजली ऑफिसच्या गच्चीवजा जागेत कॅन्टीन आहे.
तिथून सकाळी साडेदहाला दिवसाची सुरवात.
तिसऱ्या मजल्यावर सर्वोच्च पदाचे अधिकारी,त्यांना घट्ट आटीव पूर्ण दुधाचा चहा देऊन,
कदम एक जिना उतरतात….…
दुसऱ्या मजल्यावर शुद्ध पाणीदेणारे ऍक्वागार्ड मशीन आहे.
कदमांचे कदम तिथे वळतात.
अर्धी झालेली किटली ते ऍक्वागार्डच्या पाण्याखाली धरतात 
किटलीतल्या चहाची……पातळी उंचावते
आतलं द्रव्य मात्र……पातळ होत जातं.
दोनाचे चार हात ऐकले आहेत पण *विसाचे तीस कप कुणी ऐकलेत?*

ही *कदम किमया!!!!!*

तळमजल्यावर बसणाऱ्या आमच्याकडे किटली येते…….पण *परिवर्तन होऊन*
दुधाच्या घट्ट चहाचे, *दीक्षित चहात* झालेले पातळ परिवर्तन...
अस्मादिकांच्या वजन घटवण्याच्या मोहिमेत
 कदमांच्या पाणीदार चहाचा मोठाच हातभार आहे.
इतका *कॅलरीविरहित* चहा खचितच कुठे मिळत असेल.
मी त्यांना *अत्यन्त आदराने*, रोजच्या रोज नवीन नावाने पुकारते
कधी…… *जलदूत…कधी जलयुक्त शिवार प्रमुख…….तर कधी जलाधीपती!!*
प्रत्येक नावाला इतके गोड हसतात ते.
अर्थ बिर्थ सगळा समजलेला असतो बरं का!!
तरीही  खट्याळ हसतात आणि....
एखाद्या दिवशी मी काहीच बोलले नाही तर…..
बिनधास्तपणे म्हणतात “चा पातलच हाय तरी आज नाव न्हाय दिलंत?”

स्थितप्रज्ञाची सगळी लक्षणं एकवटलेली आहेत त्यांच्याठायी.

मी त्यांना म्हणते पु लंनी नामु परीट लिहिला तसा *कदम-चहावाला* सुद्धा लिहिला असता
यावर  म्हणतात *”त्येनी लीवलं असतं तर तुमचं कुनी वाचलं असतं?!!!!!!!!!!*
मी कपाळाला हात लावते.
समस्त महिलांना वाट्टेल ते बोलायची परमिशन असल्यासारखे बोलतात
आम्ही त्यांना दिली नसली तरी……….

“आज समद्याना कॉफी द्यायची न्हवं?”असं एखाद्या दिवशी उगाचच मागे लागतात.
“उगाच??? काय वाढदिवस वगैरे आहे की काय माझा? काही कुणाला कॉफी वगैरे द्यायची गरज नाहीये.”
असं मी चिडून म्हणता क्षणी”न्हाय…. ते आज साडी बिडी नेसल्या न्हव का?”असं मिश्किल उत्तर येतं.
आणि आपल्याला क्षणात हसू फुटतं.

एरवी एखाद्या पुरुष माणसाने केलेल्या कौतुकाला खुन्नस देणाऱ्या आम्ही
 त्यांच्या कॉमेंट्स मात्र गपगुमान ऐकतो. 
 कारण कदमांना पर्याय नसतो.
त्यांच्या त्या निरागस चेष्टेचा रागही येत नाही.
एकदिवस गरमागरम पावभाजीचा,
चमचमीत,घमघमीत ट्रे येतो
 बरोबबर लंचटाइम…..दुपारचा दीड
*पोटातल्या पाचक रसांनी थैमान घातलेली ती वेळ*
माझ्या डब्यात कोबी किंवा घेवडा या फ्यामिलीतली विलक्षण *करुण भाजी* असते.
मी आमच्या लंचग्रुपचा हिशोब मनात ठेवून त्यांना आवाज देते
”कदम,दोन प्लेट पावभाजी ठेवा.”

तशी माझ्या टेबलाजवळ येतात आणि ठेवणीतला बारीक आवाजात
.”तुम्हांसनी म्हनून सांगतो.अण्णांन आज कालची रातची उरलेली समदी भाजी ढकलून पावभाजी केलीये.नगा खाऊ…....निस्ता शिलपट माल”
माझ्या डोक्यात तिडीक जाते
(मुळात कोबीमुळे *फर्स्टेंशन* आलेलंच असतं!)
” अहो मग आणलीत कशाला?
शिळीभाजी आहे त्यात हे तुम्हाला माहितीये ना?”
त्यावर चेहेरा पाडून म्हणतात
”अन्नाकडे नोकरी करतो ना.मी बीं काय करनार?तुम्हांसनी म्हणून सांगितलं.नका खाऊ पावभाजी.”
एवढं बोलून थांबत नाहीत
पुढे गेलेले मागे फिरतात
 आणि मिस्कीलपणे हसत म्हणतात”आज डब्यात कोबी हाय की काय?”
यावर माझा पारा झरकन उतरतो
आणि मनापासून हसून मी त्यांच्या चाणाक्षपणाला हात जोडते.

आमची प्रमोशन,आमची पगारवाढ,
कुणाच्या रजा,कुणाची लग्न
सगळ्या बातम्या बाळगून असतात

ऑफिसचा असा एक स्वतःचा रंग असतो त्या रंगात सदैव रंगून गेलेले आमचे कदम
नवरात्रीत तर चक्क आमचा रंगाचा कॉल सुद्धा फॉलो करतात
आणि जिने कॉल पाळला नसेल तिच्यातर्फे आम्हाला पेनल्टीची कॉफी सुद्धा मिळवून देतात
यावेळेचा ऑक्टोबर महिना 
जलतांडवाचा
कुठल्या कुठल्या *पावसार्पण* झालेल्या वस्त्या
त्यात भरीत भर म्हणून डेंग्यूची साथ

एकीकडे नवरात्रीचे दिवस
ऑफीसमध्ये नवरंगाचे उधाण
नवनविन साड्या दागदागिने,
पेपरात पाठवण्यासाठी काढलेले *धडपड-फोटो*
काल आपला फोटो आलाच नाहीं…..काय हे?
जाऊदे आज पुन्हा पाठवू
उद्याच्या पेपरात येईल......
किती तो *आशावाद*
त्या शिवाय खाणेपिणे खिदळणे
देवीच्या प्रसादाच्या निमित्ताने गोडधोड.
ऑफीसात कुणाच्यातर्फे मसाला दूध
आज ललितापंचमी….....
हल्लीच्या भाषेत पाचवी माळ….
सकाळचा चहा आलाच नाही….
दुपारीही जेव्हा आला नाही.

तेव्हा मात्र पेंगुळल्या डोळ्यांनी *जांभईचर्चा*
अरे कदमचा काय पत्ता आहे?
सकाळपासून गायब???  शेवटी....
संध्याकाळी पाचला कदम हजर.
विस्कटलेले कपडे,तारवटलेले डोळे,डोळ्यात पाणी..…..
हा काहीतरी वेगळाच रंग आहे
हळूहळू सगळे त्यांच्याभोवती गोळा 
“पोरगं लैच तापलंय. डेंग्यूचा ताप हाय
हॉस्पिटलमध्ये ठिवून आलोय.”

पुढचे ,अश्रूभरले निःशब्द संवाद….

कुणीतरी लिस्ट फिरवायला सुरवात करतं
अवघा रंग एक होतो.... कारुण्याचा..
अर्ध्यातासात कदमांच्या हातात गुबगुबीत पाकीट हजर!!

एरवीच्या मिश्किल, खट्याळ भाव असलेल्या सावळ्या चेहेऱ्यावर 
आज पित्याच्या अगतिकतेचा रंग.

पुढले तीन दिवस चहा यायचा थांबत नाही…पण….....
टेबलावर येतो तो…… *मख्ख चहा*
मिस्कील कॉमेंट नाहीत…खोड्या काढणं नाही
छे छे!!!!!त्यात ती मज्जाच नाही.

चहामध्ये शब्दरंग भरायला कदम नाहीत.
पुढचे तीन दिवस फोनाफोनी
कुणीतरी हॉस्पिटलमध्ये काढलेली ओळख
ऑफिसातला नवरंग त्यातच विरून गेलेला.
“यावर्षी मसाला दूध झालंच नाही.
एरवी कॅन्टीनला ऑर्डर असते ना?
यावर्षी कदम नाहीत.”
“बरा आहे का ग त्यांचा मुलगा?”
“हो वाटतं, काल डिस्चार्ज मिळाला,असं कुणीतरी म्हणालं.”

आज खंडेनवमी………
ऑफीसात रांगोळ्यांचा सडा.
सगळ्या लपलेल्या कलाकार एकदम फॉर्ममध्ये.
आयटी रूम, प्रिंटर,कॉम्प्युटर,झेरॉक्स मशीन
सगळीकडे *नेत्रपारण* सजावट
झेंडूमय झालेला *केशरकहर!!!!!*
पूजा होते,नारळ फुटतात,पेढ्यांचे बॉक्स उघडतात.....
ओलं खोबरं आणि पेढा कॉम्बिनेशन कसलं *खल्लास* लागतं
केशरी पेढा, केशरी झेंडू,
आज ऑफीसात मिश्र रंगाचा कॉल आहे.
पण योगायोगाने सगळ्याजणी केशरी रंगात आहेत.
आणि अचानक केशरी दुधाची *वासवर्णी* येते
केशर-वास लपणार आहे होय???
कुणी दिली आहे ऑर्डर??????
आजचा ग्लास खास चवीचा 
घट्ट दुधाचा,केशरबदामाच्या चवीने *श्रीमंत* झालेला
कुणी दिली आहे ऑर्डर समजतच नाही…….
काम बंद…..चर्चा चालू……..

आणि अचानक कदम अवतरतात
प्रसन्न चेहेरा,चक्क केशरी झब्बा
मागच्या वर्षी आम्हीच दिलाय दिवाळीत
“पोराला काल सोडलं घरी.तुम्ही समदी व्हतात म्हनून…..”
ते अक्षरशः हात जोडतात..
त्यांच्या डोक्यात पाणी बघवत नाही.
“कदम पाहिले डोळे पुसा बरं.
मिळाला ना डिस्चार्ज? बरं झालं.दसऱ्याच्या आत पोरगा घरी आला ना.”
“म्हनून तर आजच केशर दूध माझ्याकडन!!!!” ते सांगतात
*आत्ता केशर दुधाचा उलगडा होतो…*.
“आज जरासुदिक पानी न्हाय घातलंय. लागतंय का न्हाई ब्येस?””
एकदम रंगपालट…….पुनःश्च नॉर्मल…
स्वतःच्याच जोकवर मिश्कीलपणे हसतात.आणि पुढे विचारतात
"यंदाबी पेपरात फोटू न्हाय आला म्हनायचा?"
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा,
असा एक *प्रसन्न रंग* असतो
आणि तो त्या सावळ्या चेहेऱ्यावर स्वच्छ उमटलेला असतो…..

@योगिनी श्रीनिवास पाळंदे, पुणे

No comments:

Post a Comment