हो म्हणाले तर हा दारात येऊन (संसर्ग घेऊन) उभाच ठाकेल अशा भीतीने मी झटकून टाकल्यासारखे त्याला सांगितले, “नाही नाही नका येऊ. नाहीयेत कपडे”
पुढच्या आठवड्यात पुन्हा त्याचा फोन आला. माझं तेच उत्तर.
त्याचा तिसऱ्या वेळेला फोन आला, तेव्हा मात्र मी विचारात पडले. बघावं तरी एकदा कपाटात असं म्हणून कपाट उघडून पहाते तो काय. 22 मार्च पासून लौंड्रि बॅग मध्ये, “आम्हाला बाहेर काढा”, असा आक्रोश करणारे ढीगभर कपडे आशाळभूतपणे माझ्याकडे पाहात होते. मला दया आली. कपड्यांची, इस्त्रीवाल्याची की माझी स्वतःची, ते मात्र कळेना.
अडीच महिने सगळेजण घरात! क्वचित कधी बाहेर जाणे होत होते. आणि बाहेरून आल्यानंतर कपडे डायरेक्ट बादलीत टाकायचे, धुवून वाळून आले कीं पुन्हा तेच बाहेर जाताना घालायचे हाच उपक्रम चालू होता.
मला एकदम आजीची आठवण झाली. कोकणातली माणसं! बोलायची वेळ आली की अगदी टोकदार बोलणे. आजी म्हणायची, “आमच्यावेळी नव्हती अशी कपड्यांची थेरं.आणि ईस्त्रीची फ्याड तर आम्हाला परवडतच नव्हती. आमच्यावेळी एक दांडीवर आणि दुसरा गांडीवर, असे दोनच कपडे असायचे”. आज मला ते आठवून हसू आले.
आज माझी तीच स्थिती होती. फक्त माझं कपड्यांचं कपाट, ओ येईतो भरलेले असूनही मला,दोन महिन्यात झुळझुळीत, नवे कपडे घालायलाच मिळाले नव्हते. आणि अगदी आजीच्याच फॉर्म्युला प्रमाणे मी कपड्याच्या फक्त दोन सेट्स वर उतरले होते. शेवटी, दोन अडीच महिन्यांनंतर आज मला कपड्यांचं कपाट उघडून पाहावं वाटलं.
प्रॉब्लेम ऑफ प्लेनटी वर्णनात बसणारं कपाट, ऑफिसला जाताना आज कुठला बरं घालावा, अशा विवंचना(?)निर्माण करणारे कपाट आज अडीच महिने अस्पर्श राहिले होते. दोन महिन्यात जेव्हा कधी ऑफिसला बोलावणे आले तेव्हा, चेहेऱ्याला मास्क लावल्यानंतर, मानेखाली कुठला का ड्रेस असेना असं म्हणत अक्षरशः अगदी बिन इस्त्रीचा सुध्दा ड्रेस घातला होता, आणि या काळात एका नवीनच विचाराचा साक्षात्कार झाला होता. "केवळ मानेवरच्या त्या चेहऱ्यासाठी, इतका उटारेटा करतो आपण????"
तुळशीबाग-बार्गेनिंग, लक्ष्मी रोड-सेल, साड्या, ड्रेस,टेलर-टेलर सोबतची फॅशन ठरवतानाची हुज्जत, हे सगळं त्या मानेवरच्या एका अवयवासाठी?
आज मास्क लावायला काय लागलो आपण, आणि मानेखालच्या सगळ्या भौतिक विवंचनाच विसरून गेलो . कपडे, त्याची इस्त्री, मॅचिंग, दागदागिने.
आणि हो चेहेऱ्याची रंगरंगोटी सुध्दा!!!!सावळ्याला उजळ करायची पावडरी धडपड,बेढबाला कमनीय करायची कापडी ओढाताण, सगळं सगळं अनावश्यक वाटायला लागलं होतं. दोन अडीच महिन्यात आरशात पाहिले सुद्धा नव्हते. चक्क एका फेस मास्क ने सगळ्या मानवजातीला, सौन्दर्याच्या(?) एकाच पंक्तीत आणून बसवले होते.
इस्त्रीवाल्याशी बोलणे चालू असताना, नवऱ्याने ऐकले. तो म्हणाला, “तो इतकेवेळा फोन करतोय तर त्याला सारखी सारखी नाही काय म्हणतेस? अगं कधीतरी ऑफिस सुरू होणारच आहे ना? बोलावं की त्याला. लाँड्री बॅग पाहिलीयेस का किती भरली आहे ती?”. आणि पुढे मिस्कीलपणे म्हणाला “की आता तेहीं काम 'आत्मनिर्भर' होऊन स्वतःच करायचा विचार आहे?”.
माझी दुःखच वेगळी होती . मी खिन्नपणे म्हटलं, “गेल्या तीन महिन्यात इकडच जग तिकडे झालं. आयुष्य पूर्ववत होणार तरी आहे का अशी शंका यायला लागली आहे? माझे इतके नवीन शिवलेले ड्रेस, नवीन साड्या यापुढे घालायला तरी मिळतील की नाही शंकाच आहे. आणि काय रे तुला कशाला हवी इस्त्री आणि तो इस्त्रीवाला?”
यावर मला थांबवत नवरा उत्तरला”तुझ्या ऑफिसच मला माहित नाही. आम्ही मात्र आता येत्या एक तारखेपासून सुरू करतोय ऑफिस? अगं किती घाबरायचं? आणि घाबरून सतत घरात बसायचं!!! आयुष्य अशा एका कोरोनासाठी थांबत नसतं.बोलावं त्या इस्त्रीवाल्याला. एरवी तो कधी आपणहून फोन करत नाही अशी तुझीच तक्रार असायची ना?”
मी म्हटलं “तीन महिने धंदा बुडलाय म्हणून लागलाय मागे. उगाच नाही सारखा फोन करते”
नवरोजीची सामाजिक बांधिलकी अशावेळी उफाळून न येति तरच नवल”. त्याला गरज आहे मान्यच आहे मला. आणि आपण त्याला काम दिलं तरच त्याचं पोट भरणार आहे हे सुद्धा मान्य आहे. पण काय ग? तुला नाहीये त्याची गरज? आणि तुला चालणार असतील तर घाल बिनिइस्त्रीचे कपडे, पण मला नाही चालणार, माझे कपडे तरी मला इस्त्री करूनच हवेत. उगाच काहीतरी वाद घालत बसते. फोन करून बोलावून घे त्याला”.
मी मुकाट्याने फोन लावला. दुसऱ्याच दिवशी तो आला. मी दारात सॅनिटायझर घेऊन उभीच होते. तो अंगावर, हातावर शिंपडून त्याला शुचिर्भूत करून घरात घेतला.
आणि जरबेच्या स्वरात नवऱ्याला म्हटलं, “एक लक्षात ठेव याने इस्त्रीचे कपडे आणून दिले की लगेच घालायचे नाहीत. कृपा करून चार दिवसाचा वेटिंग पिरियड ठेवा. कोरोना जास्तीतजास्त चार दिवस तरी राहतो ना कपड्यावर?”
या माझ्या वाक्यावर इस्त्रीवाला म्हणतो कसा, “ताई मी कपडे नेतोय पण मीच तुमच्या कपड्याना चार दिवस हात नाही लावणार. मला नाही का धोका? नेल्यानंतर चार दिवसांनी इस्त्री करणार आणि मगच आणून देणार”
बरं एवढं बोलून थांबला नाही, माझं मास्कमुळे बंद झालेलं तोंड आणखीनच बंद करत म्हणाला ”ताई भाव वाढले आहेत आधीच सांगतो तुम्हाला. आता प्रत्येक कपड्याला दहा रुपये पडतील आणि साडीला पन्नास”
मी अवाक होऊन त्याचं बोलणं ऐकत होते
तो गेल्याक्षणी मी उसळून नवऱ्याला म्हटलं”बघितलंस किती आगाऊपणे बोलला? आणि तुला या लोकांचा पुळका. भाव किती वाढवलेत त्याने ऐकलस ना?”.
“अगं, तू नाही का त्याला सॅनिटायझर लावून मगच घरात घेतलंस? तो त्याची काळजी घेणारच. आणि भावाबद्दल बोलायचं तर आता अनलॉक सुरू होतोय ना? बघच तू,सगळेजणच कसे भाव वाढवतील ते.”
मी मनात हिशोब करत होते आजच्या कपड्यात माझ्या चार सिल्क च्या साड्या होत्या ज्या मी बिना इस्त्रीच्या नेसुच शकणार नव्हते. नवऱ्याच्या फिरंगी ब्रँडच्या महागड्या शर्टची तीच कथा होती, थोडक्यात काय आजच्या सर्व कपड्यांच्या इस्त्रीची बेरीज पाचशेच्या नोटेला स्पर्श करणार होती. नवऱ्याशी कितीही वाद घातला तरी माझ्या मास्क खाली लपलेल्या चेहेऱ्या पलीकडेही असलेल्या एका चेहेऱ्याची आयडेंटिटी जपायला मला परिटघडीचे कपडे लागणारच होते, हे मी माझ्या मनाशीच प्रामाणिकपणे कबुल केले.
आज्जीचं तत्व लॉक डाउन पुरत ठीक होतं. पण आयुष्य पूर्ववत होताना मला आजीचं तत्व दांडीला टांगूनच ठेवावं लागणार होतं!!!


No comments:
Post a Comment