Jun 14, 2020

बर्वे आजी आणि लॉक डाउन

    पहाटे पहाटे बर्वे आजींना कोकिळेच्या आवाजाने जाग आली! जाग आली की धडपडून लगेच उठायचं नाही. काही क्षण स्वतःच्या शरीराला द्यायचे हा डॉक्टर नि सांगितलेला नियम त्या आवर्जून पाळायच्या.
 त्यांनी डोळे बारीक करत घड्याळाकडे पाहिलं .तो काय, फक्त पहाटेचे साडेतीन वाजलेले होते. आज्जी ज्याम वैतागल्या.
 या कोकिळेच डोकं फिरलाय का जरा, असं चिडचिड करत त्या स्वगतात बोलत राहिल्या! खरोखरच कोकिळेने उच्छाद आणला होता. किती ओरडाव त्याला काही सुमार? मग आज्जी जरा लोळत राहिल्या. उठून करायचं तरी काय हा प्रश्न होताच. त्या खिडकीपाशीं उभ्या राहिल्या तेव्हां चार वाजले होते. ज्या बेडरूम मधून रस्ता दिसतो ती माझी, हे त्यांनी ब्लॉक ताब्यात घेताना ठणकावून सांगितले होते. त्यामुळे संबंध रस्ता दिसेल अशीच बेडरूम त्यांना मिळाली होती. दुधवाल्यांची, पेपर वाल्यांची धांदल एरवी पहाटे चारलाच सुरू व्हायची. आणि अगदी पहाटे सुद्धा खिडकीत उभे राहून बर्वे आज्जींचा वेळ जायचा!

    गेले तीन आठवडे मात्र सगळं स्तब्ध झालं होतं. पहाट काय आणि दुपार काय, रस्ता निपचित पडलेला असायचा. एखाद्या मृतवत अजगरासारखा! बर्वे आज्जीना त्या कल्पनेनेच अंगावर काटा आला. त्यांनी कानोसा घेतला. स्वैपाकघर सोडून पुढे लेकाची बेडरूम होती. तिथे तर सकाळी सात वाजता देखील जाग नसायची,त्यामुळे पहाटे चार ही त्यांच्यासाठी मध्यरात्रच होती. 
चहा करावा का? मनाजोगती भरपूर साखर घालून चहा प्यायचा चांगला चान्स होता.
आज्जीच्या मनात द्वंद्व सुरू झालं. आत्ता पासून स्वैपाकघरातला लाईट लागला की  सुनबाई स्वप्नात सुद्धा चिडचिड करतील, काय तर म्हणे दाराच्या फटीतून स्वैपाकघरातला प्रकाश बेडरूम मध्ये जातो आणि झोप डिस्टरब होते.
बरं आपल्या हातून बिन आवाजाच काम हल्ली होतं का?  नाही!!!!
एखादतरी भांड हातातून पडतच पडतं  आणि मग चिरंजीवांचा सय्यम संपतो. एकूण काय अजून तास भर थांबून पाच वाजायची वाट पाहणे. आणि नंतर चहा ठेवणे.
आज्जी पुन्हा आडव्या पडल्या. आणि चक्क त्यांना गाढ झोप लागली. 
त्यांना इतकी गुंगी आली की साडेसात वाजले तरी त्याना पत्ता नव्हता. त्यांच्या कानाशी कुणीतरी गुणगुणल्या चा भास झाला, त्यांना झोपेत वाटलं ही कुठली हिंदीत गाणारी कोकिळा? 
त्यांनी डोळे उघडले तेव्हा चक्क ऊन पडलं होतं. त्या नियम विसरून ताडकन उठून बसल्या आणि क्षणात त्यांना गरगरलं, त्यांनी डोळे मिटून घेतले, चक्कर थांबल्यावर त्या हळूहळू उभ्या राहिल्या.
 स्वैपाकघरात त्यांची हिंदी कोकिळा गुणगुणत एकीकडे चहा करत होती आणि दुसरीकडे
मोबाइल वर कुणातरी खानाचा कुठलातरी खजिना उघडून नाश्त्याची हिंदी पाककृती करत होती!   
आज्जी हळू हळू चालत बाहेर आल्यावर तिने लगेच त्यांना बिनसाखरेचा चहा दिला. आज्जीनी मनातल्या मनात तोंड वाकडं केलं आणि फक्त त्या एवढंच म्हणाल्या, "खारी बिस्किटं नाहीत का?"
सुनबाई उत्तरल्या "काल चार पाच दुकानं शोधून झाली,कुठेही खारी मिळाली नाहीत.सगळीकडेच स्टॉक संपलेले आहेत."
चिंटू आणि चिंगी दोघेही डायनिंग टेबल पाशी दूध आणि सोबत क्रिम बिस्किट खात होते,ते दोघेही एकाच स्वरात म्हणाले, "खारी बिस्किटं कालच संपली. आज्जी, तुला मारी हवीत का?"
आता मात्र आज्जीनी तोंड वाकड केलं आणि म्हणाल्या "मुळीच नकोत मारी,मला हवी खारी" आणि पुढे सुनेच लक्ष नाही असे पाहून हळूच म्हणाल्या, "मला आजच्या दिवस क्रीम बिस्किटं द्या ना"
यावर दोन्ही नातवंडांनी डोळे मोठे करून आज्जीकडे पाहिलं.
आज्जीना डायबेटीस मुळे गोड द्यायचं नाही ही सगळ्या घराला सक्त ताकीद होती.
खारी खायला न मिळाल्याने दुःखी झालेल्या आज्जी नाश्त्याची चमचमीत तयारी पाहून मात्र जरा सुखावल्या.
सूनबाईंनि लॉक डाउन मधला प्रत्येक दिवसच सत्कारणी लावायचे ठरवलेले दिसत होते.
तशी सून बरी होती पण तिचा घरात पाय टिकेल तर शप्पथ! निमित्त मिळालं की चालली बाहेर! निमित्त मिळालं की चालली बाहेर!!
आज्जीना त्या चौघांनी बाहेर जायला अडचण नव्हती , त्यांना राग यायचा तो एकटे राहायला लागते याचा! 
खरंतर त्यांनाही मॉल मध्ये जायला आवडायचं, बाहेर खायला आवडायचं!
म्हणजे तशी त्यांची मजल इडली डोसा आणि फारफारतर पावभाजी या पलीकडे नाही जायची!
पण लेकाच्या मोठ्या गाडीत बसून  सगळ्यांसोबत जायला त्यांना हवं असायचं! खरंतर,पुढे जाऊन  त्याच्या शेजारी बसायची इच्छा त्यांना व्हायची. पण ती जागा सूनबाईंनी घेतली होती! बाहेर पडले की टुमकन पुढे जाऊन त्याच्या शेजारी बसायची. 
मनातून त्यांना इतका राग यायचा,पण इलाज नव्हता. 

त्यांना, मॉल मध्ये फिरून पाय दुःखतील, तिथली गर्दी सोसणार नाही,रात्री उशिर होईल अशी कुठलीतरी कारणे सांगून घरीच थांबायला लावायचे आणि स्वतः जायचे निघून. "आम्हाला जेवणात धरू नका" असा निरोप देत!

आता गेलें तीन आठवडे मात्र त्या सगळ्यांचीच तोंडं दुरमुखलेली होती, पण आज्जी खुशीत होत्या. 
तर काय! सगळे घरी! बरी शिक्षा झाली!!!

आणी सगळ्या कामवाल्यांना सुट्टी देऊन, सुनबाई स्वैपाकात दंग, अगदी मोबाइल पाहात केलेली पाककृती का होईना, पण ती छानपैकी अडकली होती! 
वाढतं वय आणि त्याबरोबर वाढणाऱ्या डायबेटीस मुळे बर्वे आज्जी अंथरुणाला खिळल्या आणि आजोबांच्या मृत्यनंतर तर त्यांचा  बाहेरच्या संपूर्ण विश्वाशी होता नव्हता तो संबंध तुटला! 
त्यांचं विश्व आता फक्त घरापुरत उरलं होतं. बाहेर एकटीला जातां येत नसल्यामुळे, त्यांना एकट्याला टाकून घराबाहेर जाणाऱ्या सगळ्यांचाच त्यांना राग येई. सून बाई आणि मुलगा नोकरी निमित्त बाहेर जायचे,तेव्हा काही बोलता येत नसे पण मग ती संधी सुट्टीच्या दिवशी  त्यांना सोडून सगळे फिरायला बाहेर जायचे तेव्हा आज्जीना मिळायची.ती मंडळी फिरायला बाहेर पडली की मात्र त्या जी काही बडबड करायच्या त्याला सुमार नसायचा.

आजींच्या मागे क्वांरन्टीन  कधीचेच लागले होते आणि त्यामुळे आपोआपच होणारे सोशल डिस्टनसिंग हे ही त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनले होते.

त्यामुळे लॉक डाउन सुरू झाला तेव्हा घरातली एकमेव आनंदी व्यक्ती होत्या बर्वे आज्जी  कारण त्यांचा एकटेपणा, तात्पुरता का होईना पण दूर झाला होता.नातवंडं अवती भवती असायची. सुनबाई काही ना काही खास पदार्थ बनवायची.बंद दारामागे काम करत का होईना, पण चिरंजीव घरात असायचे.घर कसं भरलेलं असायचं.

घरात आता कामाची रोजची धांदल असायची.
लॉक डाउन जाहीर झाल्यावर कामाला बायका येत नसल्याने, घरातल्या सगळ्यांनी कामं वाटून घेतली होती. स्वैपाक आणि वॉशिंग मशीन लावणे सुनबाई, केर लाद्या चिरंजीव, भांडी घासणे चिंटू, आणि फर्निचर पुसायचे काम चिंगीने घेतले होते.
ते ठरवताना आज्जीना मात्र कुणीही कुठलेच काम सोपवले नव्हते. त्यांच्या सततच्या आजारपणामुळे त्यांनी घरातलं काही काम करायचा प्रश्नच नव्हता.
    पाहिले काही दिवस खुपच मजेत गेले. पण दोन आठवडे झाल्यावर  हळूहळू आज्जीच्या हे लक्षात आलं की या सततच्या अवतीभवती वावरणाऱ्या माणसांमुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर खूप बंधनं आली आहेत.
एरवी कसं व्हायचं सुनबाई आणी चिरंजीव ऑफिसला गेले की आज्जींच अर्ध राज्य सुरू व्हायचं आणि एकदा मुलं शाळेत गेली की त्या संपूर्ण घरावर बर्वे आज्जींची पूर्ण सत्ता चाले!!
काम करणाऱ्या बायका यायच्या, पण त्यांच्याकडून कामं करून घेणे आणि त्यांना कुठल्यानं कुठल्या गोष्टीवरून सतत ओरडत राहणे आणि आजूबाजूच्या घरातल्या बातम्या काढून घेणे हा तर आज्जीच्या विरंगुल्याचा मोठा क्षण असे.
आणि एकदा का सगळ्या कामवाल्या येऊन गेल्या की मग मात्र आजी खऱ्या अर्थाने मुक्त होत.
हळू हळू चालत त्यांचा,घरात सर्वसंचार चालू होई.
प्रथम त्या स्वैपाकघरात जाऊन कंबरेवर हात ठेवून कोपरा न कोपरा पाहात, सूनबाईंच्या खोलीत जाऊन तिथेही निरीक्षणाचा कार्यक्रम चाले.
एरवी, फिरण्याइतकी ताकद त्यांच्यात नसली तरी घरातले स्वातंत्र्याचे तास  सुरू झाले की कुठून कोण जाणे पण त्याना बळ येई.
दुपारचे जेवण जेवून झाल्यावर हॉल मध्ये बसून टीव्ही वरच्या मालिका पाहणे आणि दुपारच्या झोपेनंतर लेकीला किंवा माहेरच्या कुठल्याही व्यक्तीला फोन करून मनसोक्त गॉसिप करणे हा ही कार्यक्रम रोज चाले.
साडेतीनच्या चहामध्ये त्या सकाळी न मिळालेल्या साखरेची भरपाई करायच्या.
साडेचारच्या सुमाराला त्यांना काहीतरी तोंडात टाकायची तीव्र इच्छा होई.
मग त्या हात लांब करून एकेक बरणीचा शोध घेत. फरसाण, शेव,खारी बुंदी इतकंच काय पण मुलांसाठी आणलेली क्रीम बिस्किटे सुद्धा आज्जींच्या तावडीतून सुटत नसत.
त्यांच्या दिनक्रमातली शेवटची मालिका पाच ते सहा या वेळात असे. ती एकदा झाली की सव्वा सहा वाजता मुलं यायच्या सुमाराला त्या पुन्हा पलंगावर आडवे पडून थकल्याची पोझ घेत घेत झोपून जायच्या.

लॉक डाउन मध्ये मात्र आज्जीच्या या सगळ्याच दिनक्रमाला मोठा तडा गेला होता. कल्पनाही केली नव्हती    इतकी बंधनं अज्जिंवर येऊ लागली. 
स्वातंत्र्याला चक्क सुरुंग लागला होता.
सूनबाईंच्या खोलीत जाऊन हेरगिरी करणे,मुलांची कपाटे उघडून पाहणे हे आता अशक्य होऊन बसले 
कामवाल्या येत नसल्याने कुणावरतरी दादागिरी करणे आणि आसपासच्या ताज्या बातम्या काढून घेणे हे मुश्किल झाले. बाहेरच्या हॉल मध्ये बसून अनिरबन्ध टीव्ही पाहणे आणि मांडी घालून त्यावर टेलिफोन ठेवून तासनतास बोलणे यावर बंधनं आली.
काही तोंडात टाकायची इच्छा झाली की स्वैपाकघरात जाऊन अबरचबर खाणे बंद झाले. 
आणि सगळ्यात मोठी पंचाईत झाली होती ती गोड खाण्याची. 
लपून छपून गोड खाण्याची संधी तर आता हातातून गेलीच होती. अज्जिना गोडाचे डोहाळे लागले होते.दिवसभर सुनेच्या देखरेखीखाली साखरेचा कणही त्यांच्या जिभेवर पडत नसे. काय करावे अज्जिना काही सुचेना. 

पहिला लॉक डाउन संपून आता दुसरा सुरू झाला होता आणि त्यामध्ये काही नियम शिथिल केले होते. संध्याकाळी पाच ते आठ या वेळा, काही मर्यादा पाळून बाहेर जाण्यासाठी ठेवलेल्या होत्या.

एका संध्याकाळी,मुलं खूप कंटाळली आहेत या सबबी वर सुनबाई आणि चिरंजीव बाहेर जायला निघाले.
यावेळी त्यांनी कधी नव्हे ते आज्जीना सुध्दा विचारले. 
बाहेर जायची आयती चालून आलेली संधी बर्वे आज्जी सोडणे शक्य नव्हते.
पण निघताना त्यांना अचानक एक भन्नाट कल्पना सुचली,आणि अचानक त्यांनी थकवा आल्याचा अभिनय सुरू केला. "चिंटू अरे मी जरा पडते. बाबाला सांग आज्जी काही बाहेर येत नाही,मला जरा बरं वाटत नाहीये"
चिंटू ने हा निरोप सांगता क्षणी सुनबाई आणि चिरंजीव त्यांच्या खोलीत विचारपुस करायला आले.
    "आई,काय होतंय तुला? चक्कर वगैरे नाही ना येत? नाहीतर आम्हीसुद्धा नाही जात बाहेर. तुझ्या सोबत थांबतो" धास्तावलेल्या स्वरात चिरंजीव म्हणाले
    यावर आज्जी गडबडल्या "नाही नाही रे. चक्कर वगैरे नाही अजिबात आली. पण थोडा थकवा वाटतो आहे त्यामुळे जरा पडते. तुम्ही या ना जाऊन. मी पडून राहणार आहे. तुम्ही मात्र अगदी सावकाश या"

    मंडळी घराबाहेर पडता क्षणी,आज्जीनी फोन करून समोरच्याच रस्त्यावरच्या ओळखिच्या दुकानदारांकडून बिस्किटं, चॉकलेट, गोळ्या, फरसाण, शेव वगैरे मागवून घेतले. आज्जी ज्येष्ठ नागरिक असल्याने दुकानदारानेही खास माणूस घरी पाठवून अक्षरशः दहाव्या मिनिटाला सगळे सामान पाठवले , आज्जीनी ही सर्वांचे पैसे त्याच्या हातात देऊन विषय तिथेच संपवला. 
   "चला,नवीन लॉक डाउन मधली माझी निदान खायची सोय आता झाली" असं म्हणत सर्व सामान त्यांनी त्यांच्या खोलीतल्या पलांगाखलच्या गुप्त जागेत लपवून ठेवलं पण त्या आधी त्यातलं एक चॉकलेट स्वतःच्या तोंडात टाकायला त्या विसरल्या नाहीत. 
त्या भलत्याच खुशीत होत्या कारण त्यांच्या खोलीतले त्यांचे स्वातंत्र्य तर अबाधित होते ना. तिथे दरवाजा लावून त्या निदान खाण्यापिण्याची चंगळ करू शकणार होत्या. त्यांच्या जिभेवर चॉकलेट विरघळत असतानाच दरवाजा उघडल्याचा आवाज आला. 
मंडळी आली की काय इतक्यात असे म्हणून आजी सटपटल्याच. नशीब सामान लपवून झालं होतं. त्यांना जमेल तितक्या वेगाने चालत  त्यांनी पलंग गाठला आणि प्रसंगावधान राखून त्यांनी झोपेचे सोंग घेऊन डोक्यावरून पांघरूण घेतले. त्यांना पावलांचा आवाज ऐकू आला.
    "आई ला झोप लागलेली दिसते आहे. तिच्या तब्येतीकडे आपलं दुर्लक्षच होतंय. तिला सारखा थकवा येतो हे बरोबर नाही" चिरंजीव सुनबाईना सांगत होते.
    "अरे डायबेटिक लोकांना कधिकधि असा थकवा येतो त्यातून त्यांचं वय ही झालंय ना. आणि त्या मधन मधन पथ्य मोडतात हे तुला माहिती आहे का? मग शुगर कमी जास्ती झाली की येतो थकवा." सुनबाई अलिप्तपणे म्हणाल्या.
    चिरंजीव आज जरा जास्तीच भावनाविवश झाले होते. "ते काही नाही. आता पुन्हा तीन आठवड्याचा लॉक डाउन आहेच तो आता आपण आईवर केंद्रित करूया. आपण सगळे घरी आहोत. 

आपण एक काम करू चिंगी आणि चिंटू दोघांनाही आजपासून आजीच्या खोलीत शिफ्ट करूया. ते दोघे तिच्या सोबत राहतील तिथेच बसून त्यांचा अभ्यास सुध्धा करतील. म्हणजे तिला एकटं वाटणार नाही आणि तिच्यावर लक्ष ही ठेवलं जाईल. मग बघू कशी मोडते पथ्य ते".

    आज्जीनी पलंगाखाली दडवून ठेवलेल्या पिशव्यांकडे एक करुण नजर टाकली आणि पांघरुणातल्या पांघरुणात कपाळाला हात लावला. 

योगिनी श्रीनिवास पाळंदे

1 comment: