Jan 9, 2021

बाल बाल बच गये

श्री सरस्वती प्रसन्न
@योगिनी श्रीनिवास पाळंदे, पुणे
          *बाल बाल बच गये*

रविवारची सकाळ आहे.
चाळीच्या मध्यभागी असलेल्या
*(संडासासमोरील)*
 मोकळ्या जागेत खुर्चीवर मला दटवून बसवलेलं आहे. आणि आमच्या चाळीत येणारा केशकर्तनकार *नारायण (उर्फ जावेद हबीब* )
माझे घनदाट केस कापत आहे.
(हेच नारायणराव आमच्या पिताश्रींचे ही केशकर्तन करीत असत.
मुलगी आणि वडिलांचा *हेअर ड्रेसर* त्याकाळी एकच  असे)
समोरच्या चाळीतून नंदु, नीता,मनु अशी समस्त मित्र मंडळी मला चिडवतायत आणि मी डोळे-नाक-तोंड या तिन्ही जलउगम स्रोतांतून उगम पावून वाहणाऱ्या *पातळ आणि दाट* नद्यांचा संगम हाताने पुसत,मोठ्या मोठ्या आवाजात रडते आहे!!!
ह्या हृदयद्रावक दृश्याला आमची पाच नंबरची चाळ साक्षी आहे.
घनदाट केसांचं वरदान मला आमच्या मातेकडून मिळालं होतं.
गिरगावातल्या पुरंदरे इस्पितळात 8 मे1966 रोजी एक गुटगुटीत बालिका जन्माला आली.......
जिचं जावळ दाट काळभोर होतं.
त्या केसातून कंगवासुद्धा शिरत नसे.
दोन बो मधून दोन वेण्यामध्ये शिरल्यानंतर मासाहेब सकाळच्या ऑफिसघाईतही माझ्या वेण्या घालून देत असत.
तेव्हा छोटुली झारी असायची ज्यातून खोबरेल तेल बोटावर घेऊन केसांच्या मुळाना खसाखसा चोळणे हा रोजचा उपक्रम असे.
सगळ्यांचेच केस घनदाट असलेला तो प्रदूषणविरहित काळ होता.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मैदानावर सतत खेळल्यामुळे त्या घनदाट जंगलातून *घर्मपाट* वाहात.
आणि परिणामी या जंगलात *काही सुक्ष्म प्राणी* सुद्धा शिरत.
तेव्हा त्या *प्राणीमर्दनाचाही* सामूहिक कार्यक्रम चाले.
बारीक दात्यांची फणी आणि पांढरा शुभ्र पंचा अशा दोन आयुधांनी हे हत्यासस्त्र यशस्वी पार पडे. सोबत त्या प्रसंगी साजेसे, आईने दातओठ खात खात म्हटलेले *शिवमंत्र* (की शिव्या मंत्र??)सुद्धा असत.
आमच्या घरी,शिकेकाई,रिठा, नागरमोथा अशा औषधांनीयुक्त खळखळून उकळलेले वेदसुगंधी पाणी,आमची डोकी,मासाहेबांचे शिवशिवणारे हात आणि चुरचुरून लालीलाल झालेले आमचे डोळे
असा *नाहाणे* कार्यक्रम पाहिली ते सातवीपर्यंत  दर रविवारी होत असे.

आठवीत शिरल्यावर मात्र ते ऍडोलसन्स की काय असतं ना त्याची हवा थोडी डोक्यात आणि *बरीचशी अंगात* ही शिरली.
नको ते शिकेकाई वापरलेलं नाहाणं असं वाटायला लागलं होतं.
एव्हाना आमच्या चाळीत,दहा बिऱ्हाडाच्या मागे एका सधन कुटुंबात टीव्ही, या हिशोबाने टीव्ही आगमन झाले होते,आणि त्यातल्या शॅम्पूच्या जाहिराती बघून आमची डोकी हळूहळू फिरायला लागली होती.
तो विकत घेणे परवडणेबल नसल्यामुळे आम्ही आमची शॅम्पू तहान शिकेकाईच्या सुबक साबण वडीवर भागवू लागलो.
नोकरीचा पहिला पगार झाल्यावर मात्र जी खरेदी झाली त्यात शॅम्पू चोरवाटेने आमच्या घरात घुसला. आणि आम्ही सगळ्याजणी केसांच्या वेण्यांच्या जागी,मोकळ्या केसांची झुल्फ उडवणार्या  झुल्फिकार भुत्त्त झालो!
तेव्हा माताजींनी वैतागून आशीर्वाद दिले *"केसांची काय लावायची ती वाट लावा,म्हणजे सुटाल"*.
इतर कुठलाही नाही पण *हा* आशीर्वाद मात्र फळला,आणि केस न केस गळू लागला.
एव्हाना टीव्हीवर जाहिरातींनी अधिकच थैमान घालायला सुरुवात केली होती.शॅम्पूचे विविध वासाचे,आकाराचे,रंगाचे बुधले उपलब्ध होऊ लागले होते.
माझी धिटाईसुद्धा बेसुमार वाढल्याने डोक्यावर *तेल कम, शॅम्पू जादा* असा स्वैराचार सुरू झालाआणि जी गळंती लागली ती आईने नंतर *उशाप* देऊनही नाही थांबली.
दोन वेण्यातली एक वेणी जेव्हा विसविशीत दिसू लागली तेव्हा क्षणात माझे डोळे उघडले
कपाळावरची केसांची महिरप अचानक युद्धात माघार घेतल्यासारखी  मागे आली होती
कपाळ भव्य(की उजाड??) दिसू लागलं होतं.
*दाट केशसंभाराच्या* जागी *वाट लागलेला केशसंहार* पहायची वेळ माझ्यावर आली होती.
शेवटी कुणीतरी सुचवलं"अग काप ते केस,म्हणजे कमी गळतील"
शेवटी दोन दाट वेण्यांवरून 
एक  दाट वेणी
वेणी वरुन पोनी
सुरवातीला दाट पोनी
आणि अखेरीस पातळ पोनी 
असा हा *केशऱ्हास*,मी माझ्या स्वतःच्या हाताने करून घेतला.
या *ऱ्हासपर्वात* मी एकटीच नव्हते,
तर काही मैतरणीसुद्धा होत्या.
काहीजणींचे केस मात्र,प्रामाणिकपणे त्यांच्या कर्मभूमीवर,विजयी योध्याच्या थाटात पाय रोवून उभे होते.
आता haves आणि have nots असे दोन तट पडले होते.
*सुकेशा आणि सिक-केशा*
एकदा त्यातलीच एक वाटेत भेटली
ती माझ्या चेहेऱ्याकडे न पाहता डायरेक्ट मेथडने माझ्या टकलाकडे पाहात होती.(असते अशी सवय)
या अशा केस टिकवून ठेवलेल्या *टिकेकर* मुलीने ठराविक प्रश्न विचारायला सुरवात केली."अगगग काय करून घेतलंयस ग केसांचं?"
*(जणू काही मी विनवणी करून केशवरावाना गळून जायला भागच पाडलं आहे)*
"अग काहीतरी कर त्या केसांचं"
टिकेकरचं पुढचं वाक्य.....
*(जणूं मी केस टिकवण्यासाठी काहीच उपाय करत नाहीये)*
"मी सांगू का ,माझ्या आतेजावेच्या चुलत बहिणीला तुझ्यापेक्षा जास्त टक्कल पडलं होतं *(म्हणजे तुला टक्कल आहे हे अधोरेखित)* 
 तिने कोरफड आणि जास्वंद केसांना लावून तिचे केस परत दाट झाले,
आणि हो, अजून एक,कच्चा पालक आणि खजूर रोज पहाटे खात जा".(हिच्या *पालकांनी* तरी पहाटे खाल्ला होता का कच्चा *पालक*??)
असला, मी न विचारलेला सल्ला देऊन   ती निघूनही गेली.मला आत्यांतिक रागाने  *कचसुंदरी टोचू नका..माझी नका करू कचचिंता* असं नाट्यगीत म्हणावसं वाटू लागलं होतं
गेलेल्या केसांचं दुःख काय ते ती व्यक्तीच जाणे,आणि त्यात न मागितलेले आगाऊ सल्ले ह्या *सुकेशा* का देतात हा संशोधनाचा विषय होईल.

एकदा तर एकीने कहर म्हणजे मला विचारलं की  तुझी ही *बाल समस्या,बालपणापासूनच* आहे का?"
तिच्या हिंमतीला दाद आणि आगाउपणाला एक मुस्काडात  द्यावीशी वाटली मला.
केस विरळ झाल्यावरचा प्रत्येक विंचरणे सोहोळा मला विंचवासारखा डसु लागला होता.
गळलेला प्रत्येक *केस* तोंडाला *फेस* आणत होता.
आरशासमोर विविध कोनांतून मान वळवून पहायची सवय लागली होती.
कुठल्याही कोनांतून पाहिलं तरी टक्कल दिसणारच आहे हे ठाऊक असूनही मी मानेचे व्यायाम करू लागले होते.
आता तर तेलाचा वापर  *विरळ*   आणि....  शॅम्पूचा वापर *सढळ*
होऊ लागला होता, इतर कुठलीही केशरचना चांगली न दिसल्यामुळे शॅम्पूने कृत्रिमरीत्या फुलवलेला केसांचा मोकळा फुलोरा आवडायला लागला होता.

माझी ही दुखरी जखम ठुसठुसत असतानाच,एखाद्या समारंभात किंवा लग्नकार्यातही माझ्यावर चहुकडून उपायांचा भडिमार होऊ लागला होता.
व्हाट्सएपयुनिव्हर्सिटीच्या या विदुषी,कधीकधी विदुषकी उपायही सुचवत,ज्याला माझी काहीही हरकत नव्हती,पण तो उपाय रीतसर पाणउतारा करत,चारचौघात माझ्या व्यंगावर(?) बोट ठेऊन सुचवला जाई.
आपल्या समाजात कुठल्याही शारीर गोष्टींना मध्यवर्ती ठेवून त्या त्या व्यक्तीचं यथेच्छ *बॉडीशेमिंग* करणे  हे अगदी नित्याचं आहे.
त्यामधून कुणाचीच सुटका नाही!!!!!
रंग,आकार,उंची,केस यापैकी कुठलेही  वैगुण्य(????) यातून सुटत नाही.
या सगळ्यामुळे मी फारच उदास होऊ लागले होते,आरशासमोर उभंही राहावं वाटेना,मनाचं सौन्दर्य वगैरे पुस्तकी कल्पना तर माझ्या खिजगणतीतही नाही राहिल्या.
 माझं दुःख अंमळ कमी तेव्हा झालं, जेव्हा मी, अनेक तरुण मुलगे ह्या *केशकलहात* (स्त्रियांपेक्षाही जास्त) भरडले जाताना पाहिले.
बॉलीवूडचा माझ्या दृष्टीने एकमेव फायदा म्हणजे,ते लोकं काहीकाही प्रश्न उजेडात आणतात हे नक्की.
मागच्या वर्षी *उजडा चमन* आणि *बाला* असे ,एक सोडून दोन सिनेमे बॉलिवूडमध्ये आले,तेव्हा कुठे विरळ केसांचे मुलगे,लग्नाच्या वेळी कुठल्या प्रश्नांतून जात आहेत याची समज मला आली.
आणि तो समज दृढ करणारी एक घटना घडली.
एका मैत्रिणीच्या मुलीला खूप शिकलेला,उत्तम नोकरी असलेला मुलगा सांगून आला,तेव्हा त्याचे
 *दाट सॅलरीपॅकेज* असूनही  *विरळ-हेअरीपॅकेजमुळे* 
मुलीने त्याला नाकारले.
"मावशी त्याची *हेअर लाईन* आत्ताच किती मागे गेली आहे.अग तो एखादं दोन वर्षात टकलू होईल.नको बाई हा मुलगा."
 आपल्या समाजातल्या महत्वाच्या मानल्या गेलेल्या लग्न या विषयात ह्या *सेमी-टकलू* मुलांची परवड पाहून मला धक्काच बसला होता.
 खूपच वैतागल्यावर ,शेवटी मी गेले होते एका तज्ञाकडे, तेव्हा अनेक सल्ले मिळाले!
"फार उन्हात जाऊ नका,पाणी भरपूर प्या,आहारात सुधारणा करा,
व्हिटॅमिन्सचा समावेश करा,कुठली कुठली औषधयुक्त तेलं लावा,
कुठलासा *आम्ही देतो तो* सौम्य शॅम्पू लावा (अतीवमहागडा)."
हे सगळं ऐकताना माझ्या डोळ्यापुढे रस्त्यावरच बिऱ्हाड ठोकलेली,कायम स्वरूपी उन्हात असणारी,अर्धपोटी लमाणी कुटुंबाच्या कुटुंब दिसली,
ज्यांच्या समस्त सदस्यांचे केस खूप घनदाट,काळेभोर आणि सशक्त होते.
*रस्त्यावरच्या आहारात नक्की कुठलं व्हिटॅमिन उपलब्ध होतं ईश्वरच जाणे.*
बरं ह्यांचे सल्ले आणि उपचार घेऊन
माझ्या केसमध्ये ,केसभरतरी फरक पडणार आहे की नाही,ही शंकाही मनात येत होतीच.
कारण मी आजपर्यंत कुठल्याही विरळ डोक्यावर,घनदाट उगवलेल्या *केसांची  केस* पहिली नव्हती.
डोक्यावरच्या *केसांचा गुंता* कमी आणि मनातला *विचारांचा गुंता* वाढत असतानाच.......
एके दिवशी,उत्तम निगा राखून ठेवलेले
लांबसडक केस अचानक कापून माझी मैत्रीण स्वाती,ऑफिसात आली. तिच्या केसांवर नजर जाताक्षणी
,"इतके चांगले केस कापायची बुध्दी हिला का झाली बाई?"असा विचार मनात आला.
जेव्हा आमची भेट झाली तेव्हा ती म्हणाली"केसांचे विग्ज बनवणारी एक सामाजिक संस्था आहे तिथे सत्पात्री दान करून आले माझे केस"
*विग्ज बनवणारी सामाजिक संस्था?*
स्वातीकडून माहिती समजली,
की ती संस्था कॅन्सरच्या उपचारादरम्यान, केस गेलेल्या रुग्णांसाठी अत्यल्प दरात केसांचे विग्ज बनवते.
हे ऐकल्यावर डोक्यावरची चाललेली माझी लढाई,डोक्याखालच्या मेंदूत शिरली आणि तिथून थेट काळजातच घुसली.
स्वातीच्या ह्या *बालदानाने *बालाजी* तिला तिरुपतीला न जाताही प्रसन्न होईल अशी माझी खात्री होती.
स्वातीच्या आग्रहाखातर तिच्यासोबत  त्या संस्थेत विगची चौकशी करायला गेले होते.
तिथे,डोक्याला स्कार्फ गुंडाळून आलेली, केमोथेरपीने केस गेलेली एक  
तरुण मुलगी पहिली.
आणि.... खाडकन शुद्धीत आले.
कुणीतरी सणसणीत थोबाडीत मारावी अशी माझी अवस्था झाली होती.
कुठलंही ज्ञात कारण नसताना आणि
स्वतःचा दोष नसताना कॅन्सर झालेली ती तरुण मुलगी.
केमोच्या सगळ्या विषारी सायकल पचवून,आयुष्याची लढाई लढायला सिद्ध झाली होती.
विज्ञानवारू चौफेर उधळलेला असूनही केमोथेरपीच्या औषधामुळे हाराकीरी करणाऱ्या केसांवर अजूनही काही उपचार आलेले नाहीत याचं वैषम्य वाटत होतं.
*चांगल्या आणि वाईटातला फरक माणसालाच कळत नाही, तर त्याने शोधलेल्या औषधाला कसा कळावा????*
स्कार्फखालच्या त्या तुळतुळीत टकलावर हात फिरवून त्या मुलीला पोटाशी धरून रडावसं वाटलं मला.

स्वतःच्या धडधाकट शरीराचं (अगदी विरळ केसांसकट)कौतुक वाटलं.
माझी पेशी न पेशी निरोगी ठेवणाऱ्या ईश्वराचे आभारही मानावे वाटले.
 रंग,रूप,केस जाडी अशा बाह्यरुपाकडे पाहून कुरकुर करणाऱ्या स्वतःचीच लाज वाटली.
*आत लपलेला आनंदसाठा* कुठल्यातरी बाह्य शारीरगोष्टीत शोधायला मी निघाले होते.
ती मुलगी दाट कुरळ्या केसांचा विग घालून निघाली तेव्हा, विगची ऑर्डर न देता बाहेर पडणाऱ्या मला,तिने हसून टाटा केला.
Havs आणि hav nots च्या कितीतरी पलीकडचा आयुष्याचा एक सशक्त किनारा मला अचानक दिसला होता....
घरी  गेल्यावर जेव्हा आरशासमोर उभी राहिले,तेव्हा आज मला त्यात  माझं खूप देखणं प्रतिबिंब दिसलं.
आणि मी खूप निर्व्याज हसले....
बहुधा अनेक दिवसांनंतर...........
@योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे

No comments:

Post a Comment