धूसर धूसर दापोलीची आजोळवाट, लालीलाल धुरळा, लालीलाल नेत्रकडा.
जर्द-लालूस वाटा, सोबतीला समुद्री निळाई, डोंगर प्रदक्षिणा करत थेट कडा!!
अंजरल्याच्या कड्यावरचे गणेशदर्शन!! आणि आता अख्तरीबाई चिपळूणास रवाना!!!!!!!!
सात-बुटक्या(?) आता हिमगौरीला(?) भेटायला उत्सुक!!!!
योगु प्रचंड एकसाईटेड, शिवांगीला (हिमगौरीला) भेटायला.
तिनेच शोधून काढलंय ना तिला!!!!
चिपळूण गाठायला आठ, शिवांगी भेटायला नऊ, जेवायला दहा आणि मुचरीला पोचायला रात्रीचे अकरा!!!!
गाडी सुसाट, घनगर्द जंगलवाट, मिट्ट-काळोखी रात्र, अर्धमिट डोळे. इतक्यात शिवांगी, "ते बघा लिटल इंडियन सिवेट (कांड्याचोर)"…….तो क्षण घट्ट पकडून मी अंधार फाडून पाहाते तो, रस्ता पार करणारे दोन अग्निगोल, एकच क्षण, पुढच्या क्षणी रानात लुप्त!!! माझ्या अंगावर जंगल शहारा!!!
काळोखात गच्च मिटलेलं जंगल, ओला दरवळ. उग्र रानवास,जंगल-जाणीवा जागृत करणारा..
फायनली दोन्ही गाड्या, मुक्कामी!!!! मुचरी
मध्यरात्रीच्या गृह-प्रवेशाची किती ती तयारी!! सारवलेल्या जमिनीवर शुभ्र रांगोळी, त्यावर डुलडुल पणतिच्या ज्योती!! मानलं शिवांगी तुला. पुण्याहून स्वागताची रिमोट मॅनेजमेंट!!! प्रशस्त स्वागतासाठी उत्सुकलेलं दातारांचं घर!!! शिवांगी प्लस दोन्ही मुलगे अशी दातार सरबराई, आणि संकोचलेल्या आम्ही सातजणी.
शिवांगीच्या जंगलात सारे सारे गाढ निद्रिस्त!!!
जंगलातली सकाळ झाल्याची वर्दी देतो रानकोंबडा, कुणीच कधीच न पाहिलेला, जन्मात न ऐकलेल्या त्या आवाजाने शिवांगीचं जंगल वेलकम करतंय!
आ हा हा हा काय तो हिरवा सोहोळा. शब्द खुंटलेले!
घर चक्क जंगलाच्या मिठीत!!
सगळ्या इंद्रियजाणिवा एकवटल्यात, काहीच मिस करायचे नाहीये. हा अनुभव, नेहेमी मिळणारा नाही.
प्रशस्त व्हरांड्यात सारे उभे, जिभेवर वाफाळता चहा, नाकाला सूक्ष्म रानदर्प, कान शिवांगीला ऐकण्यात गर्क.
लालीलाल सारवलेल्या गेरु-व्हरांड्यात रान-झुली-झोपाळा, अंगणात तुळशी वृंदावन, त्यापुढे छोटूलं तळ त्यात गुलबट कमळ, शेजारी गोल घुमटासारखी कनात, उर्फ विहिरीचं एकेकाळचं आच्छादन.
कनाती खाली सेटी उर्फ झाडाची ताशीव खोडं, पावसात उन्मळलेल्या पिंपळाचे देहदान!!!
कनाती खाली निर्जीव पिंपळाचे सजीव शिल्प!! लाजवाब पुनःरवापर-आपलं रिसायकलिंग हो.
कनातीला कुठल्याशा वेलींचा गुलाबी विळखा, नाजूकलेला!!
आता, वृक्ष परेड बाय शिवांगी, आम्ही सावधान!!!
उद…देवासमोरचा, सागरगोटा….लहानपणीचा मोह….रसाळ मदिरेचा कुंचा..घर झाडायचा वाळा…सरबताचा, डिकेमाली तान्ह्या बाळाचा.
सोबत सीता अशोक, बेल, दासवण (दुर्मिळ) आणि कोष्ठ कुळींजन.
आमचा कोकण अभिमान जमीनदोस्त!! पंचवीस आम्हाला परकी (?) झाडं!! आंबा काजू फणसा पलीकडे आम्ही कुणाला ओळखतच नाही.
धडे वाचावे तसे शिवांगीचे घाड, घाड वृक्ष वाचन!!!!! शेजारून पक्ष्यांचे वनगायन!!!!
जंगल ध्यासापायी, शिवांगीने इकॉलॉजीकल सोसायटी चा दीड वर्षाचा कोर्स केलेला, लेक्चर संपवून घरी आल्यावर शेखरसोबत चर्चा, शेखर यांच्या झपाटलेल्या अभ्यासाने कोकणवासीयांनाही माहीत नसलेली कोकणातल्या जंगलातली वीस प्रकारची झाडं, पुण्यातल्या नर्सरी मधून घेऊन, त्या बाळांना जगवुन, मोठं करून मुचरीच्या जंगलात रिप्लान्ट केलेलं.
हे असलं वेड लागलेली ही कलंदर माणसं, स्वतः सोबत इतरांची आयुष्यही बहरवणारी.
जंगल हे अपत्याप्रमाणे जपायचे आहे तर तिथलं कुणीतरी हवं ना त्याला सांभाळणार.
मग विशाखा वैभव आणि त्यांच्या कन्या, जणू दातार फॅमिलीचाच भाग बनून जातात.
विशाखावैभवकडे आमची पोटपूजा!!! शिवांगी तिच्या जंगल मनोगतात या दोघांना विठ्ठल-रखुमाई म्हणते!
शिवांगीची जंगलकथा, जणू सृष्टी-संतांची गाथा. ती सांगतीये आम्ही थक्क. संत देवभक्तीत निरपेक्ष, दातार निसर्ग-निरपेक्ष!!!
(कलमी आंबा, काजू लागवड मॉनेटरी रिटर्न्स????? किंवा प्लॉट पाडून शहरकर्यांना विकणे (अशावेळी शहर ही शिवी वाटते) छे छे छे!!!!!!
कॉर्पोरेट कपल चंद्रशेखर-शिवांगी यांचं हरित सहजीवन, दोन्ही मुलांची हरितच जातकुळी.
दोन कोटींचे सेकंडहोम..तीस एकर जंगलाचे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट-असीम आनंद!!!!! आनंद!!!! आनंद!!!! जंगल संवर्धन, निसर्गाचं देणं त्याला सव्याज परत करायचा ध्यास!!!
जंगल-जैव विविधतेने नटलेले, बहरलेले, फोफावले, अस्पर्श, घनदाट!!!!!
आम्ही काट्या कुट्यातून धडपडत चालतोय, कंच रान-वाटा तुडवत.
कसलेल्या धाकट्या दाताराच्या हातात कोयता, फक्त वेलविळखा मोकळा करायला.
पाय गुंतवी, काटेरी झुडूप माया!!! जंगल कुरवाळतय जणु.
मोठ्या कातळडोहा पासून दातारांचं जंगल सुरू. आता चढाची ट्रेड-मिल. कानाला सळसळ, रानकिड्यांच्या कॉलशी सुद्धा समस्त दातारांची ओळख!!
चाहूल लागताच, लपलेल्या रानकिड्यांचे धोका-कॉलस सुरू, पावलं पुढे गेली की अरण्य शांतता!!!
आम्ही साऱ्या निसर्ग-चकित!!! कुठून कुठून बघतेय जंगल आमच्याकडे. "जखम द्यायला तर नाही ना आलात?"
जंगलाचा विशाल हजेरीपट- मोठी झाडे-48 प्रकार, झुडुपे-19 प्रकार, छोटी झुडुपे-11 प्रकार, गवत- 3 प्रकार, नेचे- 2 प्रकार आणि महाकायवेली-17 प्रकार. हा सारा हिरवा गोतावळा, तीस एकरावर पसरलेला! आमचं चालणं संपतच नाहीये. ओबडधोबड रानवाटा म्हणजे पावलांची परीक्षा.
रिबॉक, नाईकी सगळे ठणाणून बोंबलतायत, असे चढ-उतार.
चढताचढता एक शहाणं पठार, तिथल्या दगड सोफ्यावर काहींची शरण-पथारी.
आमची मात्र हाव मोठी, हपापलेली क्षुधा दिठी!!
आता ट्रेड-मिलचा स्लोप अधिकच तीक्ष्ण, करडी श्वास-परीक्षा तीव्र चढ आणि जडावलेले पाय.
जंगल विळखा अधिकच घट्ट होतो, खूप खूप घनदाट, डोळ्यांत जणु हिरव्या काचाच!!!
आयुष्याच्या अंताला नेणारी चढण!!
आम्ही मिटल्या तोंडाने, लटलट पायाने
ध-पा-पा छातीने, घर्मपावन कायेने आणि निर्विचार मनाने चढतोय.
ते म्हणतात ना काया-वाचा-मने तसलाच की हा प्रकार.
दातारांच्या जंगलाचा हा कळासाध्याय
अखेरीस माथा!!!!! तिथला तो महदविशाल, प्रचंड आम्रतरु, शतफुटी त्याचा घेर, सृष्टी साधकांना कवेत घेणारा.
असीम शांत शांत शांत शांतता!!!
शरीर-कोसळ शांतता, फक्त अंतरात्म्याचा आवाज,धक-धक-धक, मी क्षणशरण! शरीर शरण!! मी डोळ्यांनी जंगल भिजवते!!
लखलखीत चिरंतन सत्य! मी त्याच्यात आणि तो माझ्यात!! एकमिट तादात्म्यता!!!
कितीतरी क्षण सगळ्याजणी निःशब्द स्तब्ध, भावनांपालिकडे नेणारा अध्यात्मिक अनुभव!!!
काही क्षणांनी निःशब्दतेला वाचा फुटलेली!!
थँक्स गिविंगची!!!
एक कृतज्ञ कटाक्ष शिवांगीसाठी.
माझ्यातलाच परमात्मा मला भेटवल्याबद्दल!!!
हलक्या शरीराने आम्ही उतरत असतो, काटे टोचत नाहीत, त्यांची स्पर्श-मखमल हुळहुळवत असते.
ज्युनिअर दातार सांगतो तुम्ही सारे कॅमेराकैद आहात. आम्ही अचंबित!!! म्हणाला रात्री दाखवतो गम्मत!
रोमारोमाला झालेला जंगल-स्पर्श पुसणारी अंघोळ!! करायलाच नकोय!! पण करायला हवीच ना!!!!!
मग पुन्हा विशाखाच्या घरी चुलीवरचे चविष्ट जेवण.
आम्ही बागडतोय, अगदी गोठ्यातजाऊन कालवडीलासुद्धा कुरवाळतोय. घराच्या बांधावरची फुलं किती टपोर-बहरलेली!! प्रतिमाची फोटोबाजी दणक्यात.
ग्रामस्थाच्या भेटीची संध्याकाळ.
शिवांगी सहजतेने जणू त्यांच्यातलीच एक.
रात्री शिवांगीची फॉर्मल मुलाखत आणि कॅमेराकैदेची, ताणलेली उत्सुकता.
कॅमेरा मधून लॅपटॉप वर कॉपी होणारे फोटो, उलगडतायत!!!
अंगावर सरसरीत काटा!!!
भाला-काटे रोखून सालींदर फॅमिली!!
भेकर, रानकुत्र्यांची शिकारी टोळी!!
हरणं बावरी भोळी! रानडुक्कराची तीक्ष्ण सुळी! आणि!!!!!
शेवटी धिप्पाड रानगव्यांची पाळी!!!
"काकू आपल्या जंगलात काल रात्री आलेल्या प्राण्यांचे फोटो आहेत बरं का हे!!"
माझ्या समाधीझिंगेचा अनास्थेशीया उतरून दरदरून फुटलेला घाम. म्हणजे??? आपण जिथे सकाळी फिरलो तिथले हे फोटो????
"हो, आपले सुद्धा आलेत ना फोटो. तुम्ही सात, आम्ही तीन. कॅमेरा ट्रॅप आहेत हे. कुठलीही हालचाल झाली की फोटो काढला जातो. दोन महिन्यातून एकदा कार्ड वरील डेटा लॅपटॉप मध्ये घेतो. आज कॅमेरे काढून आणले आहेत. आत्ता पर्यंत 21 प्रकार चे पक्षी आणि 15 प्रकारचे प्राणी कॅमेरा ने टिपले आहेत. बिबटया सुद्धा कॅच झाला होता एकदा!"
मला रात्रीच्या थंडाव्यातही घाम!!
पण वेगळ्या अनुभवाचं आगळं समाधानही.
आता रात्री विशाखाकडे खास कोकणी वड्यांवर ताव आणि त्यांनतर कनातीच्या घुमटाखाली शिवांगीची मुलाखत सुरू.
क्रमशः....

सुंदर����
ReplyDelete