Sep 20, 2020

मन्थएंड

    "ए आजच्या बांगड्या पाहिल्या का?"
दिवसाची सुरवात झाली!! ''साडी काय क्यूट रंगाची आहे ना. मला एक आश्चर्य वाटतं कुठल्याही रंगाची साडी असो, किंवा ड्रेस असो, हिला मॅचिंग बांगड्या मिळतातच कशा?".  ग्रुपला पडलेला महान प्रश्‍न!!
    ''नवरा हौशी असेल, देत असेल आणून". एक त्यातल्या त्यात भोळं उत्तर!!!
    '' काय बावळट आहेस, ती आहे चाळीशीची , नवरा असेल पंचेचाळीशीचा, लग्नाला अंदाजे तेरा चौदा वर्ष झाली असतील, एवढ्या वर्षानंतर बायकोला रंगिबेरंगी बांगड्या आणून देण्याइतकी हौस असेल त्याला? आम्ही तर बाई ऐकलय मोठा व्यावसायिक आहे म्हणून". विचारपूर्वक विश्लेषण!!
    ''मला वाटतं एखादा कासार हिचा खास जवळचा मित्र असेल. तो देत असेल प्रत्येक साडीवर मॅचिंग बांगड्या".  किडका सारांश!!!
एव्हाना माझा संयम संपून त्याची जागा संतापाने घेतली. मी जरबेने म्हणाले, "तुम्ही रोज तिच्यावर काय कॉमेटस्‌ करता? सासूवर टीका ठीक आहे. मुलांचे रोजचे विषय आणि चर्चासुध्दा ठीक आहे. साहेबांची निंदा ही क्षम्य आहे. पण रोज तिच्यामागे काय लागता? काय मिळतं त्यातून तुम्हाला? ती येऊन जेमतेम दोन महिने झालेत आणि..."
    माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच मीनाने मला अडवलं, आणि म्हणाली "तेच म्हणते मी, ती येऊन जेमतेम दोन महिने झालेत आणि तुमची दोघींची एवढी मैत्री जमलीच कशी? बरोबर आहे. वाचनाची आवड, लिखाणाची आवड."
मीनाला अडवत स्मीता हसत हसत म्हणाली, "मीना, लिखाणाची काय म्हणतेस? साहित्याची म्हण बाई! साहित्याची आवड!"
     मी सुध्दा काही गप्प बसले नाही "तुम्हाला का राग येतो आमच्या मैत्रीचा? तुम्ही जर ग्रुप सोडून दुसऱ्या कुणाशी मैत्री केलीत तर मला त्यात काही वाटणार नाही बाई. प्रत्येकाच्या आवडी निवडीचा प्रश्न आहे. आहे आम्हाला दोघींना वाचनाची आवड. आणि काय गं तुम्हांला तिच्या साड्या - ड्रेस आणि तिच्या बांगड्या याच्या विश्लेषणात आख्खा लंच टाईम वाया घालवायला काहीच कसं वाटत नाही? दुसरे सगळे विषय संपले का?"
    मनातल्या मनात मात्र मी कडवटपणे म्हटलं "तुम्हाला नाही वाचनाची आवड, नाही लिखाणाची आवड, नाही कुठल्या समाजिक विषयात रस. येऊन जाऊन सारखा घरचाच विषय नाही तर टीका!! सदैव कुणावर ना कुणावर तरी टीका!!!" गेल्या दोन तीन महिन्यापासून अनू हा नवीन विषय त्यांना मिळालाच होता. अनू, तिचं सौंदर्य, चाळीशीतही तिने टिकवलेला बांधा, तिचे महागडे ड्रेस, साड्या आणि त्यावरच्या मॅचिंग बांगड्या.

    लंच टाईम संपला तो दुस-याच कुठल्यातरी विषयाने. कदाचित मला दुखवायचं नाही म्हणून त्या सर्वजणी गप्प बसल्या होत्या. कदाचित वाद वाढू नये म्हणून गप्प बसल्या होत्या. मला त्यात रस नव्हताच. मी कामाला सुरुवात केली खरी पण लक्ष लागेना. वाटलं ही किती कोती वृत्ती निर्माण झाली आहे या सगळ्यांमध्ये. कुणाला नावं ठेवल्याशिवाय यांचा दिवसच पूर्ण होत नाही. आणि अनुसारख्या व्यक्तीविषयी कुठल्याही सबळ कारणाशिवाय या सर्वजणी आकस कसा ठेवू शकतात?
    इतक्यात साहेबांनी मला हाक मारली. मी त्यांच्या टेबलापाशी जाऊन उभी राहिले.
    "अंजली दोन दिवसांनी महिना अखेर येतो आहे. दरवेळेप्रमाणेच या महिना अखेरही कामाचा ढीग उपसावा लागणार आहे. त्यामुळे संध्याकाळी थांबावं लागेल, तुझी काही अडचण नाही ना?"
मी थोडी चक्रावलेच होते. साहेबांनी सांगायचं आणि आम्ही थांबायचं हे गेली काही वर्ष बिनबोभाट चाललं होतं. मग, तुझी काही अडचण नाही ना हे विचारण्याचं काय कारण होतं? मी उत्तर देणार इतक्यात साहेब म्हणाले "तुला एकटीलाच नाही, स्टाफ मधल्या प्रत्येकालाच व्यक्तीश: विचारुन ठेवतोय."
    मी हसून म्हटलं, "साहेब, ही कुठली प्रत्येकाला विचारायची नवीन पध्दत? आम्ही सर्वचजण नेहमीच महिना अखेरीच्या कामासाठी थांबतो नाही का?'' साहेबांनी आजूबाजूला पाहिलं, मला म्हणाले "बस जरा, तुला सांगतो तुझ्या मैत्रीणींचा जो ग्रुप आहे ना, त्यातल्याच काही जणींना प्रॉब्लेम झालाय"
     मी विचारलं "कुठला प्रॉब्लेम?"
    साहेब उत्तरले ‘त्या अनुश्री देशपांडे आल्या आहेत ना, त्यांची काहीतरी अडचण आहे म्हणून त्या प्रत्येक मंथएंडला रजा घेतात, तर या सर्वजणी मला भेटून विचारुन गेल्या की त्यांना विशेष परवानगी का देता म्हणून." 
मी त्यांना म्हणालो "मला सर्वजण सारखेच आहेत. तुम्हा कोणाला अडचण असेल तर तुम्हीही रजा घेऊ शकता."
साहेब शांतपणे बोलत होते खरे पण मनातून वैतागले होते.
    बरोबर आहे एखाद्या नव्यानेच आलेल्या स्त्री कर्मचा-याला, त्यातून सुंदर स्त्री कर्मचा-याला रजा दिल्याबद्दल कुणी काही तिरकं बोलायला लागलं तर ते वैतागणारच. 
    मी थक्क झाले होते!! या सर्वजणी तिच्या महिना अखेरीच्या रजेविषयी साहेबांना जाऊन भेटतात, त्यांच्याशी बोलतात हे सगळच धक्कादायक होतं. पण अनू तरी प्रत्येक महिन्याच्या शेवटी कशाला रजा घेते? एरवी या दोन तीन महिन्यातलं तिचं काम खरोखरीच वाखाणण्यासारखं होतं. प्रत्यक्ष साहेबांच्या तोंडूनच दोनतीनदा
कौतुक ऐकलं होतं. पण जेव्हा कामाचा सर्वात जास्ती ताण असतो तेव्हा रजा घेतली तर सर्वांच्याच डोळ्यात येतं हे तिच्या का नव्हतं लक्षात येत? आज संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर एकत्र जाऊ तेव्हा बोललं पाहिजे असं मी मनाशी ठरवलं.

चार साडेचारच्या सुमाराला स्मीता माझ्या टेबलापाशी आली. "अंजू दुपारी तुझा मूड गेला का गं?" स्मीता त्यातल्यात्यात समंजस म्हणावी अशी. अर्थात ती ही काही कमी नव्हती, पण निदान ग्रुप टिकून रहावा याच्या करता धडपडाची.
    "छे ग! मूड कशाला जाईल माझा?"
    "अनुश्री विषयी आम्ही बोलत होतोच आणि तुमच्या दोघींच्या मैत्रीविषयीही सगळ्यांनी नाराजी दाखवली म्हणून तू रागावली नाहीस ना?"
    मी जरा आश्चर्यातच!!! ही जरी त्यातल्यात्यात बरी असली तरी एखाद्या विषयी इतका विचार कधीपासून करायला लागली?
    "नाही ग मी नाही रागावले", मी वरवर म्हणाले.
    "असं कसं म्हणतेस ? तुझा चेहेराच इतका बदलला होता की आम्ही सगळ्यांनी ओळखलंच तू रागावलीस म्हणून".
    "हे बघ तुम्हाला तिच्याबद्दल बोलावसं वाटलं, तुम्ही बोललात. ठीक आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण टीका करतानाही आपण किती  घसरायचं याला काही लिमिट? सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनुमधली एकतरी गोष्ट अशी आहे का, ज्याचा आपल्याला त्रास होतो म्हणून आपण टीका करावी? सांग ना. तिचं बोलणं गोड आहे, ती कधीही कुणाला दुखवत नाही म्हणून तुम्ही परवा शुगर कोटेड क्विनाईन असं तिच्याबद्दल बोललात. काल साहेबांनी तिचं कौतुक केलं तेव्हा म्हणालात पुढेपुढे करते, दिसायला सुंदर आहे म्हणून तिच्या कामाचं कौतुक साहेब करतात"
    मला मधेच थांबवत स्मीता म्हणाली, "तेच तुला सांगायचय, ती वाटते साधी पण तशी मुळीच नाही. तुला पटणार नाही कदाचित पण सांगते. तू कामाचं बोललीस ठीक आहे. काम करते हे मान्य. पण प्रत्येक मन्थ एंडला साहेबांना व्यवस्थीत खिशात घालून रजा सॅक्शन करुन घेते."
    यावर मी गप्पच राहिले. नुकताच साहेबांपाशी विषय झाला होता ते सगळं आठवलं.
ठेवणीतला बारीक आवाज काढत स्मीता म्हणाली, "आजच तिचा परवाच्या सुट्टीचा अर्ज आलाय. आम्ही तो पाहिला आणि लंचच्या आधीच सगळ्या जणी साहेबांकडे जाऊन आलो. तिची रजा प्रत्येक महिन्याला कशी सॅक्शन होते ? ती कामसू आहे ना? मग महिन्यातलं सर्वात जास्ती काम असते तेव्हांच कशी चार दिवस रजा घेते?" स्मीताच्या चेहे-यावर मला निरुत्तर केल्याचा आनंद होता. ती पुढे म्हणाली "तू म्हणालीस ना टीका करताना किती घसरता म्हणून? पण खरच तिचा एक ठराविक कासार आहे. ती जवळजवळ एक दिवसाआड त्याच्याकडे जाते. आता मला सांग, हिचं आठवड्यातले तीनचार दिवस बांगड्यांच्या दुकानात जाऊन बांगड्या घ्यायचं वय आहे का? मग का जाते ती, सांग ना?"
    मी स्मीताला विचारंल, "तुम्हाला कुणी सांगितल गं ती दर दिवसाआड बांगड्या घेते ते?"
    "अगं आम्ही दोघी तिघी तिच्याच रस्त्याने जातो ना आम्ही तिच्यावर पाळत ठेवून ही बातमी काढली."
    मी थक्क !!!!
    पाळत वगैरे ठेवून बातमी काढायची म्हणजे..... हाच वेळ सत्कारणी नसता लावता आला? पण आयुष्यात गॉसिपिंग हेच ध्येय असेल तर काय करणार?
    स्मीता गेली पण मला बेचैन करूनच. वाटायला लागलं अनुला हे सर्व कळलं तर? तिची प्रतिक्रिया कशी असेल ? कुठल्याही कारणाशिवाय ऑफिसमधल्या बायकांनी सतत टीका करणं, साहेबांकडे जाऊन तिच्या तक्रारी करणं, आणि हे सर्व कमीच की काय म्हणून तिच्यावर पाळत ठेवून तिच्या बद्दलच्या बातम्या काढणं.
    संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर पाकींग पर्यंत एकत्र चालायचं हा आम्ही एकमेकीच्या मैत्रीत पडल्यावरचा शिरस्ताच झाला होता. तिची स्वत:ची गाडी ड्रायव्हर आणून उभी करायचा तिथपर्यंत गप्पा मारत जायचं, हे आता रुटीनच झालं होतं. आमच्या दोघींच्या सर्वच आवडी निवडी, जुळत होत्या असं नाही. पण मनाच्या तारा मात्र जुळल्या होत्या. कितीतरी विषयांवरच्या गप्पा, चर्चा. तिचं वाचन अफाटच.कुठल्या कुठल्या पुस्तकांविषयी मला सांगायची.
    आज मात्र माझी चिडचिड मी लपवू शकले नाही. जिना उतरता उतरता अनु म्हणाली, "काय गं अंजली काय झालं?"
    "कुठं काय झालय ?"
    "अगं चेहेरा किती उतरलाय, साहेब काही बोलले का? नाही, साहेबांच्या टेबलाशी मला दिसली होतीस म्हणून विचारलं.."
    "नाही ग साहेब नाही काहीही बोलले. माझ सकाळपासूनच डोक दुखतंय म्हणून चेहेरा असा वाटतोय तुला."
    तिच्या गाडीपर्यंत जाऊन पोचल्यावर मी लगेचच जायला निघाले. त्यावर ती म्हणाली "हे काय? थांबत नाहीस रोजच्यासारखी?"
मी म्हणाले, "नको अगं मला घरी लवकर पोचायचय."
"मी सोडू का गाडीतून?"
"नको नको, माझी मी जाईन", असं म्हणत मी पुढे निघाले, चार पावलं पुढे गेल्यावर काय वाटलं कोण जाणे, गर्रकन मागे वळून परत तिच्या गाडीपाशी जाऊन म्हणाले, "अनू या बांगडया कुठे मिळाल्या तुला?" 
    तिला माझं ते विचारणं खटकलं की काय कोण जाणे पण तिचा चेहेरा खरकन उतरला. ती म्हणाली "केवळ हे विचारायला मागे वळून आलीस? अगं माझं एक ठराविक दुकान आहे बांगड्यांचं, तिथे मला अगदी हव्या तशा रंगाच्या बांगड्या मिळतात. पण तुला अचानक माझ्या बांगड्यांची कशी काय आठवण झाली?"
माझ्या डोळ्यासमोर मीना, स्मीता आणि तो सगळा ग्रुपच होता. मी अनुला सांगितलं "अनू, कुठल्याही परिस्थितीत या मंन्थएन्डला तू रजा घेऊ नकोस, प्लीज माझी विनंती आहे तुला."
    आता मात्र गाडीत बसलेली अनू बाहेर आली, "अंजु,अग काय झालं, मगाशी बांगड्यांचं, मागे येऊन विचारलस, आत्ता, काहीही विषय निघालेला नसताना मन्थएंडच्या रजेचा विषय कशाला काढलास? काही प्रॉब्लेम झालाय का?"
    मी जरा गडबडलेच "म्हणाले तसा काही प्रॉब्लेम नाही झालाय पण.. तू येशील ना मन्थएन्डला?"
    तिचा चेहरा उतरला होता, पार रंग उडाला होता चेह-याचा. 
    "मला शक्‍य नाही"
    "अगं, पण का शक्‍य नाही? तुला उशीरा पर्यंत थांबण शक्‍य नसेल तर थांबू नको पण निदान ऑफीसला ये".
    "मला शक्य नाही"
    मी चिवटपणे तिला म्हणाले "आजपर्यंत आपण एकमेकींच्या घरचा विषय कधीच काढला नाही. खाजगी विषय सोडून कायम बोलत राहिलो. पण मला एक सांग, तुझी काही अडचण आहे का?"
    "मला शक्‍य नाही" तिचं तेच उत्तर.
    आता मात्र मला तिचा रागच आला. मी एवढी परोपरीने सांगत असूनही ती, "मला शक्‍य नाही" या वाक्‍याशिवाय काही बोलायला तयार नव्हती. शेवटी कसाबसा तिचा निरोप घेऊन मी निघाले.
    रात्री तिचा फोन आला. 'मी रागावले नाही ना' विचारणारा, तो मी जेमतेम परतवून लावला.
    दोन दिवस कामही प्रचंड होतं आणि आम्ही दोघी एकमेकींशी नेहमीसारख्या बोलतही नव्हतो. एकदा वाटलं दुस-या कुणाच्या सांगण्यावरुन आपण आपलं मत बनवणं किंवा आपल्या नात्यामध्ये दुरावा आणणं कितपत योग्य होत? एकदा वाटलं इतरांच्या सांगण्याचा प्रश्‍च नाही, पण माझ्या सांगण्यावरुन एखाद्या माहिनाअखेरीस ही ऑफीसला आली तर काय बिघडेल? माझी इतकी छोटी अपेक्षा,अपेक्षा शब्दाशी थोडी दचकले. कारण अपेक्षा आली की मैत्रीचा कस कमी होतो यावर अनुचं नी माझं एकमतं झालं होतं.
    महिना अखेर !!!!!! कामाचा प्रचंड ताण!!!! ऑफिसच्या वेळेनंतरही आम्ही माना मोडून काम करत होतो. मी काम संभाळता संभाळता आमच्या ग्रुपची अनुवरची जोरदार टीकाही सोसत होते.  
बरोबर ते चार दिवस पूर्ण झाल्यानंतर अनु आली!! रेशमी साडी त्यावर नेमक्या त्याच रंगाच्याबांगड्या, केसात गजरा.आल्यावर तिची कामाला चटाचट सुरवात झाली. मी मात्र लांबून हे सर्व पाहात होते. लंचटाईम मध्ये सरसकट सगळ्यांनी तिची आजची साडी, बांगड्या, महीना अखेरीस घेतलेली रजा, या सगळ्यावर भरपूर टीका केली.
    मी गप्पच होते. घुश्यात होते.
    ऑफीस सुटायच्या आधीच, ती माझ्या जवळ आली. '" अंजू रागावली आहेस ते कळतय मला".
    "छे,मी नाही रागावले."
    "अंजू प्लीज, या दोनच महिन्यात तू आणि मी एकमेकींच्या इतक्या जवळ आलो आहोत. तू रागावलेली मला नाही का कळणार?"
    मी तिची नजर चुकवली.
"आज माझ्या घरी येशील?"
"नाही गं, घरी जायला उशीर होईल. मुलं वाट बघतील."
"मग उद्या येशील?"
"मी असं सांगू शकत नाही यायला जमेल की नाही ते."
 तिचे डोळे पाण्याने भरले होते.
"मी कुणाला कधीच काही सांगितलं नाही. पण तुझा राग मला सहन होत नाही. आणि आपली मैत्री तुटणं तर नाहीच नाही. उद्या तुला तू विचारलेल्या आणि न विचारलेल्या प्रश्नांची सर्व उत्तरं मी माझ्या घरीच देईन."
दुस-या दिवशी पाळणाघरात उशीरा येण्याबद्दल सांगून आले. संध्याकाळी तिच्या गाडीत बसताना माझ्याच नकळत, मी, कुणी बघत नाही ना हे पाहून घेतलं. स्मीता, मीना नेमक्या बाजूनेच चालल्या होत्या. त्या हसल्या, बहुतेक कडवटपणे.
    कोरीव काम केलेला दरवाजा पाहूनच घर कसं असेल याची मला कल्पना आली. तिच्या जवळच्या चावीने तिने दार उघडलं. पाय रुततील असा उंची गालिचा, उंची पडदे, महागडं फर्निचर जे जे काही म्हणून वैभव असायला हवं ते सर्वच होतं.
    "चल अंजू तुला सगळ घरं दाखवते". मी तिच्यामागे जात सर्व घर पाहिलं. दिवाणखाना, स्वयंपाकघर, तिची बेडरुम, पाहुण्यांसाठी खोली. दिवाणखान्यातून एक चकचकीत जिना वरती जात होता. तिने मला वरती नेलं.
इतक्यात कानावर जोरदार किंकाळी ऐकू आली.
    "आई!! आई!! आई आली!!!!"
    मी आत शिरले, पाहाते तो समोर पलंगावर एक अस्ताव्यस्त पसरलेली तेरा चवदा वर्षाची मुलगी, डोळ्यात वेडसर झांक. तोंडातून गळत असलेली लाळ. केस पसरलेले. चेहेरा मात्र अनूचाच. तसाच स्वच्छ गोरा वर्ण, मोठे डोळे, कुरळे केस, सरळ नाक.
    माझे हात पाय कापायला लागले होते, शरीर थंड पडलं होतं.
अनु पलंगावर बसली. तिने तिची लाळ रुमालाला पुसली, केस हातानेच सारखे केले, तिची पापी घेतली,तिला म्हणाली "शोनू,ही अंजू मावशी हिला नमस्ते कर."
    अडखळत ती मुलगी म्हणाली ''मावशी,मावशी, आई माझ्या बांगड्या?"
 मी पाहातच राहिले!!! सकाळी अनुच्या हातात असलेल्या बांगड्या एका नव्या-को-या खोक्यात होत्या, तो खोका अनुने तिच्या हातात देत म्हटलं. "शोनू नवीन बांगड्या आणल्या हं"
त्या दोघींचा बांगड्यांचा वीड सारखाच होता. अनूने त्या बांगड्या तिच्या हातात घातल्या. माझ्याकडे पाहात म्हणाली "अंजू ही माझी लेक कोमल"
माझं अनूकडे पाहायचं धाडसच होत नव्हतं. त्या पलंगावर मी कशीबशी बसलेली होते. कोमल अनूला चिकटून बसली होती. मधेच तिचे पापे घेत होती.
    मी नि:शब्द होते!!!!
इतक्यात अटॅच्ड बाथरुम मधून एक पन्नाशीच्या बाई बाहेर आल्या . त्या अनूला पाहून म्हणाल्या, "हिने सकाळपासून फक्त चहा प्यायलाय आणि दोन बिस्कीट खाल्लीत."
    "ठीक आहे, तुम्ही खाली जा आणि स्वयंपाकाच पहा. आमच्यासाठी चहा ठेवा आणि हो, तुमच्यासाठीही ठेवा बर कां."
    ती बाई मान डोलावून खाली निघून गेली .
    "हं आता बोल अंजू, आता या काकू स्वैपांकाचं बघता बघता आपल्याला मस्तपैकी चहा आणून देतील. तू अशी अवघडली का आहेस? बस ना व्यवस्थित."
    मी जेमतेम स्वत:ला सावरत म्हटलं, "अनु, मला हे माहिती नव्हंत."
    अनु हसत म्हणाली ''मी सांगितलच नव्हंत तर तुला कसं कळणार होतं?"
    "कोमल कधीपासून अशी आहे?"
    "जन्मत:च, फक्त सुरुवातीला लक्षात नव्हतं आलं. जेव्हा उभं राहायचं वय झालं. तेव्हा ही पायावर उभीच राहायची नाही. आणि उभी राहिली ती फेंगडी. तरी एक दोन महिने लक्षात नव्हतं आलं. नंतर माझ्या आईच्या लक्षात आलं की हिचं सगळंच वेगळ आहे म्हणून". 
काहीतरी विचारायचं म्हणून आपलं मी विचारलं "कुठली ट्रीटमेंट वगैरे नाही का दिली?"
    "कुठलीही पॅथी, मी सोडली नाही. आयुर्वेद झालं. गव्हांकुराचा रस झाला.अनीशने, म्हणजे माझ्या नव-याने तर त्याचे लंडन मधले बिझीनेस कॉन्टॅक्टस वापरुन तिथपर्यंत हिचे रिपोर्टस्‌ं पाठवले पण कशालाही यश आलं नाही. एकच सत्य होतं, ते हे, की ही अशीच राहणार, कायमची!!!!!"
मग त्यातल्या त्यात तिचं आयुष्य सोपं व्हावं, तिला तिचं स्वत:च स्वत:ला सर्व करता यावं, यासाठी मसाजिस्ट ठेवला तो तिचे पाय चोळून देतो. अनेक वर्षे तो येतोय. या काकू खाली गेल्या ना त्या माझ्याकडेच राहतात, कायमच्या. त्यांचं खाणंपिणं, कपडालत्ता, औषधपाणी अगदी सणावाराच्या खरेद्यासुद्धा मी करते. माझ्या कोमलचं प्रेमाने करतात. मुख्य म्हणजे तिचा तिरस्कार न करता करतात याचे पैसे मी मोजते."
    अनु हे सर्व शांतपणे सांगत होती, भावनाविवश न होता बोलत होती. काल माझ्या रुसव्याने डोळ्यात पाणी आलेली अनू, तिच्या पोटच्या गोळ्याच्या दुखण्याविषयी बोलताना शांत कशी होती? कदाचित तिचं खूप रडून झालं होतं. त्या विषयापुरतेतरी अश्रू संपले होते. 
    कोमल माझ्याकडे पाहात होती, मध्येच अनूकडे पाहात होती, मध्येच म्हणायची, "आई माझ्या बांगड्या".
काहीतरी आठवल्यासारखं करत अनू म्हणाली, "हिच्या बांगड्यांची गंमत सांगते. ही लहान होती तेव्हा मी कधीच बांगड्या वापरत नव्हते. प्रचंड आवड असूनही वापरत नव्हते. वाटायचं ही इतकी नाजूक, चुकून त्या फुटल्या, कुठे काच पायात गेली तर काय घ्या. पण या काकू कामाला यायला लागल्या. नंतर तर कायमच्याच राहायला आल्या. त्यांच्या बांगड्या हिला आवडायला लागल्या. त्या बांगड्यांच्या किणकिणाटाची तिला गंमत वाटायला लागली. हळूहळू तिचं बांगड्यांच वेडं वाढतच गेलं.प्लास्टिकच्या आणलया तर चालायच्या नाहीत. तो फरक कळण्याइतकी बुध्दी तिला आहे. शेवटी अनीशने सर्व घरात वूलन कार्पेटस्‌ आणून टाकली.निदान खाली पडून बांगडी फुटायला नको. म्हणून जेव्हा मी ऑफिसला यायला लागले"........
तिला मधेच तोडत मी म्हटलं, "हिला सोडून तू कशी काय ऑफिसला यायला लागलीस?"
    "सुरुवातीला तर हिचं निदान झाल्यावर मी राजीनामाच तयार ठेवला होता. पण अनीशने माझा तो निर्णय मला बदलायला लावला. माझं बी पी वाढायचं. सारखी विचार करत बसायची. वाटायचं हिचं कसं होणार? विचार करून वेड लागायची पाळी आली. शेवटी या काकू कायमच्या राहायला तयार झाल्या आणि दोन वर्षांच्या लांबलचक रजेनंतर मी ऑफिसला जायला लागले. तेव्हापासून रोज संध्याकाळी बांगड्या आणायचा शिरस्ताच पडला."
    कोमल पुन्हा म्हणाली, "आई माझ्या बांगड्या".
    मी पटकन पुढे होत तिचा हात हातात घेत म्हटलं ''शोनू तुझ्या बांगड्या छान छान आहेत". यावर कोमल लाळ गळेपर्यंत हसली. अनूच्या हातातला रुमाल घेऊन मी ती हळूवारपणे टिपली.
    "परवा तुला नाही का सांगितलं माझं एक ठराविक दुकान आहे. तो मला कुठल्याही रंगाच्या बांगड्या मिळवून देतो. देव कशात काय ठेवतो पाहा ना. कोमलला बांगड्याच्या रंगातला बारीक फरकही कळतो आणि परवाच्याच बांगड्या उद्या नवीन म्हणून आणून दिल्या तर त्या ती चिडून फेकून देते."
    "अनू तुझी खरच कमाल आहे. तू तुझ्या चेहेऱ्यावरूनधीच काही दाखवलं नाहीस. तू कायम चेहेरा, प्रसन्न, आनंदी ठेवलास."
    "अगं मी नुसता चेहेराच आनंदी नाही ठेवत. मी प्रामाणिकपणे सांगते, कोमलच्या या दोषाला आयुष्यातलं एक सत्य म्हणून मी स्वीकारलय आणि त्या सह मी आनंदी आहे, प्रसन्न आहे."
    "You are simply great." 
    “नाही नाही, मी नाही. अनीश is simply great. जगण्याचा हा मार्ग त्याने मला दाखवला. हे बांगड्यांचं वेड कोमलला लागलं तेव्हा मी कपाटात रचून  ठेवलेल्या रेशमी साड्या, महागडे ड्रेस त्याने मला बाहेर काढायला लावले,आणि म्हणाला, ''प्रत्येकावर बांगड्या विकत घे. त्या घालून ऑफीसला जा. संध्याकाळी त्याच बांगड्या बॉक्समध्ये घालून कोमलला देत जा. नाहीतरी तुमचं माप सारखंच आहे. तू तुझं सगळं तरुणपण, हौस, सगळ्या आवडी निवडी विसरुन गेलीस तर तुझं स्वतःचं व्यक्तीमत्व करपून जाईल. तसं करू नकोस. कोमलच्या प्रॉब्लेममुळे आपण कायमच रडत बसायचं नाही."
    "तुला सांगते अंजू त्याचा एवढा मोठा बिझीनेस आहे तो सांभाळूनही तो कोमलसाठी रोज वेळ काढतो."
मी भारावल्या सारखी ऐकत होते. वाटत होतं हिच्याकडे पाहून चुकूनही कधी वाटलं नसतं की हिने एवढं सगळं सोसून त्यावर ही मात केली आहे. आणि ज्यांनी कधी कुठलं दुःखच पाहिलं नसेल त्यांना हे विचार कसे हो झेपणार?
आमच्या ग्रुपने हे एवढं ऐकूनही कदाचित म्हटलं असतं, "पहा काय कमाल आहे. अशी लोळागोळा झालेली तरुण मुलगी घरात टाकून ही बया नटून थटून ऑफीसलायेतेच कशी?"
    इतक्यात चहाचा ट्रे घेऊन काकू आल्या. चहा घेता घेता अनू म्हणाली,"ही बारा वर्षाची झाली आणि निसर्गाने नको त्या बाबतीत मात्र तत्परता दाखवून महिन्याचा तो त्रास हिच्या मागे लावून दिला. हिची तब्येत त्या चार दिवसात मात्र तोळामासा होते. तिची चिडचिड वाढते."    
    अनूने उठून जिन्याच्या तोंडापाशी जाऊन काकू खाली गेल्याची खात्री केली आणि हळूवारपणे म्हणाली "एरवी काकू कोमलचं प्रेमाने करायच्या. पण या चार दिवसात मात्र त्यांचीही चिडचिड व्हायला लागली. विशेषतः अस्वच्छ कपडे धुताना त्या नाराजी दाखवायच्या. शेवटी ठरवलं,आपलं मूल आहे. एरवी त्या सांभाळतात, प्रेमाने करतात, खूप झालं. ते त्यांची काहीतरी अडचण आहे ते चार दिवस मात्र मी सांभाळते, म्हणूनतर मी रजा घेते, नेमके ते चार दिवस मंथएंडला येतात".
मी अवाक झाले होते. तिच्या 'मला शक्य नाही' चा अर्थ असा उलगडला होता. 'चार दिवसांनंतर मी पाचव्या दिवशी जेव्हा ऑफिसला येते तेव्हा कोमल खूप उदास असते. एक दोन दिवस अन्नाला स्पर्शही करत नाही. मगाशी काकूंनी सांगितलेलं ऐकलंस ना, सकाळपासून फक्त चहा बिस्कीटावर आहे ते? मग मी संध्याकाळी घरी आल्यावर तिच्यापाशी सतत बसून असते. तिला भरवते." कोमलच्या चेहरा निर्विकार होता. डोळ्यात भावहीनतेची छटा होती. सारखी आपली बांगड्या कुरवाळत होती. आता हळूहळू मलाही स्पर्श करून माझ्या चेहऱ्याकडे पाहात होती.
अचानक अनू विषय बदलत म्हणाली, "अगं तुला माझं पुस्तकाचं कलेक्शन दाखवायचं राहिलं. चल ना तुला दाखवते. शेजारच्याच खोलीत मी ते ठेवलंय. कोमल खेळत बसते तेव्हा मी वाचत बसते."
    मी गुदमरून गेले होते,आणि डोळे विस्फारून माझ्या शेजारी बसलेल्या त्या तेजस्वी शलाकेकडे पाहात होते. काय नव्हतं माझ्या त्या नजरेत? आदर, भारावलेपण, प्रेम आणि दाटून आलेलं विलक्षण ममत्व. 
त्या माझ्या नजरेचा अर्थ ओळखत अनु हसली आणि थोडसं थांबून मिस्कीलपणे म्हणाली, "आता कुणी काही माझ्याविषयी बोललं तर माझ्यावर रागावणार नाहीस ना?"
    मी आश्चर्याने पाहातच राहिले. "तुला कुणी सांगितलं तुझ्याविषयी माझ्यापाशी कुणी बोललं म्हणून?"
    ती म्हणाली "ते महत्वाचं नाही. पण तू रागावणार नाहीस ना?"
    
    मी तिचे दोन्ही हात हातात घेऊन फक्त हसले.

1 comment:

  1. ही आधी वाचली होती, अप्रतिम कथा आहे🙏

    ReplyDelete