श्री सरस्वती प्रसन्न
@योगिनी श्रीनिवास पाळंदे
रीडेव्हलपमेंट
होमाच्या धूराचा सुगंध चितळयांच्या नाकाला विलक्षण सुखावत होता. त्यांची नजर हॉलच्या भिंतीवर लावलेल्या विजयाताईंच्या तसबीरीवर खिळली होती.
“काका,चहा!!” विलक्षण आर्जवाने अंजूने चहाचा वाफाळता कप काकांच्या हातात दिला आणि परागला म्हणाली,
“पराग,अरे काकांना बागेत नेऊन आणलंच नाहीयेस.काकूंच्या नावाचा बाक आपण बागेत बसवलाय ना तो काकांना दाखव की."
वाकलेल्या काकांचा हात धरून परागने बागेत प्रवेश केला तेव्हा तिथे बसलेल्या जुन्या शेजाऱ्यांच्या,आणि काकांच्या मित्रांच्या नजरा आपल्यावर खिळल्या आहेत याच्या जाणीवेने तो खूष झाला.
अगदी समोरच बसलेले जुने शेजारी, जोशी,तोंडभरून हसले आणि म्हणाले
“'या या चितळे,बागेत पहिल्यांदाच येताय वाटतं?"चितळयांनी हसून मान डोलावली .
“जोशीकाका तुमच्या समोरचा बाक आहे, तोच आहे ना काकूच्या नावाचा?"
नाव स्पष्ट दिसतच होतं !!!
कै विजया रामचंद्र चितळे यांच्या स्मरणार्थ श्री रामचंद्र चितळे यांजकडून आणि कंसामध्ये लिहिलं होतं सौजन्य, पराग भालचंद्र चितळे!!!
पत्नीच्या स्मरणाने क्षणभर गहिवरलेल्या चितळयांना, कंसातल्या परागच्या नावाच्या उल्लेखाने खुदकन हसूच आलं!!!
दाबलं त्यांनी ते !
तशी,चेहे-यावरचा भाव लपवायचा अभिनय करायची सवय, त्यांना विजयाच्या निधनानंतर एखाद्या वर्षात लागलीच होती .
ती गेल्यावर आलेलं एकाकीपण,एकटेपण,
आणि ते सुध्दा चाळीतल्या जुन्या जागेत नव्हे, तर रीडेव्हलपमेंटसाठी चाळ पाडल्यानंतर दिल्या गेलेल्या
तात्पुरत्या ब्लॉकमधे!
तिथे ते एकाकीपण अधिकच वेदनादायी झालं होतं.
आणि विजयाचा अचानकपणे आलेल्या आजारात मृत्यू झाला!!!
तसा अकालीच म्हणायचा....
गेली तेव्हा तिचं वय होतं अडूसष्ठ,
पणं तशी हल्ली जगतात की माणसं ऐंशीपच्याऐंशी पर्यंत !
पण, विजया, मूल नसल्याचं दु:ख
जे जन्मभर वागवत आली होती, ते जुनी चाळ पाडल्यावर अधिकच गहिरं झालं होतं .
नवीन ब्लॉकमध्ये जुने शेजारी नाहीत,
"काकू,आजी,मावशी" अशा हाका मारत येणा-या शेजारपाजारच्या चिमण्या नाहीत.
त्यात तो आजार आला......तिला संपवूनच गेला !
कुणी कुणी आलं नव्हतं तेव्हा.
भाचे, पुतणे, पुतण्या कुणी म्हणून आलं नाही .
चाळ पाडल्यानंतर,नवीन जागेत जाते वेळच्या शिफ्टींगला नाही, आणि विजयाच्या आजारपणात तर नाहीच नाही.तसे एखाद्यावेळी हॉस्पीटलमधे आणि नंतर दिवस-कार्याच्या
वेळी तोंड दाखवून गेले सगळे!
एकाकीपणाच्या गर्तेत चितळे मात्र कुढत राहिले, रडत राहिले
आणि अभिनय मात्र करत राहिले संयमाचा !
विजया गेल्यानंतर पहिला सण आला दिवाळीचा , नाईलाज झाल्यासारखा एक भाचा येऊन गेला,विकतच्या फराळाचं छोटं पार्सल देऊन गेला,
परगावी जाणार असल्याचा पुतणीचा फोन येऊन गेला....म्हणजेच ती काही येणार नव्हती.
“खरं म्हणजे आमची सुध्दा दु:खी दिवाळी, पण सायलीला अभ्यास करताना सारखं तोंडात टाकायला काहीतरी लागतं म्हणून चकल्या लाडू आणल्या विकत, म्हणून
आणलंय थोडं थोडं दिवाळीचं,
तुमच्यासाठीसुद्धा असं,
न मागितलेलं स्पष्टीकरण देऊन पराग अंजू येऊन गेले .
अगदी प्रथमच चितळे परागला म्हणाले.
" दिवाळीत घर खायला उठतंय रे.फार एकटा पडलोय मी"
ह्या वाक्यावर क्षणात अंजली म्हणाली ,"सायलीची दहावी आहे ,
नाहीतर नेलं असतं तुम्हाला.आणि तसं आमचं घर लहानच पडतं हो."
परागने अर्थातच हो ला हो मिळवलान.
घरात एकही दिवा न लावता चितळे बाहेरची रोषणाई पाहात राहिले .
वर्षानुवर्ष काकूंच्या हातच्या,तोंडात विरघळणा-या चकल्या,ओठांनी खावा असा बेसनलाडू,याचीसवय लागलेली.
चितळ्यांनी फराळाची पार्सलं स्वैपाकाच्या काकूना देऊन टाकली.
नाही म्हणायला समोरच्या चाळीतल्या रानडे वहिनी,दुःखी दिवाळी म्हणून विजयाताईंची आठवण ठेऊन रवा लाडवांचा डबा देऊन गेल्या होत्या.
त्या लाडवातला तुकडा मात्र त्यांनी तोंडात टाकला.
असेच दिवस जात राहिले, जुन्या चाळी पाडून एव्हाना चार वर्षे झाली होती आणि विजयाला जाऊन दोन.
भयाण एकाकीपणा, रिकामेपणा, वयाने गात्रात वाढत चाललेला थकवा या सा-याला तोंड देत चितळे दिवस ढकलत होते.
दिवसातून दोन वेळा दरवाजाची बेल वाजे.सकाळी स्वैपाकाच्या काकूंची, आणि दुपारी केरफरशी धुणीभांडी करणारी बाई यांनी वाजवलेली.
या सा-यांमधे आधार होता तो अधूनमधून येणा-या जुन्या चाळीतल्या शेजाऱ्यांच्या फोनचा.
खरतर फोनवर चितळयांच्या चौकशीपेक्षाही, बिल्डरने घातलेल्या नवीन अटी आणि कुणा अडेलतट्टू भाडेकर्यांनी आणलेल्या स्टे ऑर्डर याचीच चर्चा जास्त चाले.
एकुणातच काय,तर रीडेव्हलपमेंट प्रोजेक्टचा पार बोर्या वाजला होता.
टॉवर्स, ब्लॉक्स, लायब्ररी,तिथला बगीचा, जेष्ठासाठीच्या सुविधा...... सारीसारी स्वप्नं धूसर व्हायला लागली होती.
आणि एके दिवशी सकाळी सकाळी जोशींचा फोन आला!
" 'प्रतिक्षा संपली!!!!!
सामोपचाराने वाद मिटले.
दोन आठवडयात ऍग्रीमेंट फायनल होतंय. वर्षाच्या आत नवीन-वास्तू उभी राहाणार बरं का चितळे”
चितळेंना आनंदच वाटेना!!!
त्यांना स्वत:च्या कोरडेपणाचंआश्चर्य वाटत होतं.
एकेकाळी विजयासोबत याच वास्तूची स्वप्नं पाहिली होती !
संभ्रमावस्थेत ते असतानाच बेल वाजली.
बेल नेहेमीची नव्हती,कारण स्वैपाकाच्याकाकू तर येऊन गेल्या होत्या.
आश्चर्य करत त्यांनी दार उघडलं तर समोर पराग !
हातात गरम गरम उपम्याचा डबा, सोबत घरी केलेले रवा लाडू “काका पहिलं खाऊन घ्या गरमगरम."
त्यांच्या हातात डीश देऊन पराग बेधडकपणे स्वैपाकघरात घुसून चहा करायला लागला.
काकांच्या हातात चहाचा कप ठेवत त्याने थेट विषयाला हातच घातला.
“काका काय म्हणतोय बिल्डर?पुढच्या आठवडयात अँग्रीमेंट होणार ना?"
आपल्याला काळजीपूर्वक सह्या कराव्या लागणार आहेत बरं का?”
“ आपल्याला या शब्दापाशी चितळयांना ठसका लागला
त्यांना नक्की कशी प्रतिक्रिया द्यावी तेच कळेना.
पराग बरंच काही बोलत राहिला, ज्याकडे त्याचं लक्षही नव्हतं.
अचानक त्यांच्या कानावर एक वाक्य पडलं.
“अंजू म्हणतेय पुरे झालं काकाचं एकटं राहाणं!
गाडीत घालून घरी घेवून ये त्यांना”
काकांना विजया गेल्यावरची पहिली दिवाळी आठवली.
त्या दिवसभरात योगायोगाने ब-याच भाच्या, पुतण्यांचे फोन येऊन गेले,तब्येतीची चौकशी करणारे.
एकेदिवशी दुपारी....“तुम्हाला आवडतात म्हणून थालीपीठ पाठवल्येत हिने आणि सोबत घरचं लोणीसुध्दा पाठवलंय हो" असं सांगत एक भाचा आला.
दोन तीन दिवस विचारांच्या कल्लोळात सापडलेल्या चितळयांना अचानक एक गमतीशीर, सुखावणारा शोध लागला होता.
आणि त्यानंतर मात्र ते विलक्षण खूष झाले.
आयुष्यातल्या इतक्या वर्षात हरवलेल्या सुखाची गुरूकिल्ली त्यांना सापडली होती.
त्या आठवडयात फोनला आणि दारावरच्या बेलला उसंत मिळाली नाही.
कुणी “सहजच आलो होतो या बाजूला, म्हटलं भेटावं काकांना" अशी स्पष्टीकरण देत होतं.
कुणी लुसलुशीत घावन आणि ताज्या चटणीचा डबा घेऊन येत होतं.
चितळयांना आता मात्र गुदगुदल्या होत होत्या.
इतक्या दिवसांचा कंटाळा,उदासी,
मरगळ,एकटेपणा,इतकच काय पण शारिरीकव्याधी सुध्दा आता त्यांना भेडसावत नव्हत्या.
मनातली कटुता आणि शंकाना दूर सारत त्यांनी जराही आढेवेढे न घेता, येणा-या सुखाला स्वीकारायचं ठरवलं.
आणि एका रविवारी... परागने कमालच केलीन.
"यापुढे नाही एकटं ठेवणार तुम्हाला,आता वय झालं तुमचं.
सायली मोठी झाली आहे. बारावी असली म्हणून काय झालं!तिचा अभ्यास ती लायब्ररीत जाऊन करू शकते” असं त्यांच्या जुन्या जखमेवर मलम लावत स्वतःच म्हणाला.
दोन दिवसात सामानाची बांधाबांध करून त्याने गाडीत घालून चितळयांना स्वत:च्या घरी आणलं.
नात्याची ही रीडेवल्पमेंट चितळ्यांना सुखावून गेली, जरी त्याला निस्वार्थीपणाचा सुगंध नव्हता तरीही !
ऑँग्रीमेटचा दिवस जवळ येत चालला तसे स्वैपाकघरातल्या फोडण्यांचे दरवळ वाढले.
चितळ्याना स्वतंत्र खोली बहाल झाली होती.त्यांच्या आवडीनिवडी सांभाळून स्वैपाक होत होता. गरमागरम ताज जेवण,त्यांच्या औषधांच्या वेळा,सगळं सांभाळलं जात होतं.
त्यांना सामील करून घेत गप्पा होत होत्या.
सुखाच्या लाटेवर स्वार झालेल्या चितळयांना वास्तवाचं भान मात्र सुटलं नव्हतं.
त्यांचा आणि जोशींचा रोज फोन चाले.
घरातल्या डेव्हलपमेंटस ते जोश्यांना वेळोवेळी कळवत होते.
जोशींनी मात्र स्पष्ट सल्ला दिला,
"अँग्रीमेंट तुमच्याच नावाने करा, आणि विल मधे मात्र परागचं नाव टाका. नाहीतरी इतर भाच्या पुतण्यांपेक्षा तोच तुमचं करणार असं
एकूण लक्षण दिसतंय.बाकी सगळी कायदेशीर मदत मी तुम्हाला करतो.अहो आपल्या रानडयांचा पुतण्या वकील आहे. तो हीच कामं करतो.तुम्ही निश्चिंत रहा?"
फोन ठेवता ठेवता मिस्कीलपणे हसून जोशी म्हणाले “अहो पुतण्या आहे म्हणुन विचारतोय,झेलतोय.
आमच्याकडे चिरंजीव आणि सूनबाई ब्लॉक ताब्यात घ्यायला नाचतायत,
पण,आम्हाला थालीपीठ घावनांचा
खुराक नाही हो तुमच्यासारखा!!”
जोश्यांसोबत चितळे खो खो हसले.
आयुष्यात प्रथमच नि:संतान असल्याचा आनंद त्यांना झाला होता.
परागच्या मित्राच्या आणि अर्थातच जोश्यांच्या सल्ल्याने ऍग्रिमेंट झालं,आणि त्यासोबत विलसुद्धा!!!
विलची मूळ प्रत जोश्यांच्या ताब्यात होती.परागला ती प्रत पाहीपर्यंत काही जीवातजीव नव्हता.
शेवटी, मनोमन धास्तावलेल्या परागला त्यांनी मूळ प्रत दाखवुनच टाकली.विल वाचतानाचे त्याच्या चेहेऱ्यावरचे विविध भाव पाहून चितळ्याना पुन्हा गुदगुदल्या झाल्या.
विल वाचायच्या दिवशीच,सुखावलेल्या परागने घोषणा केलीन"काका, नवीन बांधकामात आपल्याला एक बगिचा सुद्धा बांधून मिळणार आहे,आणि बिल्डरने आवाहन केलंय की कुणाला कुणा दिवंगताच्या नावाने काही देणगी द्यायची असेल तर तिथल्या बाकांवर त्यांचे नाव दिलं जाईल,तर मी आणि अंजूने ठरवलंय,काकूच्या स्मरणार्थ एक बाक बसवून घ्यायचा, ज्याला तिचं नाव दिलं जाईल.“
म्हटल्याप्रमाणे वर्षभरात बांधकाम पूर्ण झालं. ब्लॉकमध्ये पराग,अंजली, सायली राहायला येणार हे देखील ठरलं.माफक फर्निचर झालं.
शिफ्टिंग, सामानाची लावालावी, यातलं चितळ्याना काहीही बघायला लागलं नाही.
एखाद्या फुलासारखे अलगदपणे ते नवीन जागेत शिरले होते.
आज घराच्या वास्तुशांतीनंतर,
बागेमध्ये शिरताना,त्यांना सगळं सगळं आठवत होतं.
त्या बाकावर टेकताना त्यांना विजयाताईची आठवण आली,क्षणभर ते गहिवरलेही, पण हळवं व्हायचं नाहीच मुळी असं त्यांनी स्वतःला बजावलं होतं.
त्या परिसराशी निगडित असलेल्या सर्व आठवणींनी मनात फेर धरला होता.
जुनी वास्तू स्वतःला जमिनीच्या पोटात घालून,नव्याने जमिनीवर उभी राहिली होती.आता फक्त बरकत होती,
भरभराट होती,डेव्हलपमेंट होती.
पूर्वायुष्यातले कटू, बोचरे, जिव्हारी लागलेले अनुभवही आज भूतकाळात गाडले गेले होते,जमीनदोस्त झाले होते.
आता होती फक्त......
रीडेव्हलपमेंट
नव्या वास्तूची आणि नव्या नात्याचीसुद्धा....
समोरच्या बाकावर बसलेल्या जोश्यांशी चितळ्यांची नेत्रपल्लवी झाली आणि दोघेही मिस्किलपणे हसले!!!!!!!
@ योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे
No comments:
Post a Comment