Oct 22, 2021

नदीकाठी

  कथा स्पर्धेसाठी              

#गूढकथा

#भयकथा

                   श्री सरस्वती प्रसन्न

                          नदीकाठी......

मुठेचा काठावरची ती करकरीत रात्र होती.

दिवसेंदिवस खालावणारं,दुर्गंध-भार नदीपात्र.

आजारी!!!अशक्त!!!!

दुर्गंधीचे डोंगर करण्यात कितीतरी लोकांचा हातभार होता.

शिळ्या भाज्या फेकणारे भाजी-विक्रेते,निर्माल्य टाकणारे भाविक,दशक्रिया विधींच्यावेळी  मृताच्या वस्तू जलार्पण करणारे शोकाकुल नातलग,रासायनिक प्रदूषण करणारे कारखानदार आणि कुणाच्याही नकळ्त,रातोरात बांधकामाचा राडारोडा फेकणारे बिल्डर्स.

कुणीच कुणाला बांधील नव्हतं, की कुणी कुणाला विचारत नव्हतं.गुदमरलेली मुठा सर्वांचे *जलापराध* पोटात घेऊन कशीबशी वाहात होती.

 किशाचा ट्रक नदीच्या दिशेने रोंरावत सुटला होता.मध्यरात्रीची वेळ.सुनसान रस्ते.मिणमिणते दिवे,निर्जन नदीघाट.

किशाच्या एका हातात बाटली होती..कितीतरी दिवसांनी मिळालेली.

त्यातले घोट घ्यायच्या आधीच किशाला खुशीची नशा चढली होती.कित्येक दिवसांनी काम मिळालं होतं. तेसुद्धा बिना कष्टाचं. इतरवेळेला लांबची ट्रिप मारल्यावर जेवढे पैसे मिळायचे तेवढे फक्त ह्या तीन रात्रींच्या कामाचे मिळणार होते.

काम एवढंच होतं. टेकडीवर साहेबांच्या बंगल्याची जुनी बिल्डिंग पाडून नवीन बांधत होते,त्या जुन्या तोडलेल्या बिल्डिंगचा सगळा राडारोडा,चुपचाप नदीपात्रात आणून टाकायचा.

बस्स!!!!!!इतकंच!!!!

फक्त हे काम मध्यरात्रीच्या वेळेत पार पाडायचं इतकीच काय ती अट होती. आधीचा बंगलाच मुळी चार मजली होता.त्यामुळे सिमेंट कचऱ्याचा,फर्निचरच्या लाकडांचा प्रचंड ढीग होता.

आज किशाची पहिली ट्रिप होती.

कचकवून ब्रेक लावत त्याने ट्रक थांबवला.बाटलीतला मोठा घोट घेऊनच मग त्याने ती बाजूला ठेवली आणि सराईतपणे उडी मारून तो बाहेर उतरला.

बाहेर बर्फाळ थंड होतं.

त्याच्या अंगावर काटा फुलला.

नदीकाठी निसर्ग नियम मोडून,राजकीय आशीर्वादाने झालेली बरीच बांधकाम होती.

पूररेषेच्या अगदी जवळच एका बिल्डरचा रिव्हर-व्ह्यू बंगला होता.एकेकाळी मोठ्यामोठ्या वृक्षांची दाटी असलेला तो हिरवा काठ सिमेंटमय झाला होता.

शिल्लक राहिलेला एकुलता एक वड मात्र होता.

भेसूर,विद्रुप झालेला,पारंब्यांचे केस पिंजारलेला, नदीच्या अत्याचाराच्या साक्षीला उभा राहिलेला.

जीर्णशीर्ण नदी मात्र वाहातच होती.तिचं पात्र रोडावून आता एखाद्या रोगट ओढ्यासारखं झालं होतं.

म्हणूनतर लोकांना तिथे कचरा फेकण दिवसेंदिवस जास्तच सोपं होतं गेलं होतं.

अंधाराकडे डोळेफाड बघत कचरा फेकताना,किशाला पहिल्या काही खेपा जड गेल्या.

नंतर मात्र त्याचे डोळे सरावले.

शेवटचा राडा टाकताना तो वळला आणि वडाच्या पारावर त्याला काहीतरी हालचाल दिसली.

नशा त्याच्यात इतकी भिनली होती की तो अजिबात डरला नाही.

“कोण आहे रे तिकडे!!”असं दरडावून म्हणताच तिथली हालचाल थांबली.तो ट्रकच्या दिशेने निघाला.

ट्रकमध्ये बसणार इतक्यात त्याला धडकी भरवणारं ते दृश्य दिसलं.

 ड्रायव्हिंगसीटवर एक आकृती होती.

शुभ्र पांढऱ्या वस्त्रातली.

त्याची नशा क्षणात उतरली

पाय लटलट झाले.

दरदरून घाम फुटला.त्याची किंकाळी घशातच जिरली.

त्याने डोळे चोळून पुन्हा पाहिलं, तो ड्रायव्हिंगसीटवर कुणीच नव्हतं.

‘आज लैच चढलीया’,असं म्हणत स्वतःला कचकवून शिवी घालत किशा

बसला.त्याने ट्रक सुरू केला.वडाच्या झाडाला वळसा घालून जाताना,त्या पारावर त्याला पुन्हा तीच श्वेताकृती दिसली,पारंब्यांवर झोके घेणारी.

तिचे मोकळे केस,आणि लांबूनही जाणवणारे अमानवी अंगारनेत्र!!!!

किशा भीतीने लोळपोळ झाला होता.

त्याने थरथरत्या हाताने ट्रक सुरू केला आणि तो सुसाट निघाला.ती आकृती आपला पाठलाग करतेय असाच भास त्याला होत होता.

कोण असेल ती बाई? आणि इतक्या मध्यरात्री तिथे कशी?नक्की बाईच होती की बाईचा आकार घेतलेलं दुसरंच कुणी????

घरीं पोचल्यावर पहाटे जेव्हा तो आडवा झाला तेव्हा त्याचं अंग तापाने फणफणलं होतं.

दुसरा संपूर्ण दिवस रखमा त्याच्या कपाळावर गार पट्ट्या घालत राहिली.

“ती तितं हाये……कुनीतरी तितं हाये.”असं वाक्य बरळणाऱ्या नवऱ्याला नक्की काय म्हणायचंय हे तिला समजेना.तिच्यापाशी असलेली तापाची गोळी त्याला देऊन तिने संध्याकाळपर्यंत,त्याचा ताप उतरवला.

सहा वाजायच्या सुमाराला किशा उठून बसला.त्याला विलक्षण थकवा जाणवत होता.रखमाने न बोलता त्याच्या हातात चहा खारी दिली,त्याने चवीचवीने घोट घेत तो कडकडीत चहा संपवला.त्याच्याकडून कप हातात घेताना मात्र रखमाला राहवेना

”अवो रात्रिसून काय बोलाया लागला???रात्री कुट गेला व्हतात? ती कोन हाय??तुमी रातच्याला कुट गेला व्हतात?”

किशाचा चेहेरा फटफटीत पडला.त्याने उत्तर देणं टाळलं.

संजू शेजारीच शाळेचं पुस्तक वाचत बसला होता.त्याने मान वर करून बाबाकडे पाहिलं आणि म्हणाला “बाबा,सांगा ना.तुम्ही कुठे गेला होतात काल रात्री?”

किशाला उत्तर देणं भाग होतं.”त्ये बिल्डर सायेब हायेत त्यांच्या बंगल्याचा राडारोडा टाकायचं नवीन काम गावलंय.रातच्याला टेकडीवरच्या बंगल्यातून समदं तोडफोडीचं सामान ट्रकमदी भरून नदीवर निऊन टाकतो.”

आता मात्र संजूने पुस्तक मिटलं आणि तो डोळे विस्फारून म्हणाला”बाबा तुम्ही नदीत कसा कचरा टाकता??तिथे कचरा टाकायचा नसतो!!आमच्या पुस्तकात लिहिलंय आणि पर्यावरणाचा तास असतो तेव्हा बाईंनीसुद्धा सांगितलंय की आपली नदी ही आपली जबाबदारी आहे.”

किशाचा चेहेरा तिरसटला,त्याच्या कपाळावर आठयांचं जाळ पसरलं,चिडीला येऊन तो ओरडला”तू गप रे.तू नग मला अक्कल शिकवू.मी कचरा टाकतो,तिथं समदी घानच हाय.तितं समदी जगदुनिया कचरा फेकते.आरं येका ट्रिपचे लै पैकं द्येतात सायेब.”

रखमा मात्र *त्या* वाक्याला चिकटून होती”अवो तुमि रातभर काय काय बरलत व्हतात.कोन हाये ती.असलं कायतरी बोलत व्हतात.तितं कुनी दिसलं का तुमाला??”

किशाला ती आठवणही नको वाटली.तो खेकसला”असंल कुणी येडी खुळी.रातच्याला क्येस मोकलं सोडून फिरत बसतीय. आज बगतो तिला.आनी टाळक्यात हानतोच काठी.”

किशा उसन्या अवसानाने म्हणाला खरा,पण ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसलेल्या आणि नंतर वडपारंब्यांवर झुलणाऱ्या गूढ श्वेतांबरेची आठवण त्याला धसकावून गेली.अर्थात मिळणाऱ्या पैशांचं आमिष इतकं जबरदस्त होतं की काहीही झालं तरी ते सोडायची मात्र त्याची तयारी नव्हती.

रात्रीचे नऊ वाजले.कभिन्न आकाशात विजा लखलखायला लागल्या होत्या.म्हणता म्हणता बाहेर पावसाने थैमान घालायला सुरुवात केली होती.किशाचं अंग अजूनही कोमट गरम होतं. पावसात जायला जिवावर आलं होतं. पण फक्त आज आणि उद्याचा दिवस काम केलं की सगळे पैसे मिळणार होते आणि साहेब खूष झाले तर पुढे मागे त्याला इतरही कामं मिळणार होती.

रखमाने जेवणाची तयारी केली.किशाच्या तोंडाला आज मुळीच चव नव्हती.तरी तो बळेबळेच जेवला.साडेनऊ पावणेदहाला त्याने निघायची तयारी सुरू केली तेव्हा रखमा म्हणाली”अवो आत्ता कुट ताप उतरलाय, पावसापान्याचं जाऊ नगसा.”

“ह्या कामापायी सायेब पैका किती मोजतोय माहिती तरी हाय का तुला?चल छत्री काडून द्ये मला.”

संजूचे कान टवकारलेले होते.

तो बाबांच्या सगळ्या हालचाली टिपत होता

बाबांच्या बोलण्यावरून तो त्याच्या रात्रीच्या कामासाठी चाललाय हे त्याने ताडलं होतं.बाबाने हे काम करू नये असं त्याला मनापासून वाटत होतं पण बाबा ऐकून घेणार नाही हे ही त्या चिमुकल्या जीवाला समजत होतं.

रात्रीची जेवण झाल्यावर पावसाच्या रिपरिपीचा आवाज अचानक बदलला.

आता तो आकांताने कोसळायला लागला होता.

काहीतरी वेगळं ,विचित्र वाटलं किशाला.

अवकाळी पडणारा पाऊस,तो ही इतका मुसळधार.

त्याच्या अंगात अजूनही कणकण होती.

आजची ट्रिप कठीण जाणार होती.

इतक्यात पावसाचा जोर भयानक वाढला आणि सोबत घों घों वारा वाहायला लागल्याचं त्या बैठ्या घरातही जाणवलं

घरावरचे पत्रे थाडथाड वाजत होते.

सगळं घरंच हादरायला लागलं होतं

किशाने हातात चाव्या घेतल्या मात्र त्याक्षणी भिंतीवरची मायची तसबीर धपकन खाली पडली.

काचा इतस्ततः विखुरल्या.

रखमा लगबगीने ते आवरायला पुढे झाली.

किशाची नजर मायच्या तसबीरीतल्या डोळ्यांवर खिळली होती.... आज ते विलक्षण जिवंत वाटत होते.

लहानपणी किशा मुक्या कळ्या तोडायचा,गंमत म्हणून झाडांची पान ओरबाडायचा, पाण्याची खूप नासधूस करायचा,विहिरीत कचरा टाकायचा आणि मायला ते सहन नाही व्हायचं.

माय नेहेमी सांगायची 'किशु बाळा तू लै शिकशील,शिकून मोठा व्हशील.तुमच्या बुकात काय लिवलंय मला नाय म्हाइत.पण तू मुक्या कळ्या-पान तोडू नगं,पान्याची अशी नासधूस करू नगं.ह्या जिमिनिवर पंचमहाभूतांचं राज्य हाय.त्येला कदी डिवचू नगंसा."

आजच हे वाक्य आपल्याला का आठवावं,याचा विचार करत करत किशा घराबाहेर पडला.

हातातल्या छत्रीला चिरून काढत पावसाच्या धारा किशाच्या अंगाला घट्ट चिकटल्या.विजेच्या झटक्यासारखी एक थंड शिरशिर त्याच्या सर्वांगावर फिरली,त्याच्या जिभेवर एक कडूसर द्रव पसरला, अंगात राहिलेल्या तापाची जाणीव करून देणारा.

त्याने ट्रक हाणत हाणत, त्या बांधकामांनी पोखरलेल्या टेकडीवर चढवला.

लाईट गेलेले होते.कुळकुळीत अंधारात साहेबांचा नवीन बांधकाम सुरू झालेला बंगला निपचित उभा होता.

किशाने ट्रकच्या हेडलाईट्समध्ये त्याचं काम सुरू केलं

आजच्या अखळ पावसांत साहेबांच्या बंगल्याबाहेरचा भिजलेला राडा उचलणं फारच अवघड झालं होतं.

शेवटची गोण भरताना कडाडकडाड आवाज झाला आणि,टेकडीवर जणु विजेचा गोळा उतरला.

किशाची नजर अभावितपणे टेकडीवर गेली आणि भीतीचा लोळ त्याच्या अंगांगात घुसला..

 खोदून कापून बोडक्या झालेल्या टेकडीच्या डोंगर तुकड्यावर  ती आकृती उभी होती

पिंजारलेले केस,अंगारलेले डोळे, काष्ठवलेले हात-पाय असलेली ती कालचीच श्वेतांबरा!!!

तिच्या डोक्यात एखादा लाकूडतुकडा हाणायच्या बाता करणारा किशा आतामात्र गर्भगळीत झाला होता.

शेवटची गोण कशीबशी ट्रकमध्ये टाकून किशाने ट्रक सुरू केला.तिथून लवकरात लवकर निसटायला हवं होतं.पण पावसाच्या तडाख्यामुळे ते शक्य नव्हतं.

सर्व शक्ती पणाला लावून त्याने  ट्रकचा वेग वाढवायला सुरवात केली.

तुफानी पावसात तो पूर्ण भिजला होताच आणि त्या माऱ्याने ट्रकचे वायपर्स लुळे पांगळे झाले होते

 समोरच्या रस्त्यावर पाण्याची एक दाट पांढरी भिंत तयार होती.

माय म्हणायची तसा हा पंचमहाभूतांचा कोप होता की काय!!!

किशाचा ट्रक जेमतेम खालच्या वळणावर आला न आला तोच कानठळ्या बसवणारा एक आवाज झाला.

त्याने अभावितपणे मान मागे केली आणि पाहतो तो काय!!

 तो तुटका टेकडीचा कडा निखळून कोसळला होता आणि बंगल्याच्या नव्याने सुरू झालेल्या बांधकामावर येऊन पडला होता.

किशाला गरगरलं.काही क्षणांपूर्वी तो जिथे उभा होता तिथेच मोठे मोठे कातळ येऊन कोसळले होते.

बंगल्याच्या नवीन बांधकामाचा पत्ताच नव्हता.तिथे दिसत होता एक दगडा-मातीचा निष्प्राण ढीग.

आपण वाचलो ह्याचा आनंद मानावा की साहेबांच्या बंगल्याच्या झालेल्या नुकसानीचं दुःख मानावं हे त्याला कळेना.

थरथरत त्याने तिथली नजर वळवून रस्त्यावर टाकली.

पाहातो तो तिथे…..मगाशी दिसलेल्या पांढऱ्या जल-भिंतीवर...तीच आकृती…. उभी होती.

आता मात्र किशाचा स्वतःवरचा ताबा सुटला.त्याला आता नशेची नितांत गरज होती.

बाजूच्या सीटवरची अख्खी बाटली त्याने घटघट रिचवली,

त्याच्या भिजल्या देहात आता रसरसलेला उष्मा शिरत होता.वरून थंड शिरशिरी आणि आतून उष्म्याचे लोळ त्याला भाजत होते.त्याने दात ओठ खात ट्रकचा वेग वाढवला आणि त्याने त्या आकृतीला सपशेल चिरडून टाकत ट्रक पुढे रेटला.

अघोरी नशा त्याच्या डोक्यात चढली होती.

चिरडलेल्या त्या देहाचं काय झालं याची पर्वा न करता त्याने नदीपात्राचा रस्ता धरला.

दहा पंधरा मिनिटात तो नदीजवळ पोचला.

पाऊस अजुनही कोसळत होता,किशाचं काम आज जास्तीच कष्टप्रद असणार होतं

तरीही तो स्वतःवर खूश होता.

कोसळलेल्या कड्याच्या संकटातून त्याचा जीव वाचला होताच आणि आत्ता त्या 

आकृतीला सपशेल तुडवून सुखरूपपणे सुटल्याचा आनंदही त्याला झाला होता.

नदीच्या काठावर तो पोचला तेव्हा त्याच्या कानाला घोंघावणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श झाला.

त्याने त्याच्या कामाला सुरुवात केली खरी पण आज नदीपात्र नेहेमीप्रमाणे कोरडं दिसत नव्हतं. उलट दुथडी भरून वाहात होतं.

कालपर्यंत अंधारातही डोळ्याला जाणवणारे कचऱ्याचे ढीग,आज जणू अदृष्य झाले होते.

किशाच्या पोटात रुजलेली अख्खी बाटली आता तिचं कर्तव्य पार पाडत होती.

त्याचे डोळे लालीलाल झाले होते,पाय थरथर कापत होते,तोल सावरत नव्हताच.

त्याने तोल सावरत सावरत कचरा नदीपात्रात टाकायला सुरुवात केली.

आजच्या गोणी भिजल्यामुळे जास्तीच जड होत्या.तरीही तो नेटाने त्याचं काम करतच राहिला.

अर्धातास तो ट्रकपासून नदीपात्रापर्यंतच्या खेपा करत राहिला

शेवटच्या खेपेला त्याच्या पायाखाली काहीतरी वळवळलं. त्याने पाय झटकत पावलं पुढे रेटायचा प्रयत्न केला.

पण पायात ती वळवळ गुंतत होती.त्याने अस्सल गावरान शिवी हासडत खाली वाकून पाय 

सोडवायचा प्रयत्न केला.पण तो वळवळ विळखा पावलापासून वर चढत घट्ट घट्ट होत होता.

आता किशाचा पाय एका जागी रुतून बसला होता.*ते*  नेमकं काय आहे हे त्याला समजत नव्हतं.

काहीतरी अमानवी,गिळगिळीत,लिबलिबित अस्तित्व होतं ते.

किशा जीवाच्या आकांताने ओरडला,पण त्याचा आवाज ऐकायला तिथं कुणीही नव्हतं.

एव्हाना त्याच्या सभोवताली नदीपात्रातलं पाणी भरायला सुरुवात झाली होती.त्याने कसाबसा पाय सोडवून घेतला आणि तो धावायचा प्रयत्न करायला लागला मात्र आणि समोर ती आकृती उमटली. 

अख्खा ट्रक अंगावर घातल्यावरही जिवंत राहिलेली…..

आत्ता ती त्याच्या अगदी जवळजवळ येत होती.

नदीच्या खळाळत्या लाटांवर ती सहजपणे चालत होती.

त्याच्या निकट आलेल्या त्या आकृतीने तिचे बर्फाळ हात किशाच्या गळ्याभोवती आवळायला सुरुवात केली.त्याच्या शरीराचा अणुरेणू भीतीने कंप पावत होता.ह्यातून सुटका होणं अशक्य आहे हे त्याला उमगलं होतं.

एव्हाना पुराचं पाणी त्याच्या मानेच्याही वर पोचलं होतं. त्याचे पाय एका जागी पुन्हा रुतले होते,श्वास कोंडायला लागला होता.गुदमरून जाताना त्याची तडफड वाढत होती.डोळ्यांची बुब्बुळं बाहेर यायला लागली होती.

काही क्षणांत पुराचं पाणी त्याच्या नाकातोंडात घुसलं,श्वासाचं पाखरू घुसमटून फडफडायला लागलं.

किशाच्या अर्धमिट डोळ्यांनी या जगातलं शेवटचं दृष्य पाहिलं तेव्हा त्याला ती आकृती पाण्याच्या लोंढ्यात वितळून जाताना दिसली.

दुसऱ्या दिवशीच्या पेपरात मोठ्या मथळ्यात दोन बातम्या होत्या.एक होती, अनधिकृत बांधकामांनी पोखरलेल्या टेकडीचा कडा कोसळून जमीनदोस्त झालेल्या बंगल्याची,आणि दुसरी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात गुदमरून मेलेल्या एका ट्रक ड्रायव्हरची.

नदीमध्ये भराव टाकून तिच्या अक्षरशः गळ्यावर पाय रोवून किशाची वस्ती उभी होती.

कालच्या पुराच्या पाण्याने काठावरच्या त्या सगळ्याच वस्त्यांमध्ये थैमान घातलं होतं.

किशाच्या अंगणात गुडघा गुडघा पाणी तुंबलं होतं.

किशाचा मृतदेह पोस्टमोर्टम उरकून घराच्या अंगणात आणला तेव्हा तो ठेवायला कोरडी जमीन म्हणून शिल्लक नव्हती. वस्तीतल्या माणसांची ही गर्दी चिखल तुडवत जमली होती.

भेदरून गेलेला संजू रखमाला चिकटला होता.रखमाचा टाहो ऐकवत नव्हता.

नदीतली ती अनधिकृत बांधकाम ज्याच्या आशीर्वादाने उभी होती तो कॉर्पोरेटर वस्तीतल्या प्रत्येक मयतीला हजर असे.

त्यालाच आणायला वस्तीचा दादा गेला होता. त्यांच्यासाठी सगळे थांबले होते.

कॉर्पोरेटरची भलीमोठी गाडी चिखलाचे फवारे उडवत आली.

पांढऱ्याशुभ्र सफारीमधले साहेब खाली उतरताना त्यांच्या कपाळावर आठयांचं जाळ पसरलं होतं.

 पॅन्टवर चिखलाचे शिंतोडे उडणार ह्या कल्पनेनेच ते बिथरले होते.पण प्रसंगावधान

राखून ते चढेल आवाजात दादाला इतकंच म्हणाले”काय रे बाळ्या??? किती हा चिखल!!!जरा भराव टाकून घ्या की.पुढच्या पावसांत नदीच्या पुराचं पाणी इथे घुसता कामा नये.काय?आलं का लक्षात?”

वरमलेल्या स्वरात दादा म्हणाला”हे ह्याचं आटोपलं की आत्ता लगेच करून घेतो साहेब.नदीत भरावच तर टाकायचा आहे ना.आपल्या रावल्याला देतो ना कॉन्ट्रॅक्ट.सगळीकडे भराव घालायचं काम तोच तर करतो.”

किशाची चिता नदीकाठी धगधगत होती तेव्हा अस्वस्थ वडावरची सळसळ वाढली होती.वरवर शांत वाटणारा नदीगर्भ आतून बेचैन होता.

 क्रियाकर्म उरकल्यावर सगळे परत निघाले.

 नदीपात्राच्या पलीकडच्या हिरव्यागर्द काठाकडे पहाणारा दादा कॉर्पोरेटरला म्हणाला

“साहेब किती रम्य परिसर आहे बघा. हितच पलीकडच्या बाजूला भराव टाकून तुमच्या कृपेने छोटं घर बांधलंय.कधीपासून तुम्हाला बोलवीन म्हणतोय.आज रात्री तिथे बसायचं का?”अंगठा तोंडाकडे नेत दादाने परवलीची खूण केली.कॉर्पोरेटर साहेबांनीही हसून संमती दिली.

आणि…….

क्षणात वड सावध झाला,त्याची सळसळ थांबली. नदीपात्रात मगाचपासून चालू असलेली अस्वस्थ खळबळही थांबली.नदीची तहान बुजवायला नवीन सावज मिळणार होतं.

आज रात्री कोण………हे आता ठरलं होतं !!!

योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे



















No comments:

Post a Comment