Jul 2, 2020

बक्षिस

    सकाळी उठायला आज उशीरच झाला होता. मला स्वत:चाच राग आला. ज्या दिवशी जास्ती काम असतं त्याच दिवशी कशी नेमकी उशिरा जाग येते? पटापट कणीक मळायला घेतली.
    तेवढ्यात सोनूची हाक आली, "आई टॉवेल दे". अगं माझे हात कणकेचे आहेत. आजच्या दिवस स्वत:च स्वत: घे ना" मी स्वयंपाकघरातून ओरडले.
    "आई मी अंघोळ सुरू केली आहे. तू टॉवेल आणून दे, मी विसरले आहे."
    तिचा माझ्या वरताण चढलेला आवाज ऐकून शेवटी मी उठलेच. चडफडत हात धुतले. स्वत:शीच विचार करत पुटपुटत होते. "आता ही काही लहान राहिली नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टी स्वत:च्या स्वत: उरकायला काय हरकत आहे?" 
"तूच चढवून ठेवलंयस,आता तूच निस्तर". पेपरामागून डोकावत ह्यांनी वाक्य टाकलं. 
    मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत एकीकडे भाजी चिरून फोडणीला टाकली. पोहे करायला घेतले. भाजी झाल्यावर पोळ्या सुरू केल्या. ह्यांच वाचन शांतपणे चालूच होतं आणि मधनंमधनं वाक्य टाकणंही. 
इतक्यात सोनू आली. "आई वेण्या"
    "घालते गं, जरा ही शेवटची पोळी होते आहे तोपर्यंत तू तुझा चहा ठेवलाय तो पी.” 
    "आई उशीर झालाय, आधी वेण्या घालून दे ना".
    "तिचे केस कापून टाक म्हणजे ती रोजची वेण्यांची कटकट नको". चेहेऱ्यासमोरचा पेपर जराही न हलवता हे म्हणाले. 
    "आई, बाबा बघं ना मला सारखे चिडवतात, मी माझे केस मुळीच कापून देणार नाही."
    "अहो, जरा गप्प बसायला काय घ्याल? मदत करायची नाही आणि नुसत्या कॉमेंट्स करत बसायचं. माझी किती धांदल चाललीय पाहताय ना. एकतर आज उशीर झालाय त्यातून आज माझी स्पर्धा आहे, त्याचीही तयारी करायची राहिली आहे".
    स्पर्धा या शब्दाला बाप-लेकीच्या भुवया वर चढल्या... 
    "कसली स्पर्धा?" आता मात्र पेपर बाजूला ठेवत ह्यांनी विचारलं. 
    "आमच्या ऑफिसमध्ये आज पाक-कलेची स्पर्धा आहे. बेसनांचे कुठलेही पदार्थ तयार करून न्यायचे आहेत. गोड किंवा तिखट काहीही.” 
    "अगं मग तू बेसनाचे लाडू कर ना, म्हणजे माझाही तिसऱ्या डब्याच्या प्रश्‍न सुटेल". जसा शंकराचा तिसरा डोळा तसाच ह्यांचा पोळी भाजी सोडून एक तिसरा डबा असायचा गोडाचा. मी म्हटलं, "कशाला हवेत लाडू? तूप आणि साखरेंने तुमचं वजन आणखी वाढायला?"
    "आणखी म्हणजे तुला काय म्हणायचंय?"
    "आणखी म्हणजे आधीच वाढलेंय, ते अजून वाढेल".
    सोनू म्हणाली "बेस्ट वे म्हणजे आई तू शेव कर".
    मी म्हटलं, "बघू आज आधीच उशीर झालाय, पण काहीतरी नक्की बनवणार आहे मी."
    दप्तर उचलत सोनू घाईघाईने निघाली. निघताना मागे वळून म्हणाली, "आई स्पर्धेसाठी बक्षीस मिळवूनच ये गं." 
    "आयुष्यभर स्वयंपाक केल्यावर बक्षीस मिळायलाच हवं." पोहे खाता खाता ह्यांचं तिरकस शरसंधान.
    "मिळेलचं! तुमच्या एवढ्या शुभेच्छा आहेत. मग नक्की मिळेल", मी खोचकपणे उत्तर दिलं. 
    आठला हे ऑफिसला गेले. ऑफिसला जाण्यासाठी मला घरातून दहा वाजंता निघायचं होतं. म्हणजे दोन तास होते. शेवटी मी शेव करायचा विचार पक्का केला. बेसन भिजवून तयारी केली. कढईत जरा जास्तच तेल घातलं आणि गॅस चालू केला. सुरुवात करणार इतक्याच फोनची बेल वाजली. गॅस बारीक करून घाईघाईने फोन उचलला. सासूबाई नणंदबाईंकडे चार दिवस रहायला गेल्या होत्या त्यांचा घरी येणार असल्याचा फोन असणार हा माझा अंदाज खरा ठरला. आज दुपारी चार साडेचारला त्या घरी येणार होत्या.
    मी फोन ठेवून येईपर्यंत तेलं चांगलंच तापलं होतं. मी सावकांशपणे तळायला घेतलं. सोनेरी, पिवळ्या शेवेच्या सुबक गोल चवडीनी ताट भरून गेलं होतं. सगळ्यात शेवटच्या घाण्याला मात्र गडबड झाली. सोऱ्यातले शेवेचे पीठ, कढईत पडेचना. शेवटी मी सगळा जोर त्या सोऱ्यावर टाकून पाडायला सुरुवात केली. आणि हातातून तो सोऱ्या निसटून कढईत पडला...तापलेल्या तेलाने उसळी मारली ती माझ्या डाव्याहाताच्या पंजावर.
पहिले काही क्षण जाणिवेपलीकडचे होते!!! पण पुढल्याच क्षणी हाताची भयंकरच आग व्हायला लागली. ओठावर ओठ दाबुन, डोळ्यातलं नकळत येणारं पाणी मागे सारत मी त्या वेदना सहन करत होते. थोडंसं भानावर आल्यावर आठवलं पाणी. शेवटी चक्क नळाखाली हात धरला. एकीकडे विचार करत होते काय करावं? डॉक्टरांकडे जावं की घरच्या घरीच काही उपाय करावा. पण या अशा वेदना सहन करत ऑफिसला जाणं मात्र शक्‍यच नव्हतं. पण मग स्पर्धेचं काय? एवढा आटापिटा करून ही शेव तयार केली! जरा पंख्याखाली बसावं म्हणून बाहेरच्या खोलीत आले तर फोन वाजला.नाईलाजानेच मी तो उचलला.
    "अंजू, मी नेहा बोलत्ये”
    "बोल, काय म्हणतेस ”
    "अगं आजची आपली स्पर्धा एक दिवस पुढे ढकलली आहे. आजच्या ऐवजी, ती उद्या आहे"
     "अगं पण मलां हे कुणीच नाही सांगितले"
     "मला काल ऑफिस सुटल्यावर  कळलं. पण तेव्हा तू घरी निघूंन गेली होतीस."
    "नेहा तुला रात्री फोन करून हे सांगता नाही आलं?"
    "अगं तुला रात्री तीन-तीनदा फोन लावला पण सारखा एंगेज येत होता. शेवटी सकाळीसुद्धा लावत होते. तेव्हा बेल वाजत होती पण कुणी उचलला नाही." 
    "हो, अगं आज आम्हाला उठायला जरा उशीरच झाला, म्हणून कुणी उचलला नसेल फोन. आणि अगं घाईघाईत शेव करायला घेतली. ती करून झालीच होती आणि शेवटच्या घाण्याला माझा हात तेलाने भाजला गं"
    "काय सांगतेस? कसा भाजला हात?" नेहाने विचारलं.
    "अगं हातातून सोऱ्या निसटून कढईत पडला आणि ते उकळलेलं तेल उसळून माझ्या हातावर पडलं."
    "पण मी म्हणते हातातून सोऱ्या निसटलाच कसा?"
    "तू घरी ये. तुला पुन्हा करून दाखवते सोर्या हातातून कसा निसटतो ते." मी वैतागून उत्तर दिलं.
    "अगं चिडतेस काय अशी?"
    "नाही, चिडत नाही. पण आता फोन ठेवते, मला हाताला औषध लावायचंय"
    एव्हाना हाताच्या पंजावर पुरीएवढा फोड आला होता. कैलास जीवन किंवा बरनॉल लावायचे म्हणून त्या दोन्ही ट्युब शोधल्या. पण कुठेही सापडल्या नाहीत. शेवटी असहाय्यपणे तशीच बसून राहिले. एव्हाना आग थोडी सुसह्य झाली होती. असं वाटलं आता डॉक्टरांकडे जायची मुळीच गरज नाही. घरच्याघरीच होईल बरं. कुठलंही दुःख, शरीराचं किंवा मनाचं, असंच असतं ना? सुरुवातीला त्रास झाला तरी एकदा त्याची सवय झाली की त्याची तीव्रता कमी होते.
    इतकयात  बेल वाजली. मी ओळखलं लीलाबाई कामाला आली असणार. माझी ऑफिसची वेळ साधून ही रोज येणार म्हणजे तिने काम लवकर उरकावं आणि मला कुलूप लावून ऑफिसला जाता यावं यासाठी मीच तिला घार्ई करणार. तिने एंट्रीलाच नेहेमीचं वाक्‍य टाकलं. "ताई आज लय उशीर झाला. पटकन उरकते काम. म्हंजी तुम्हाला बी येळेवर जाता येईल".
    "आजं घाई नाही लीलाबाई सावकाश होउदे काम आज"
    "म्हंजी आज तुमची बी दांडी का?". ही शहाणी माझी चेष्टा करत होती. 
    "दांडी नाही. माझा हात भाजलाय म्हणून ऑफिसला जाणार नाहीये. आणि 'येत नाही' म्हणून कळवलंय मी फोन करून. आणि फोन करून कळवलं की त्याला दांडी नाही म्हणत".
    माझ्या टोमण्याने लीलाबाईचा चेहेरा गोरामोरा झाला. ही बया आमच्या घरातून कुठल्याशा मावसबहिणीला फोन करते पण कधी येणार नसली तर एक रुपयाचा फोन करून काही कळवावसं वाटत नाही तिला. 
    मग विषय बदलत म्हणाली, "अगं बया बया!! कशानी वो भाजला हात?"
    "उकळतं तेल हातावर सांडलं". वैतागून माझं उत्तर.
    "काय करत काय व्हतात तेलाचं?" लिलाची उलट तपासणी.
    "अगं शेव तळत होते. तेव्हा भाजला हात." सहनशीलतेचा कडेलोट.
    "शेव तळताना कसा वो हात भाजला?"
    आता मात्र संयम समाप्त!!!!!!! त्यात हाताची आगही त्रास देत होतीच.
    "तू माझा आता इंटरव्ह्यू घेणार का?कसा भाजला? कधी भाजला? का भाजला? तू कामाला लाग."
वैताग नुसता!!!!! एकतर हाताची आग होत होती. त्यातून औषध सापडलं नव्हतं. आणि ऑफिसला फुकटची दांडी मात्र झाली होती. शिवाय अजून दोन व्यक्‍तींना तोंड द्यायचं होतं. सासूबाई आणि आमचे पती परमेश्वर!!
    मग अचानक आठवलं, लिलाबाईशी बोलताना बोलून गेले पण ऑफिसला येणार नसल्याचा फोन मी केलाच नव्हता. मी ऑफिसच्या राणे मॅडमना फोन लावला. 
    "हॅलो राणे मॅडम का? मी अंजू बोलतेय,अहो आज मी येणार नाही ऑफिसला".
    "का ग? काय झालं? तब्येत बरी नाही का?" खरंतर ते शेवपुराण लावायचं मनात नव्हतं. तरीही नकळत बोलून गेले. "अहो आज सकाळी शेव तळताना हात भाजला माझा"
    "अगं ऑफिसला यायच्या घाईत शेव कशाला करायला घेतलीस?"
    आता यांना एक्सप्लनेशन द्या. तशीही एक 'स्त्री' ऑफिसर असल्याने, ज्याच्या-त्याच्याकडून एक्सप्लनेशन घ्यायची त्यांना आवड होतीच. 
    "मॅडम आज आपल्या ऑफिसात पाककलेची स्पर्धा होती म्हणून शेव केली होती मी".
    "काय सांगतेस? मला माहीतच नव्हतं स्पर्धा आहे ते. नाहीतर मी सुद्धा नसता का भाग घेतला? अंजू पाहिलंस ना कामाच्या व्यापात ऑफिसमधल्या इतर गोष्टी मला कळत सुद्धा नाहीत". यांचंच कामाचं पुराण चालू. मला विचारालंही नाही की तुला किती भाजलंय? त्रास किती होतोय?
    "बरं मॅडम ठेवू फोन?" 
    "अंजू, रजा आजच्या दिवस की उद्यासुद्धा? नाही, काम खूप साठलंय म्हणून विचारते."
     "नाही हो, मी उद्या नक्की येईन", असं बोलून मी फोन ठेवला.
    कामांच्या मागे माणूस इतका लागतो की, माणुसकीच्या साध्या साध्या गोष्टी विसरून जातो? शेवटी एकदाची आडवी झाले. जेमतेम अर्धा तासच! तो बेल वाजली. आता या वेळी कोण? सोनूला शाळेतून यायला वेळ होता.
दारात शेजारच्या गोखलेकाकू उभ्या! काळजीयुक्‍त स्वरात त्यांनी विचारलं, "तुमचा हात भाजला म्हणून तुम्ही ऑफिसला गेला नाहीत असं लीलाबाई सांगत होती."
    मी कसंनुसं हसत म्हटलं, "हो,सकाळी शेव करत होते तेव्हा हात भाजला"
    "तुम्ही शेव वगैरे घरी करता? मला वाटलं नोकरी करणाऱ्या बायका सगळं बाजारचं विकत आणतात."
    "नाही हो मी शक्‍यतो बाहेरचं काही नाही आणत." मी केविलवाणी.
    "तुम्ही शेवेला बेसनआणि मोहन याचं प्रमाण काय घेता हो?" गोखलेकाकूंचा प्रश्‍न.
    मी करुण नजरेने त्या फोडाकडे पाहत उत्तर दिलं, "असं काही ठरलेलं प्रमाण नाही. आता सवयीने माझा हात बसलाय."
    "माझी शेव नेहेमी बिघडते हो... बरं ते जाऊ दे. हात बघू तुमचा?". मी  मुकाट्याने हात दाखवला. "बंरंच भाजलंय हो. सोनूच्या आई रागावू नका पण तुम्ही नोकरी करणाऱ्या बायका सगळ्याची घाई फार करता. आता तुमचंच पाहा ना, तळणीचे पदार्थ घाईघाईने सकाळी कशाला केले?". यावर मी निरुत्तर होते. त्यांना ऑफिसमधली स्पर्धा वगैरे सांगत बसते तर त्यांनी आणखी अर्धा तास खाल्लाअसता. "बरं मी निघते पण डॉक्टरला दाखवा हो. नाहीतर तुम्ही नोकरी करणाऱ्या बायका सगळं अंगावर काढता". मी अक्षरश: दार आपटलं. बहुतेक नोकरी करणाऱ्या बायका चिडल्यावर आपटतात ना तसं!!! 
    थोडासा आमटी भात कालवून खाल्ला आणि पलंगावर आडवी झाले. त्या हाताकडे बघवत नव्हतं. हळूवारपणे मी त्या फोडावरून हात फिरवला. मला शरीराच्या त्या व्यापाराची गंमत वाटली. त्या एका छोट्या पंजाला भाजल्यानंतर सगळे संदेश मेंदूकडे जातात काय आणि मेंदू शरीराच्या इतर भागांनाआज्ञा देऊन भाजलेल्या ठिकाणी पाणी पाठवतो काय. केवढं आश्चर्य!! भाजलेल्या जागी पाण्याचा फोड येणं या एका छोट्या घटनेतही निसर्गाची केवढी शक्‍ती? निसर्गाची शक्‍ती की शरीराच्या आत राहून अविरत कार्य करणारी आत्मिक शक्‍ती? जरासा डोळाच लागला होता. म्हणता म्हणता दीडतास तरी झोपलेच मी. 
    जाग आली ती कर्कश्श वाजणाऱ्या बेलने. सोनू आली असणार. मी दार उघडलं. "अरे, आई तू घरी कशी काय?दाराला कुलूप नाही हे पाहिल्यावर मला तर वाटलं आजीच आली. आज येणार होती ना?". मी मुद्दामच हात लपवून वावरत होते. सोनूच्या हे गावीही नव्हतं की आपल्या  आईचं आज काहीतरी बिनसलंय. तू रजा का घेतलीस, हाही प्रश्न नाही आला. तिला जेवायला वाढलं.
    "शी! काय बोअरिंग भाजी आहे गं आई."
    "सोनू तुला कुठल्या भाज्या बोअरींग वाटत नाहीत त्याची एक यादी करून दिलीस तर बरं होईल"
    "काय गं आई!!!! ए आई तू सकाळी शेव करणार होतीस ती केलीस का? केली असशील तर ती वाढ ना. मी त्याच्याशी पोळी खाईन". अन्न वस्त्र निवारा मधील अन्नातच अडकलेली ही पिढी!!!!
    मी मुकाट्याने शेव वाढली. ह्या मुलीच्या चेहेऱ्यावरची रेष न रेष मी वाचते. तिचा आनंद, तिची दुःख, तिच्या आवडीनिवडी सगळं सगळं, माझ्याच स्वत:च्या व्यक्तित्वाचा भाग म्हणून मी संभाळलंय. आणि हिला आईच्या चेहेऱ्यावरची वेदना समजू नये? ही कधी होणार मोठी? जेवण झाल्यावर सोनू क्लासला जायला निघाली आणि घराबाहेर पडताना तिला आठवलं. "आई अगं आज तुझी स्पर्धा होती ना?".
    मी वैतागून म्हटलं, "नाही, आजची स्पर्धा उद्या आहे.”
    सोनू म्हणाली, "आई तुला बक्षीस नक्की मिळेल शेव खूप छान झाली आहे. पुढच्या आठवड्यात कधीतरी चकल्या करशील?". मी कपाळाला हात लावला आणि मनात म्हणाले, "कारटी अगदी बापाच्या वळणावर गेली आहे. फक्त स्वत:चा विचार करायचा. इतरांना,विशेषत: आईला गृहीत धरायचे. चार वाजता ठरल्याप्रमाणे सासूबाई आल्या. त्यांना वाटेतच गाठून गोखलेकाकूंनी माझा हात भाजल्याचा किस्सा सांगितला होता. त्यांनी घरात शिरल्याक्षणी विचारलं, "बघू, कुठे भाजलंय ते?"
    "शेव करताना कशी गं भाजलीस?"
    झालं, पुन्हा तेच प्रश्‍न!!!!!!
    "तुम्ही आधी बसा हो आई. एवढ्या उन्हाच्या आल्या आहात. पहिलं गार पाणी प्या". 
    पाणी पिऊन झाल्यावर त्यांनी विचारलं. "बघू गं हात बघू तुझा." मी हात दाखवला. "चंचंचं...किती गं भाजलंय. पण मी म्हणते तू सकाळच्या घाईत शेव कशाला करायला घेतलीस?". 
    "आई, अहो, ऑफिसात पाककलेची स्पर्धा होती. त्यात भाग घेतलाय मी त्यासाठी शेव करत होते."
    "तुमच्या ऑफिसमध्ये कामं सोडून स्पर्धा कसल्या घेतात गं? त्या सुद्धा पाककलेच्या? बरं ते राहू दे. तू कैलास जीवन लावलंस का?"
    कुलूपं अनेक किल्ली एक या चालीवर आमच्या आईनाही, कुठल्याही दुखण्यावर किंवा आजारावर कैलास जीवन हे एकच औषध आवडतं. मी नकळत बोलून गेले, "मी कैलासजीवनची बाटली खूप शोधली पण सापडलीच नाही". 
    त्यांना चान्स मिळाला. "तुमच्या वसतू जागच्या जागी ठेवलेल्या नसतात. मी बोलले की माझं तोंड तेवढं तुम्हाला दिसतं पण तुमची एकतरी वस्तू कधी गरजेला जागच्या जागी सापडेल तर शपथ."
    आता हे सुनवायची ही वेळ होती का? शेवटी त्यांनी त्यांच्याजवळची पिशवी उघडून, त्यांची ठेवणीतली लासजीवनची बाटली काढली आणि मी लावते की नाही याची खातरजमा न करताच त्या आत गेल्या. "अंजु,आधी आत ये बरं". मी आज्ञाधारकपणे गेले.
    "एवढं तेल कुणी शेव तळायला घेतं?"
    "आई, अहो सकाळच्या घाई गडबडीत शेव करायला घेतली. चुकून तेल जास्ती घेतलं." चूक नसतानाही कबूल करायची सवयच लागून गेली होती.
    "पण मी म्हणते सकाळच्या घाईत कशाला केलीस? कालच रात्री का नाही करून ठेवलीस?"
    मी चिडून मनात म्हटलं, 'म्हणजे भाजलं नसतं का? आता, तो सोऱ्या, जो माझ्या हातून आज सकाळी निसटला, तो
काल रात्री कशावरून नसता निसटला?'. पण वाद कोण घालणार? मी मुकाट्याने कैलास जीवन चोळत राहिले. आता संध्याकाळचा एपिसोड अजून शिल्लक होता. हे घरी आल्यावर किती चेष्टा करतील,किती टोमणे मारतील याची कल्पनाच न केलेली बरी. आधीच थट्टेखोर स्वभाव, त्यात बायकोच्या धांदरटपणामुळे झालेला अपघात. ही संधी हे सोडतील? पण एक मात्र मी ठरवलं सकाळपासून म्हणजे अगदी नेहाच्या फोनपासून प्रत्येक प्रसंगात खूप चिडचिड झाली. वैतागून झालं. आता नाही! आता अजिबात त्रास करून नाही घ्यायचा. सहा वाजता बेल वाजली.तेव्हा मी चेहेरा शक्‍य तितका कोरा ठेवला होता. आल्याबरोबर बुटाची लेस सोडता सोडता यांनी पहिला पश्न टाकला. "काय मग पहिलं बक्षीस का?". मी मानेनेच नाही म्हटलं. 
इतक्यात सासूबाई पुढे येत म्हणाल्या, "अरे बक्षीसं कसली देतोयस.तिचा हात बघ किती भाजलाय". मी हात पुढे केला....आणि सगळे शाब्दिक वार झेलायला सर्व ताकदीनिशी तयार झाले. 
    "अगं किती भाजलंय..तू डॉक्टरकडे गेलीस की नाही?". मी मानेनेच नाही म्हटलं.
    "तुझी कमाल आहे. सकाळी हात भाजल्यापासून तू आत्तापर्यंत डॉक्टरकडे न जाता राहिलीस कशी?"
    "अहो सुरुवातीला आग झाली,जरा त्रास झाला. पण आता विशेष त्रास होत नाही आहे."
    यांनी सोडलेले बूट शांतपणे पायात पुन्हा अडकवले. "तू डॉक्टरकडे चल.''
    "अहो, आधी चहा तर घ्या. मी ड्रेस बदलते, नंतर जाऊया."
    "अंजू तू डॉक्टरकडे चल. अशीच्या अशी,आत्ताच्या आता चल", यांचा आवाज चढला होता. मी मुकाट्याने उठले.
    इतक्यात सासूबाई पुढे आल्या."अरे तिला मी कैलास जीवन लावायला दिलंय".
    "कसलं कैलास जीवन लावतेस? तिला भाजलंय किती ते बघ एकदा. सकाळपासून किती त्रास झाला असेल काय माहिती. अंजू चल गं". 
    मी पाहातच राहिले. हे माझा इतका विचार करतात? सकाळपासून काणीही इतकी काळजी दाखवली नव्हती, मला किती त्रास झाला असेल याचा विचारही कुणी केला नव्हता. आणि हे एक पुरुष असूनही माझ्या वेदनांचा इतका विचार करत होते? डॉक्टरांकडे जाऊन परत यायला आठ वाजले. तोपर्यंत सासूबाईंनी स्वयंपाक करून ठेवला होता. रात्री झोपताना ह्यांनी हाताला मलम लावताना विचारलं, "किती दुर्लक्ष करशील स्वत:कडे?"
    मी आवंढा गिळला.
    "तुझी खूप धावपळ होते ना? घरचंही संभाळायचं, ऑफिसलाही जायचं. त्यातून माझ्या आणि सोनूच्या खाण्यापिण्याचे नखरे.''  
    माझ्या डोळ्यात पाणी जमायला लागलं होतं. 
    "आज सकाळीसुंद्धा तुझी अशीच धावपळ झाली असेल ना? किती भाजलंय...तुझ्या हाताकडे बघवत नाहीये निदान मला एक फोन तरी करायचास."
    एव्हाना माझा बांध फुटून मी मुसमुसून रडायला लागले. 
    "खूप दुखतंय का?''
    मी डोळे पुसत नाही म्हटलं.
    "आंता औषध लावलंय ना, आता बरं वाटेल तुला."
माझी लहान मुलासारखी समजूत घालत हे मला थोपटत राहिले. 
    त्या, न झालेल्या स्पर्धेतलं बक्षीस मला आधीच मिळालं होतं!!!
- योगिनी पाळंदे


ही कथा 'स्त्री' मासिकाच्या "मे - २००४" च्या अंकात प्रकाशित झाली होती. 



5 comments:

  1. Replies
    1. किती सुंदर लिहलय योगिनी तू अगदी बारीक सारीक तपशिलासह. सुंदर.

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Eloquent piece of work with reality and warmth! Excellent writing skills dear!Hope to read more such blogs in future!

    ReplyDelete
  4. तुझ्या लिखाणातून प्रसंग किती सहज डोळ्यासमोर उभा राहतो.मस्त लिहितेस

    ReplyDelete