श्री सरस्वती प्रसन्न
अनलॉक सुरू झाल्यामुळे पहाटेचे फिरणे आता अगदी बिनधास्त सुरू झाले होते.
आजही पहाटे निघाले. सिग्नल पाशीच क्रॉसिंग सोपे व्हावे म्हणून ब्रिज बांधला आहे,अगदी लिफ्ट सकट बांधलाय तो ब्रिज. त्या लिफ्टचे उदघाटन झाल्यापासून आजपर्यंत तिला कुणीही वापरलेले मी तरी पाहिलेले नाही. नाही म्हणायला त्या लिफ्टच्या आडोशाचा उपयोग काही भिक्षेकर्यांनी मुक्काम ठोकण्यासाठी केला होता.आज मात्र ती जागा रिकामी होती.म्हणजे तिथली माणसे हलली होती,म्हणून जरा बारकाईने पाहिले.तर आश्चर्य आणि खेद अशा दोन्ही भावनांचा धक्काच बसला. त्या रिकाम्या झालेल्या जागेवर उत्तम प्रतीच्या पोळ्यांची अक्षरशः चवड होती,रिकाम्या प्लॅस्टिक च्या पिशव्या,कागदाचे खरकटे द्रोण,उष्ट्या पत्रावळी आणि भोवताली चांगल्या शिजवलेल्या अन्नाचा सडा.
अन्न खाताना शेतकऱ्यांपासून सर्वांचं कृतज्ञता स्मरण करा आणि निदान त्या कृतज्ञतेपोटी तरी अन्न वाया घालवू नका असं घरी सांगणारी मी, इथले दृश्य पाहून गोठून गेले होते.
काही दिवसांपूर्वी,अगदी त्याच जागेवर बसलेल्या एक म्हाताऱ्या बाईसोबत असलेल्या लहान मुलीने डोळ्यात पाणी आणून “ताई राशन ला पैसे द्या की”असं म्हटल्यावर मी कळवळून हातात आलेली नोट तिला दिली होती.त्यादिवशी मी रणरणत्या उन्हात ऑफिसमधून घरी परतत होते,डोक्यात कोरोनाच्या बातम्यांचा आणि अन्नांन दशा झालेल्या मजुरांच्या करुण कथांचा पूर होता. सध्याच्या संसर्गाच्या दिवसात ऑफिसमध्ये जाऊन डबा खाणे नको व्हायचे त्यामुळे मी घरी येऊन जेवणेच प्रिफर करत होते .दुपारच्या भाजून काढणाऱ्या ऊन्हात, भुकेने पोटात आगडोंब उसळलेली मी त्या वाटेवरून घरी जाताना ती छोटी पोर जवळ येऊन रेशनसाठी पैसे मागत होती. एरवी भीक देणे पटत नसले तरी त्यावेळी पैसे देणें माणुसकीला धरून होते, मनात विचार आला की आपण घरी जाऊन सुग्रास अन्न जेवणार आणि इथे तळपत्या उन्हात ही माणसं भुकेली राहणार.
आज त्याच जागेवरच्या भिक्षेकर्यांना,माझ्यासारखीच मदत कुणीतरी केलेली दिसत होती आणि फुकट मिळालेले उत्तम प्रतीचे अन्न खाऊन झाल्यावर उरलेले अन्न टाकून तिथल्या मंडळींनी मात्र मुक्काम हलवलेला दिसत होता.
पोटभर खाल्ल्यावर उरलेलं अन्न रस्त्यात तसच टाकून देववत तरी कसं,या विचारांनी प्रचंड चिडचिड झाली.
पंचवीस वर्षांपूर्वी मी अशीच चिडचिड ऋजुताला शिकवताना केली होती. ऋजुता च्या पहिली किंवा दुसरीच्या शालेय अभ्यासक्रमात एक धडा होता . गोष्ट दोन भिकाऱ्यांची होती.एक आंधळा असतो आणि दुसरा लंगडा .दोघांना एका अन्नछत्रात जायचे असते ,मग आंधळा लंगड्याला खांद्यावर घेतो आणि लंगडा त्याला वाट दाखवतो,दोघे तिथे जातात,आणि भरपेट जेवतात.
ही काय अभ्यासक्रमात शिकवायची गोष्ट आहे का? तेव्हा ऋजुताने मला पहिला प्रश्न विचारला होता “आई भिकारी म्हणजे काय?आणि त्यांना आपण जेवायला का द्यायचं असतं?” माझ्या जीवाचा संताप संताप झाला होता.इतक्या छोट्या निरागस जीवाला “भिकारी”ही कन्सेप्ट का शिकवायची? थोडक्यात काय,भिकारी असतात आणि त्यांना भिक्षा द्यायची असते,अन्नदान करायचं असतं, हे आपल्या देशात इतक्या लहान वयात शिकवले जाते. का? कशाला ?
अशा शिक्षणातून गरजवंताला मदत करायची असते हा संदेश गेला असेल पण मदत देताना डोळस पणे द्यावी,मदतीच्या योग्य प्रकारे विनियोग होतो की नाही हे तपासून बघावे हे नाही शिकवले जात ,आणि घेणारा त्या योग्यतेचा नसेल तर वेळप्रसंगी कठोर होऊन मदत न देणेच योग्य, हे सुध्दा नाही शिकवले जात.
एकतर भीक देणे हेच न पटणारे,पण कोरोनाच्या संकटात समाजातल्या अनेक लोकांनी अन्नदान केले होते,कारण “पोटाला मारू नये” ही आपल्याकडची शिकवण. पण,केलेल्या मदतीनंतरचे हे दृश्य अंगावर काटा आणत होते,आणि असंख्य प्रश्न तयार करत होते.
या लोकांना मदत करून चूक तर नव्हती ना झाली?की चूक ही होती की,अन्नदान करून झाल्यावर तिथल्या नंतरच्या स्वच्छतेची जबाबदारी देणार्याने घेतली नव्हती .
त्या जागी मी सुन्न होऊन विचार करत उभी होते. बरोब्बर त्या ब्रिज समोर मृत्युंजयेशवराचे मंदिर आहे. तिथेसुद्धा अनेक भिक्षेकरी बसलेले असतात. कोरोनामुळे “देऊळबंद” होते त्यामुळे त्या भिक्षेकर्यांना मिळणारी मदत बंद पडली होती .अशाच एका दुपारी ऑफिसमधून येताना मी पाहिलं, एक मोठी वातानुकूलित गाडी तिथे थांबली आणि त्यातून अद्ययावत कपड्यातली एक महिला खाली उतरली आणि तिने त्या सर्व भिक्षेकर्यांच्या साठी दुपारचे भरपेट जेवण आणले होते. ते दृश्य पाहून गहिवरलेल्या मला संध्याकाळी तिथेच पडलेला उष्ट्या अन्नाचा सडा बघुन असह्य त्रास झाला होता.आयते जेवायला मिळालेल्या त्या भिक्षेकर्यांनि उरलेला प्लास्टिकचा,कागदाचा आणि उष्ट्या अन्नाचा कचरा जवळच्या कचरा कुंडीत टाकायचेही सौजन्य दाखवले नव्हते.
माऊलीच्या वारीदरम्यान संघाचे “निर्मलवारी” कार्य चालते. लाखो वारकऱ्यांच्या मलमूत्र विसर्जनाचे पर्यावरणपूरक नियोजन केले जाते ते काम पाहायला मी आणि आमचा एक गट मुद्दाम सासवड येथे गेलो होतो.अत्यन्त शिस्तबद्धतेने आणि कुठलाही गाजावाजा न करता संघ स्वयंसेवक ते काम करत होते.आणि त्याच ठिकाणी अनेक श्रीमंत क्लब आणि स्वयंसेवी संस्था वारेमाप अन्नदान करत होत्या.त्याचे फोटो काढले जात होते .कौतुक केले जात.शेवटी शेवटी अन्नाचा इतका पूर आला होता की लोकं भूक नसतानाही पदार्थ घेत होते आणि जरासे उष्टावून चक्क रस्त्यात टाकून देत होते आणि त्यामुळे तयार होणाऱ्या अफाट कचऱ्याचे नियोजन करण्याची जबाबदारी मात्र कुणाचिच नव्हती.रस्त्याच्या मधोमध केळी, साबुदाणा खिचडी,राजगिरा लाडू,ग्लुकोज बिस्किटे यांचा अक्षरशः चिखल झाला होता.भरीसभर म्हणून असंख्य प्लस्टिकच्या पिशव्या आणि चहाचे अर्धवट प्यायलेले कागदी कप याचाही कचरा तयार झाला होता.ते दृश्य पाहून मन विषण्ण झाले होते.
आज ते सगळं आठवलं ,मला स्वतःचीच लाज वाटत होती. अन्नदानाचे व्हाईट कॉलर काम तर मी केले होते पण त्यानंतरच्या निस्तरपट्टीचे-साफसफाईचे ब्लु कॉलर काम मात्र माझे नव्हते!!!!!!!!!
माझ्या मनात क्षणभर विचार आला।होता की निदान ती रस्त्याच्या कडेला पडलेली पोळ्यांची चवड उचलून उपाशी कुत्र्यांना घालावी , कारण जागोजागच्या टपऱ्या आणि हॉटेल्स बंद असल्याने रस्त्यावरची भटकी कुत्री उपाशी राहात होती .अन्न वाया न जाता निदान त्यांच्या मुखी तरी लागले असते.
पण,दहा बारा वर्षे सामाजिक कामं करूनही “ते” काम करायची हिम्मत काही मला दाखवता आली नाही!!!!!!
योगिनी श्रीनिवास पाळंदे
पुणे
10/6/20
No comments:
Post a Comment