Jul 29, 2021

टॉयलेट एक शेम कथा

                श्री सरस्वती प्रसन्न
                                                           *टॉयलेट-एक-शेमकथा*

ह्या व्यथेच्या-कथेची सुरवात बालपणीच एका छोट्याश्या खुणेने झाली होती. 
*ती खूण* ज्या कुणी शोधली असेल त्याला आपण मानलं बुवा!!
शून्यानंतरच्या त्या खुणेच्या आकड्याने सर्वांच्या बालजीवनात किती सुलभता आणली होती.
अगदी जेवढी *सुलभ शौचालयांनीसुद्धा* आणली नसेल तेवढी. 
शाळेत, नावडत्या तासाला वर्गाबाहेर जायची हुकमी खूण, त्या अजाणवयात मदतीला धावून यायची.
 एका करांगुलीने गोवर्धन उचलला याबद्दल वादच नाही पण तीच करांगुली एका वेगळ्याच संकटातून वाचवायला उपयोगी पडेल हे बहुधा त्या सर्वज्ञ कृष्णाला त्याकाळी माहिती नसावं.
कुणी मान्य करो वा न करो
 *हा विषय* खरंतर सर्वांच्या मनातला,आणि *तुंबळ* आठवणींचा.

नेमेची येणारी डिसेंम्बर महिन्यातली शाळेची इयत्ता-दुसरीची की तिसरीची ट्रिप.......परतीचा प्रवास......
“एक दोन तीन चार”…”परांजपे विद्यालयाची मुले हुशार” असलं काहीतरी घसा खरवडून जोरजोरात ओरडताना घशाला शोष पडला होता म्हणून *परिणामांची चिंता न करता* ढसाढसा पाणी प्यायले होते.
थोड्याच वेळात, मला अचानक *ती* जाणीव झाली.
एकतर डिसेंम्बर महिना, त्यात संध्याकाळचा गारठा.मी गरीबड्या चेहेऱ्याने बाईंकडे गेले, आणि *करंगळी* दाखवून,वाकड्या चेहेऱ्याने माझी अडचण सांगितली.
त्यावेळी बाईंनी ज्या चेहेऱ्याने माझ्याकडे पाहिलं ते मी अजूनही नाही विसरले.
“थांब ग .इथे रस्त्यात *त्याची सोय* नाहीये.आपण पोचू तासाभरात घरी.तेवढी कळ काढ.”
बाईंच्या ह्या कळदार वाक्यावर मी बाळंत-कळा तोंडावर आणून विव्हळले.
बाईंनी नाईलाजाने बस थांबवून मला माझा कार्यभाग उरकू दिला.आणि बसमध्ये चढलेल्या माझ्याकडे पाहून कोपऱ्यापासून हात जोडले.
*तो मी माझ्या आयुष्यात कमावलेला पहिला(आणि बहुतेक शेवटचा)नमस्कार!!*
ह्यात माझी काय चूक होती????
सर्व वाहनांना ब्रेक असतो,रस्त्यावर स्पीडसाठीसुद्धा ब्रेकर असतो.मग मानवी शरीराच्या ह्या बायो-ब्रेकसाठी,
जागोजागी सोय नको का???

वैद्यकशास्त्र असं सांगतं की भुकेची भावना जरूर रोखावी पण तहानेची भावना कधीच रोखू नये आणि शरीराच्या उत्सर्जनाच्या भावनाही कधीही रोखू नयेत.कारण ते  निसर्गाच्या विरुद्ध असतं.
बरं भारतासारख्या अवाढव्य पसरलेल्या देशात हजारो लाखो-किलोमीटरचे रस्ते बांधले जातात पण जागोजागी *ती सोय* मात्र नाही आणि यष्टी ष्ट्ट्यांड किंवा तत्सम ठिकाणी  सोय असते,
*पण तिथे आपण जायची सोय नसते.*
 सोय असलीच तर त्याच्या स्वच्छतेचे नियोजन नाही.पाणी नाही, सफाई कर्मचारी नाहीत.
लहानपणी कोकणात जाताना आमची अशीच पंचाईत व्हायची.
तरी बरं मे महिना असायचा.
आमच्या दहावीस भावंडांच्या फौजेमध्ये जे मुलगे असायचे ते, दरीकडे तोंड आणि लाल-यष्टीकडे पाठ करून निसर्गाचं देणं व्याजासकट चुकवायचे.
वाट लागायची ती आम्हा बहिणींची.
म्हणूनच कितीही निसर्गरम्य असला तरी, नको तो रस्त्यावरचा प्रवास अशी माझी धारणा तेव्हापासूनच झालेली आहे.बर निसर्गानेच केलेल्या स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या भेदभावामुळे स्त्रीवर्गाची किती जीवघेणी अडचण होते जी चारचौघात बोलंताही येत नाही.
लहानपणी मात्र एक सुख होतं, कुठलीही गोष्ट सांगायला संकोच म्हणून वाटायचा नाही.
करंगळी दाखवून करून तोंड वाकडं केलं की काम भागत असे.मात्र जसजसं वय वाढायला लागलं 
तसतशी *ह्या* कम्युनिकेशनची चारचौघात वाच्यता करायची लाज वाटू लागली.विशेषतः इतक्या सशक्त असलेल्या मातृभाषेतूनही *तो शब्द* कसा बोलायचा हा प्रश्नच पडे. बरं तरुण वयात खाणाखुणा तरी कशा कराव्यात?
मला आठवतंय,आमच्या सहनिवासात 
भावसरगमचा कार्यक्रम होता. पंडितजींच्यासोबत एक अतिशय ताकदीची गायिका होती.
डिसेंम्बर महिना,रात्रीच्या साडेदहाचा सुमार!! सुरांनी मंतरलेलं ते वातावरण.मध्यन्तरात त्या गायिकेला  *निसर्गाची हाक* आली. तिने आम्हा कार्यकर्त्यांना *ती सोय* कुठे होईल विचारलं. तात्पुरत्या बांधलेल्या त्या स्टेजजवळ *ती सोय* नव्हती.आम्ही तिला सांगितलं की समोरच्याच इमारतीत प्रेक्षकांपैकी अनेकांची घरं आहेत,तिथल्याच एका घरी आम्ही तुम्हाला घेऊन जातो.पण प्रेक्षकांच्या मधून *त्या गोष्टीसाठी* चालत जायला तिला विलक्षण संकोच वाटला. तिने चक्क नकार दिला,आणि त्या तसल्या अवघड अवस्थेत तिने उरलेला गाण्याचा कार्यक्रम पूर्ण केला.

मुळात अत्यंत नैसर्गिक असलेल्या ह्या गोष्टीचा संकोच किंवा लाज वाटायचं काय कारण आहे हेच समजत नाही.
का कोण जाणे पण विशेषतः बायकांना ह्याची भयंकर लाज वाटते.
मला 26 जुलैची ती काळरात्र आठवते.आम्ही पुण्यातून सगळं वार्तांकन पहात होतो.माझी भाची त्याकाळी एका कार-पूलने ये जा करायची.तिला मी सतत मेसेज करत होते.त्यांच्या गाडीत ती एकटीच महिला होती आणि बाकी सगळेच पुरुष होते.गाडी मुंगीच्या गतीने पुढे सरकत होती.पाणी कंबरेच्याही वर साठलेलं होतं. गाडीला व्हिटी पासून ठाण्याला पोचायला सात ते आठ तास लागले.गाडीत सुखरूप असलेल्या माझ्या भाचीला *त्या* अडचणीसाठी मात्र काहीही करता आलं नाही.इतर पुरुषसहप्रवासी मात्र आळीपाळीने गाडीबाहेर जाऊन आले.पण ही मुलगी इतके तास तश्या अवघड अवस्थेत कशी राहिली ते तिचं तीच जाणे.
………तासनतास एका जागी अडकून राहिलेल्या गुडघा गुडघा तुंबलेल्या रस्त्यावर एखाद्या लोकल रेल्वे,बस अथवा कारमध्ये अडकून पडलेले समस्त मुंबईकर, *त्या संकटाला* वर्षानुवर्षे कसे तोंड देतात ते त्यांचं त्यांनाच ठाऊक.
सोनोग्राफी सेंटरमध्ये अतिशय अवघडून बसलेल्या एखाद्या पेशंटला तिथल्या टेक्निशियनने आतमध्ये घ्यावे आणि आता सुटका होणार अशा आनंदात असलेल्या त्या अवघडलेल्या जीवाला *ब्लॅडर इज नॉट फुल* असं म्हणून त्याने बाहेर हाकलवून द्यावं,अशीच *तुंबळ* अवस्था असते या प्रवासी जीवांची.
मला आठवतय मी 1991 साली  जर्मनीला गेले असताना एका विकेंडला पॅरिसचा बेत ठरला.आम्ही राहात होतों ते गाव जर्मनी आणि फ्रान्सच्या सीमारेषेवरचं असल्याने फक्त रात्रभराचा बस प्रवास होता.
पॅरिसला जायचं ह्या कल्पनेने झालेला आनंद,प्रवास बसचा आहे आणि तेसुद्धा रात्रभर हे समजल्यावर,
*विविध संकटांच्या पूर्वकल्पनेमुळे* मावळला.
पण,आश्चर्याची गोष्ट अशी, की त्या बसमध्ये चक्क एक छोटं टॉयलेट होतं.आणि त्याच्या जीवावर मी तो प्रवास निर्धास्त मनाने केला.
हल्ली आपल्याकडेही लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये ती सोय असते असं ऐकलं आहे.
रस्त्यावर जागोजागी हॉटेल्स,ठेले,
टपऱ्या अशा खानपानाच्या सोयी असू शकतात तर *ही* सोयसुद्धा जागोजागी असणं आवश्यक नाही का?
इतकी अडलेली माणसं असतात.वृद्ध असतात,मधुमेही असतात,लहान मुलं असतात.सकाळी सकाळी लवकरच्या शिफ्टसाठी कंपनीच्या बसची वाट पाहणारी सुशिक्षित सुसंस्कारी लोकंसुद्धा नाईलाजाने रस्त्यावरचे आडोसे वापरतात.
आणि स्त्रियांचं तर बोलायलाच नको.
पुराणकाळापासून स्त्रियांवर अत्याचार होत आहेतच पण हा अत्याचार मात्र नक्की होतो आणि तो महाभयंकर आहे.
केवळ ह्या एका अडचणीमुळे स्त्रियांना  प्रवास करण नको वाटतं. इलेक्शनड्युटीचं संकट अनेक महिलांना अधिकच भयप्रद वाटतं.
अनेक दुर्गम भागातल्या किंवा खेड्यातल्या शाळांमधली मुलींची संख्या, ह्या एका कारणास्तव कमी असते.
राजकीय किंवा व्यावसायिक किंवा सामाजिक इच्छाशक्ती असेल तर मात्र ह्या समस्येवर तोडगा निघू शकतो.

आता राजकीय इच्छाशक्तीबद्दल काय बोलावे???बोलूच नये हे उत्तम!!
पण *व्यावसायिक इच्छाशक्तीचे* उत्तम उदाहरण म्हणजे मेट्रो.
पौडरोडला पहाटे फिरायला जाताना नजरेला अनेक ट्रक त्यांच्या सक्शन पंम्पसच्या मदतीने,कामगारांच्या सोयीसाठी तात्पुरती उभारलेली मोबाईल-टॉयलेट्स साफ करताना नजरेस पडतात.मेट्रोच्या प्रत्येक कामाच्या ठिकाणी ही मोबाईल टॉयलेट्स उभी केलेली आहेत आणि अतिशय शिस्तबध्दतेने त्यांची सफाई होत असते.आणि एका ठिकाणचे मेट्रोचे काम संपले की ही टॉयलेटस पुढच्या कामाच्या ठिकाणी नेऊन उभारली जातात.
*सामाजिक इच्छाशक्तीचं क्लासिक उदाहरण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे *निर्मल वारी* चे कार्य.
वारीच्या दिवसांत,आमच्या कामगार-संघटनेच्या वतीने आम्ही पुण्यातून एक मिनीबस करून सासवडला गेलो होतो.
माऊलींच्या दर्शनाला???
नव्हे नव्हे.निर्मलं-वारी अभियान राबवणाऱ्यांचे कौतुक करायला.
गुलाबाचं फूल, बाकरवडी-बर्फी अशी शेकडो पाकिटं आम्ही संघ कार्यकर्त्यांच्या आणि सफाई कामगारांच्या कौतुकासाठी घेऊन गेलो होतो.
वारकऱ्यांना खाऊवाटप करायला अनेक संस्था आणि राजकारणी आले होते पण ह्या कामाची जबाबदारी घ्यायला मात्र फक्त संघाचेच कार्यकर्ते ठिकठिकाणाहून आले होते.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी शेकडोंच्या संख्येने मोबाईल टॉयलेट्स उभारलेली होती.
वारकऱ्यांना हात जोडून ती वापरायची विनंती करत होते.
आणि वापरलेल्या टॉयलेट्सचे पूर्णपणे नियोजन करत होते.मोठे मोठे ट्रक भरून पाण्याच्या टाक्या आणि सक्शन पंपाद्वारे हे काम अत्यन्त शिस्तीत चालू होते.
वाटेवरच्या रिकाम्या शेतांमध्ये शोष-खड्डे खणून,जैव कचऱ्याचे रूपांतर खतात करण्यात येत होतं.

*टॉयलेट-एक-शेमकथा* ह्या कथेचा हा कदाचित मध्यन्तर असू शकतो.

पण शेवट गोड हवा असेल तर कितीतरी पातळ्यांवर,काम व्हायला हवं.
कित्येक खेड्यांमध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने वर्गणी काढून जागोजागी शौचालये बांधल्याच्या कथा ऐकल्या आहेत.पण ते पुरेसं नाही ना!!
इतका प्रचंड मोठा देश आहे.
त्याला तितकीच प्रचंड  इच्छाशक्ती आणि पैसा हवा.
इतके राजकीय पुढारी,नेते मंडळी आहेत त्यांनी जरा वाढदिवसांच्या फ्लेक्समधून आणि पुतळ्यातून बाहेर यावं आणि त्यांचा पैसा
 राज का *रण* ऐवजी सत का *रण*
 साठी वापरावा.
आणि....कॉर्पोरेटस????
कॉर्पोरेट घराणी????
अंबानी!!!अदाणी!!!!
आणि असेच कुणी कुणी??
त्यांनी घ्यावी ना जबाबदारी!!
किमान त्यांच्या सी एस आर तर्फे *होऊन जाऊदेना थोडा खर्च* 
*अन्यथा... होल वावर इज अवर आहेच...*
योगिनी श्रीनिवास पाळंदे, पुणे

 

No comments:

Post a Comment