Mar 23, 2021

चिमणी

              श्री सरस्वती प्रसन्न
@योगिनी श्रीनिवास पाळंदे

                  चिमणी
माहेरघरच्या आम्ही चिमण्या
आत्ता पेंग्विन झालो असलो
तरी तेव्हा नक्कीच चिमण्या होतो
आमचं लहानपण!!!!
त्याची महती काय वर्णावी?
तीसापाठी एका घरात टीव्ही
त्या टिव्हीकाकूंच्या *नेटफ्लिक्स* दाराबाहेर
आम्ही तासभरही लाईन लावली आहे
थोड्यावेळाने लागणाऱ्या
छायागीतासाठी!
त्यांनी कितीही हाकललं तरीही!!!!
मानसशास्त्र कार्यशाळाच जणू
त्याशिवाय आत्मनिर्भर मनोरंजन
उन्हाळीशिबिराशिवाय साधलेलं
किचनमागच्या मातीतल्या 
तुटक्या बांगड्यांच्या चिखलभर काचा
नळाखाली धुवून,त्यानंतर 
काचापाणीचा खेळ.. 
दगड का माती,लगोरी,ठिक्कर
*सगळे फ्री ऑफलाईन गेम*
वीसापाठी एका घरातला
फ्रीज डिफ्रॉझ केल्यावर
फ्रीजकाकूंनी उदारपणे दिलेला
शिळा बर्फ वाटीत घालून 
चवीचवीने चाटलाय
*डेझर्टसारखा…*
एवढं सगळं करूनही
एखादा उन्हाळी दिवस 
संपता संपायचा नाही
चिमण्यांना *पंखभरून कंटाळा* यायचा
मग एखाद्या दिवशी टूम निघे
मेंदी लावायची!!!
चाळीतल्या कमानीपाशी
मेंदीचं झुडूप
नर असतो तो मेंदा
मादी असते ती मेंदी
हे ज्ञान कुणीतरी ताई पाजळे
(तेव्हा व्हाट्सएप विद्यापीठ नव्हतं)
मग ती मादीवाली मेंदीची पानतोड 
आई पाट्यावर वाटायची
आमच्यासारख्यांच्या घरात कात कुठला??
मग पुन्हा कुणीतरी 
*ज्ञानदीप उजळूदे* स्टाईलने सांगे
चिमणीची शीट वाटून घाला त्यात
म्हणजे रंगेल मेंदी
आमच्या चाळीच्या कठड्यावर
*चिमण्यांचा कमोड* 
एक फेरी मारली की पाच सहा 
ठिपक्यांच्या रांगोळीएवढ्या
शिटा मिळायच्या
त्या उचलताना कधीच
घाण नाही वाटायची
मेंदी किती रंगायची
नाही माहीत,पण…..
*तेव्हापासून मला चिमणी आवडते*
तिचं ते बागडण
तिची धिटाई
*सावळी पण स्मार्टवालं* 
तरतरीत स्लिम रुपडं
आणि सतत कामात असणं
एका जागी शांत बसलेली चिमणी
अद्याप नाही पाहिली
कामगार पक्ष्यांची 
महिला उपाध्यक्ष आहे ती
वळचणीच्या घरट्यातली
तिची *शुष्ककाष्ठ करामत*
त्यातले चिमणे जीव
चोची वासणारे
ती खाणार किती???दोनचार दाणे
आणि त्यातला बाळघास
पिल्लाला भरवणार
आपले कोरोना स्पेशल
लाल निशाणवाले,चपटे पिवळे,
त्यांनी कत्तल केली चिमण्यांची
त्यांना काय???
 माणूस काय अन चिमणी काय.
टार्गेट-सुपरपॉवर…एवढंच ध्येय
माओकाकांनी फतवा काढला
अरे काय हैवान आहेत साले
पंचवीस ग्रॅम वजनाची एक चिमणी
खाऊन खाऊन किती धान्य खाईल???
पण मारल्या,एकजात
जो चिमणी मारेल
 तो देश वाचवेल…म्हणे
लहान पोरांच्यासुद्धा हातात
बेचक्या दिल्या हलकटांनी
एकट्या शांघायमध्ये
एका महिन्यात ते...रा ला….ख मारल्या
आणि वर्षा दोन वर्षात
पडला मस्त फटका
*निसर्गाचा म्युट रुद्रावतार*
चिमणी नामशेष आणि 
टोळधाड फॉर्मात!!!!1960 साल
खा लेकांनो!! त्या चपट्यांचं
सगळं शेत फस्त करा
फळबागा, भाजीपाला, धान्य 
सगळं सगळं टोळमुखी पडलं
दुष्काळ उगवला
दीडेक कोटी चपटे भुकेने मेले
धाईधाई रडावं लागलं मग 
चिमणी ज्यांना संपवायची
त्या टोळांनी याना संपवलं
परफेक्ट पोएटिक जस्टीस
शेवटी सोव्हिएत युनियनवरून चिमण्या आयात कराव्या लागल्या
*मला फार आवडते चिमणी*
अगदी तिचं नाव गुंफलेले शब्दसुद्धा
चिमणीचा-घास, चिमणी-पावलं
बाळाच्या कपड्याचं चिमणाळ 
चिमणीपाखरं
चिऊचा घास, चिऊचं घरटं
शब्दात समाधान मानते कारण
हल्ली ती दिसतच नाही कुठे
चिनी-चपट्यांच्या इतके वाईट नसलो तरी
आपणही काही कमीचे नाही आहोत
आमची सिमेंट-जंगलं आणि
*प्रगतीचे मोबाईल मनोरे*
यांनी तिला हुसकावून लावलं.
*प्रगती झाली…*
*चिमणी गेली...*
ती दिसतच नाही
 माझ्या नजरेला
कुठेही….
वळचणी शिल्लक आहेत कुठे?
आमचा वाणी सकाळी 
धान्य टाकतो…ते टिपायला
आता चिमणी नाही येत
*जा जा जा* म्हणायची वेळ आणणारी कबुतरं येतात
सोबत *अस्थमा-स्पेशल धूळ* उडवतात
मी शोधक नजरेने 
परिसर पिंजून काढते
पण चिमणी कुठेही नाही
आणि …..माझ्या आईच्या जावयाने
लावलेला एकुलताएक जावईशोध
(शोध आता बराच जुना झालाय)
मुंबईला जाताना 
*श्री दत्तचा* मिसळथांबा
घरि ओ येईतो जेवलेलं असलं तरी
श्रीदत्त हवाच,तो सुद्धा *त्रिगुणी*
मिसळ,पोहे आणि वडा चटणी
आणि मला तिथे *ती* दिसली
टुण टुणकन उड्या मारत
सांडलेल्या पोह्यातला 
एकेक पोहा 
टूपूटूपू वेचणारी
चुटुचुटु खाणारी
मग मी थोडेसे मुद्दाम सांडवले पोहे
पोह्यांवर दत्तचा *सुंठावलेला* तिखट गोड चहा
चहा पीत पीत माझं चिमणी निरीक्षण
कित्ती दिसतात तिथे.
नॉनव्हेज खाऊन कंटाळलेल्या तिला
मिसळ, कोथिंबीर वडी,
पोहे, साबुदाणा खिचडी यासर्वातला
एकेक चिमणघास तरी मिळतोच रोज 
माझा दत्तमधला इंटरेस्ट
*चहा आणि चिमणी पुरताच*
परवा माहेरी गेले होते
माहेरच्या चाळीचे आता मनोरे झालेत
तिथं सगळंच बदललंय
ऑफलाईन आयुष्य ऑनलाइन झालं
कुणी कुणाच्या दाराबाहेत रांगा लावत नाही आणि डेझर्ट म्हणून बर्फ चाटत नाही
घरोघरि टीव्ही फ्रीज जुने झाले
काचापाणी गेम डबाबंद झाले
 दगड उरलेच नाहीत आणि *सगळ्याचीच माती झाली*
मास्क तोंडाला लावून,
माझी प्रभातफेरी सुरू होती
*संपलेला भूतकाळ वेचत!*
नाकतोंड बंद पण,कान उघडे होते
आणि आला की…….
चिवचिवाट कानावर
माझा आनंद अनावर
मग शोधत गेले….कितीतरि दिसल्या
*मनोऱ्यांतल्या माहेरवळचणी*
चिमणीच्या घरट्यांनी भरल्या होत्या
काउचं शेणाचं घर वाहून गेलं 
तरी चिऊचं मात्र जिवंत राहिलंय
पण आता तिची शीट
मनोभावे वाटून, मेंदीत घालणारे
निरागस हात राहिले नाहीत
चिमणी जिथे घर बांधते
ते बांधकाम भक्कम असतं
असं म्हणतात
विश्वासच बसला!!!
*माहेरचं घरंच भक्कम*
म्हणूनतर माहेरघरी एवढ्या चिमण्या
मी परतून जाताना, 
हळव्या आठवणी 
मनात चिवचिवत असतात
आणि……….
भुर्रर्र उडून विदेशी गेलेल्या
माझ्या चिमणीच्या आठवणीने
माझं तोंड चिमणीएवढं झालेलं
मी आता *त्या चिमणीच्या*
पिल्लांच्या प्रतीक्षेत आहे
एक घरटं मनात
आणि एक माझ्या
टेरेसच्या वळचणीला ठेवून
मी म्हणते
*या चिमण्यांनो परत फिरा!!!!!!*
*हॅप्पी जागतिक चिमणी दिन!!!!!*
@योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे

No comments:

Post a Comment