May 7, 2021

खुपते ते सारे काही....

                    श्री सरस्वती प्रसन्न

                                       खुपते ते सारे काही…………….

मी पहाटे साडेपाचला फिरायला निघते.रस्त्यातून चालताना बेदरकारपणे वेगात जाणाऱ्या वाहनांपासून स्वतःला वाचवत पुढे जाते आणि उद्याच्या पेपरातली “भरधाव वाहनाने पादचारी महिलेला चिरडले.”ही बातमी न होण्यासाठी प्रयत्न करते,थोडक्यात रामप्रहरी रामाला प्रिय न होण्याची कसरत करत,जवळची गल्ली गाठते.

छोट्या छोट्या गल्ल्या आणि त्यातले टुमदार बंगले(असूया न वाटता)पाहात पाहात चालताना,पुष्पचोर नजरेस पडतात.पायांच्या टाचा जमतील तेवढ्या उंचावत,बाहेर डोकावणाऱ्या एखाद्या नाजूक फांदीची मुंडी पिरगळुन,जमेल तेवढी फुले(क्वचित कळ्यादेखील) पिशवीत भरून नेणारे हे पुष्पचोर!

अल्पवयीन गुन्हेगारांना बालसुधारगृह असते तसे यांच्यासाठी जेष्ठसुधारगृह असावे असे वाटते!!

मी पुष्पचोरांकडे दुर्लक्ष करत पुढे निघते.

पुढच्या वळणावर वाण्याचे मोठे दुकान आहे,सध्याच्या कोव्हिडं काळात तो भाजीपालाही विकतो.त्यातली सडकी भाजी बाजूच्याच रस्त्यावर टाकतो.आणि त्यासोबत प्रभातवंदनेच्या,घशातून खरवडून काढलेल्या प्रार्थना.बरं तेवढ्याने थांबत नाही,त्या आवाजाची पुढची पायरी म्हणजे दुकानाच्या बाजूला टाकलेला त्याचा सडा.

ह्या प्रभात वंदनेने कान आणि डोळे तृप्त होत असताना मी पुढे मार्गस्थ होते.

गुलाबी थंडी, अंगावर लपेटलेली शाल,आणि पुढच्याच वळणावर भेटलेल्या मैत्रिणीसोबत गप्पा,असं पुढे जात असताना,अंधार भेदून सूर्यकिरणे बाहेरही आलेली नसताना,मुनिसिपालटी रस्त्याचे दिवे मालवते!!!!!! वेळ ठरलेली... सकाळी सहाची,ऋतू कुठलाही असो.सहा म्हणजे सहा. उन्हाळ्यात लख्ख उजेड पडलेला असतानाही दिवे मालवायची वेळ काही बदलत नाही आणि थंडीत रस्त्यावर पुरेसा उजेड असो वा नसो,रस्त्यावरचे दिवे मालवले जातातच.

मग आमची धडपड-फेरी सुरू होते.त्यात रस्त्यातले ते वर्षानुवर्षे न बुजवलेले खड्डे!!!!

पुन्हा तीच म्युनिसिपल कॉर्पोरेशन!!!आता अंधार,आणि खड्डे असे एकावर एक फ्री पॅकेज असतं.

रस्त्यांवर अनेक श्वानप्रेमी श्वानांना घेऊन प्रभातफेरीला निघालेले असतात.श्वानांचे प्रभातिच्या निरव समयी भुंकणे आणि मलमूत्र उत्सर्जित करणे अशा दोन्ही कृती बेधडकपणे चालू असतात.श्वानमालक श्वानाच्या घन आणि द्रव दोन्ही उत्सर्जनाचे वेळी, तो मी नव्हेच अशी अलिप्त भूमिका घेतात,आणि स्वतःची प्रभातफेरी सुखेनैव चालूच ठेवतात.

माझ्या या प्रभातफेरीच्या वाटेवरच एक सिग्नल आहे पण जिथे रीतसर सिग्नल आहे,तिथेच रस्ता क्रॉस करण्यासाठी एक पादचारी पूलसुद्धा बांधून ठेवलेला आहे.तो बांधायचं नक्की कारणच समजलेलं नाही.तो कुणीही वापरत नाही.तो पूल म्हणजे काही भिकारी कुटुंबांचे वसतिस्थान झाला आहे.त्यांची कुटुंबाच्या कुटुंब तिथे राहातात.वाईट अशा गोष्टीचं वाटतं की त्यांना कुणीतरी भिक्षा म्हणून दिलेलं अन्न ते अर्धवट खाऊन तिथेच टाकतात.कित्येक वेळेला वाळलेल्या पोळ्यांची चवडच्या चवड तिथे पडलेली असते.ते पाहून एवढं निश्चित समजतं की देणाऱ्याने घरातलं उरलेलं सगळंच्या सगळं अन्न तिथे आणून टाकलंय,जे भिक्षेकर्यांच्या गरजेपेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणात दिलं गेलेलं असतं.हे नेहेमीचंच दृश्य पाहून मन सुन्न  होतं.भिक्षा म्हणून मिळालेलं अन्न बेफिकिरीने टाकण आणि जरूरीपेक्षा जास्त अन्न त्यांना देण हे दोन्ही मला खुपतं.

जेव्हा मी विचार करते तेव्हा,कितीतरी,अगदी सुशिक्षित घरं मला आठवतत् जी, शिळ अन्न चक्क टाकून देतात.मला अशावेळी पोटाची खळगी भरण्यासाठी उंदीर किंवा माकड,मुंग्या यांनाही खाणारे मेळघाट किंवा हेमलकसा इथले आदिवासी आठवतात.

माझ्या फिरायच्या वाटेत कैक वेळेला, पाईप फुटून, पाणी वाहून चाललेलं मला दिसतं.मला अशावेळी भेगाळलेली भुई,तिच्यावर डोक्याला हात लावून हताश बसलेला बळीराजा आठवतो,हंडा हंडा पाण्यासाठी उन्हातान्हात मैलोनमैल चालणाऱ्या बाया दिसतात,आणि माझ्या जीवाचा तळतळाट होतो,पण सांगायचं कुणाला?तक्रार कुणाकडे करायची? ते माहितीच नसतं,आणि त्याचा जास्तच त्रास होतो.

एव्हाना रस्त्यावरच्या चहाच्या टपऱ्या उघडलेल्या असतात.तयार झालेल्या ताज्या चहाचा पहिला ग्लास रस्त्यावर ओतला जातो.शहरात 500 तरी चहाच्या टपऱ्या असतील.म्हणजे रोज सकाळी रस्त्यावर 500 कप चहा ओतला जातो.हाच कुणा गरीबाच्या मुखी नाही का लागलेला चालणार???असा विचार मनात येतो.आणि…..मी पुढे चालतच राहाते.

आमची प्रभातफेरी पूर्ण होताना वाटेमध्ये तेच वाण्याचं दुकान पुन्हा लागतं.आता दुकानाचं शटर पूर्णपणे उघडलेलं असतं.वाणी मूठभर धान्य घेतो आणि रस्त्यावर भिरकवतो.ते टिपायला,चिमण्या येत्या तर एकवेळ ठीक(पण चिमण्यांना आमच्या मोबाईलटॉवरनी हुसकावून लावलं आहे ना),चिमण्यांच्या ऐवजी कबुतरांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर उतरतात.(वाण्याच्या घरी बहुधा कुणाला अस्थमाचा त्रास नसावा )वाण्याच्या दुकानात त्यांच्या धर्मसंदेशाची पाटी लावलेली असते,ज्यात पक्ष्यांना धान्य खाऊ घालणाऱ्याला मोक्षप्राप्ती मिळेल, असं लिहिलंय,फक्त *कबुतरांच्या त्रासामुळे वाण्यासोबत ती मोक्षप्राप्ती एखाद्या अस्थमा पेशंटलासुद्धा मिळण्याची शक्यता असते* तो भाग निराळा.

माझ्या घरी परत येण्याच्यावेळी आमच्याच गल्लीत राहणारी काही मंडळी अगदी पाच मिनिटांवर असलेल्या जिममध्ये जाण्यासाठी चारचाकी वाहन काढताना मी पाहाते. घाम गाळायला पैसे देऊन जाणारी ही मंडळी पाच मिनिटे चालून येणारा घाम गाळायला अजिबात तयार नसतात आणि प्रदूषणाचे काम मात्र चोख करतात.

मी घरी येते.ऑफिसची तयारी करत असताना एकेक करून कामवाल्या बायका यायला लागतात.

दिवाळीत माझ्या वहिनीने मला नवाकोरा मग्जचा सेट, भेट दिला आहे.बाईला मी माझ्यासोबत चहा देते,अगदी त्याच कपातुन,ज्यातून मी पिणार असते.हीच माझी बाई वेळेला, आणि अडीअडचणीला माझ्या पाठीशी उभी राहणार असते…आणि राहतेच.इतक्या वर्षांत आमच्यात तेवढें ऋणानुबंध तयार झालेलेच आहेत.

पण लॉकडाऊनचा, चार महिन्यांच्या न केलेल्या कामाचा पगार मी दिल्यावर”काही उपकार नाही केलेत वहिनी.सगळ्यांनीच दिलाय.” असं म्हणते ते मात्र विलक्षण खुपतं.

आणि ह्याच माझ्या कामवालीची,दहा बारा तारीख होऊनही पगार न देणाऱ्या, उत्तम सांपत्तिक स्थिती असलेल्या घरचं काम करायची तयारी मात्र असते.तिथे ती उशिरा मिळणारा पगार गप गुमान स्वीकारते!

आणि तिला वेळच्यावेळी पगार आणि कामाची मोकळीक देणाऱ्या मला मात्र चार गोष्टी सुनावते.

बाई,कपडे धुताना नळ सोडून ठेवते.धो धो पाणी वाहात असतं.तिच्या वस्तीत पाणीटंचाई असूनही ती बेदरकारपणे पाण्याशी खेळते!! ,’नळ बारीक कर ग किंवा बंद कर’ सांगितलं की राग येतो तिला.

सकाळचे फिरणे आटोपून,घरी परतल्यावर आता माझ्याकडे दोन तास असतात,ज्याच्यात कपडे भिजवणे,वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करणे,स्वैपाक,पूजा ही सर्व काम असतात.या कामाच्या कुठल्याच वाटणीमध्ये हातभार लावायला “अहो” तयार नसतात.त्यांना काम सांगायची वेळ मी येऊच देत नाही फारशी.पण एखाद्या गडबडीच्या दिवशी “जरा पूजा करा ना आजच्या दिवस” या विनंतीला…...“वाहा नुसतं हळद कुंकू.मला नाही वेळ पूजेला”असं कमावलेल्या स्थितप्रज्ञतेचं उत्तर येतं.

चांगलंच खुपतं ते!!

खरंतर त्यांचं उत्तर खुपण्यापेक्षाही, त्यांना, या असल्या सवयी आपणच,सुपरवुमन होण्याच्या नशेत लावल्या आहेत याची जाणीव व्हायला लागते आणि ती जास्त खुपते.

या खुपणे प्रकाराचीही ना, सवयच लागते मनाला.

आणि खुपुन खुपुन मनाच्या आणि हृदयाच्या त्या त्या जागा बधिरच होऊन जातात.आणि संवेदनेचा अगदी *कुष्ठ-चट्टा* होऊन जातो.

कामाच्या त्या घणाघाईच्या दोन तासात लेकीचा परदेशातून फोन येतो.मला जेव्हा शनीवार रवीवारी वेळ असतो तेव्हा त्यांची रिलेशन मेंटेनन्सवाली (लादली गेलेली) गेट टूगेदर असतात.आणि त्यांना वेळ नसतो.

शेवटी भारतातली सोमवार सकाळ जी त्यांची रविवार रात्र असते तोच मुहूर्त निघतो फोनचा!

आपल्याला सगळीकडेच गृहीत धरलं जातं ही बाबच आपण गृहीत धरलेली असते…वर्षानुवर्षे!! त्यामुळे,लेकीजवळ ह्या विषयी नाराजी व्यक्त नाही करत,पण अहोंजवळ मात्र माफक नाराजी व्यक्त केली

की म्हणतात,”जा की ऑफिसला उशिरा.सरकारी ऑफिस तर आहे तुझं. “ 

हे वाक्य मला नुसतं खुपत नाही,तर ओरबाडून टाकतं.

माझं ऑफिस केवळ सरकारी आहे म्हणून असं बोलणं काहीही गरज नसताना ऐकावं लागतं!

मी कशीबशी तयार होऊन ऑफिसला जायला निघते.

रिक्षास्टँडपाशी *पिंकलेल्या रांगोळ्यांचा सडा* असतो.मी एका रिक्षावाल्याला, येणार का विचारते.

तो,आधीच्या रंगरंगोटीत *स्वतःचं डिझाईन* काढून,नंतर हो म्हणतो.

मला ओळी सुचतात “ऑफिसला जायला उशीर झालाय

                 थुंकतोय रिक्षावाला…घाण सारी करतोय रिक्षावाला”

रिक्षा सुरु होते,तेव्हा मला रिक्षाचालकच नव्हे तर अनेक मोटारचालक,बसचालक,पादचारी, जिथे तिथे 

थुंकताना दिसतात,रीतसर मास्क खाली उतरवून थुंकतात.भारत हा(कोरोना काळातही) थुंकणार्या लोकांचा देश आहे,असं टोकेरी वाक्य माझ्या मनात ओरखडा काढतं,आणि खेद ह्या गोष्टीचा वाटतो की *त्यांच्यापैकी एकालाही हटकायची हिम्मत माझ्यात नसते.*

माझी रिक्षा,मुळा मुठेच्या पात्रावर बांधलेल्या पुलावरून जात असते,माझ्या दृष्टीला एक भपकेबाज गाडी दिसते,त्यातून झुळझुळीत कपडे घातलेली एक महिला उतरते आणि,निर्माल्याची पिशवी,नदीपात्रात भिरकावते.कोरडं पडलेलं पात्र,त्या पिशवीचा यशस्वी कॅच घेतं पण प्रवाही झाल्यावर पुराची मॅच मात्र हरणार असतं!!ह्याच प्लास्टिकच्या पिशव्या पावसाळ्यात जागोजागी अडकून वेळप्रसंगी पुराचेही निमित्त बनणार असतात,आणि तेव्हा हीच महिला तिच्या आलिशान घरात कॉफ़ी पीत पीत पूरकऱ्यांना सहानुभूती दाखवणार असते,वेळप्रसंगी एखादा चेक रिलीफफ़ंडात ही देणार असते.या दांभिक वृत्ती पाहून मन थकून जातं!

मी गेल्याच आठवड्याच्या वर्तमानपत्रात नाशिकच्या एक तरुणाबद्दल वाचलेलं असतं. हा तरुण, पुलावर उभं राहून नदीत कचरा टाकणाऱ्यांना, तो टाकण्यापासून परावृत्त करतो.बातमी सुखावणारी असली तरी पण एक पर्यावरणप्रेमी आणि हजारो पर्यावरणद्रोही,हे व्यस्त समीकरण अवघ्या अवनिचा विनाश करणार अशी भीती वाटते.

ऑफिस जवळ येत असतानाच अगदी बाजूलाच एक थिएटर आहे.रिक्षाचा स्पीड तिथे कमी झालेला असतो त्यामुळे तिथे लावलेली पोस्टर्स पाहाणे बंधनकारक असते. तिथल्या फ्लेक्सवर लावलेली उत्तान कपड्यातल्या स्त्री पुरुषांची चित्र पाहून,वयापरत्वे निबर झालेली मनसुद्धा हैराण होतात आणि शेवटी संतापतात.

या अशा सिनेमांवर पैसे घालवण्यापेक्षा,उत्तम नाटकं किंवा सवाई गंधर्व सारख्या संगीतमहोत्सवावर पैसे खर्च केलेलं बरे असा विचार मनात येतो खरा,पण तिथेही टोचणार्या प्रसंगांतून सुटका नसते.

सवाईगंधर्वला भारतीय बैठकीवर स्वतःची सतरंजी पसरून,स्वतःची हद्द तयार करणारे महाभाग कोत्या विचारांची हद्द गाठतात.गाणं चालू असताना उकडीच्या मोदकांपासून ते मोमोज,भेळ,वडापावपर्यंत विविध पदार्थ खात खात संगीत-साधनाही करतात.खाताना कागदाचा आणि प्लास्टिक पिशवीचा आवाजही करतात.

या अशाच वृत्ती असलेले काहीजण, विविध आवाजांचे पार्श्वसंगीत देत देत नाटकं देखील पाहतात.नाटक पाहताना मोबाईल सायलेंटवर,ठेवायला विसरतात.आणि सर्वांचा रसभंग करतात

माझी रिक्षा ऑफिसच्या दारात येऊन थांबते.तिथे उतरत असताना,तिथल्या मोठ्या मोठ्या वृक्षांवर खिळे ठोकून अडकवलेल्या जाहिराती मला दिसतात.जगदीशचंद्र बोस इतकं ठोस सांगून गेलेले असूनही,झाडांना ख्रिस्तखिळे ठोकून त्रस्त करणारी ही फुकटमस्त मंडळी डोळ्यांना दिसत नाहीत पण कुठेतरी आसपासच्या समाजातच लपलेली असतात.

रिक्षातून उतरताना रिक्षाचे 97 रुपये झालेले असतात म्हणून मी 100 ची नोट त्याच्या हातात ठेवते.तो त्या नोटेची घडी करून शांतपणे खिशात ठेवतो.उरलेले तीन रुपये मागायला लागलं की एखादा गुन्हा केल्याच्या नजरेने मला पाहतो आणि चक्क म्हणतो “सुट्टे नाहीयेत माझ्याकडे!!!!एक काम करा तुम्हीच सुट्टे 97 द्या.”

मी नाईलाजाने आणि वाद घालायची इच्छा नसल्याने सुट्ट्या तीन रुपयांवर पाणी सोडते.

ऑफीसात तर अनेकरंगी आणि अतरंगी माणसांच्या गर्दीत, या खुपणं प्रसंगांची मालिकाच असते.

मस्टरवर सही करून,दिवस पदरात पाडून घेतल्यावर,या *कामकन्या* काल रात्री घरी जेवायला काय केलं होतं तिथून जी गप्पांची सुरुवात करतात ती स्वैपाकघर फिरून अगदी दिवाणखाना,बैठकीची खोली फिरून पुनश्च स्वैपाकघरात येऊन आजच्या नाश्त्याच्या मेनुपर्यंत येऊन थांबतात.ऑफिसचा वेळ हा गप्पा,बँकेची कामं, वैयक्तिक फोन अशा विविध गैरऑफिस गोष्टींसाठी वापरणाऱ्यांच्यावर रीतसर कारवाई करायची सोय सरकारी ऑफीसात नसते आणि त्या सगळ्याचा राग आला तरी त्याविषयी कुणाच्याही तोंडावर बोलायची कुणाचीच हिम्मत नसल्याची खंत वाटते.

गप्पा मारत काम करणे,काम करताना चुकणे, चूक दाखवल्यावर चिडणे,चिडून पुन्हा चूक करणे.हाताखाली काम करणाऱ्यांशी उध्धटपणे बोलणे.मऊ माणसाकडून काम वसूल करून घेऊन भांडखोर माणसापुढे नमणे.अनेक प्रकार…….

कारण नसताना तमाशा करणारी आणि हुकमी भांडण करणारी माणसं इथे पुढारी बनतात.आणि सौम्य माणसांवर प्रहार करत राहतात.आणि जिथे नडायला, भिडायला हवं तिथे मात्र सोयीस्कर कातडी वाचवतात.हे चित्र नुसतं ऑफिसमध्ये नव्हे तर सोसायटीत, किंवा अगदी कुटुंबातसुद्धा दिसत राहतं.

जेवणाची वेळ होते,तेव्हा ऑफिसच्या वॉशरूममध्ये,जलदानगप्पांच्या फडाकडे पाहून जीव चुटपुटतो.नळ सोडून त्यानंतर हातावर साबण चोळत चोळत एकीकडे शेजारी उभ्या असलेल्या सखीशी,जणू अनेक वर्षांच्या विरहानंतर भेटली आहे अशा थाटात गप्पाष्टक चालू असतं.नळराजा चालूच…

एक हात धुण्यामागे पाचएक लिटर तरी पाणी बरबाद होताना पाहावं लागतं.ऑफीसात कोऱ्या कागदाचा यथेच्छ गैरवापर करून बेदरकारपणे कागद फुकट घालवणे,ऑफिस सुटून निघायच्या वेळी दिवे पंखे बंद न करणे,अशा छोट्या छोट्या गोष्टींतली लढाईसुद्धा हरताना पहावी लागते.

घरी पोचल्यावर जाउबाईंचा फोन येतो.त्यांच्या थोरल्यासाठी मी सुचवलेल्या मुलीचा सावळा वर्ण त्यांना खुपलेला असतो आणि त्या कारणास्तव,ती मुलगी पसंत नाही हे त्या माझ्यापाशी चक्क कबूल करतात.

जाड-बारीक, सावळा-काळा, उंच-बुटके या विविध गोष्टींवरून एखाद्या मुलीला अथवा मुलाला नाकारणे हे आपल्या समाजमनाचा एक अविभाज्य भाग बनून गेलंय. आणि अगदि उच्चविद्याविभूषित घरांतही,हे निकष लावून,लग्नसम्बन्ध ठरवले जातात.लग्नसंबंध तर जाऊदे,ती फार वैयक्तिक बाब आहे.पण अशा वर्णनाच्या माणसांना चारचौघातही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हिणवले जातं यासारखा दैवदुर्विलास नाही.

देशांत अजूनही जात असलेले वर्णद्वेषाचे बळी,जातीपातीचे बळी,हुंडाबळी,धार्मिक विद्वेष बळी हे आठवून मन सुन्न होतं.

अगदी मंगळावर पोचायच्या टप्प्यातल्या, माझ्या विज्ञान प्रगत देशांतही, अजून ही मानसिकता का बदलत नाही, या विचारांनी माझ्या मनात आवर्त उठवलेलं असतं.

या विचारांच्या आवर्तात मी गढून गेलेली असते आणि एकीकडे स्वैपाकपाणी आणि जेवणं उरकून मी टीव्ही समोर बसते!

 दूरदर्शनच्या बातम्या लावणे…..मनःशांती भंग करणाऱ्या बातम्या सहन न होऊन पळपुटेपणा करत बातम्यांचा चॅनेल बदलणे………..आवडणाऱ्या बातम्या थोडावेळ पाहणे आणि मानसिक ताकद ऊरलीच असेल तर,मालिका पाहाणे असा माझा कार्यक्रम असतो.बातम्यांमध्ये मानसिक वीट आणणारे राजकीय पक्षांचे कार्यक्रम, त्या आपण निवडून दिलेल्या *(की जोडून सुट्टीत फिरायला गेल्यामुळे,निवडून न दिलेल्या)* पुढाऱ्याचे अथवा नेत्याचे भाषण ऐकणे ही एक तपस्याच असते.

एखाद्या विषयावर किंवा नवीन येऊ घातलेल्या कायद्यावर विविध चॅनेल्सवर काथ्याकूट चालू असतो.दर्शकाच्यापुढे इतक्या टोकाच्या आणि विपर्यस्त भूमिका मांडल्या जातात, की काय चूक काय बरोबर ह्याचा पत्ताच लागत नाही.जनमत तयार करायची कुवत असलेल्या वाहिन्या स्वतःच्या राजकीय कृपाछत्राचा यथेच्छ गैरवापर करून दर्शकांची दिशाभूल करतात.शेवटी त्या चर्चा बंद करून एखादा मनोरंजनाचा,विनोदी कार्यक्रम लावावा तर तिथे पुरुषांचा रंग आणि वस्त्रपालट करून विनोदाचा आव आणणारे बीभत्स दर्शन घडते,प्रयत्न करूनही हसू न येणाऱ्या या हास्यमालिकांचे प्रयत्न हास्यास्पद ठरतात.

मालिकांमध्ये तर सुष्ट आणि दुष्ट यांच्यापलीकडे जाऊन कुठलेही प्रबोधन वगैरे घडेल ही अपेक्षाच नसते.शेवटी टीव्ही बंद करून रात्री पलंगावर आडवं पडूनही झोप येत नसते.तेव्हा वाटतं किमान एखादं पुस्तक वाचावं.

आणि….तेव्हा आठवण होते, मीच “वेळ नाही मिळत”या कारणास्तव बंद केलेल्या लायब्ररीची!!

वाचनाची माझी आवड,सवय या सोशल मिडियापायी मी गमावून बसलेली असते.

आता,दिवसभरातल्या,पहाटेपासूनच्या घटनांचा ट्रेलर माझ्या डोळ्यासमोरून फिरत असतो.

टक्क डोळे उघडे ठेवून मग मी आत्मावलोकन करायला लागते.

पहाटेपासून माझ्या दृष्टीला दुसऱ्याच्या प्रत्येक कृतीत काही ना काही खोट दिसलेली असते.आणि ती काही प्रमाणात योग्य देखील असते.पण…पण….. ती पाहताना,स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची एक अलिप्त दृष्टी मात्र मी गमावलेली असते. माझं कुठलंच वागणं दुसऱ्याला खुपत नसेल????मी कुठेच चुकत नसेन का?? या विचारांचं आत्मभान मला येत नाही ते नाहीच पण इतरांच्या खुपलेल्या गोष्टीही त्यांच्या निदर्शनाला आणून देण्याचे धैर्यही माझ्यात नसते.

खुपते ते सारे काहीची ही मालिका इतरांपासून सुरू होऊन शेवटी स्वतःपर्यंत येऊन थांबते!!!!!!

तशी ती खरीतर थांबत नाहीच. त्याने सुरू होते मनातली एक अस्वस्थता, विचारांची घुसळण!

मी इतरांकडून बदलाची अपेक्षा करत असताना,स्वतः मध्ये बदल घडवण्याइतकी लवचिक राहिले तरी आहे का? मी सुद्धा माझ्यात प्रत्येक पातळीवर बदल घडवून आणणे गरजेचे असते.मी जरी माझ्या भवतालचे जग बदलू शकणार नसले तरी माझ्या माझ्या एका छोट्या वर्तुळातला माझा प्रवास,माझ्या सवयी,माझं वागणं,माझे विचार निर्दोष ठेवायचा प्रयत्न केला तर त्या खुपण्याने बधिर झालेल्या माझ्या मनाच्या,कुष्ठचट्ट्यातल्या संवेदना पुन्हा जागृत होणार असतात आणि माझ्यातल्याच एका हळव्या 

आणि सशक्त मानवाचा प्रवास काही प्रमाणांत सुखकर करणार असतात.

योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे

No comments:

Post a Comment