पूर्व प्रकाशित-विपुलश्री
*विलीन*
गंगेचा प्रपात, रौद्ररुपात वाहाणारा, पांढरा धोप फेसाळलेला. वाऱ्याचे त्यावर चाललेले तुफानी तांडव, त्याचा घुमणारा गूढ नाद, आभाळातून अग्निशलाका बरसवणारा तप्त भास्कर!
पंचमहाभूतांच्या या उग्र थैमानात एक चिमुकली नाव हेलकावे घेते आहे. त्यात कुणी दोघं आहेत पण नावाडी मात्र नाही. पाण्याचे लोटच्या लोट नावेभोवती फेर धरताहेत. तिला घुसळुन काढताहेत.
जीवनाच्या जीवनाशी चाललेल्या त्या तुंबळ युध्दात ते दोन जीव गुदमरुन चालले आहेत !
माईंना खडबडून जाग आली. आता हे स्वप्न नेहेमीचंच झालं होतं.
काही महिन्यापूर्वी प्रथम पाहिलं तेव्हा त्यांना दरदरुन घाम फुटला होता, छातीत धडधडलं होतं. पण सवयीने ते धडधडण कमी कमी होत गेलं होतं.
माई उठल्या. गुडघ्यातुन वेदनेची एक लाट उसळली, ती ओठाखाली दडपून त्या अप्पांजवळ गेल्या. त्यांना शांत झोप लागली होती. चहाचं आधण ठेवून त्यानी थोडी
वाट पाहिली आणि मगच त्यांनी आप्पांना हाक मारली. ''उठताय ना??? चहा ठेवलाय" अप्पांना जाग
आली. त्यांनी तोंड धुतलं. देवापुढे हात जोडून उभे राहिले. माई उकळणाऱ्या पाण्याकडे एकटक पाहात होत्या. अप्पा म्हणाले “काल कितीवेळ फेऱ्या मारत होतीस? झोप नव्हती का लागत?"
“माई म्हणाल्या "हं!!!!! पण पहाटे लागली होती “
उकळणाऱ्या चहाकडे पाहाताना त्यांना पहाटेच्या
स्वप्नाची आणि गंगेच्या रौद्र रुपाची आठवण झाली .
अप्पा पुढं म्हणाले ''नाही लागली झोपं तर मला उठवत जा ना. स्वत:ला किती त्रास करुन घेतेस. झोपेच्या गोळ्यांची बाटली औषधांच्या कपाटात ठेवली आहे. त्यातली अर्धी मी तुला दिली असती ना, म्हणजे लागली असती झोप तुला. एखादे वेळी घ्यायला काहीच हरकत नाही."
माई उत्तरल्या"तुम्हाला इतकी शांत झोप लागते की तुम्हाला उठवायला जिवावर येतं."
इतक्यात अप्पांना काहीतरी आठवलं आणि ते म्हणाले “अग माझी तरी काय स्मरणशक्ती कमी होत चालल्ये,अग वीणाचा फोन आला होता ती आपले फोटो घेऊन आता सकाळी
येणार आहे आणि नंतर ऑफिसला जाईल इथनच, तिला पोहे वगैरे काहीतरी खायला कर."
चहाचा कप अप्पांना देत माई म्हणाल्या “'आपले कुठले फोटो??? “'
अप्पा म्हणाले "मागच्या रविवारी माझी पंचाहत्तरी वीणाने केली होती त्याचे फोटो!!!! हल्ली तुलाही विस्मरण होतं सगळ्याचं. कुठल्यातरी विचारात असतेस, कसला विचार करतेस एवढा? माई हरवल्यासारख्या पाहात होत्या.
''त्या म्हणाल्या, आता या वयात फोटो वगैरे प्रदर्शन नको वाटतं. वीणाच्या समाधानासाठी पंच्याहत्तरीच्या सोहळा करायला कबूल झालो तेच पुष्कळ आहे.” माई चहाचे कप विसळू लागल्या.
एकीकडे अप्पांनी आंघोळ उरकली. पाणी तापवायचा प्रश्नच नव्हता.बारा महिने माई थंड पाण्याने
आंघोळ करायच्या.
ते पाहून पाहून अप्पांनीही सुरु केलं होतं. ते म्हणत बारा महिनेही थंड पाणी सोसणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे.
माई म्हणायच्या ' कशाला हवं गरम पाणी ? शरीराचे
चोजले तरी किती पुरवायचे ? माईंचा गॅस फक्त दूध तापवणे, चहा करणे व फोडण्यांपुरता वापरात होता. सोलर कुकर त्यांनी मागेच आणली होती. सूर्याच्या त्या तेजाचे माईंना कायमच आकर्षण वाटायचचं. सूर्यच काय पण निसर्गातल्या पंचमहाभूतांतली विश्वव्यापी ताकद माईंना नेहमीच
दिपवायची.
अप्पा आंघोळीहून आले. पूजेची तयारी करता करता त्यांनी जाहीर केलं “आज वीणा यायची आहे म्हणून शॉर्टकट पूजा आणि वाचनालयातही जाणार नाही. तू खायला करतेस ना?"
माई हसून म्हणाल्या “' हो पोहे करणार आहे. पण त्या आधी गच्चीत डाळभात भाजीचा कुकर ठेवून येते.'”
माईंनी पोह्यांची तयारी चालू केली. लिंबू, कोथींबीर , खोबरं, कांदा, बटाटा सर्व एकत्रपणे चिरायला घेतलं.
माईंना वाटलं फक्त पोहे करायचे म्हटले तर एवढा साजशृंगार ?????
पण आज वीणासाठी करायचं होतं. त्यामुळे साग्रसंगीत करणे क्रमप्राप्त होतं.वीणा त्यांच्या मोठ्या भावाची
मुलगी. भावाच्या फिरतीच्या नोकरीमुळे वहिनीही त्याच्याचबरोबर फिरायच्या. वीणाच्या शाळेत
जाण्यामुळे प्रश्न निर्माण झाला होता तो माईंनी सोडवला. तिची जबाबदारी माई अप्पानी घेतली. पहिलीत
जाणारी छोटुकली वीणा तिच्या आत्याच्या घरात शिरली ती कायमचीच.
माईंनी तिथपासून उचलेली जबाबदारी वीणाच्या एम्.एस्.एसी.च्या डीग्रीनंतरही थेट तिच्या बाळंतपणापर्यंत पार पाडली होती.
वीणाची दोन चार दिवसात एक खेप तरी व्हायचीच.
रविवारी नवऱ्याला घेऊन, क्वचित एखादेवेळी सासू सासऱयांनाही घेऊन वीणा त्यांच्याघरी येत असे.
माई अप्पांना एकटेपणा |वाटू न द्यायची वीणाची धडपड पाहून अप्पांना दिलासा मिळायचा.
माई मात्र ह्या सगळ्यांतून हळूहळू अलिप्त होत होत्या. कुणात आणि कशाकरता गुंतायचं. गुंतून आणखीन गुंता वाढवायचा आणि सुखापेक्षा दु:खाला आमंत्रण द्यायचं
त्यापेक्षा शाश्वत सुखाची अनिवार ओढ त्यांना लागली होती.
ज्ञानेश्वरीचं पारायण, दासबोधाचं पारायण जे, काही वर्षापूर्वी सहा महिन्यातून एकदा व्हायचं ते
आता दर महिन्याला व्हायला लागलं होतं.
दरवाजावरच्या घंटेने माईंची तंद्री मोडली. घंटा परिचयाची होती. एकदा वाजवायला घेतलं की दार उघडेपर्यंत हात न काढायची वीणाची पोरकट सवय,तिला पोर झालं तरी गेली नव्हती. अप्पांनी लगबगीने दार उघडलं. “हाय अप्पा ! माई कुठाय
व्वा व्वा कांदा कोथींबिरीचा मस्त वास सुटलाय.पोहे की उपमा की थालीपीठ???"
अप्पा अतीव कौतुकाने तिच्याकडे पाहात होते .वीणाने चप्पल काढली, बॅग कॉटवर टाकली. जेमतेम हातापायावर पाणी घेऊन ती स्वयंपाकघरात शिरली
“'माई मी बाहेर उभ राहून नुसत वासावरुन तीन पर्याय
ओळखलेत त्यातले पोहे नक्की ना ? सडकून भूक लागली आहे “' माई हसून म्हणाल्या"पोहेच
करणार आहे. पण त्या आधी तुला किती वाजता जायचंय ते सांग. इथूनच परस्पर ऑफीसला जाणार आहेस ना ? पोहे पंधरावीस मिनिटात होतीलच पण तुला वेळ आहे का तेवढा ?"'
"नो प्रॉब्लेम,माई,आज मी उशीरा येणार असं ऑफिसात सांगूनच आले आहे. तू आरामात कर पोहे.'
माई तिच्याकडे रोखून पाहात म्हणाल्या '“तुझी ऑफिसची वेळ नऊची आहे ना ? मग आत्ताशी आठ वाजतायत.
उशीरा जायचं काहीच कारण नाही. एकदा तिकडचे नियम आपण मान्य केले ना की नंतर ते मोडायचे नाहीत.'
” माई एक दिवस चालतं गं. मला तुझ्याशी गप्पा मारायच्यात. हे फोटो दाखवायचे आहेत आणि मुख्य म्हणजे मी उशीरा येणार असं कालच सांगून आले आहे.”"
माई शांतपणे म्हणाल्या “तू इथून पावणेनऊला नीघ. पण ऑफिसला वेळेवर जा. वाटल्यास उद्या
शनिवारची अर्धादिवसाची सुट्टी आहे तेव्हा ये गप्पा मारायला.''
शेवटी वीणा नाईलाजाने म्हणाली "ओके बॉस. उद्या मी नीलला घेऊन रहायलाच येईन."
अप्पा त्या दोघींच्या संभाषणाकडे पाहून हसत होते. वीणाचा उत्साहाचा खळखळता झरा आणि माईंचा गूढ गंभीर शांत सागर.
पोहे खाताना अप्पा गमतीने म्हणाले, “'वीणा रोज आम्ही दोघचं असतो तर ही असं मन लावुन काहीच करत नाही
पोहे केले तर लिंबू तरी नसतं नाहीतर कोथिंबीर तरी नसते. तू रोज येत जा बाबा,म्हणजे मला चमचमीत खायला मिळेल “'.
माईंनी काहीच उत्तर दिलं नाही. त्या, दोघांना आग्रहाने वाढत
होत्या. वीणा म्हणाली “'माई एखाद्या दिवशी तरी सकाळचा नाश्ता करत जा . निदान आज माझ्याबरोबर तरी खा ना"' माईंनी गेल्या दोन वर्षापासून सकाळचा नाश्ता खाणे बंद केलं होतं.
अप्पा म्हणाले''अग आता तिने नवाच प्रकार चालू केलाय “”. माई त्या वाक्यासरशी गडबडल्या.
त्या अप्पांना थोपवण्यासाठी म्हणाल्या ''काहीतरी तिला सांगू नका “".
पण अप्पा ही संधी सोडणे शक्यच नव्हते.
रिकामी ताटली ओट्यावर ठेवून ते वीणापाशी आले आणि म्हणाले "गेल्या आठवड्यापासून हिने रात्रीचं जेवण सोडलंय."
“गेल्या आठवड्यापासून जेवण सोडलं ?" वीणाने विचारलं. अप्पा मिस्कीलपणे हसून म्हणाले “मी पंच्याहत्तरीचा तरुण आहे. मी भरपेट जेवतो पण आमच्या बाईंना माझ्या पंच्याहत्तरीपासून त्यांच्या वाढत्या वयाची जाणीव
झाली. आता हळूहळू कमीच जेवायचं म्हणते.”
वीणा माईंपाशी गेली, त्यांचे खांदे आपल्याकडे
वळवत म्हणाली. 'माई रात्रीचं जेवण का बंद केलंस ? अशाने थकवा येईल .या वयात तू असं
खाणं कमी केलस तर आजारी नाही का पडणार तू ? थांब उद्या मी राहायलाच येते आणि रात्री बघते कशी जेवत नाहीस ते “'
माई ठामपणे म्हणाल्या “तुला माहिती आहे मी एकदा ठरवलं की त्यात बदल करत नाही “
त्यांच्या त्या शांत पण निश्चयी बोलण्याने वीणा वैतागली. “' माई तू खूप हट्टीपणा करतेस हं कधीकधी. बर उद्याचं उद्या पाहू. मी तुम्हाला आता फोटो दाखवते हं अप्पांच्या
पंच्याहत्तरीचे. माई हा तुझा क्लोजअप मस्त आलाय आणि हा तुमचा दोघांचा क्लोजअप. त्यात अप्पा खूप हसरे आणि माई किती गंभीर आली आहे'”
वीणाच्या हातून फोटांचा अल्बम घेताना
माई म्हणाल्या “मी सावकाशीने पाहीन फोटो. तुला उशीर होईल ऑफिसला. तू आता निघ.”
अप्पा आणि वीणा बरोबरच बाहेर पडले. जाताना वाचनालयात जाण्याचंही सांगून गेले. त्यामुळे ते
अकरापर्यंत यायची निश्चिंती होती. त्यांना निरोप द्यायला बाहेर आलेल्या माईंनी गॅलरीतल्या कुंड्यांवर नजर टाकली.झाडं कोमेजली होती.त्यांना पाणी घालायला हवं होतं.
गुलाब,तुळस,पातीचहाची वर वर डोकावणारी उंच पाती, दुर्वा.
तुला सर्वांना त्यांनी मायेने पाणी घातलं.
एक क्षण त्यांच्या मनात आलं, जर नाही घातलं पाणी तर काय होईल?सुकतील झाडं.त्यानंतर पानं फुलं गळून पडतील आणि शेवटी मातीतच मिसळतील. जिथून आली तिथेच जातील. मग बिघडलं कुठे ?
लोक म्हणतील झाडं मेली. माईंनी विचार केला झाडं मरणार नाहीत ती निसर्गाच्याच कुशीत परत जातील.उलट त्याचं खत बनेल.उद्याच्या झाडासाठी सुपीकतेचा वारसा त्या मेलेल्या झाडांमुळे मिळेल.
असच असावं नाही का निसर्गचक्र??
माईंनी आत येउन मोरीतली भांडी विसळली आणि त्या
जपाला बसल्या. 'ओम नमो भगवते वासुदेवाय ,ओम नमो भगवते वासुदेवाय'
त्यांचे ओठ पुटपुटत होते. डोळे शांतपणे मिटलेले होते. हातातून स्फटिकाचा एकेक मणी पुढे सरकत होता. डोळयापुढे नीलवर्णी कृष्णाची शांत मूर्ती होती. त्याच्या डोळ्यातल्या तेजाला स्वत:मध्ये शोषून घेता घेता माई त्याच्याशी संवाद साधू लागल्या. पाहाता पाहाता त्यांचा जप बंद पडला, माळ गळून पडली.
सुरुवातीच्या काळात, तरुण वयात त्या कृष्णाचे बाळरुप पाहायच्या,त्याला आपल्या कुशीत जन्म घेण्यासाठी विनवायच्या. वर्षांमागून वर्ष गेली. त्यांच्या कुशीतला कृष्ण
त्यांना वीणाच्या रुपात शोधावा लागला होता, थोडासा नाईलाजानेच. पण तिच्यावरच्या प्रेमात
त्यांनी कुठलीच कसूर ठेवली नव्हती. वीणासाठीची सर्व कर्तव्य पार पाडताना त्यांनी वेळप्रसंगी
कठोर रुपही धारण केलं होतं. तिला शिस्त लागावी, तिला संस्कार लाभावे यासाठी स्वत:च्या
शरीरालाही त्या शिणवत होत्या. मनात कृष्णनामाचे गुंजन चाल असताना त्यांचे शरीर त्या केवळ
माध्यम म्हणून वापरत होत्या. अप्पांचा संसार चालवणारं, वीणाला लहानाचं मोठं करणारं आणि
त्यासोबत कुठे भजनाचा छंद संभाळणारं, आदिवासी आश्रम शाळेतल्या मुलांसाठी मोफत गणवेश
शिवून देणारं.
कृष्ण त्यांना ज्यात त्यात सापडत होता, जसा तो वीणामध्ये सापडला होता तसा तो
आश्रम शाळेतल्या मुलांच्या डोळयातल्या समाधानात सापडला होता. गरिबांच्या मुलांच्या मोफत
शिकवण्या घेण्यात सापडला होता.
पण आताशा शरीर थकलं होतं, साथ देत नव्हतं आणि म्हणूनच की काय पण माई त्याच्या निर्गुण रुपाला शोधू लागल्या होत्या. हल्ली जपाला बसलं की त्या कृष्णाशी
एकरुप होताना त्याला विनवायच्या. त्याच्या सगुण रुपाची माईंनी शोधलेली रुपं आता माईंनी
थोपवू शकत नव्हती. तरीही त्या मायेत गुंतलेल्या होत्या. माई कृष्णाला म्हणाल्या, तू प्रश्न निर्माण करतोस आणि त्यांना उत्तरही देतोस. पण त्याने मनाला चिरंतन शांती नाही लाभत. इतक्या
वाचनानंतरही आणि अभ्यासानंतरही माझं मन कितीतरी ठिकाणी गुंतलय. वीणात गुंतलय. तिच्या
बाळात गुंतलय,अप्पांमध्ये मी पूर्णपणे गुंतले आहे. आता यातून सुटका तू कधी करणार ? तुझ्या
सगुण रुपाची ओढ तर सर्वांनाच वाटते पण मला मात्र तुझं निर्गुण निराकार रुप खूप आवडतं. ते
कधी आकाशात दिसतं ,कधी मी घेतलेल्या प्रत्येक श्वासात दिसतं, स्वप्नातल्या त्या गंगेच्या
प्रवाहात दिसतं, कधी सूर्याच्या प्रखर तेजात दिसतं.
फोनची घंटा बराच वेळ वाजून बंद झाली तेव्हा गॅलरीत कानोसा घेत उभ्या राहिलेल्या
जोशीवहिनी पुढे आल्या. त्यांनी माईंची बेल वाजवली तेव्हा कुठे माई दचकून उठल्या. त्यांनी दार
उघडलं आणि जोशी काकू नेहमी प्रमाणेच माईंच्या घरात घुसल्या 'हे काय तुम्ही फोन नाही का
उचललात ? तुमचाच ना वाजत होता ? कितीवेळ मी बेल ऐकत्ये, वाटलं मोरीत गेला असाल पण
तुमच्या हातात तर जपाची माळ दिसते आहे”'.
माईंना वाटलं या बाईचा अगदी जागता पहाराच आहे या चाळीवर. आता अप्पा जर आले
आणि त्यांना हे कळलं तर ते खूप चिडतील. हा विचार मनात यायला आणि अप्पा घरात शिरायला
एकच गाठ पडली. जोशीवहिनी एव्हाना खुर्चीवर स्थानापन्न झाल्या होत्या त्या अप्पांना पहाताच
सरसावल्या, “अप्पा, माईचा जप फार एकाग्रपणे चालतो हं. फोनची घंटा एवढावेळ वाजून वाजून
बंद पडली पण माईंनी फोन उचललाच नाही". अप्पा आधीच उन्हाचे आलेले, ते आल्या आल्या
जोशी काकूंची सरबत्ती ऐकून चिडले "काय ग??फोन का नाही उचललास ? कसला एवढा जप सारखी
करत असते काय माहित. कोणाचा फोन होता कोणास ठाउक' माईंनी शेवटी विषय बदलण्यासाठी
कॉटवरचा वीणाने आणलेला आल्बम जोशी काकूंच्या हातात दिला. 'वीणाने आजच आणलेत
यांच्या पंच्याहत्तरीचे फोटो आहेत”. जोशी काकूंची फोटो पहाताना अखंड बडबड चालली होती.
शेवटी सर्व फोटो पाहून झाल्यावर त्यांनी ठेवणीतली वाक्य म्हटली.
"वीणा प्रेमाने करते हो सगळं, तिला तुमचं केवढं कोतुक आहे. नाहीतर आमच्याकडे पाहा,स्वत:ची
मुलं असून देखील मुलगी अमेरिकेला ग्रीनकार्डच्या प्रतिक्षेत आणि मुलगा, सून माझ्याशी पटत नाही
म्हणून वेगळं राहातायत. पण कुणाला वाटली का आमच्या यांची पंचाहत्तरी करावी म्हणून ? तुम्ही
मात्र खरच भाग्यवान हो." फोटो माईंच्या हातात देत त्या निघून गेल्या. आपलं स्वत:चं रक्ताचं असं
कुणी नाही ही भावना माईंना आयुष्यभर छळत आली होती म्हणूनच कोणी अस काही कौतुकवजा
टोमण्याने बोलल की माईंना खूप त्रास व्हायचा. पण आता त्यांना कसलं काही वाटत नव्हतं.
कपड्यालत्त्याची, दागदागिन्यांची हौस त्यांना कधीच नव्हती. अगदी तरुण वयातसुध्दा. पण
थोडबहुत पहिल्यापासूनच जमलेलं सोनं होतं ते त्यांनी पंच्याहत्तरीच्या निमित्ताने त्यांच्या बहिणी,
जावा, भाच्या, पुतण्या या सर्वांना समान वाहून टाकलं होतं. तेव्हा त्यांच्या निरासक्तीचे सर्वांनी खूप
कौतुक केले होते. त्यांनाही बऱ्याच गोष्टी भेटरुपाने मिळाल्या. साड्या, भांडीकुंडी, शाली वगैरे. पण
माई मनातून अलिप्त होत्या. इतरांचं आपल्यावरचं प्रेम पाहून अप्पा त्या दिवशी अनेकदा रडले होते.
गहिवरले होते. पण अश्रूंच्या त्या जळातही माई कोरड्या ठाक होत्या. त्यांच्या मनात त्यादिवशीसुध्दा ज्ञानदेवांच्या ओव्या नाद धरुन होत्या. ज्ञानेश्वरीची त्यांनी अनेक पारायण केली होती.
त्याची एक एक ओवी त्यांना मुखोद्गत होती. कृष्णाने सांगितलेल्या गीतेला सामान्य जनांपर्यंत
पोचविणाऱ्या ज्ञानेशांविषयी आणि त्यांच्या आयुष्याविषयी माईंना अपरिमित ओढ होती.
अप्पांनी सोलर कुकर आत आणला. 'काय तापलाय गं, सावकाश हात लाव हं"' ते माईना
म्हणाले. माईंनी कुकर उघडला. शिजून निघालेल्या भाजीला त्यांनी फोडणीवर थोडी परतवली.
आमटी सारखी केली. आणि ते दोघं जेवायला बसले. अप्पा म्हणाले “'वीणा उद्या बाळाला घेऊन
रहायलाच येणार आहे. तिला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्यात ना. ती संध्याकाळी चार - पाच पर्यंत
येईल. आणि रविवारी रात्री घरी जाईल.” माईनी मान डोलवली. “' नील बाळाचे फोटो काय सुरेख
आले ना गं” अप्पांनी विचारलं. माई म्हणाल्या '' मी फोटो पाहिलेच नाहीत." अप्पा पुन्हा
वैतागले, “तू इतक्या वेळात फोटो पाहिलेच नाहीस ? तुला हल्ली झालंय तरी काय ? कितीतरी
दिवस अशी हरवल्यासारखी वागत्येस. त्या पोरीने एवढी दणक्यात पंच्याहत्तरि केली माझी पण तू
त्याची काही दखल घेतलीस का? तिचं काही कौतुक केलंस का ? त्या दिवशी सुध्दा कुणीतरी जबरदस्ती केल्या सारखी बसली होतीस."
" हल्ली कसलंच प्रदर्शन नको वाटतं. ती
पंच्याहत्तरी काय आणि हे फोटो काय ? आता आपण या सर्वातून दूर जायला हवं. हे सगळं तोडून पुढे
जायला हवं. पुढे बरच काही आहे ." माई पुटपुटल्या.
अप्पा म्हणाले “' मला तुझ्यासारखं
उदासीन रहायला नाही जमणार बुवा.”
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वीणा आली. एका हातात नील बाळाचं गुटगुटीत मुटकुळं आणि
दुसऱ्या हातात कपड्यांची बॅग. माईंनी सवयीनेच त्या दोघांवरुन तांदूळपाणी ओवाळलं. नीलबाळ
माईकडे झेपावला. त्याच्या त्या स्पर्शाने माई सुखावल्या. वीणाने केवढीतरी फळं आणली होती,
माईंनी रात्री जेवण सोडलय हे कळल्यामुळे असेल कदाचित. बाकी कोरडा खाऊ सुध्दा होता.
हातपाय धुतल्यावर तिने माईअप्पांना समोर बसवलं. नीलसाठी दुपटं घालून त्याला त्यावर ठेवलं.
त्याच्या समोर चार खेळणी टाकली. “माई तुला गंमत दाखवायची आहे.'” माई विस्मयाने पहात
होत्या. त्या म्हणाल्या “'पंच्याहत्तरी झाली आता काय राहिलय॑ आणखी ?'' वीणाने एक लाल डबी
माईंच्या मुठीत ठेवली. काहीशा नाराजीनेच माईंनी ती उघडली. त्यात जिवतीच्या आकाराची
कृष्णाची सुवर्ण प्रतिमा होती. “' तू दिलेल्या सोन्यातले दोन तीन ग्रॅम बाजूला काढले आणि त्याची
ही कृष्णाची सुवर्ण प्रतिमा नीलच्या गळ्यात घालण्यासाठी केली. आणि उरलेल्या सोन्याचं काय
केलं माहित्ये ?”" तिने एक रिसिट माईच्याच हातात दिली ““अनाथ आश्रमात वाढणाऱ्या मुलांच्या
शिक्षणासाठी आणि संगोपनासाठी ते पैसे माईंच्याच नावाने दान दिले.""
एका क्षणासाठी का होईना
पण माईंचे डोळे भरुन आले. त्यांनी पुढे होऊन वीणाला मिठीत घेतलं. त्या अप्पांना म्हणाल्या
“हिला मी संस्कार द्यायचा प्रयत्न केला. माझे विचार तिच्या मनात पोचले. रुजले. आता मला हिची
काळजी नाही. पण तिला सगळं दिल्या नंतर मी मात्र पूर्ण रिकामी झाली आहे.''
त्यांनी वीणाच्या आवडीचे सारे पदार्थ जेवणात केले. अगदी गव्हल्यांची खीर, कांद्याची भजी, चटणी, कोशिंबीर . अप्पांच्या पानात जेव्हा केळ्याची भजी पडली तेव्हा त्यांनी चमकून
माईंच्या चेहेऱ्याकडे पाहिलं. त्या चेहेऱ्यावर अनेक दिवसांनंतर समाधानाचे हसू होते. रात्री वीणा
आणि नील झोपल्यावर माई नेहेमीप्रमाणे तळमळत होत्या. जेव्हा त्यांना अप्पा अंथरुणावर उठून
बसलेले. दिसले तेव्हा त्या पुढे होऊन म्हणाल्या,''काही हवय का?” अप्पांनी मानेनेच नाही म्हटलं,
“पाणी हवंय का? की झोप नाहीये लागत?”
अप्पा म्हणाले, “आज किती दमलीस तू. एवढा
सगळा स्वैपाक केलास. नीलला खेळवताना त्याला कडेवर घेऊन घेऊन दमलीस तू. मी तुला काल
बोललो म्हणून तू रागावली नाहीस ना?”
माई म्हणाल्या, "कशाबद्दल बोलताय तुम्ही? अप्पांना
गहिवरुन आलं. ते म्हणाले, ''काल मी म्हणालो की हल्ली तू खायला करत नाहीस. तुला फोन
वरुनही रागावलो. वीणाचं कौतुक केलं नाही म्हणून रागावलो.” त्यांना पुढचे शब्दच फुटेनात.
माई त्यांची समजूत काढायला लागल्या. सुरुवातीच्या काळात रागावण्यासारखे अनेक प्रसंग येऊनही
त्या रागावल्या नव्हत्या. आता तर त्या रागलोभापलीकडे चालल्या होत्या. त्या अप्पांना म्हणाल्या,
"मी तुमच्यावर कधी रागावते का?”
“तू रागवत नाहीस म्हणून तर जास्त वाईट वाटतं.तू
आयुष्यभर सर्वांचं केलंस, नातेवाईकांचं केलंस, शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या अडचणीला धावलीस,
आदिवासी मुलांसाठी मोफत कपडे शिवून देत होतीस. आणि वीणाला तर सुंदर संस्कारांनी तयार
केलंस. सात महिन्यांचा झालाय नीलबाळ. म्हणजे चार महिन्यांपूर्वी वीणा त्याला घेऊन सासरी
गेल्यानंतर आता आपण खऱ्या अर्थाने मोकळे झालोत.” त्यांना थोपवत माई म्हणाल्या, “आज
तुम्ही असं काय बोलताय?”
अप्पा म्हणाले 'ते काही नाही आता सर्व जबाबदारीतून आपण मोकळे झालोय. आता आपण दोघांनी भरपूर मजा करायची. नाटकं पहायची, गाण्याचे कार्यक्रम ऐकायला
जायचं, प्रवासाला जायचं, वाटल्यास टूरीस्ट कंपनीसोबत जाऊ "म्हणजे प्रवासात कुठल्या अडचणी नको यायला.”
अप्पा बरच काही बोलत राहिले. माई त्यांना अक्षरशः थोपटत होत्या. त्यांना अप्पांची दया आली. वाटलं आपण दोघंही अगदी विरुद्ध दिशेने चाललोय. कुणीच कुणाला थोपवू नाही शकत.
अप्पा ऐहिक गोष्टींमध्ये गुंतत चाललेत आणि आपल्यालाही गुंतव् पाहतायत, आपण त्यांच्यापासून
अनेक योजने लांब आहोत आणि ते आपल्यापासून.
पण या मोहातून आपली सुटका होईल का?
माईना भीती वाटली.आज वीणाच्या त्या छोट्या कृतीने त्यांच्या डोळ्याला कित्येक वर्षांनी पाणी आलं होतं.
या पोरीने फार प्रयासाने घट्ट केलेल्या मनाला पाझर फोडला होता.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अभय वीणाला आणि नीलला घेऊन घरी गेले.
सारं घरच रिकाम झाल. अप्पा उदास झाले. त्यांनी थोडा वेळ गाणी ऐकली थोडावेळ टीव्ही
पाहिला आणि शेवटी रात्री झोपून गेले. माईंनी हातात जपाची माळ घेतली.
त्यांच्या डोळ्यासमोरचा
कृष्ण आज मात्र अगदी मिस्कील हसत होता. त्या त्याच्यावर चिडल्या. तुला काय वाटतं? मी
अलिप्त नाही राहू शकत? मी मोहात गुंतले आहे?तू म्हणून हसतोयस? थांब, तू पाहातच राहा.
पहाटे त्यांना पुन्हा ते स्वप्न पडलं. आज गंगेच्या रौद्रौघात, कृष्णाची त्यांना खुणावणारी प्रतिमाही होती.
आणि आज त्या नावेत त्या एकट्या होत्या
पहाटे त्या नेहमीप्रमाणे उठल्या. अप्पांची चहा आणि
आंघोळ झाली आणि ते वाचनालयात निघून गेले. त्यांना निरोप द्यायला आलेल्या माई त्याच्या
पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात होत्या. अप्पांचे झुकलेले खांदे त्यांचे पिकलेले केस, थकत चाललेलं
शरीर माईंना त्यावेळी प्रकर्षाने जाणवलं. शरीराचा हा वार्घक्याकडे होणारा प्रवास अटळच होता.
जसा तो अप्पांचा होणार होता तसा तो माईचाही होणार होता. माईच्या एकेक अवयवाने शरणागती पत्करायला सुरुवात केली होती. गुडघेदुखी सुरु होतीच. आताशा पारायणाला बसताना कंबरही दुखत असे. काही काळाने ज्ञानेश्वरीचे पारायण अशक्य होणार होते
माई यंत्रवत काम करत होत्या.
अकराच्या सुमाराला त्या झाडांना पाणी घालायला बाहेर आल्या. सर्व झाडाना पाणी घातल्यावर त्यांना जाणवलं की जमीन खूप तापली होती.
त्यांनी कपाळावर हाताचा आडोसा करून सूर्याकडे नजर टाकली. त्यांना स्वप्नातला तो तप्त गोळा आठवला आणि सहन होत नसतानाही त्यांनी त्याला निरखायला सुरुवात केली.
काही क्षणानंतर पायाला चटके जाणवेनासे झाले.
तसंच ती प्रखरता खुपेनाशी झाली.
माई, त्या कल्पनेनेच हसल्या. काही क्षणांच्या नश्वर वेदनांनंतर त्या शक्तीत मिसळून जाणं, वाटतं तितकं अवघड नव्हतं.
शेवटी त्या सूर्यरुपात त्यांना कृष्ण दर्शन झालं.
त्या त्याला म्हणाल्या 'माझी सहनशक्ती माझ्या नश्वर देहाच्या कुवतीत शिल्लक आहे तोवरच मला तुझ्याकडे येणं शक्य आहे.
तुझ्यात मिसळून जाऊन एकरूप होणं शक्य
आहे
मोहाच्या गुंत्यातुन त्या अलगद बाहेर येत होत्या.
इतक्यात त्यांना वीणाचे कालचे बोलणे आठवले.
ती, नील वर्षाचा झाल्यानंतर, माईंकडे त्याला सांभाळायला ठेवणार होती.
माईंना दडपण आलं.
आता शेवटाचा शेवट जवळ आल्यावर परत पुन्हा मागे फिरून सुरुवात करणे त्यांना शक्य नव्हते.
एखादा निर्णय कटू वाटला तरी वेळच्यावेळी घ्यावा असं त्यांच्या मनात आलं नी त्या सावध झाल्या.
ज्ञानेश्वरीच्या पारायणाला त्यांनी त्याच दिवशी सुरुवात केळी, आता आठ दिवस दुपारचा चहा अप्पांनीच करायचा हे ठरलं होतं. सकाळीच थोडं जास्ती शिजवून ठेवलेलं जेवण अप्पा रात्री जेवणार होते. माईच्या रात्रीच्या जेवणाचा प्रश्नच नव्हता. कैक वर्ष मार्च रात्री गाद्या घालायच्या पण
पारायणामुळे गुडघे दुखतात या कारणांनी त्यांनी ते ही काम अप्पांनाच करायला सांगितलं होतं.
त्या आठ दिवसात माईचे बोलणे कमी कमी होत गेले. त्या ज्ञानेश्वरीमय झाल्या होत्या. त्यांच्या |डोळ्यासमोर संजीवन समाधी घेणारे ज्ञानेश्वर होते.
कसं ओळखलं असेल त्यांनी की आपलं कार्य संपलं म्हणून? कसं ओळखलं की आत्म्याला
देहाच्या बंधनातून मोकळं करायचं म्हणून? कुठल्या क्षणी ठरवलं की आता सगुणातुन निर्गुणाकडे
जायचं म्हणून? कुठला क्षण? कुठला दिवस? माईंना आठवलं लहानपणी वीणा परवचा म्हणताना
म्हणायची. सोमवार शंकराचा शंकराला नमस्कार, मंगळवार गणपतीचा गणपतीला नमस्कार असं
करत करत ती रविवार तो सूर्याचा सूर्याला नमस्कार असं म्हणून झालं की रडवेली व्हायची,म्हणायची माईच्या कृष्णाचा कुठलाच वार नाही. मग माई हसत हसत तिला शिकवायच्या. प्रत्येक वार कृष्णाचा, कृष्णाला नमस्कार. आजही त्यांना तेच आठवलं. प्रत्येक वार कृष्णाचा, प्रत्येक क्षण कृष्णाचा,प्रत्येक श्वास कृष्णाचा,आणि प्रत्येक आत्मा कृष्णाचा......अचानक त्यांना खडबडून जाग आली.
'होय प्रत्येक आत्मा कृष्णाचाच'....
त्यांनी ठरवलं आज.... हो आज रात्रीच...
तो त्यांच्या पारायणाचा शेवटचा दिवस होता
रात्री झोपेच्या कुशीत शांत झालेल्या अप्पांकडे त्यांनी एकच कटाक्ष टाकला .
संयम ढळवणाऱ्या त्या एका मोहाच्या क्षणालाही त्यांनी
कृष्णार्पण केले.
त्यांनी कपाटातली गोळ्यांची बाटली काढली आणि सावकाशपणे तोडात रिकामी केली.
कृष्ण म्हणतो," अर्जुना रडतोस काय?ही युद्धभूमी म्हणजे मीच आहे. शस्त्रात मी आहे. वस्त्रात मी आहे.
लढणाऱ्या प्रत्येकात मी आहे आणि मरणाऱ्या प्रत्येकातही मीच आहे."
माईंनी शांतपणे अंग पलंगावर आडवं केलं.
एखाद्या झंझावातासारखी वीणा घरात घुसली.
माईंच्या देहावर पांढरी चादर होती.
उन्मळून गेलेलं आप्पा डॉक्टरांनी दिलेल्या गोळीमुळे झोपून
गेले होते.
अनेक जण गोळा झाले होते. नात्याचे, बिन नात्याचे
बाईला काय दुःख होतं म्हणून तिने आत्महत्या केली,याविषयीची कुजबूज चालू होती.
वीणा ज्ञानेश्वरी छातीशी धरुन धाय मोकलून रडत होती. तिचा आकांत काळीज चिरत होता.
'माई माझं काही चुकलं का? मागच्या शनिवारी तर राहून गेले होते. आठ दिवस रोज फोन करत होते.
तुझं पारायण चाललं होतं म्हणून आले नाही इतकच. तुला आत्महत्या का कराविशी वाटली?
माई सांग ना तू असं का केलंस??? का केलंस????"
त्याचवेळी आकाशातला तप्त सूर्य त्याच्यात विलीन होणाऱ्या तेजाला सामावून घेत होता.
कुंडीतल्या तुळशीतल्या काळपट जांभळ्या मंजिऱ्या वायूला आपला धुंद गंध अर्पत होत्या.तरारलेल्या हिरव्याकंच दुर्वा, डवरेले गुलाब, त्यांच्या सृष्टीत नुकत्याच आलेल्या एका जीवाचं स्वागत करायला डुलत होते.
उत्तरेला,कुठेतरी शांतवत होणाऱ्या गंगेच्या काठावरच्या मंदिरात घंटा ध्वनी झाला.
आणि.....त्याचवेळी समाधिस्त ज्ञानेश्वरांच्या चेहऱ्यावर
कृष्णार्पण झालेले समाधानाचे स्मित साकारले होते.....
योगिनी श्रीनिवास पाळंदे, पुणे
No comments:
Post a Comment