श्री सरस्वती प्रसन्न
होय कोकण कळाच लागतात, कुठल्याही निमित्ताने लागतात.
कोकण-कळा लागलेल्या आम्ही सात मैतरणी! अल्याड पल्याडवाली जोडून सुट्टी!! मग काय वेगवान गाडी, सोबत खादाडी!! पहाटे सुसाटलेली गाडी महाबळेश्वर मार्गे थेट दापोलीच्या आजोळघरी!! डोळ्यातल्या पाण्याने मामाचं स्वागत. मैत्रिणी हरखलेल्या आणि मी विखुरलेल्या स्मरणमण्यांना वेचत वेचत, इकडून तिकडे, क्षणात पुढील दारचा झोपाळा, क्षणात मागील दारचा झोपाळा, विहिरींची वाट, चंदनाची वाट (आजोबांनी लावलेला चंदन ओळखता यावा म्हणून तो मध्यभागी, आणि भोवती सारवलेली वाट म्हणून चंदनाची वाट) सगळ्याना कडकडून मिठी.
आणि माझी चाळीस वर्षपूर्वीची सगळी झाडं, तशीच!!!!!
दोनशे माड,तिनशें पोफळी,
पन्नास गुलाब चाळीस केळी,
जाईजुई वरची प्रत्येक कळी,
रातांब्याखाली सरबत तळी,
सगळे माझी वाट बघतायत, चाळीस वर्षांपूर्वी पहायचे ना तशीच. घरातल्या देव्हाऱ्यासमोर मी एकच क्षण मिटल्या डोळ्यांनी हुंगते, सोनचाफा प्लस मोगरा प्लस पारिजातक प्लस आजी आजोबांची आठवण, सगळं सगळं डोळ्यातून घळघळतं!!!! भिंतीवरच्या फ्रेम्स धुरकट!!!!!
मैत्रिणीपुढचं रातांब्याचं पिंप फस्त, डोळे पुसत मी बागडतेय मस्त!
आता जेवणाची घरगुती वर्दी, पिठलं लोणी भाकरी, घट्ट कवडीदही, नि आई गं, माझी फणसाची भाजी!!
ऊन्ह व्हायच्या आत आता त्याच्याकडे जायचंय!!!
केशवराज!!!!!! त्याचं नावच किती रॉयल.
आमची अक्खतरी (पु लं) पुन्हा सुसाटलेली.
पोचलो!!! मोठा पॉझ....
घनगर्द सावल्यानी आभाळ वाकलेले, घनगर्द आहेच नो डाउट पण वाकलेलं आभाळ दिसायला तर हवं. ते दिसतच नाही. किती हिरवंमिट्ट असावं, ती नागीणवाट, थोडीथोडी खोल. मातीच्या काळजात घुसतोय असंच वाटावं अशी खोल! आणि मग नितुळलेलं, आरसा-पाणी.
बाजूला कल्लेदार खडकतुकडे, प्रतिमा ची फोटोप्रतिभा बहर बहर बहरलेली!
पाण्यात पाय, पायाखाली पाणी, पाण्याखाली मासोळी नृत्य, पायाला गुदगुदी!!! अरे उठा तो वाट पाहतोय ना!!! छातीवरची चढण,फुललेल्या श्वासाच्या लयीचं निथळ घर्मगान!!
पायात गोळे, उष्ण श्वास,फुफ्फुस भरून प्राणवायू.
डोळ्याला कमाल कमाल सृष्टीपान, घे हवा तेवढा रंग, पाहिजे तेवढा सुगन्ध.
केशवराज त्याचे हुकूम-एकके फेकतोय, आम्ही सर्वार्थाने चारी मुंड्या चित.
तीनएकशे कातळ पायऱ्या, आणि फायनली कळस दर्शन!! येसससस!!!!
वरच्या जंगल खोऱ्यातून खळ खळ खळ खळ पाणी कोरीव-गोमुखातून तिर्थावलंय!!
थंड सुगन्ध, आम्ही तिथेच शुचिर्भूतुन, स्तब्ध स्टॅच्यु!!! सगळ्यांचे डोळे मिटलेले, माझ्या डोळ्यातुन गोमुख पाझरायला लागलेलं.
कोकण-स्पेशल कढ,
अरे आहे काय, दिसली केळ आलं पाणी, दिसला माड आलं पाणी. गोकुळभरल्या घरातल्या निरागस आठवणी!!
मंडपात पाय टेकवत नाही, इतका अंगात भिनणारा शहारा (महिना एप्रिल).
मी डोळेबंद हुंगत राहते, गाभार्याच्या ओलसर, धुपारी-तुपारी आशिर्वासाला.
त्याच्या वरच्या अंगाला, रानजंगल फोफावलंय आणि भोवती सगळा साजूक-सोवळ्या झाडांचा भक्तिमय विळखा. मोगरा,चाफा,जास्वंद,सायली.
तिथे पाय अडकतात!!! बेड्याच!!!
उठताना मणामणाचे कष्ट पडतात!!!
त्याला मी चिडून बजावते, "मी तुझ्या कायम सोबत आहे वगैरे मला सांगू नको. मला,कायम इथे येऊनच तुला भेटायचं असतं. अरे वेड्या (योगिनी केशवराजला), मी गाडीतून उतरल्यावरच तुझ्या दर्शनाची प्रोसेस सुरू होते. इथली नागीण वाट, तिचा जास्वंद-रंग, ते काळे कभिन्न रासवट खडक, ती ओली आरस्पानी जलाई, त्यातले ते सुळसुळी नृत्यन्यास, डोंगर माथ्यावरचा गर्द रानवा, गोमुखातला जलौघ, ह्या सगळ्यात तू भरून राहिलायस. मी कुठे तुला तुझ्या मूर्तीत पाहाते? माझ्या कोकण-कळा, तूच लावल्यास, तूच त्याचा उपाय हो".
पुनश्च आमची अखतरी सुसाटते.
मामाचं अंगण घमघमत असतं, जिव्हारी लागेल असा फोडणी-दरवळ उठतो.
आमचा केशवराज आता पोटात असतो.
अक्षरशः ताव,ओरपुन ओरपून जेवण!!! पुन्हा कधी हे मिळायचं? छे!!!!!
आता निघायचे अश्रू-वेध. झोपाळ्यावरचे उष्ण कढ, मलाच एकटीला जाणवणारे.
गाडी निघाली, गळ्यात सूक्ष्म वेदना, पाण्याचा-पडदा, पडद्याआड कवठी-चाफा, सोनचाफा, गळामिठी घालणारे माड, पोफळी, चिकू, राताम्बा, जुई, जाई, आणि….आजोबांनी लावलेलं ते चंदनाचं झाड!!!!!!!!

No comments:
Post a Comment