श्री सरस्वती प्रसन्न
मी! बँकर , कोविड वॉरियर
नेहाला कॅश आणि किऑस्क दोन्ही टॅली करून निघायलाच नऊ वाजले आणि त्यापुढे घरी यायला पाऊण तास.
शेवटी घर गाठायला पावणेदहा झाले. तरी बरं सध्या लॉक डाउन असल्यामुळे साहेब त्यांच्या गाडीनेच नेत होते आणि रात्री आणून देखील सोडत होते.
बरं कितीही दमलेले असले तरीही , घरी येऊन लगेच जेवायला बसण्याची सोय नव्हती. दिवसभरात कितीतरी नोटांचे स्पर्श झालेले असायचे! कितीतरी ग्राहक हट्ट करून करून बँकेत ठाण मांडूनच बसायचे,त्याशिवाय बँकेचे सफाई कामगार ,सुरक्षा रक्षक आणि इतर सहकर्मचारी, कुणाकुणाचे,थेट स्पर्श होत नसले तरीही ते सर्व जण आसपास वावरत असायचेच.त्या आसपास वावरण्याची सुध्दा सतत भीती वाटत राहायची.
आणि मग घरी नेहा शिरायची ती जणू कुणाच्या अंत्यविधीला जाऊन आल्यासारखी.
सध्या ती एक छोटी पर्स नेत होती, जी घरात शिरल्या शिरल्या बाहेरन सॅनिटायझ करणे सोपे जात होते .पण पाण्याच्या बाटल्या ,डबा या साऱ्यासकट घरात शिरल्यावर थेट बाथरूम गाठायला लागायची .आणि मग कडकडीत गरम पाण्याची अंघोळ,तीही साबण तीन तीन वेळा चोळून. तेव्हाच हातासरशी डबा आणि बाटल्या सुधा साबण आणि गरम पाण्याने धुणे.
इतके सगळं केल्यावर जेवायच्या ताटावर बसल्यावर भूक मरून गेलेली असायची. जेवायला हात पुढे केला की,नेहाला दिवसभरातल्या नोटा आठवायच्या, कुठून कुठून फिरून आलेल्या त्या नोटा. आणि त्यांच्यावर असलेला किंवा नसलेला तो अदृश्य राक्षस.
हे असेच गेले महिनाभर चाललेलं होतं
आज नेहेमीपेक्षा जास्ती उशीर होऊनही घरातले सगळे नेहासाठी जेवायचे थांबले होते.
नवरा जरा चिडूनच म्हणाला”आज काय झालं ? किती उशीर?तुझ्या शिवाय कुणी आलं नव्हतं की काय कालच्या सारखं?”
नेहा काही बोलणार इतक्यात सासूबाई म्हणाल्या” तिला जेवू दे ना शांतपणे. प्रश्न कसले विचारतो आहेस? किती दमून आली आहे ती ”
कौशल म्हणाला “आई,तुम्ही essential सर्व्हिसेस मध्ये येता ना?मग तुझ्या बाकीच्या मैत्रिणी कशा ग नाही म्हणू शकतात? आणि तूच तेवढी जातेस!" घरच्यांना ऑफिस मधले सगळे बारकावे माहीत होते.
नेहाला मात्र उत्तर सुद्धा द्यावे वाटेना इतका शारीरिक आणि त्याहीपेक्षा मानसिक थकवा आला होता.
आज जन-धन योजने अंतर्गत असलेले कितीतरी लोक, बँकेत आले होते,सरकारने त्यांच्यासाठी पॅकेज जाहीर केले होते आणि त्या सर्वांच्या खात्यात काही रक्कम जमा झाली होती.ते बिचारे अगदी दोन पाचशे रुपये काढायला आले होते,त्यांच्यावर काय चिडणार?
एवढ्या रणरणत्या उन्हात अक्षरशः एखादया किलोमीटर ची लाइन, ती सुद्धा सोशल डिस्टन्स ठेवून.ती लाईन निपटवताना नाकी नऊ आले होते.
बरं, या जनता जनार्दनाला सहानुभूती दाखवावी तर त्यांच्याच जोडीला कितीतरी पेन्शनर आजी आजोबा, अगदी चांगली आर्थिक परिस्थिती असलेले सुद्धा ,पेन्शनच्या लाईन मध्ये उभे होते.
या असल्या रोगराईच्या वेळी बँकेत यायची काय गरज होती यांना ? असं खूप काही मनात येऊन जायचं पण मग नंतर वाटायचं की त्यांची काही अडचण असेल,घरी एकटे असतील, मुलं परगावी असतील आणि याना ऑनलाइन व्यवहार करता येत नसतील.
काउंटर वर बसलेल्या नेहाला तहान लागूनही पाणी प्यायला सुद्धा उठता आले नव्हते . खरंतर सोबत घरून नेलेली पाण्याची बाटली असूनही, नोटांचा हात त्या बाटलीला लावायचा, मास्क खाली उतरवायचा हे सगळं करायला अगदी जीवावर यायचं. अगदी दोन दोन सॅनिटायझर च्या बाटल्या काउंटर च्या आतमध्ये होत्या तरीही!! एयर कंडिशनर लावून चालत नव्हता,त्यामुळे अंगाला घामाच्या धारा,कोरडा पडलेला घसा, सुरक्षेसाठी लांब अंतरावर उभ्या असलेल्या ग्राहकाला नोटा देण्यासाठी विचित्र प्रकारे पुढे वाकायला लागत असल्यामुळे भरून आलेली पाठ,न संपणाऱ्या रांगेतली संतापलेली लोकं आणि या सगळ्या सकट प्रत्येक नोट हातात घेताना मनावर आलेलं दडपण, त्या सूक्ष्म जीवाचं, जो अनेकांचं जीवन उध्वस्त करत सुटला होता.
जेवताना सगळेजण एका विलक्षण तणावात होते.
शेवटी नेहालाच वाटले,घरातले बिचारे सगळे सहकार्य देतात, काम वाटून घेतात,तिची काळजी घेतात ,कितीहि उशीर झाला तरी जेवायला थांबतात , त्यांनां का तणावाखाली ठेवायचं?
म्हणून तिनेच काहीतरी हलका फुलका विषय काढून बोलायला सुरुवात केली.
“ आज एक गंमत झाली बरं का!”
“सध्या बँकेत गमती जमती होतायत वाटतं” चिडचिड करत नवरा म्हणाला.
त्याच्या तिरकस स्वराकडे दुर्लक्ष करत नेहा म्हणाली”आज ना एक आजोबा आले होते बँकेत. कुठलही तातडीचं काम नव्हतं बरं का. बाहेर पडू नका असं सगळीकडे बोंबलून सांगतायत तरीही आले होते. का तर म्हणे,पेन्शन बुक अपडेट करायचे आहे. शेवटी मी त्यांना सांगितलं की खरंतर या कारणासाठी तुम्ही यायला नको होतं. आला आहातच तर फक्त अकाउंट नबर सांगा मी बॅलन्स किती आहे ते तोंडी सांगेन, तर भांडायलाच लागले. म्हणे मला माझ्या बुक मध्येच एन्ट्री करून हवी आहे.देणार नसलात तर मॅनेजर कडे जाईन. मी म्हटलं खुशाल जा.शेवटी गेले ते आजोबा साहेबांकडे,तर साहेबानी त्यांना तेच सांगितलं,"कुठलेही अकाउंट अपडेट करायला इथे यायचं नाही आणि आलात तर तोंडी माहिती मिळेल. एकतर माझा स्टाफ धोका पत्करून येतो.बाहेर केवढी लाईन आहे पाहताय ना.त्या गरीब लोकाना पाचशे पाचशे रुपये द्यायला आम्ही नाही म्हणूच शकतं नाही,ते तर द्यावेच लागतात. त्या प्रत्येक ट्रांझक्शनला नोटेला हात लावावा लागतो. आता त्याच हातानी तुमचं पास बुक अपडेट केलेलं कितपत सुरक्षित आहे तुम्हीच सांगा”.
सासूबाई म्हणाल्या ”मला एक समजत नाही याना घरची लोक सोडतातच कशी?
नेहा उत्तरली “अहो तेच तर सांगते ना. नंतर त्या आजोबांनी येऊन माझी माफी मागितली. आणि स्वतःच पुढे म्हणाले “महिनाभर घरी बसून अगदी कोंडल्यासारखं झालं होतं, शेवटी आज घरच्यांशी भांडून आलो बँकेत.पण मीच किती धोका पत्करला हे इथली गर्दी पाहिल्यावर आत्ता जाणवलं. तुम्ही खूप धोका पत्करून तुमचं काम करत आहात . गॉड ब्लेस यु."
जेवणं आटोपली.सासूबाईंनी नेहाला पुढच्या आवराआवरीला हातही लावू दिला नाही.
पलंगावर अंग टाकताक्षणी नेहाला गाढ झोप लागली.
लॉक डाउन च्या 25% फॉर्म्युला प्रमाणे तिची बँकेत जायची turn उद्या नव्हती,त्यामुळे बऱ्याच दिवसांनी तिला निवांत झोपायची संधी मिळाली होती.
सकाळी सव्वा सहाला मात्र तिला सवयीने जाग आली . उशाशीच ठेवलेला मोबाइल ती डोळे चोळत पाहू लागली.मेसेजेस वाचता वाचता ती अचानक ताडकन उठली.
साहेबांचा मध्यरात्री आलेला मेसेज तिने आता वाचला,तिची turn नसताना सुद्धा आज तिला emergency basis वर बोलावले होते. 25% चा फॉर्म्युला असूनसुद्धा आणि कालच तिची turn झालेली असूनही तिला आजहि जावे लागणार होते. साहेबानी तिला साडेनऊला तयार राहायला सांगितले होते.
नेहा अक्षरशः, धावत धावत स्वैपाकघरात गेली. डाळ तांदुळाच्या कुकरात तिने सात आठ बटाटे सुद्धा लावले. आणि त्यानंतर दात घासून चहा ठेवून तिने कणिक मळायला घेतली.
तोवर घरातली इतर मंडळी हळुहळु उठायला लागली होती. तशी सध्याच्या लॉकडाउन मुळे घाई कुणाचीच नसायची,पण सातसाडेसात पर्यंत सगळेच उठायचे.
सासूबाई चहा घेता घेता म्हणाल्या”आज जायचे नाही ना तुला तरी इतक्या लवकर कुकर? आणि हे काय बटाटे कशाला लावलेस? आज घेवडा करायचं ठरलं होतं ना! इतक्या शिळपट भाज्या मिळत आहेत सध्या. त्या घेवड्याने आधीच मान टाकली आहे . आता आजही नाहीं केलास तर अगदीच लेवाडा होऊन जाईल तो."
नेहा क्षणही न दवडता त्यानं थांबवत म्हणाली”मला आज जावं लागणार आहे.सरांचा मेसेज आला आहे.नुसतं लिहिलं आहे की emergency,पण काय ते नाही लिहिलं पण emergency असेल तर मला जावं तर लागणार आहेच. मला न्यायला साडेनऊ वाजता येतील ते. मला जरा जरी कल्पना असती ना तर मी लवकर उठले असते .नेमकी आज उशिरा उठले मी. आता इतक्या कमी वेळात बटाटा सोडून दुसरं काय होणार!”
एकीकडे तिने अंघोळ उरकून घेतली आणि नाश्त्यासाठी पोह्यांची तयारी सुरू केली.ऑफिसचा डबा आणि पाण्याच्या दोन बाटल्या सुद्धा फ्रिज मध्ये गार करत ठेवल्या.
तिची धांदल पाहून नवरा पुढे आला,”मी आज पूजा करतो. तुझी फारच गडबड उडाली आहे.पाच मिनिटात अंघोळ उरकतो आणि पूजा करतो.” नेहाच्या चेहेऱ्यावर मिस्कील हसू होतं, खरतर ती त्याने दाखवलेल्या काळजीमुळे सुखावलीच होती.पण तरीही तिने चेष्टा करत म्हटलं” करा करा पूजा करा.फक्त देवांना आंघोळ घालताना कृपा करून त्यांना नळाखाली धरू नका.“ नवरा आज स्पोर्टिंग मूडमध्ये होता . तो सुद्धा हसत म्हणाला” मागे कधीतरी एकदा पूजा करताना देवांना अंघोळ घालताना नळाखाली धरून धुवून काढलं होतं,या गोष्टीला पाच तरी वर्ष झाली असतील पण तू काही चान्स सोडत नाहीस ते बोलून दाखवायचा”
सासूबाई लगबगीने पुढे येत म्हणाल्या”तू जा तुझं आवरायला.मी नाश्त्याचं बघते. आणि हो, तू तशीच जाऊ नकोस पटकन पोहे करते ते खाऊन मगच जा”
नऊ वाजून गेलेच होते नेहा पोहे खाताना सासूबाई तिच्या हातात चहाचा कप ठेवत म्हणाल्या”तुमच्या साहेबांचं मला नवल वाटतं. तू जातेस ,कधी नाही म्हणत नाहीस म्हणून तुलाच का बोलावतात?आता गेल्या दिड महिन्यात तू किती वेळा गेली आहेस. मला वाटत एक दिवस आड तर नक्कीच गेली आहेस.आता काल जाऊन आल्यावर आज पुन्हा का बोलावल आहे तुला? तू गेलीस ना बाहेर की मला भीती वाटायला लागते. साहेब तुला न्यायला नि सोडायला येतायत तरीही तिथे बँकेत तुम्ही किती लोकांच्या संपर्कात येता.कोण माणूस कुठे कुठे जाऊन आलाय काही पत्ता तरी असतो का आपल्याला” यावर नेहा अगदीच निरुत्तर होती.
ती घराबाहेर पडली,पण निघताना मनात समाधान होतं की नवऱ्याला आणि सासूबाईंना कुठे कुठे मदत करायला हवी याचं नेमके भान होत. तिला तिच्या कर्तव्यापासून कुणी अडवत नव्हतं.
साहेबांची गाडी विशिष्ठ ठिकाणी उभी होतीच. नेहा पटकन मागे जाऊन बसली.
पहिल्या दिवशी गाडीत चढताना तिला संभ्रम होता की मागे बसावं की पुढे?. मागे बसणे शिष्टाचाराला धरून नव्हते .पण कोरोनामुळे सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी मागच्या सीटवरच बसणे इष्ट होते,हे पहिल्या दिवशीच साहेबानी स्पष्ट केल्याने ती आता बिनदिक्कत मागे बसू लागली होती.
साहेब खरोखरंच समजूतदार होते. आज त्यांनी बोलावलं म्हणजे तितकेच महत्वाचे काम असणार याची नेहाला खात्री होती.तिने काही विचारायच्या आतच त्यांनीं बोलायला सुरुवात केली.”आपली वेस्ट अंधेरी ब्रँच आहे तिथली कॅशियर, बिंदीया आहे ती पॉझिटिव्ह निघाली. परवा रात्री तिचा रिपोर्ट आला. काल आपली ब्रँच सील केली आहे.”
नेहासाठी हा फार मोठा धक्का होता. तिचे हातपाय कापायलाच लागले.
“सर, अहो काय सांगता काय? बापरे? असं कसं झालं? अहो मी ओळखते तिला. खूप सिन्सीअर आहे ती आणि माणूस म्हणूनही खुप चांगली आहे ती. मागे एक ट्रेनिंग प्रोग्रॅम आम्ही दोघीनी एकत्र अटेंड केला होता, तेव्हापासून आम्ही ओळखतो एकमेकींना. पण सर तिला कस काय झालं हो इन्फेक्षन? आम्ही सगळेच एवढी काळजी घेतोय तरीही असं का झालं?”
आपला प्रश्न अत्यन्त बावळट आहे हे समजूनही नेहाने विचारलं.
हे कधीतरी होणारच आहे हे ही तिला माहिती होतं आणि असे असूनही ती खूप हादरली होती.
“नेहा,वेस्ट ब्रँच ला फॉरेन क्लायंट खूप आहेत. आणि गेल्या दोन महिन्यात इतके लोक,परदेशातून भारतात आले आहेत. त्यातले कितीतरी बँकेत आलेच असणार.येणारी प्रत्येक नोट कुठे कुठे फिरून आली असेल काय माहीत? तिला आठवडाभर सर्दी वगैरे झाली होती. आणि ती सांगत सुद्धा होती की मला बोलावू नका, पण तिचा अफाट स्पीड आणि पॉझिटीव्ह स्वभाव यामुळे मॅनेजर तिला घरी बसायची परवानगी देईना.शेवटी चार दिवसापूर्वी तिला ब्रँच मधेच ताप भरला.तेव्हा तिला घरी पाठवलं. दोन दिवसांनी पॉझिटीव्ह रिपोर्ट आला, आणि सध्या ती प्रिकॉशन म्हणून व्हेंटिलेटरवर आहे .पण स्टेबल आहे . हे सर्व समजल्यावर आपली ती ब्रँच सील केली आहे आणि आता मॅनेजर डोक्याला हात लावून बसलाय. त्यातून वरून प्रचंड प्रेशर आहे .”
“पण सर तुम्ही मला का बोलावलं,हे नाही समजलं मला? माझा तर आज येण्याचा टर्न सुद्धा नव्हता” नेहाचा आवाज कापत होता.हातापायाला सूक्ष्म थरथर सुटली होती.
“अगं तिथले सगळे कस्टमर काल ब्रँच बँद केली म्हणून बोंब मारत होते. वरपर्यंत कंपलेंट गेली.त्यातून पेन्शनर आणि गरीब जन धन योजना वाले, सगळ्याचं पॉलिटिकल प्रेशर सुद्धा तयार झालं. आपली essential service असल्यामुळे,शेवटी आपल्याला त्यांची पेमेंटस करायची ऑर्डर आली आहे. त्यांची अकाउंट्स मूव्ह केल्येत आपल्याकडे.आज प्रचंड लोड असणार आहे.लोक संतापले आहेत आणि तूच हे शांतपणे हँडल करू शकतेस म्हणूनच तुला एकटीला ऍक्सेस सुद्धा दिला आहे. सॉरी मला हे काल रात्री समजल्यावर तुझ्याशिवाय कुणाचेच नाव डोक्यात नाही आलं. यासाठीं लागणारे सॉफ्टवेअरचे काम आयटी वाले मध्यरात्री पर्यंत करत होते.
आता आज तुला लढाई सांभाळायची आहे.
नेहाच्या डोळ्यासमोर कालची एक किलोमीटर ची रांग आली. तिची छाती दडपून गेली होती. कामाच्या कल्पनेने नाही तर बिंदीयाने असलेच प्रेशर हँडल करताना तिला इन्फेकशन झाले होते या कल्पनेने.तिला डोळ्यासमोर बिंदीया आणि तिला लावलेला व्हेंटिलेटर दिसायला लागला.
तिने आवंढा गिळला. तिच्या घशात टोचायला लागलं. आपल्याला घशात वेदना होतायत असा भास तिला व्हायला लागला. अचानक थंडी भरून आल्यासारखं सुद्धा झालं.
साहेबाना गाडी थांबवायला सांगून घरी पळून जावे असे तिला वाटायला लागले.
खूप प्रयत्नांनी तिने स्वतःला सावरलं,आणि स्वतःला समजावलं.
असे घाबरून कसं चालेल? डॉक्टर नर्सेस घाबरतायत का? रात्रंदिवस पहारा देणारे पोलीस घाबरतायत का?अगदी ग्रामीण पातळीवर च्या आरोग्य सेविका, आशा वर्कर,अंगण वाडी सेविका,आरोग्य विभाग या सगळ्यांनी परिस्थितीला घाबरून ड्युटी केली नाहीं तर चालेल का? या सर्वांनाच त्यांची ड्युटी करावीच लागते आहे आणि तशीच ती आम्हा बँकरना सुधा करायची आहे. फक्त यात थोडा फरक आहे,तो असा की त्यांची लढाई शारीरिक आहे आणि आपलीं आर्थिक!
आज आपल्या देशाच्या नसानसातून पैसा खेळता राहायला हवा आहे.हे युद्ध नुसतं माणसाच्या जिवाचेच नाहींतर आर्थिक विनाशाचे सुद्धा आहे. हे जर आपण लढलो नाही तर कुणाच्याच हातात पैसा येणार नाही.इतरांचे जाऊदे पण जेव्हा गरीबाच्या हातात पैसा येणार नाही,तेव्हा त्याला दोन वेळचे जेवण सुधा मिळणार नाही. आणि भुकेने कंगाल झाल्यावर माणूस हा माणूस राहणार नाही मग कदाचित दिवसाढवळ्या सुद्धा दंगली पेटतील. दोन वेळच्या जेवणासाठी सुध्दा दरोडे पडतील.
आपल्याला घाबरून चालणारच नाही . ही लढाई लढायचीच आहे.साहेबांचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे. आपल्याला ज्या बँकेने आर्थिक पाठबळ दिले, सुसंपन्नता दिली तिच्या या अडचणीच्या वेळी आपण पळून जाऊन चालणार नाही.
मी सुद्धा आहे एक कोरोना वॉरियर!
माझ्यासाठी इतर कुणि टाळ्या वाजवल्या नाहीत तरी चालेल.मीच देईन मला शाबासकी.असा विचार करत नेहा हाताला सॅनिटायजर चोळून काउन्टरला बसली.
योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे
9766319246
No comments:
Post a Comment