श्री सरस्वती प्रसन्न
जिवती
ताजा कडक लॉकडाउन.
दिवसक्रमांक एकशे-छत्तीस.
सुनसान रस्ते,गायब झालेली वर्दळ!
एखाद्या भयपटाचा अदृष्य थरार!
कोरोनाचा श्रावण-स्पेशल कहर!!
हा कसला श्रावण?
देव्हाऱ्यात चिकटवलेला कागद!!
देऊळ बंद!!
शिवामूठ नाही,लघुरुद्र नाही
मंगळागौरी नाहीत
जिवतीची सवाष्ण सुद्धा नाही
ऑफिसात शुक्रवारची चणे नाहीत
गेल्याच आठवड्यात ऑफिसचा वॉचमन पॉझिटिव्ह निघाला
पुन्हा एकदा सगळ्यांना घरी बसवलय.
आज अगदी मस्ट वालं काम आलंय
त्यामुळे मोजून पाचजणींना
ऑफिसचे खास निमंत्रण आहे.
काय अडलंय तुझ्याशिवाय या घरच्यांच्या प्रश्नापुढे मी निरुत्तर!
एरवी जिथे शंभर लोकांचा वावर तिथे फक्त पाच लढवय्या!
कुणीकुणाशी बोलत नाही,मास्कधारी अबोला!
इतक्यात ती अवतरते!
हातात इन्शुरन्स पेपर्सचा मोठा गठ्ठा!
मला गळ घालते(की गाळात घालते?)
“मॅडम, सगळ्या रीकवायरमेन्ट पूर्ण केल्यात.माझे पेपर कम्प्लिट करून द्याल का?”
मी काम संपवायच्या घाईत.
आत्ता ही कुठे तडमडली?तेसुद्धा मोठा किचकट केसेसचा गठ्ठा घेऊन!
काही नडलय का जीव धोक्यात घालून इथे यायचं? कोविडच्या टेन्शनमध्ये अधिकच भर.
मृत्यूभीतीमुळे आलेली इन्शुरन्स-लाट
हिच्या हातातल्या गठ्ठ्यात पोचलेली!
घाबरलेली तमाम जनता!
इन्शुरन्सएजंटला फोनवरून निमंत्रण.
कसेही करून या आणि इन्शुरन्स पेपर पूर्ण करून घ्या!
हिचे सगळे पेपर म्हणजे,कामाचा जास्तीचा एक तास प्लस जोखीम आणि टेंशन सुद्धा
नको झालंय ते टेन्शन मला.
मी वातावरण सैल करते.
“काय स्मिता तुझी अस्मिता का झालीये?जरा हास की.”
माझा जोक अगदीच फालतू,
न हसणेबल असतो.
माझ्या प्रत्येक फालतू जोकला आवर्जून हसणारी स्मिता आज मात्र उदासलेली!
मी तिला पुन्हा उचकवते “ए रेड झोन कशाला आलीस ग आम्हाला त्रास द्यायला?.गपचूप घरी बस ना”
आता मात्र तिच्या डोळ्यात श्रावण धारा,
मास्क असला तरी त्यावरचे डबडबले डोळे दिसतात मला!
“काय ग? काय झालं?”
ती नुसती मान हलवते.
“मॅडम माझे पेपर्स ….एकदा चेक तरी करा……”
मला तिला जास्त त्रास द्यावासा वाटत नाही
शेवटी पेपर घ्यायला माझे हात पुढे होतात.
ती सतर्क!!!!!!
चटकन बाजूच्या सॅनिटायझरचा अभिषेक पेपरवर करते
आणि माझ्या हातावरही.
गरीबघरची असली तरी डोक्याने तल्लख.
पेपर वर्क, मशीन वर्क सगळं उत्तम जाणते.
बड्या इन्शुरन्स एजंटचा उजवा हात.
त्याची ऑफिसातली सगळी कामं झटझट उरकते.
चेष्टा मस्करी तर अखंड ,
पण आज हे काहीतरी वेगळंच,
नक्की काय झालंय हिला?
कोरोना स्पेसिफिक डिप्रेशन?
हल्ली जिथेतिथे डिप्रेशन आहे.
जीवनरस शोषून घेतलेली उदासी.
तिचा चेहेरा ओढलेला ,डोळ्याखाली अशक्त काजळी,
हातापायाच्या काड्या,सगळ्या दिशांनी खपाटलेलं शरीर.
“बोल बाई पटकन,”असं मी मनात म्हणते
आणि तिच्याकडचे पेपर्स चेक करते.
सगळे ओके असतात.
मी पेपर पाहताना ती माझ्याकडे एकटक पाहात असते.
तिला काही बोलायचंय का?
मला आता सगळा ताण असह्य होतो.
सकाळी टिव्हीने कोकलून दिलेल्या मृत्यूच्या बातम्या,
मग आलेला ऑफिसचा फोन,
घरातुन मी निघताना झालेली कटकट,
कोविड सरंजामासकट निघताना आलेलं मणामणाचं ओझं,
रस्त्यात पोलिसांची उलट तपासणी.
बंद ऑफिसमध्ये शिरल्यावर डोळ्याला टोचणारे अस्वच्छ कुबट कोपरे
आणि आता ही बया.
डबडबलेल्या डोळ्यांची!!!!!!!!
पेपर्स कम्प्लिट करून झाल्यावर मी त्या पेपरवर ओकेवाले शिक्के मारते.
आणि तिला पुन्हा टोचते,
”ए रेड झोन,तू खडकीला राहतेस ना?
रेड झोन डिक्लेअर झालाय ना?मग तू कशी आलीस?
त्रास नुसता,केवढं काम मला देऊन ठेवलंयस”
ती इतकी स्मार्ट,की
पेपर पूर्ण झाल्यावर
मी हे वाक्य बोलतेय
याची खात्री झाल्यावर,
भळभळ बोलत सुटते!
“मॅडम सारखं सारखं रेड झोन नका म्हणू!
इथल्या साहेबांनी ऐकलं तर मला इथे येऊ देणार नाहीत.
आणि मी ऑफिसला आले नाही तर आमच्या साहेबांचं काम कसं पूर्ण होणार?मला ऑफिसात यायला आवडतं!
घरात सासू खूप त्रास देतेय ,घरी बसणं नको झालंय."
“अगं पण आत्ता तुझं इथे येणं धोक्याचं नाही का?एकतर पब्लिक ट्रान्सपोर्टने येतेस.”
“मॅडम,माझ्या साहेबांनी तिन्ही महिन्यांचा सगळा पगार दिला,
त्याशिवाय सोनूच्या दहावीच्या क्लासची अर्धी फी सुद्धा दिली.
मग मी त्यांचं काम नको का पूर्ण करायला?”…….
“अग मुलीच्या फी चं तुझा नवरा काहीच नाही का ग बघत?”
“मॅडम,फी चं काय बोलताय?गेले तीन महिने घरखर्च सुद्धा सगळा मी एकटी करतेय.
लॉकडाउन मध्ये घरी बसलाय तो.
त्याला कामावरून कमी केलंय.
सध्या फक्त टीव्ही पाहतो आणि मोबाइल हातात घेऊन बसलेला असतो.
सासू त्याला काही बोलत नाही ,पण राग माझ्यावर काढते
त्यांच्या तिघांच्या गप्पा चालतात आणि सतत खायला मात्र मागत असतात.”
खोल गेलेल्या आवाजात तिची घरघरकी कहानी!!!
हे तर घरोघरी होतंच की,
सुशिक्षित घरातही हातावर हात घेऊन बसलेले,
घरकामात मदत न करणारे पुरुष होतेच.
पण म्हणून हिच्यासारखं कुणी खपाटीला नव्हतं गेलं.
उलट लॉकडाउन आम्हा सगळ्यांच्या अंगोपांगी बहरला होता.
माझी चेष्टा ”मग?काय काय खायला घातलंस नवऱ्याला ?
आणि तू अशी फिकुटलेली का ग?
त्यांच्यासाठी करतेस ते तू नाही का स्वतः खात?
प्रतिकार शक्ती चांगली लागते माहिती आहे ना??
चांगली खातपीत जा बाई.हळद दूध वगैरे पी.”
“मॅडम,सकाळपासून झाड-लोट,
सगळ्यांचे कपडे हाती धुवायचे,
भांड्यांचा ढिगारा घासायचा.
त्यानंतर नाश्ता आणि स्वैपाक!!!!
सगळं झाल्यावर मी खायला बसले
की सासू समोर येऊन बसते
माझ्या जेवणाच्या ताटाकडे पाहात बसते.
मग मला नाही जात जेवण.
ती समोर आली की मी अर्धवट खाऊन, तशीच उठते!!"
“सासू,कामाला जरा तरी मदत करते की नाही ग?
अग तू एवढी राबराब राबतेस घरासाठी कमावतेस मग करावी की तिने थोडीतरी मदत.”
या प्रश्नावरचं तिचं हसू
रडण्यापेक्षा जास्त वेदनादायी असतं.
“उठल्यापासून बाजेवर बसते
आणि सारखी बडबड करत राहाते.
घर तिच्या नावावर आहे ना.
कामाचं काय घेऊन बसलात,
तोंड बंद ठेवलं तरी पुष्कळ झालं.
मॅडम सोनूची दहावी आहे. शाळा,क्लास सगळा अभ्यास ऑनलाईन चालतो,
मग तुम्ही सांगा घरात शांतता नको का?
मला खूण करून म्हणाली “एक गंमत दाखवू का?उठा माझ्यासोबत जरा या पलीकडच्या हॉलपर्यंत”
मी मुकाट्याने तिच्यामागे चालत जाते.
पाहाते तो ऑफिसच्या त्या पूर्ण रिकाम्या असलेल्या हॉल मध्ये
सोनूचा ऑनलाइन क्लास चाललेला असतो.
तिच्या चेहेऱ्याचा मास्क अर्धवट खाली आलेला असतो,
बाजूला बाटलीत हळद दूध असतं,
सासूच्या नकळत आणलेलं!!
सोनूची त्वचा तुकतुकीत असते.
मशागत केलेल्या पिकासारखा चेहेरा टपोरलेला असतो.
ही बया पोरीला शांततेत अभ्यास करता यावा म्हणून तिला इथे रोज घेऊन येते?
प्रवासाचा रिस्कसुद्धा घेते?
स्वतः अर्धवट खाऊन पोरीला भरपेट जेवण देत असणार,हे दिसतच होतं.
“मी आणि सोनू एकच स्मार्टफोन वापरतो
इथे तिला शांतता मिळते
आणि माझा फोनसुद्धा वापरता येतो
मॅडम दोन दोन स्मार्टफोन परवडत नाहीत हो”
सोनुकडे पाहताना तिच्या डोळ्याला जिवती पान्हा फुटतो.
मला अचानक श्रावण-साक्षात्कार होतो
रात्री जेवताना,
माझा पहिलाच घास अडतो.
तिचा शुष्क चेहेरा,करपलेलं शरीर
आणि ओढलेले डोळे मला टोचायला लागतात.
माझी टर्न नसतानाही मी शुक्रवार मागून घेते.
श्रावणी शुक्रवार
जिवतीचा शुक्रवार
पहाटे लवकर उठून केर,लाद्या,भांडी,
आणि पुरणाचा स्वैपाकसुद्धा शिजतो!!!
आज मी उपास करायचं ठरवलंय .
आदल्या दिवशी आणून ठेवलेल्या सामानाची पिशवी आणि पुरणाच्या साग्र-संगीत जेवणाचा डबा मी अदबशीरपणे भरून घेते.
सासुचे फोनवर जिवती-गॉसिप चालू असतं.
”लॉकडाउन मध्ये ऑफिसला जायचं काही नडलाय तरी का?आम्ही आमच्यावेळी आम्ही रजा घेऊन शुक्रवारची सवाष्ण घालायचो.
हल्ली मी बोलणं सोडून दिलंय. करा काय हवं ते………"
असलं काहीबाही कानावर पडत असतानाच,यशस्वी दुर्लक्ष करत मी बाहेर पडते.
हातपाय उपाशी लटलटत असतात,
हातात दोन वजनदार बॅग्स असतात.
पण मी एकदातरी तिचा-वाला अनुभव घेणार असते.
उपाशीपोटी काम,अजिबात जाणीव न ठेवणाऱ्या सासूची कटकट,त्यानंतर ऑफिस!
सामान स्कुटरवर अडकवून मी स्टार्ट मारते.
वाटेत अडवणाऱ्या पोलिसाला आदराने माझं आयकार्ड दाखवते.
ऑफिसात त्या रिकाम्या हॉल मध्ये मी डोकावते.
आजही सोनूचा ऑनलाइन क्लास चालू असतो.
आणि बाजूच्या टेबलवर डोकं टेकवून,
तिचा अर्धपोटी थकला देह, निद्राग्लानीमय झालेला असतो.
मी पिशवीतून ताट,वाटी,भांडं काढते,
पुरणपोळीच्या जेवणाचा सगळा श्रावणी सरंजाम मांडते,
ताटाभोवती रांगोळी,उदबत्ती,सगळा थाट उडवते.
तिला हळूच हलवून उठवते.
तिचे विस्मयाने उघडलेले डोळे, प्रेमाने भिजतात.
मी तिच्या हातात गजरा देते,कुंकू लावते आणि तिला जेवायला लावते.
त्यादिवशीची जिवतीची ओटी मी मास्क,सॅनिटायझर,खजुर,राजगिरा
लाडू,चिक्की,सफरचंद या सगळ्यानी भरते.
आणि साडीच्या जागी सोनूच्याक्लासच्या उरलेल्या फीचं पाकीट तिच्या हातात कोंबते.आणि वाकून तिच्या पायाला हात लावून नमस्कार करते.
ती संकोचाने कशीनुशी होते
पण शेवटी लखलखीत हसते .
कोरोनात हरवलेला माझा श्रावण मला या जिवतीच्या रुपात सापडलेला असतो.
साठा उत्तराची तिची जिवती कहाणी लॉक डाउन नगरीत सुफळ संपूर्ण होणार असते......
योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे
सुंदर
ReplyDeleteकहाणी सफल सुफळ संपन्न होवो..
सर्वांना इच्छित फल प्राप्त होवो
योग अप्रतिम साधला आहे.
ReplyDeleteओघवती उत्सुकता वाढवत नेणारी शैली आणि कथा बीज सारंच उल्लेखनीय
कथालेखनाचं मर्म तुला छान सापडलंय..दिवसंदिवस तुझ्या कथांचा वृक्ष असाच बहरत जावो...आणि आणखी रसाळ,मधुर फळांचा आस्वाद घेता येवो...
ReplyDeleteखूप सुंदर लेख.. श्रावणी शुक्रवारी देवीचे दर्शन घडवलेस
ReplyDeleteफारच सुरेख लिहिले आहेस. It has come from your heart.
ReplyDeleteफारच सुरेख लिहिले आहेस. It has come from your heart.
ReplyDeleteफारच सुरेख लिहिले आहेस. It has come from your heart.
ReplyDeleteसुंदर! आपल्या प्रथांमधलं नेमकं मर्म मांडलंस. 'ती', तिची सोनू आणि तिची भरलेली ओटी सगळं दृश्य डोळ्यांसमोर उभं केलंस.
ReplyDelete