श्री सरस्वती प्रसन्न
टार्गेट
मार्च एन्ड!! हातातोंडाशी आलेलं टार्गेट.
साधंसुधं नव्हे,दीडशे कोटींची स्कीम फायनल!
जोशींबुवा खुश!
ऑफिसमधला रुबाबीथाट सोडला तर हा खरा कोकणातला जोश्याच.
पक्का जोश्या!!बायकोला डाळिंब्या सोलायला मदत करणारा.
पण कामाला,बुद्धीचातुर्याला,आणि कनविनसिंगला वाघ.
साठ जणांचा स्टाफ काय हाताळायचा बाबा.एक्ससलेंट मॅनेजमेंट!
पण कोविड आडवा आलाय!
जोशींची चुळबुळ चुळबुळ,येरझारा!!! कसही करून हातातोंडाशी आलेली मोठी स्कीम केवळ कोविडमुळे निसटून नाही द्यायची!
खूप घाईघाई केली,स्टाफला आमिष दाखवून जास्तीचं काम सुद्धा करवून घेतलं होतं!
कलेक्टरचं सर्क्युलर उशिरा येवो अशीं प्रार्थना करत असतानाच आमंत्रण आलं.
सिनियर मोस्ट मॅनेजरका बुलावा आ गया. स्टाफ फॉर्म्युलाचा निरोप असणार.
जोशा कोकणी-शिव्या मनातल्या मनात घालत लिफ्टपाशी उभा होता.
घरी जायला निघालेल्या स्टाफला थांबवून ठेवायला लागलं होतं.
सासरेबुवांनी कलेकटरचा आदेश नाचवला.
उद्यापासून कंपलीट लॉकडाउन!
हाय रे दुर्दैवा!!!
“साहेब स्कीम पूर्ण झाली आहे फक्त फायनल डॉक्युमेंटेशन बाकी आहे.ते सही झालं की दीडशे कोटींचा चेक आपल्या काउन्टरला जमा होईल.तेवढी दोनतीन दिवस स्टाफला बोलवायची परवानगी द्या”
“नथींग डूइंग,जोशी मी रिस्क नाही घेऊ शकत.टार्गेट नाही झालं तरी चालेल,इथे जर इश्यू झाला आणि चॅनेलवाले वगैरे आले ना तर तू गाळात जाशील नि सोबत मलाही घेऊन जाशील. परमिशन नॉट ग्रॅंटेड”
जोशा चडफडला “याची रिटायरमेंट आहे ना साल्याची म्हणून मला दाबतोय. ह्याचं पुढचं प्रोमोशन असतं तर हेच वाक्य बोलला असता का?”
बॅक टू डिपार्टमेंट गेल्यावर सगळा स्टाफ डोळे मोठे करून वाट पाहात होता.
“उद्यापासून सुट्टी!!!!वर्क फ्रॉम होम”सांगून टाकलं, आणि डोक्याला हात लावून बसला.
डोळ्यासमोर दीडशे कोटींचा चेक डिस्को करत होता!
डोळे मिटून,मान टाकुन जोशा अर्धातास तरी बसला होता..
इतक्यात कुजबुज कानावर आली, त्याने डोळे उघडले. केबिनबाहेर न्यू बिझनेस डेस्कच्या चौघी रेंगाळत होत्या.”साहेब येऊ का?”
“अरे विचारताय काय?या की.बसा बसा. बोला”
“सर,आपली नवीन स्कीम फायनल व्हायच्या आधीच लॉकडाउन लागला, खरंतर या चार दिवसात पूर्ण झाली असती ना हो?”
जोशा कळवळला. या पोरींना समजतंय ते त्या सासऱ्याला समजत नाहीये,म्हणे चॅनेलवाले इश्यु करतील.
“होय,तोच विचार करतोय मी.काय करता येईल आपल्याला?
या स्कीमसाठी तुम्हीं सगळे किती मेहेनत घेत होतात,आणि घास तोंडाशी आल्यावर….......”
”सर,आमचं जाऊदे,पण तुम्ही चार्ज घेतल्यापासून काम करायला मज्जा यायला लागली होती,कैक वर्षात पूर्ण न झालेलं टार्गेट यावर्षी तुमच्या स्किलमुळे पूर्ण झालं असतं.आम्ही एवढंच सांगायला आलोय की आपल्याला काही स्पेशल परमिशन मिळाली तर आम्ही चौघी ऑफिसला यायला तयार आहोत.”
जोशा रडायचाच बाकी होता!!!!! कसला कमाल स्टाफ होता!!
या स्कीममुळे त्यांना तसा वेगळा फायदा नव्हताच.त्यांची महिन्याच्या पगाराची फिगर, या स्कीममुळे बदलली नसती.जोश्याला मात्र तुफान इंसेंटिव्ह मिळणार होता.
दीडशे कोटी पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर थैमान घालायला लागले! त्या चौघीजणी उठून गेल्यावर तासाभराने सगळं वाईंडअप करून निघायला दोन तास तरी गेले.
बायको,मुलं कुणाकुणाकडे त्याचं लक्ष नव्हतं.गेल्यागेल्या टीव्ही समोर जाऊन बसला.
घरचे सर्द, हा आणि टीव्ही????
आणि त्याला अपेक्षित असलेली बातमी झळकलीच,त्याने डोळे बारीक करून खात्री केली आणि टाळ्याच वाजवायला लागला.
कोरोनाच्या बातम्या पाहताना टाळ्या वाजवणारा तो वेडाच वाटला
घरच्यांना.
आणि त्याला अगदीच अपेक्षित असलेला सासर्याचा फोन दहाव्या मिनिटाला आला!
“जोशी,आपल्याला इसेन्शियल सर्व्हिस कॅटेगरीमध्ये टाकलंय. मला आपल्या मुंबईहुन इ डी चा फोन आलाय, टार्गेटला काही कोटी कमी पडतायत.आणि बिलिव्ह मी, जोशी फक्त आपल्यामुुळे झोनचं टार्गेट अचिव्ह होणारे,रडतखडत नाही तर सुपर ड्युपर फिगरने.सो,परमिशन ग्रॅंटेड, तुझ्या स्टाफला तू बोलावू शकतोस.मला क्यू-आर कोड मिळालाय,तुला पाठवतो,पोलिसांनी अडवलं तर दाखवायला लागेल.”
हरखलेल्या जोशाने त्या चौघीना फोन लावले.
कुणाला,कुठे पिकअप करायचं याचि ठरवाठरवी झाली.
बायकोला एव्हाना अंदाज आला होता.
जोशाला एक्सईटमेंटमुळे झोपच लागेना.कधी उठून ऑफिस गाठतोय असं झालेलं.
सकाळी निघताना बायकोने त्याच्या हातात सहा जणांचा इडली चटणीचा नाश्ता,कॉफीच्या थर्माससकट ठेवला.
जोशाने भुवया उंचावल्या ”पिकनिकला नाही चाललोय”
बायकोने सणसणीत चपराक दिली”तुम्हाला कळतंय का?कॅन्टीनवाला, वडापाववाला,झालंच तर तुमचं ते हॉटेल श्रावण सगळे लॉक झालेत.एक घोट चहासुद्धा आजपासून मिळणार नाहीये.”
च्यायला,वाटते त्यापेक्षा ही भलतीच स्मार्ट आहे राव!!
निघताना मिस्कीलपणे म्हणाली “संध्याकाळी ओवाळणीचं तबक तयार ठेवते.”
जोशा थम्ब रेज करून बाहेर पडला.
रस्ता सगळा निपचित होता,ती मरण शांतता नको वाटली,आजतरी कसं प्रसन्न असायला हवंय आपण.
दोघींना पिकअप केलं,त्यांना ऑफिसला ड्रॉप करून त्यांना कामाच्या इन्स्ट्रक्शन्स देऊन, उरलेल्या दोघींना घ्यायला तो पुन्हा बाहेर पडला
सायराच्या गल्लीच्या तोंडाशी गाडी अडली,अरुंद गल्ली आणि तोंडाशीच सगळीकडे पत्रे ठोकले होते आणि पाच सहा मास्कधारी पोलीस खुर्च्याच मांडून बसले होते.जोशानी बाहेर नजर टाकली,तिथे चिकटुनचिकटुन असलेल्या बैठ्या घराकडे पाहताना त्याला जरा वेगळंच वाटलं,बाजूलाच एक मशीद होती, मशिदीपलीकडे दाट वस्ती असलेल्या बैठ्या चाळी पसरल्या होत्या.
सायरा इथे राहते?
“सर,तुम्ही इथेच थांबवा गाडी,मी सायराला फोन लावून तिला बाहेर बोलावून घेते.” मागच्या सीटवरून विनी म्हणाली.
पाचव्या मिनिटाला सायरा बाहेर आली,हातात ऑफिसच्या पर्सशिवाय एक मोठी बॅग होती,बाहेर पडताना तिला पोलीसांनी हटकले.
जोशा सटकलाच होता.हे साले का अडवतायत तिला?
सायरा,आजच्या कामाची मास्टर होती,उरलेल्या तिघी कामाला बेस्टच होत्या पण मेन रोल सायराचा, डॉक्युमेंटेशन मास्टर होती ती.
कुठलीही स्कीम फायनल करण्याआधी,यापूर्वीचे सगळे मॅनेजर आणि अर्थात आता जोशासुद्धा तिलाच बोलावून घ्यायचे.
तिच्या तीक्ष्ण नजरेतून कुठलाही लीगल पॉईंट सुटत नसे.रेफरन्स बुक हातातही न घेता ती एकेक कागद चावून(वाचून)काढायची.
पोलिसांना क्यू आर कोड दाखवायला लागणार असं वाटून गाडीबाहेर पडणार इतक्यात हसत हसत सायरा आली.
”सॉरी सर आपको रुकना पडा.अरे ये पुलीस छोडने को तय्यार नहीं.”
मागच्या सीटवर त्या दोघी डिस्टन्स ठेवून मास्क लावून बसल्या,आणि गाडी सुटली.
“सायरा पोलीस तुला का अडवत होते?”
“सर,तोच प्रॉब्लेम तुम्हाला सकाळी फोन करून सांगणार होते. पण नवरा म्हणाला कशाला सकाळी सकाळी साहेबाना टेन्शन देते.म्हणून फोन नाही केला"
“मला जरा समजेल असं सांग ना, माझं डोकं त्या स्कीमच्या विचारांनी आधीच आऊट झालंय.”
“सर माझ्या बिल्डिंगमध्ये एक कोरोना पॉझिटीव्ह निघालाय,मला हे कळेचना की आता ऑफिसला येऊ कशी? सगळं सील केलंय. पोलिसाने म्हणून तर अडवलं मला.त्याला काहीतरी सांगून मी पटवलंय पण आता प्रॉब्लेम असा आहे की एकदा संध्याकाळी मी घरी गेले तर मात्र मला पुन्हा बाहेर सोडणार नाहीत.”
“सायरा, पण स्कीमचे डॉक्युमेंटेशन एक दिवसात कसं पूर्ण होणार? रात्री थांबूनसुद्धा पूर्ण होणार नाही. कमीतकमी दोन दिवसांचं तरी काम आहे ते.मग कसं करणार आपण?आणि तू आली नाहीस तर सगळं बोंबललं म्हणून समज.”
“सर,माझ्या नवऱ्यानेच मला आयडिया सांगितली,म्हणून तर मी तीन दिवसांच्या कपड्यांची बॅग घेऊन आले आहे.आता एखाद्या हॉटेलात राहायची माझी सोय मात्र करायला लागेल.कारण आता मी घरी नाही जाणार"
जोशाच्या डोक्याला मुंग्या आल्या!
इतक्या मेहेनतीने ही स्कीम मिळवली होती,शेवटच्या क्षणी लॉकडाउन लागला,मग तो सासरा स्टाफला बोलवायची परवानगी देणार नाही म्हणाला,मग इसेनशिअल सर्विस म्हणून परवानगी देतो म्हणाला,
आणि आता घास तोंडात पडायच्या क्षणी सायराची बिल्डिंग सील झाली होती.दैव बलवत्तर म्हणून ती हिम्मत करून बाहेर तरी पडली होती.
नाही नाही,ते काही नाही,हिची बाहेर राहायची सोय करायलाच हवी,कारण एकदा घरी परत गेली की बिल्डिंगच्या सीलमुळे आणि कर्फ्युमुळे अडकली तर वाट लागेल.
कमीतकमी तीन दिवसांचं सायरास्पेशलपेपरवर्क बाकी होतं,ज्या नंतरच चेक ऍक्सेप्ट होणार होता.
ऑफिसात त्या दोघीना नेऊन टाकल्यावर, त्याकंपनी सोबत फोनाफोनी चालू झाली.त्यांच्या साईडने पेपर देऊन झालेलेच होते,ते सायराच्या दृष्टीने क्लिंअर झाले की त्यांचा माणूस चेक घेऊन येणार होता.
टार्गेट कंपलिशन वाला चेक!!
चौघी फाईलींमध्ये डोकं खुपसून बसल्या होत्या,मधूनच कुठला कुठला डेटा,अपलोड सुद्धा करत होत्या!त्यांना इडली-चटणी, कॉफी प्यायला लावून,जोशा येरझारा घालतोय.
स्कीमच्या बार्गेनपलीकडचे ऍडमिनवाले काम सुरू झाले की,याच्या हात पाठी घेऊन फेऱ्या,हे नेहेमीचेच होते.
पण आज इथवर सगळं येऊन सायराच्या रात्रीच्या राहण्याचं काय,या भुंग्याने डोकं पोखरायला सुरवात केली होती.
जोशाने काँटॅक्टमधले काही नम्बर फिरवून हॉटेलची चौकशी केली.सोय होणार होती.दोन तीन ठिकाणी कन्फर्मेशन मिळालं होतं. म्हणजे खरंतर प्रश्न सुटला होता.
पण जोशा अस्वस्थ होता.सायराला एकटीला हॉटेलमध्ये ठेवणं बरं दिसलं असतं का?
तिच्या नवऱ्याने, तिला परवानगी दिली होती हेच खूप होतं.
त्याच्या विश्वासाला पात्र ठरायला हवं!
दुसरी कुणी असती तर या उरलेल्या तिघीनी स्वतःच्या घरी रात्री राहायला हसतहसत नेलं असतं.
सायराच्या नकळत त्या तिघीना वेगवेगळ गाठून थेट विचारूनही झालं होतं, कुणीच नाही म्हणालं नव्हतं, पण प्रत्येकीच्या घरी सासू,सासरे. नाही म्हटलं तरी जुन्या विचारांचे.
आणि सायरा सुद्धा फारच धार्मिक,नमाज पठण वगैरे सगळं रोजच्यारोज करणारी.
तीन दिवस कसं जमायचं???????
एकतर त्या सगळ्या,लॉकडाउन असूनहि आपणहून यायला तयार झाल्या होत्या,त्यात,कुणीतरी सायराला घरी न्या हा प्रस्ताव मांडायचा म्हणजे !!!!
शेवटी भार्याशरण जायचे ठरवलं, तशी ती स्पोर्टिंग आहेच.
लावला फोन,तिला वाटलं टार्गेटचा चेक मिळाला की काय!!
तिला हताशपणे सगळा प्रकार सांगितला
”अहो त्यात काय ?येउदे की तिला आपल्या घरी”
तिनताड उडालाच जोशा. “आपल्या घरी?”
“त्यात काय झालं? अहो फक्त एकदा तिच्या नवऱ्याच्या कानावर घाला बरं का.नाही ती माणसं जरा वेगळ्या विचारांची असतात ना.
निर्जळी हरताळका करणारी जोशीण स्मार्ट स्क्वेअर निघाली.
सायराशी बोलून झालं,तिच्या नवऱ्याला लगोलग फोन लावला.भलताच समजूतदार होता.
“आपके घर रहेगी ना,मुझे कोई दिक्कत नाही. लेकीन एक बात ध्यान मे रखो…”
जोशा टरकला,आता काय??????
“वो,टार्गेट कम्प्लिट होने के बाद पार्टी करोगे तो हमे भुलना नही”
जोशा चारिमुंड्या चीत!!
आधी बायको आणि आता सायराचा नवरा.
दोन दिवस कामाच्या धुमशचक्रीचे.
घरी यायला रात्रीचे दहा.
मान मोडून काम.
सायरा नमाजासकट मुलांच्या रूममध्ये छानपैकी ऍडजस्ट झालेली.
आज शेवटचा दिवस,दुपारी बारा वाजता चेक डिपॉझिट होणार.
मग चेअरमन आणि इ डी सोबत झूम कॉल,अर्थात लॉक डाउन मध्ये येणाऱ्या स्केलेटल स्टाफसोबत!
देवाला नमस्कार करून,बायकोला सांगून,सायरा आणि तिची बॅग घेऊन जोशा निघाला.
जोशींणबाईंनी सायराच्या परवानगीने कपाळाला हळदकुंकू लावून हातात ड्रेस मटीरीयल सुद्धा ठेवलं.
सायरा थक्क!!
जोशा पाहतच राहिला.साला कुठल्या मटेरियलची बनली आहे बायको,
इतक्या वर्षात हिला ओळखलच नाही आपण.
बारा वाजता चेक आला.
एरवी किती कौतुक झालं असतं. वाजतगाजत,फोटो च्या क्लिक्लिकाटात सासऱ्यांने जोशाला पेढासुद्धा भरवला असता,
च्यायला आज त्या कोरोनामुळे काय वेळआलीये.
सेलिब्रेशनला मोजून सहा माणसं.
झूम कॉल झाला कौतुकाचा,पण रुखरुख लागूनच राहिली जोशाला.
आजवरच्या परफॉर्मन्सला चार चांद लागलेले. खडतर टार्गेट पूर्ण झालं पण काहीतरी कमीच वाटतंय बुवा.
बाहेर त्या चौघीजणी,सिस्टीम आणि मशीन बंद करून निघायच्या तयारीत आणि जोशा केबिनमध्ये,आपल्याला पाहिजे तेवढा आनंद का होत नाहीये याच विचारात,डोळे मिटून ध्यानस्थ!!
इतक्यात बायकोचा मास्कधारी लाऊडस्पीकर वाजला.
जोशा आश्चर्य-चीत!!!
“अहो बाहेर या, आम्हालासुद्धा सेलिब्रेट करूदे की”
बायको ऑफिसमध्ये किचनच्या सहजतेने…...
फॉर्मलिटी वगैरे भानगडीत नाही पडत ती.
मागून सायराचा नवरा माजीद,बाहेर हल्लकल्लोळ!!
साजूकतुपातल्या, प्रसादाच्या शिर्याचा सात्विक केशरभरला वास..
जोशा केबिनच्या बाहेर.
“काय ग, तू कशी आलीस? रिक्षा बंद आणि बाहेर कर्फ्यु असताना?”
“अहो हे माजिदराव आले मला न्यायला(कपाळाला हात!! माजिदराव म्हणे)”
सायरा आणि बायको संगनमताने खुदूखुदु हसतायत. आपल्याला वेडं करायचे उद्योग आहेत हे.
सकाळी सायरा किचनचा ताबा घेऊन बायकोच्या सूचनेप्रमाणे प्रसादाचा शिरा बनवते.आणि सायराच्या रेसीपीने बायको केक करते,टार्गेट-सेलिब्रेशनकेक!!!!
बाहेर सगळे उभे आहेत,माजिदने टेबल सॅनिटाइझ करून मधोमध घेतलंय,त्याने कुठूनतरी उत्पन्न केलेल्या गुलाबाच्या फुलांनी टेबल सजवलं आहे, टेबलवर एकीकडे साजुक शिरा आणि एकीकडे सेलिब्रेशन केक.
“थ्री चिअर्स टू द टार्गेट अचिवमेंट बाय जोशीसर” सगळे एकत्र ओरडतात.
जोशाच्या हातात सुरी आणि डोळ्यात डबडब पाणी!!!!!!!!!!
योगिनी श्रीनिवास पाळंदे
पुणे
योगिनी, व्यक्तिरेखा आणि प्रसंग अगदी डोळयांसमोर उभा करतेस
ReplyDeleteअप्रतिम लेखन कला
अप्रतिम!����
ReplyDelete