Jun 17, 2020

कोरोना आणि कोबी


    लॉक डाऊन च्या चवथ्या दिवशी, पिंजऱ्यात वाघीण येरझारा घालत राहते ना तशा येरझारा घालत होते. 
बाहेर जायला मिळत नाही म्हणजे काय, चुळबुळ चुळबुळ. शेवटी ठरवलं की काहीतरी निमित्त,काढून बाहेर जायचंच. *अहो* ना सांगून पिशवी, पर्स आणि तोंडाला मास्क लावून विजयी मुद्रेने निघाले. घराबाहेर पडले आणि खाली उतरले. इतक्यात शेजारची चुणचुणीत चिंगी माझ्या सारख्याच अवतारात बाहेर निघालेली दिसली. तिने विचारलं "काकू काही आणायचं आहे का? अहो मग मला सांगा ना. तुम्ही कशाला पाहत पडता? अहो वयस्क लोकांनी बाहेर अजिबात पडायचं नाहीये." 

मी चडफडत तिची वाक्य ऐकत होते. संताप आवरून गप्प बसले. राग नक्की कशाचा आला ते कळेना. यस्क म्हटल्याचा की बाहेर जायची आयती संधी हुकणार याचा, तेच समजेना. माझ्या गप्प बसण्याने चिंगी ची धिटाई वाढली. "काकू काय आणायचे आहे सांगा ना मी चाललेय बाहेर. तर तुमचे सामान सुधा आणेन". सामान कसलं आणायचं डोंबल!! ते तर मागच्याच महिन्यात वर्षभराच भरलेलं होत. मी निघाले होते भाजीचं निमित्त काढून. शेवटी चिंगी ने  माझ्या परवानगी ची वाट ही न पाहता, माझी भाजी ची पिशवी घेऊन ती बया बाहेर पडली सुधा. मी संधी हुकल्यामुळे आलेली निराशा लपवत जिना चढत चढत एकदाची घरात शिरले. मास्क उतरवला. अहोनी विचारलं "हे काय इतक्यात परत? उठाबशा लागल्या की काय काढायला? की तुलाही फटके पडले". 

मी वैतागून म्हटलं "फालतू विनोद करू नका. खालीच चिंगी भेटली. आणि म्हणे मी जातेच आहे बाहेर. तर तुमची भाजी सुधा आणते. नको तिथे या पोरांना समाजसेवेची हुक्की येते. " शेवटी पुन्हा गाऊन चा डगला चढवला आणि पुनश्च व्हॉटसअप मध्ये डोके खुपसले. पाचव्या मिनिटाला चिंगी चा फोन "काकू इथे भाज्यांची काहीच variety नाहीये. आणि दोन तीन ठिकाणी तर भाज्याच संपल्या". शेवटी मी उत्तरले "अगं कुठलीही आणलीस तरी चालेल. आणि हो सोबत कांदे बटाटे  टोमॅटो जर मिळाले तर मात्र आणायला  विसरू नको". 

थोड्यावेळाने चिंगी ताई अवतरल्या. दारातूनच तिने भाजीची पिशवी आत सरकवली आणि मी तिला पैसे दिले. पिशवी उन्हात ठेवणे. दोन दिवसांनी भाज्या बाहेर काढणे हे सोपस्कार पूर्ण केले आणि भाज्या बाहेर काढल्या. पाहते तो एक गलेलठ्ठ कोबी. मनातल्या मनात कपाळाला हात लावला. एक तर कोबी घरात आवडत नाही. त्यात उन्हाळ्यात त्याची चव अगदीच बंडल! कसला घाणेरडा वास येतो! तरी नशीब सध्या लॉक डाऊन मुळे डबा प्रकरण नाहीये. नाहीतर दुपारी ऑफिसात डबा उघडल्यावर या कोबी देवी जो काही वास सोडतात तो अगदीच दैवी की दुर्दैवी असतो. शेवटी फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी तो कोबी हातात घेतला तर तो गड्डा भलताच वजनदार निघाला. एरवी किती पोकळ असतो.! हा गड्डा कमीतकमी सव्वा किलोचा असावा.!

दुसऱ्या दिवशी अर्धा चिरला. भाजी पानात पडताक्षणी अहोनी नाक मुरडले. मला त्यांचा राग आला पण खरतर भाजी मलाही आवडली नव्हती. मग काय? दोघात किती संपणार? शेवटी उरलीच. दुसऱ्या दिवशी सकाळी थालीपीठात तिला ढकलली. तेव्हा मात्र जरा बरी लागत होती. तिसऱ्या दिवशी भाजी काय हा प्रश्न होताच आदल्या दिवशी बटाटा भाजी झाली होती. शेवटी तिसऱ्या दिवशी कड धान्य उसळ आणि सोबत काहीतरी हवं म्हणून कोबी ची पचडी केली. त्यानंतरही कोबा बाईंचा गड्डा उरलेला होताच. दोन दिवस पुन्हा गेले.एके दिवशी सकाळी पोहे करताना ठरवलं सारखा सारखा कांदा काय घालायचा? कधीतरी कोबी घालु की. म्हणून कोबी पोहे केले तरीही कोबी काही संपायला तयार नव्हता.


आता मात्र फ्रीज मध्ये त्या कोबीच्या सुकलेल्या गड्डीचे सुस्कारे सुटल्याचा वास येऊ लागला होता. मी ठरवून टाकलं होत की कितीही वास येऊदे, तिला हातच लावायचा नाही. फ्रीज उघडला की आक्रसत चाललेला, तो, आधी हिरवा असलेला आणि आता पिवळा पडत चाललेला कोबी मला डोळ्याला आणि नाकालाही छळत होता. पण तो टाकायची काही हिम्मत होईना. एकीकडे उपाशी लोकांचे तांडे टीव्ही वर दिसत असताना, काही टाकायला मन धजत नव्हतं. 

अखेर लॉक डाऊन चा बारावा आणि कोबी ताईंचा आठवा दिवस उजाडला. शेवटी ठरवलं आज भजी करून टाकू आणि कोबी पुराण संपवून टाकू. भजी साठी ती बाहेर काढली मात्र. ती हातात धरवेना. तरीही तशीच निकराची झुंज देत देत तिला चिरली. भज्यांचे पीठ भिजवताना मनात अपराधी पणा वाटत होता.

बाहेर माणसं जीवन मृत्यू शी लढताना आपण मात्र एवढी खायची प्यायची ऐश करतो. हे शोभत का आपल्यासारख्या जबाबदार नागरिकाला? मुळात हे भाज्या आणण्याचे चोजले हवेत कशाला? आंब्याची पेटी सुद्धा, हो नाही करता करता मागवलीच की आपण. का मागवली ? नसते खाल्ले तरी काय झालं असतं?पण काही क्षणात स्वतःची सोयीस्कर समजूत घातली. आपण जर खरेदी नाही केली तर त्यांचा माल तरी कसा विकला जाणार. आणि मग त्या शेतकऱ्याला पैसे कसे मिळणार?हा विचार एकदम आवडला  होता. या विचारामुळे त्या अपराधी पणाच्या भावनेतून लगोलग सुटका झाली होती. 

शेवटी भजी खात खात मस्त जेवण झाले. आज मात्र फ्रीज संपूर्ण रिकामा झाला होता. आज संध्याकाळी भाजी साठी बाहेर जायला चांगली संधी मिळणार होती. आणि जरा आवडीची भाजी सुधा आणता येणार होती.  

जरा आडवी होणार इतक्यात सोसायटी च्या सेक्रेटरी चा फोन आला. "मॅडम आपण आपल्या सोसायटी साठी एक भाजीवाला बोलावला आहे . तो आपल्या पार्किंग मध्येच त्याचा टेम्पो लावेल. आता अर्ध्या तासात तो येणार आहे. फक्त त्याचे तीनशे रुपयाचे पॅकेज घ्यावेच लागेल. आणि त्या पॅकेज मध्ये तीनशे रुपयाच्या भाज्या, फळे आणि त्यावर एक सरप्राइज भाजी किंवा फळ तो आपल्याला फुकट देणार आहे." हे ऐकुन उत्साहात उठले. ड्रेस चढवला, भाज्यां साठी पिशव्या, सुट्टे पैसे काही सुट्ट्या नोटा, मास्क, शिवाय लागलाच तर एक छोटी बाटली  sanitizer ची घेऊन मी खाली उतरले. खाली चर्चा चालली होती . 

"किती बंडल भाज्या सध्या मिळत आहेत. कशाला मुळी चवच नाही."

"कधी संपणार हा लॉक डाऊन, कधी आपण वैशाली मध्ये जाणार"

"कधी आपल्याला नॅचरल चे Ice cream खायला मिळणार" वगैरे वगैरे.

इतक्यात टेम्पो आला. अंतर ठेवून उभ्या राहिलेल्या समस्त महिला भान विसरून त्या टेम्पो वर तुटून पडल्या. पण भाजीवाला दादा जरा जास्तच समजदार होता. त्याने आधीच छोटी छोटी पोती तयार करून आणली होती. ती त्याने सर्वांना लांब उभे राहायला लावून, प्रत्येकीच्या हातात दिली. 

इतक्यात सेक्रेटरी त्याला म्हणाले "अरे कुठलीतरी भाजी किंवा फळ surprise म्हणून फुकट देणार होतास ना?". यावर दादा हसला आणि म्हणाला "आहे की, हे काय! असे म्हणून त्याने त्याच्या कडचे एक गच्च भरलेले पोते उघडले. आम्ही किमान एखादे कलिंगड तरी फुकट मिळेल या आशेने त्यात डोकावले. पाहतो तो काय गलेलठ्ठ कोबी नी गच्च भरलेले ते पोते होते. माझ्या हातातली पिशवी निसटते आहे की काय असेच वाटले मला. आधीच्या कोबा बाईंना तोंड देता देता नाकी नऊ आले होते आणि आता यांचे आगमन. बरं, नको तुझे गिफ्ट असेही म्हणता येत नव्हते. न जाणो पुढच्या आठवड्यात भाज्या मिळाल्याचं नाही तर. त्यामुळे परिस्थितीला शरण जात, त्या वजनदार जीवाला हातात घेतले. आता कोबी ची भाजी पुन्हा पानात पडल्यावर घरात किती रणकंदन होईल याची कल्पनाच करवत नव्हती.

पुढचे दोन दिवस, त्या आणलेल्या भाज्यांची कोरोना पद्धतीने वासलात लावता लावता अगदी नाकी नऊ आले. भाज्या जागच्या जागी लावून शांतपणे  टीव्ही वर च्या बातम्या लावून बसले होते. पण का कुणास ठाऊक त्या दिवशी त्या सगळ्याच उद्विग्न करणाऱ्या बातम्या ऐकवत नव्हत्या, पाहवत नव्हत्या. जागो जागी होणारे मृत्यू. जीवाचे रान करून सेवा देणारे डॉक्टर नर्स, डोळ्यात तेल घालून पहारा देणारे  पोलीस,परदेशातल्या मृत्यू तांडवाच्या बातम्या. तशातच पुढची बातमी होती ती  पोरांना अंगा खांद्यावर बसवून रणरणत्या उन्हात मैलोनमैल पायी जाणाऱ्या पराराज्यातल्या मजूरांची. त्यांना वाटेत अडवणारे पोलीस. एके ठिकाणीं बातमी होती की त्या सर्वांची राहायची जेवणाची सुधा सोय  पोलिसांनी एका आश्रम शाळेत केलेली होती. त्या आश्रमशाळेतील काही कथा माझ्या एका इन्स्पेक्टर मित्रा कडून मला आदल्या दिवशीच कानावर आल्या होत्या. लॉक डाऊन चा शेवटचा दिवस होता.त्यामुळे तिथल्या मजुरांना वेडी आशा वाटत होती की उद्या आपल्याला घरी जायला मिळणार. प्रत्यक्षात मात्र लॉक डाऊन वाढवला गेला होता. हे समजल्यावर, त्यादिवशी पराराज्यातल्या त्या मजुरांनी अन्नाला तोंड देखील लावलं नव्हतं. डोळ्यात पाणी आणून ते सांगत होते आम्हाला जेवण नको आमची आमच्या घरी जायची सोय करा. काहीतरी वाहनाची सोय करा पण आम्हाला घरी पोचवा. हे सर्व ऐकून, पाहून हाता पायातले अवसान गळले. इतक्या दिवसांचा मनात लपलेला सूक्ष्म तणाव अचानक बाहेर आला आणि डोळ्यातून घळघळा वाहायला लागला. आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत. सुखात आहोत. खातो आहोत पितो आहोत, टीव्ही मोबाईल सर्व सुख सोयी उपभोगतो आहोत. आपण पोलिसांचे ताण पाहिलेले नाही, डॉक्टर नर्स यांची लढाई आपण लढत नाही. अपरंपार नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्याचे अश्रू आपण ओळखत नाही. स्वतःच्या घरात जाण्यासाठी पाचशे किलोमीटर अंतर चालणाऱ्या मजुरा च्या पायपीटीची आपण कल्पना सुधा करू शकत नाही. आपली लढाई फक्त कोबी कसा संपवू इतपतच आहे. 

दुसऱ्या दिवशी मी शांतपणे कोबी चिरायला घेतला.

No comments:

Post a Comment